अनोळखी दिशा पर्व २ (भाग २४)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्रा आणि हर्षच्या ॲनिव्हर्सरीचे छोटेसे सेलिब्रेशन घरी आणि ऑफीसमध्ये देखील होते. त्यानंतर पुढे दोन दिवसांत हर्षुचा बर्थडे असतो. सोबत सत्यनारायण पूजादेखील. आदित्यने मात्र कार्यक्रमाला यायला हर्षुला स्पष्ट नकार कळवला. त्यामुळे ती नाराज होते. तुझ्या भावाला समजाव म्हणून ती नेत्राला सांगते. पण आदित्य अचानक येऊन हर्षुला सरप्राइज देण्याच्या विचारांत होता आणि आता हे समजल्यावर नेत्रा देखील त्याच्या प्लॅन मध्ये सामील होते.
आता पाहुयात पुढे...

"नेत्रा आवरलं का? अगं ब्राम्हण काका येतील पाच ते दहा मिनिटात. तू आणि हर्ष आवरुन तयार रहा बाई. पुन्हा ते आल्यावर गडबड नको व्हायला म्हणून आधीच सांगते." नयना ताई बोलल्या.

"हो आई आवरते, अजून फक्त दहाच मिनिटं द्या मला, येतेच मी आवरुन." नेत्रा म्हणाली.

तेवढ्यात हर्ष रूममधे येतो.

"अरे काय हे हर्ष... अजून तू असाच फिरतोयेस. तयार हो पटकन् आणि दोघेही आवरुन लगेच खाली या." नयना ताई म्हणाल्या.

"अगं आई, मला पाच मिनिटं पुरेशी आहेत आवरायला. आता आवरायला सुरुवात केली तरी तुझ्या सुनेच्या आधीच आवरेल माझे." नेत्राकडे पाहून डोळा मारत हर्ष बोलला.

"हो का.. बरं आवर आता पटकन्. उगीच गप्पा मारत बसू नका आणि लगेच खाली या." असे म्हणून नयना ताई खाली गेल्या.

"बायको.. बायको.. बायको...कसली गोड दिसतियेस यार तू.  किती दिवसांनी तुला आज असं साडीमध्ये पाहतोय."
आरशासमोर उभ्या असलेल्या नेत्राला पाठीमागून घट्ट मिठी मारत हर्ष बोलला.

"अरे काय हे हर्ष, सोड मला. सगळा मेक अप खराब होईल माझा. हेअर स्टाइल पण बिघडेल. आधीच किती मुश्किलीने तयार झालीये मी, माहितीये."

"हो का..होऊ दे मग मेक अप खराब आणि हेअर स्टाइल पण बिघडू दे..पुन्हा कर. हवं तर मी मदत करेल."

"त्याची काही गरज नाही. तेवढंच काम नाहीये मला आणि  आपल्याकडे वेळ पण नाही तेवढा. आताच आई काहीतरी सांगून गेल्यात, इतक्यात विसरला देखील."

"काहीच नाही विसरलो; पण समोर माझी बायको इतकी सुंदर तयार झालेली असताना सगळं काही विसरून जावंसं वाटतंय आणि तुझ्या मिठीत अलगद विरघळून जावंसं वाटतंय."

नेत्राच्या कानात हर्ष बोलला. तशी ती शहारली. त्याचा गरम श्वास तिच्या मानेवर जणू गुदगुल्या करत तिला स्पर्शून गेला. क्षणभर तिलाही मग त्याच्या मिठीचा मोह आवरला नाही. आरशासमोर डोळे बंद करून ती तशीच उभी राहिली. चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. हर्ष मात्र आरशातील तिचे सुंदर प्रतिबिंब डोळ्यांत साठवून घेत होता.

"यार खूप सुंदर दिसत आहेस तू." हर्ष बोलला आणि त्याने अलगद आपले ओठ नेत्राच्या मानेवर टेकवले. आता मात्र नेत्रा पुरती घायाळ झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या मिठीतून सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ती करू लागली.

"हर्ष, सोड ना.. अरे पाच मिनिटं अशीच वाया गेली. आवरुयात ना पटकन्. आपल्या दोघांनाही पूजेला बसायचंय हे विसरून चालणार नाही." नाजूक आवाजात नेत्रा बोलली.

"हो गं...पण समोर माझी सुंदर बायको उभी असताना मग मला सगळं विसरायला होणारच ना." आरशात नेत्राकडे पाहत हर्ष बोलला. लाजून नेत्राने मग नजर खाली झुकवली.

"दादा अरे आवरलं की नाही? या पटकन् बाहेर." तितक्यात बाहेरून हर्षुने आवाज दिला.

"बघ हर्ष..मी म्हणत होते ना तुला. आवर आता पटकन्. सोड मला." नेत्रा हर्षच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली.

"दोनच मिनिटात तयार होतो बघ मी. पण कोणता कुर्ता घालू मी?" कपाटातील कपडे वर खाली करत हर्ष बोलला."

"अरे अरे थांब...हे काय करतोयेस तू हर्ष? हे बघ इथे तुझा कुर्ता काढून ठेवलाय मी. सगळं कपाट अस्ताव्यस्त करण्याची घाणेरडी सवय काही जात नाही बघ तुझी."

"करतो सगळं नीट मी. तू काळजी करू नकोस. हे बघ असं ठेवू?"

"अरे बाबा राहू दे ते. तू तुझं आवर आधी. आता घाल हा कुर्ता पटकन्. ते मी करेल नंतर." हर्षच्या हातात कुर्ता देत नेत्रा म्हणाली.

"गुणाची माझी बायको. आता हे बटण पण लावून दे."

"तू पण ना. ये इकडे आणि सरळ उभा राहा." असे म्हणत नेत्राने हर्षच्या कुर्त्याचे बटन लावून दिले.

"थँक्यू बायको." नेत्राचे गाल ओढत हर्ष बोलला.

"देवा, उद्या खरंच आम्हाला जेव्हा बाळ होईल, तेव्हा कसे होणार माझे?" कपाळावर हात मारत नेत्रा बोलली.

"चला..आ एम रेडी." केसांतून कंगवा फिरवत हर्ष बोलला.

"कृपाच झाली म्हणायचं. चला आता पटकन."

"एवढी सगळी तयारी झाली म्हटल्यावर एक सेल्फी तो बनता है बायको."

"अरे आता त्यात अजून वेळ जाईल हर्ष."

"नाही जात, इकडे बघ पटकन्."

"अरे... काही वेळ काळाचे भान तरी ठेवा रे. खाली सगळे वाट पाहतायेत तुमची आणि तुम्ही मस्त सेल्फी काढत बसलाय." फायनली हर्षु त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या रूममधे आलीच.

"ये हर्षु...बरं झालं आलीस. एक फोटो काढ ना आमचा."

"मी तुमचा फोटो काढायला नाही आले इथे, समजलं? तुम्ही आधी खाली चला. ब्राह्मण काका आलेत. अजून जास्त उशीर करू नका हे सांगायला आलीये. नाहीतर उगीच आईचा ओरडा खावा लागेल."

"पण आलीच आहेस तर एक फोटो काढ ना. किती भाव खाशील आता."

"आण इकडे, तू ऐकणारच नाही मला माहितीये ना." हर्षच्या हातातून मोबाईल ओढून घेत हर्षु म्हणाली.

हर्ष आणि नेत्राने मग सुंदर सुंदर पोज देत एक एक म्हणता चांगले दहा बारा फोटो काढून घेतले हर्षुकडून."

"बस की, अजून काढू?" खोचकपणे हर्षु म्हणाली.

"तशी आमची काही हरकत नाही पण उशीर होतोय ना." हर्ष बोलला.

"नशीब लवकर समजलं. चला आता खूप झाले फोटो." दोघांनाही दम देत हर्षु जाण्यासाठी वळली.

"हर्षू...अजूनही रागावलियेस माझ्यावर?" नेत्राने पाठमोऱ्या हर्षुला विचारले.

"हो." शब्दावर जोर देत मोठया आवाजात हर्षु बोलली आणि ती पुढे निघुन गेली.

'आता जोपर्यंत आदित्य इथे येणार नाही तोपर्यंत मॅडमचा राग काही जाणार नाही. हा आदी पण ना. अजून किती छळणार आहे बिचारीला काय माहित. त्या दोघांमध्ये मात्र माझे मरण.' मनातच नेत्रा बोलली.

नेत्रा आणि हर्ष दोघेही मग आवरुन खाली येतात.

प्रसन्न वातावरणात सत्यनारायण पूजा अगदी विधिवत पार पडते. सगळं काही अगदी नयना ताईंच्या मनासारखे होत होते, त्यामुळे त्या खूपच खुश होत्या. घरात अत्यंत प्रसन्न वातावरण तयार झाले होते. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंददायी भाव झळकत होते. पूजा संपायच्या आत माधवराव आणि महेशराव देखील ऑफिसमधून आज लवकर घरी येतात. जवळचे नातेवाईक देखील हजर झालेले असतात.

नयना ताईंच्या माहेरचे, निलम काकीच्या माहेरचे तसेच नेत्राच्या माहेरहून तिची आई आलेली असते. त्याबरोबरच आजीच्या माहेरहून आजीचा भाऊ, भावजय तसेच मुलगा, सून आणि नातवंड देखील आलेली असतात.
सगळ्यांच्या उपस्थितीत आरती आणि महाप्रसाद कार्यक्रम पार पडतो. इनामदारांच्या घरचा थाट नेहमीच पाहण्याजोगा असतो.

पूजेनंतर आता हर्षुच्या बर्थडेची तयारी सुरू झाली. बंगल्याच्या बाहेर असलेल्या स्पेसमध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. पाहुण्यांच्या स्वागताची उत्तम तयारी देखील करण्यात आली होती.

"हर्शु...हे बघ हा ड्रेस घाल, तुझ्या दादाने खास तुझ्यासाठी मागवलाय." तोंड फुगवून बसलेल्या हर्षुला नेत्रा म्हणाली.

"काही नको वहिनी, खूप ड्रेस आहेत माझ्याकडे मी त्यातलाच एखादा घालेल."

"हर्शु... कशाला उगीच हट्ट करतेस. आजतरी नको ना गं असा राग धरून बसू."

"वहिनी... मला एक सांग, तू का आग्रह केला नाहीस आदित्यला? तुझं सगळं ऐकतो ना गं तो. मग ही एवढी छोटीशी गोष्ट त्याने तुझी ऐकली नसती का गं?"

"अगं हर्षु, सगळं मान्य आहे मला पण त्याचा सेकंड पेपर आहे ना थोड्याच दिवसांत. म्हणून मग सध्या त्याचा फोकस तिकडे आहे. त्यामुळे मी नाही जास्त आग्रह केला त्याला."

"याचा अर्थ, तुझीच इच्छा नाहीये आदित्यने इकडे यावं अशी. हो ना वहिनी?"

"हर्षु...अगं तसं काही नाहीये गं. थोडं समजुन घे ना. मागे निलम काकी कशा बोलल्या त्याला ते तर माहीतच आहे तुला आणि आताही तसे काही होणार नाही याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून मग मी शांत बसले."

"वहिनी... तुलाही माहितीये, एवढ्या सगळ्या लोकांसमोर काकी असं काही करणार नाही. तिला फक्त घरातले लोक असल्यावर जास्त चेव येतो. इतर वेळी, 'मी किती गुणी सून आहे इनामदारांची' हे असं जगाला दाखवायचं असतं तिला."

"बरं ऐक माझं, घाल ना हा ड्रेस. बघ ना किती सुंदर आहे. तुला अगदी शोभून दिसेल."

"वहिनी आता विषय बदलू नकोस आ आणि तसंही ज्याने मला ह्या ड्रेसमध्ये पाहायला हवंय तो तर येणारच नाहीये मग मी तरी कोणासाठी तयार होऊ?"

"अगं आपण व्हिडिओ कॉल करू ना त्याला. फोटो सुध्दा पाठवूयात. मग तर झालं."

"काहीच गरज नाही त्याची. राहू दे, नको आता मला मस्का मारण्यात तुझा वेळ वाया घालवूस. जा तू." रागातच हर्षु बोलली.

"बरं मी आदित्यला जर इथे येण्यासाठी आग्रह केला तर मी म्हणेल तशी तयार होणार तू?"

नेत्राचे हे शब्द ऐकताच हर्षुची कळी खुलली.

"हा काय प्रश्न आहे का वहिनी? तू म्हणेल ते मी करेन." हसतच हर्षु बोलली आणि लगेचच ती तयार व्हायला गेली.

पण खरंच येईल ना आदित्य?

क्रमशः

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all