अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४६)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राची आनंदाची बातमी नयना ताईंना समजते. त्यांना खूपच आनंद होतो. सगळं काही विसरून पुन्हा एकदा घरात जणू आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता पाहुयात पुढे...

"आई अगं आठ दिवस होत आले तरी अजून कोणीच मला साधा फोन सुद्धा केला नाही की, 'जाऊ दे निलम झालं गेलं विसरून जा ये घरी परत.' निलम काकी माहेरी तिच्या आईजवळ बोलत होती.

"आपण घेतलेल्या निर्णयाने पुन्हा आपल्यालाच पश्र्चाताप होत असेल तर आधीच काही गोष्टी टाळाव्यात ही एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला?" आईने लेकीलाच दोन समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.

"ठेव... तूही मलाच नावे ठेव. तसंही कोणाला काहीच पडलेली नाहीये माझी. तुझ्या जावयाने सुद्धा माझ्यावर त्या दिवशी पहिल्यांदा हात उचलला. त्याचेही तुला काहीच वाटले नाही. लेकीची खरंच काळजी असती तर जावयाला एखादा फोन करू जाब विचारला असता."

"आपलंच नाणं खोटं असेल तर कोणाला काय बोलणार मी निलम. अगं तो सोन्यासारखा माणूस तुझ्या आयुष्यात आहे म्हणून इतके दिवस टिकलीस तरी त्या घरात. नयना ताईंसारखी जाऊ भेटायला सुद्धा नशीबच लागतं. आणि शकुंतला आजीसारखी समजून घेणारी प्रेमळ सासू सगळ्यांच्याच नशिबी नसते ना."

"आई तू नेमकी कोणाच्या बाजूने आहेस गं. तुझी लेक भांडण करुन माहेरी आलीये आणि तू लेकीच्या बाजूने उभं राहायचं तर माझ्याच सासरच्यांचे गोडवे गात आहेस."

"हे बघ जे खरं ते मी बोलले. आठ दिवस तुझं सगळं ऐकून घेतलं ना मी, मग आता तू माझं ऐक नको तिथे जास्त डोकं लावत जाऊ नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तूही थोडं त्यांच्या मनाप्रमाणे वाग म्हणजे तेही सगळेजण तुझे मन जपतील आणि त्या घरची धाकटी सून आहेस तू. थोडं तरी जबाबदारीने वाग. म्हणजे सगळं व्यवस्थीत होईल की नाही बघ."

"बस झालं आई...आता तू माझ्या सासूसारखं बोलू नकोस आणि काही गरज नाही मला तुझ्या मदतीची मी माझी समर्थ आहे माझे प्रॉब्लेम सॉल्व करायला." असे बोलून तणतणत निलम आत गेली आणि पाचच मिनिटात तिची बॅग घेऊन बाहेर आली.

"आता तुला आणखी त्रास नाही देणार आणि पुन्हा तुझ्याकडे असं हक्काने मुक्कामी येताना निदान दहा वेळा तरी विचार करेल आणि येणार तर नाहीच मी तो भाग वेगळा. जाते मी." असे बोलून रागातच निलम काकीने माहेरचा उंबरा ओलांडला.

"निलम...निलम अगं जेवण तरी कर...दुपार झालीये. थोडं ऊन कमी झाल्यावर मग जा."
आईचा जीव वेड्यासारखा लेकीसाठी तळमळत होता पण निलम काही थांबली नाही.

"देवा सद्बुद्धी दे रे बाबा हिला. आई म्हणून हिला घडविण्यात मी कुठे कमी पडले ते तुलाच ठाउक." असे बोलून निलमची आई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बराच वेळ तशीच उभी राहिली. आईच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली होती. लेक दिसेनाशी झाली तशी पदराने डोळे पुसत ती माऊली तशीच आत निघून गेली.

ह्यावेळी पहिल्यांदाच निलम आठ दिवस माहेरी जाऊन राहिली होती. रागाच्या भरात महेशरावांनी तिच्यावर हात उचलला होता हीच गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती. शेवटी आईनेही लेकीचीच चूक दाखवली त्यामुळे निलमला आईचा देखील प्रचंड राग आला.

थोड्याच वेळात निलम तिच्या घरी पोहोचली. नेत्रा,आजी आणि नयना ताई तिघीही जेवणच करत होत्या. तिघींनीदेखील निलमला पाहून न पाहिल्यासारखे केले. खरंतर रागाच्या भरात ती तिथून न जेवताच निघाली होती. त्यामुळे तिलाही खूप भूक लागली होती. कोणीतरी म्हणेल की, 'बाई जेवलीस का?' पण तसे काहीही झाले नाही. ती तशीच हातपाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली.

जेवण झाल्यावर नेत्रा तिच्या खोलीत गेली आणि पुस्तक साच्ट बसली. नयना ताई हॉलमध्ये पेपर वाचत बसल्या आणि आजी त्यांच्या आवडीची सिरियल बघत बसल्या होत्या.

थोड्याच वेळात निलम तिच्या खोलीतून बाहेर आली. तिला खूपच भूक लागली होती. त्यामुळे जेवणासाठी ती ताट वाढून घ्यायला गेली. पण अर्धी पोळी आणि थोडीच भाजी शिल्लक होती. ते पाहून तिचा आणखीच मनस्ताप झाला. आता इकडे कोणाला थोडीच माहीत होते की निलम येणार आहे.

'आई म्हणते ते बरोबर आहे, मी आधी विचारच करत नाही कोणत्या गोष्टीचा. तडकाफडकी निर्णय घेते आणि मग अशी पश्र्चाताप करण्याची वेळ येते माझ्यावर. आता आले तिथूनच जेवण करून तर काही बिघडलं नसतं पण नाही दरवेळी माझी अक्कल शेण खायला जाते.' आता निलमला स्वतःचाच राग येत होता.

तसाच राग आवरत तिने स्वतःसाठी भाकरी बनवून घेतली. थोडी भाजी होती, त्यातच तिने कसेबसे भागवले.

इकडे घरात सर्वांनीच ठरवले होते, निलम आल्यावर कोणी तिला काहीच बोलणार नाही. तिला वाद घालण्याची संधीच आपणच निर्माण करू द्यायची नाही. तसे काही झालेच तर आपणहून माघार घ्यायची. समोरचा जर बदलत नसेल तर आपणच आपल्यात बदल करायचा असे आजीने सर्वांना सांगून ठेवले होते. आतापर्यंत आजीला वाटत होते की बोलून, वेळीच समज देऊन हीच्यात सुधारणा होईल पण इतक्या वर्षात ते काही शक्य झाले नाही. म्हणून आजीनेच बदलायचे ठरवले होते आणि घरात सर्वांना त्या दृष्टीने बदलायला सांगितले.

आजीचा प्लॅन हळूहळू वर्क आऊट होताना दिसत होता.

बघता बघता नेत्राला तिसरा महिना संपत आला. आता हळूच पोट बाहेर डोकावू लागले होते. चेहऱ्यावर वेगळेच तेज उमटले होते. पहिल्या तीन महिन्यात तिला प्रचंड त्रास झाला. पण  घरात सर्वांनी मिळून तिची खूप काळजी घेतली. हर्षुनंतर इनामदारांच्या घरात जन्माला येणारे हे पहिलेच बाळा असणार होते, त्यामुळे प्रत्येकाचा आनंद चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. जो तो आपापल्या परीने नेत्राची काळजी घेत होता.

आयुष्य हे असेच असते. सुरुवातीपासून नात्यांचे सुख तिला कधी मिळालेच नाही. पण म्हणतात आयुष्याची सर्व सूत्र ही वरच्या त्या परमेश्वराच्या हाती असतात, हे काही खोटे नाही. लग्नाआधी नेत्राने जो काही त्रास सहन केला होता त्याबदल्यात आता तिच्या आयुष्यात हा सुखाचा वर्षाव सुरू होता. नात्यांची श्रीमंती तिच्याकडे भरभरून होती.

एका अनोळखी वाटेवर भेटलेली एक अनोळखी व्यक्ती नेत्राच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने रंग भरते आणि दोन अनोळखी दिशा एक होऊन आयुष्य अगदी रंगीबेरंगी करुन टाकतात.

हर्ष म्हणजे नेत्राचा हक्काचा मित्र, प्रियकर आणि आता तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तिचा नवरा... तिच्या आयुष्याला योग्य वळण देणारा जणू एक जादूगारच ठरला होता. खऱ्या अर्थाने हर्षच्या रुपात भेटलेली एक अनोळखी व्यक्ती आज नेत्राचे सर्वस्वच बनली होती.

नेत्राचे आता ऑफिसला जाणे पुर्ण बंद झाले होते. कंपनीत कामाचा व्यापदेखील खूपच वाढला होता. त्यामुळे समीरला प्रमोशन देऊन महत्त्वाचा कामाचा भार माधवरावांनी आता त्याच्यावर सोपवला होता. समीर म्हणजे हर्षचा जणू उजवा हातच बनला होता. त्यामुळे हर्षदेखील निश्चिंत होता.

त्यातच नेत्राच्या बाबतीत हर्षच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या होत्या. सर्वकाही संभाळून तो नेत्राची देखील काळजी घेत होता. तिची औषधं, रेग्युलर चेक अप, सोनोग्राफीच्या तारखा याकडे त्याचे बारीक लक्ष होते. एक जबाबदार बाबा म्हणून तो देखील घडत होता.

अशातच आणखी एक आनंदाची बातमी घरात सर्वांना सुखावून गेली आणि ती बातमी म्हणजे आदित्यचे पुढचे सक्सेस. एक एक करत आदित्य आता यशाच्या आणखीच जवळ जात होता. अर्थातच त्याची मेहनत आणि हर्षुचा त्याला असलेला सपोर्ट सर्वच कामी येत होते.

"नयना अगं आदित्यचे सक्सेस आपण आपल्या घरी सेलिब्रेट करायचे का? आदित्यला घरी जेवायला बोलवायचं का? नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर." अंदाज घेत माधवरावांनी विचारले.

"आता माझी काय हरकत असणार आहे?"

"हेच थोडं हसून बोलली असतीस तर छान वाटले असते."

"चालेल ना मी कुठे नाही म्हटलं."

"नक्की ना..?"

"हो म्हटलं ना.. बोलवा."

का कोण जाणे पण नयना ताई अजूनही जणू आदित्यला जावई करून घेण्यासाठी मनापासून तयार नव्हत्या.

"आता मी कितीही नाही म्हटलं तरी तो आपल्या हर्षुचा होणारा नवरा आणि आपला होणारा जावई आहे."

नयना ताईंचे हे वाक्य ऐकून माधवरावांच्या चेहऱ्यावर आपसूकच हास्य फुलले.

फायनली नयना ताईंनी आदित्यचा जावई म्हणून स्वीकार केला होता.

"नयना...तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आदित्य खूप चांगला मुलगा आहे. त्याला सपोर्ट करणं ही आता आपली सुद्धा जबाबदारी आहेच ना."

काहीही न बोलता नयना ताईंनी होकारार्थी मान डोलावली. त्या दाखवत जरी नसल्या तरी आदित्यच्या यशाची बातमी ऐकून त्यांना खूपच आनंद झाला होता, हेही तितकेच खरे.

"उद्या रात्री बोलवूयात मग आदित्यला?" नयना ताईंनी विचारले.

"अगं तू म्हणशील तेव्हा. उद्या रात्री फायनल."

"फक्त हर्षुसाठी हे सरप्राइज असेल आणि तेही मी प्लॅन केलेले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मलाही जवळून पाहायचा आहे. गेल्या काही दिवसांत एक आई म्हणून तिला समजून घेण्यात मी खूप कमी पडलीये."

"अगं असं काही नाहीये नयना. तू उगीच असं काही वाटून घेऊ नकोस."

"असंच आहे. निलमच्या बोलण्यात येऊन मी चुकांवर चुका करत गेले आणि माझ्या लेकीच्या विरोधात उभी राहिले. तरी आई मला वारंवार सांगत होत्या, निलम पासून लांब रहा पण मी नाही ऐकले."

"नयना जाऊ दे ना आता तो विषय. झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण फक्त आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करायचा. त्यांच्या आनंदासाठी जगायचं. बाकी आणखी काय हवंय आयुष्यात? आता काही दिवसांत आपण आजी आजोबा होणार, किती आनंदाची गोष्ट आहे ही."

"अगदी खरं आहे तुमचं. बरं तुम्ही स्वतः आदित्यला फोन करून इकडे बोलवा आणि त्यालाही सांगा की कोणाला सांगू नको म्हणून. अगदी नेत्राला सुद्धा."

"हो...सांगतो."

"थॅन्क्स नयना...अशीच तुझी साथ कायम राहू दे. मग बघ सगळं कसं व्यवस्थित होईल." नयना ताईंचा हात हातात घेत माधवराव म्हणाले."

क्रमशः

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all