अनोळखी दिशा पर्व २ (भाग २२)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राने समजूत घातल्यावर हर्षु तिच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी तयार झाली. त्यात आता हर्षु आणि आदित्यच्या नात्याला नेत्राचा सपोर्ट आहे हे निलम काकीला समजते. दोघींचे सुरू असलेले बोलणे निलम काकीच्या कानावर पडले होते.

आता पाहुयात पुढे...

नयना ताईंनी आणि नेत्राने मिळून हर्षुच्या बर्थडेचे आणि पूजेचे सर्व नियोजन केले. कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे याची लिस्ट देखील तयार झाली. अजून बरीच तयारी बाकी होती.
दोन दिवसांनी नेत्रा आणि हर्षया लग्नाची सेकंड ॲनिव्हरसरी होती.

नेत्राने हर्षुची अट हर्षला सांगितली.

"अरे आपण जर फिरायला गेलो तरच हर्षु तिच्या बर्थ डे सेलिब्रेशन साठी तयार आहे आणि इतकंच नाही तर मॅडमला लवकरात लवकर भाचा किंवा भाची हविये." लाजत आणि नजर चोरत नेत्राने हर्षुचे सगळे बोलणे हर्षला सांगितले.

"अरे वा! बघ माझ्या बहिणीला किती काळजी आहे आपली. तुला म्हणायला गेलं तर तुला माझे म्हणणे पटत नाही. 'खूप काम आहे इथे, असं सगळं सोडून कसं जायचं.' एक ना अनेक कारणं जणू तू पाठच करून ठेवलीत. पण बरं झालं हर्षुने अशी हटके अट घातली ते. बोल मग कुठे जायचं आपण फिरायला? तू फक्त नाव सांग. मी लगेच तिकीट बुक करतो."

"काय हे हर्ष! तू पण ना! अरे मी आईंना सुद्धा बोलले नाही ही गोष्ट. फक्त हर्षु तिच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी तयार झाली एवढेच बोलले. तू तर लगेच फिरायला जाण्याचे प्लॅनिंग पण सुरू केले. डायरेक्ट तिकीट बुक करायला निघालास."

"फिर नेक काम मे देरी किस बात की यार." थोडा रोमँटिक मुडमध्ये नेत्राच्या कानात हळूच हर्ष बोलला.

"झालं का तुझं पुन्हा सुरु? आपण आता ऑफिसमधे आहोत हे विसरू नकोस." लटक्या रागातच नेत्रा बोलली.

"घेतलाच पुन्हा चुकीचा अर्थ? तुम्ही बायका त्यात अगदी एक्स्पर्ट असता. मी आईला विचारण्याबाबत बोलत होतो, समजलं." नेत्राचे बोलणे खोडून काढत हर्ष बोलला.

"गप्प बस, माझ्या इतकं चांगलं तुला दुसरं कोणी ओळखुच शकत नाही." नेत्रा म्हणाली.

"तू काय अर्थ घेतलास माझ्या बोलण्याचा?" हर्षने विचारले.

"काही नाही गप्प बस." लटक्या रागातच नेत्रा म्हणाली आणि हातातील पेन सोबत चाळा करत लाजतच तिने मान खाली घातली.

"आता तूच म्हणालीस ना, हर्षुला भाचा किंवा भाची हवीये म्हणून मग मनावर नको का घ्यायला?" नेत्राच्या गालावर आलेली केसांची बट कानामागे सरकवत हळूच हर्ष तिच्या कानात बोलला.

तेवढ्यात दारावर कोणीतरी नॉक केले. दोघेही एकदम दचकले. हर्ष लगेचच सावध होत मागे सरकून खुर्चीत नीटनेटका बसला.

"दरवेळी बरोबर वेळ साधूनच दारावर नॉक होते नाही का नेत्रा."   रागातच हर्ष बोलला.

"येस कम इन.." हसतच नेत्रा म्हणाली.

हर्षची भंबेरी उडालेली पाहून नेत्राला अजूनच हसू आले.

"ये हाय, गूड आफ्टरनून समीर, ये बस." नेत्राने समीरला आत येण्याची परवानगी दिली.

"काय झालं मॅम, सरांनी जोक सांगितला वाटतंय." नेत्राला हसताना पाहून समीर म्हणाला.

"अरे तुझे सर नेहमीच जोक सांगायच्या मूडमध्ये असतात. भलेही मग माझा ऐकायचा मूड नसला तरी." बोलता बोलता हर्षकडे एक कटाक्ष टाकत आणि कुत्सितपणे हसत नेत्रा म्हणाली.

"वो वाव...किती स्वीट कपल आहात तुम्ही. अगदी मेड फॉर इच अदर." नेत्रा आणि हर्षचे कौतुक करत समीर म्हणाला.

"बाबा समीर.. असं इतरांना कॉम्प्लिमेंट देणं खूप सोप्पं असतं रे पण  प्रत्यक्षात जेव्हा स्वतःचं लग्न होतं ना तेव्हा समजतं."

"काय समजतं, जरा मलाही कळू दे." भुवया उंचावत नेत्रा हर्षला म्हणाली.

"नाही म्हणजे, तेव्हा समजतं की ह्या बायकांना समजणं किती  अवघड आहे ते. म्हणजे त्या बोलतात एक आणि वागतात भलतंच त्यामुळे प्रत्येक नवरा लग्नानंतर बिचारा होऊन जातो आणि त्याला करायचे आहे तेच तो विसरुन जातो. कारण बायकोच्या मनातल्या गोष्टी नवरा बरोबर ओळखतो पण कोणतीच बायको ते कधीच मान्य करत नाही आणि पुन्हा तुम्हाला माझ्या मनातलं कळतंच नाही असे बोलायला ती मोकळी होते."

"हो का..? आता इथे समीर आहे म्हणून मी काहीच बोलत नाही. मिस्टर हर्षवर्धन नंतर बघते तुम्हाला." नेत्राने जवळपास धमकीच दिली हर्षला.

समीर मात्र हर्ष आणि नेत्राची सुरू असलेली नोकझोक मनापासून एन्जॉय करत होता.

"हसू नको समीर, लग्नानंतर आपण बॉसगिरी करायची नसते बरं का. तुझं अजून लग्न व्हायचंय म्हणून आधीच सांगतो तुला. काही टिप्स हव्या असतील तर नक्की देईल." हर्ष म्हणाला.

"बरं समीर, सरांकडून नंतर टिप्स घे, पण त्याआधी तुला एक खास गोष्ट सांगायची आहे."

"हो बोला की मॅडम."

"येत्या अठरा तारखेला आमच्या घरी सत्यनारायण पूजा आहे. तर तू तुझ्या फॅमिलीसह आमच्या घरी पूजेला यायचंय."

"ओ वाव.. नक्कीच येणार मॅडम. मला खूप आवडेल. पण अचानक सत्यनारायण पूजा? म्हणजे काही प्रोग्रॅम आहे का?"

"अरे माझी नणंद म्हणजेच हर्ष सरांची लहान बहीण खूप मोठ्या अपघातामधून बचावली. अठरा तारखेला तिचा बर्थ डे असतो म्हणून मग पूजा आणि त्यानंतर तिचा बर्थ डे असे छोटेसे फॅमिली फन्क्शन अरेंज केले आहे. त्यानिमित्ताने तुझ्या आई बाबांसोबत पण ओळख होईल."

"ओके..नक्कीच मॅम. मी नक्की येईल आई बाबांना घेऊन. त्यांनाही खूप आवडेल."

"हो नक्की ये. वेळ मिळालाच तर मी काही टिप्स पण देईल तुला. म्हणजे पुढे जाऊन तुझ्या खूप कामी येतील." मध्येच हर्ष पून्हा एकदा मस्करीच्या सुरात बोलला.

"आणि त्याही अगदी फ्री मधे बरं का. पुढे हे बोलायला विसरले तुझे सर." खोचकपणे नेत्रा बोलली.

"सरांकडे आणि तुमच्याकडे पाहून खरंच मला वाटले नव्हते की तुम्ही दोघेही इतके फ्रिली असाल आणि म्हणूनच मला तुम्ही आयडीअल कपल वाटता. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीही ठिकाणी अगदी परफेक्ट." अभिमानाने समीर बोलला.

"थँक्यू समीर, पण असंच हसतखेळत राहावं माणसाने कारण कामाचा ताण त्यामुळे अजिबात जाणवत नाही." नेत्रा म्हणाली.

"अगदी बरोबर." नेत्राच्या बोलण्याला दुजोरा देत हर्ष बोलला.

"खरंतर तुमच्या दोघांकडून देखील मला टिप्स घ्यायला आवडतील. इथे जॉईन व्हायच्या आधी तुमच्या दोघांबद्दल ऐकून होतो. तुम्ही एक हुशार आणि आयडीअल कपल आहात म्हणून, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतोय मला."

"नेत्रा इतके फेमस आहोत आपण? मला वाटलं मला तर बाहेरच्या जगात कोणी ओळखत सुद्धा नसेल."

"बरं बस झाल्या आता अवांतर गप्पा. जरा कामावर पण फोकस करुयात का?" कडक शब्दात नेत्रा म्हणाली.

"सो सॉरी मॅम. ही उद्याच्या मीटिंगची प्रेझेंटेशन फाईल. सर्व रेडी आहे त्यात." समीर लगेचच कामाच्या मुद्द्यावर आला.

"हे बघ यासाठी बायको हवी असते. मग आपले लक्ष डायव्हर्ट होण्याचा प्रश्नच नाही. कसं अवांतर गप्पांना सुरुवात पण हिनेच केली आणि पुन्हा मूळ मुद्द्यावर पण हिनेच आपल्याला आणलं. कसं जमतं हे बायकांना देवच जाणे." हसतच हर्ष बोलला.

नेत्राने हसू आवरत फाईलमध्ये डोके घातले.

काहीही न बोलता समीरने देखील फक्त हसून रिप्लाय दिला.

"ॲझ युज्वल उत्तम प्रेझेंटेशन बनवलं आहेस समीर. कमी वेळात खूप छान तयार झालास बघ तू. अशीच प्रगती करत राहा."

"थँक्यू मॅम. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि वेळोवेळी तुमच्या कडून मिळणारी कौतुकाची थाप, यामुळे शक्य होत आहे."

"कीप इट अप." नेत्राने समीरचे मनोबल वाढवले.

"थँक्यू मॅम. थँक्यू सर...येतो मी." असे म्हणत समीर त्याच्या कामासाठी निघून गेला.

"नेत्रा तुला माहितीये..?

"काय ?"

"समीरकडे ना नक्कीच थँक्यूचं पोतं भरलेलं असणार. त्यामुळेच तर सारखं थँक्यू सर, थँक्यू मॅम सुरू असतं त्याचं."

हर्षच्या या जोकवर मग नेत्रालाही हसू आले.

"पण काहीही म्हण, फारच गुणी आहे पोरगं आणि तितकंच मेहनती सुद्धा."

"ह्मममम...एकदम माझ्यासारखा." कॉलर ताठ करत हर्ष बोलला.

"तू नाही सुधरणार. बस झालं आता जोक करणं. आता जरा कामाचं पण पहायचं का?"

"म्हणजे आता मी केला तो जोक होता की तू केला तो?"

"तुझ्या जोकवर मी मारलेला पंच होता असे समज." हसतच नेत्रा  बोलली.

मुद्दाम रागवण्याची ॲक्टिंग करत चेहरा पाडून हर्ष नेत्राकडे बघतच राहिला.

"नको रागावूस मी काही मनवत बसणार नाही आता. आवरा खूप कामं पेंडींग आहेत. ह्या फाईल्स चेक करून सह्या कर त्यावर." स्वतःच्या समोरच्या सर्व फाईल्स हर्षच्या समोर सरकवत गालातल्या गालात हसत नेत्रा म्हणाली."

"किती खडूस आहेस यार तू."

"काय करणार आता तुझीच बायको आहे ना! वाण नाही पण गुण लागणारच."

हर्ष आणि नेत्राची तू तू मैं मैं संपायचे काही नावच घेईना.

संध्याकाळी घरी आल्यावर हर्षने त्यांच्या ॲनिव्हरसरी निमित्त फिरायला जाण्याचे प्लॅनिंग नयना ताईंना सांगितले. आता नयना ताई थोडीच ना नाही म्हणणार होत्या. त्याही लगेचच हो म्हणून मोकळ्या झाल्या. वेळ न घालवता हर्षने मग नेत्राच्या आवडीप्रमाणे शिमल्याची दोन फ्लाइटची तिकिटे बुक केली सुद्धा. नेत्राने लगेचच ही बातमी हर्षुला जाऊन सांगितली.

"बघ वहिनी दादाचे किती प्रेम आहे तुझ्यावर. कधीतरी त्याच्या आनंदाचा देखील विचार कर गं. फक्त काम काम नको म्हणत राहू. सर्वांनाच असा प्रेम करणारा नवरा भेटतोच असे नाही ग.. नशिबाने तो तुझ्याकडे आहे. म्हणून म्हणते त्याला जप." नेत्राचा हात हातात घेत हर्षु म्हणाली.

"नक्कीच ग..आणि थँक्यू..मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल. कामाच्या व्यापात माझं हर्षकडे खरच दुर्लक्ष होतं. पण यापुढे असं नाही होणार. आय प्रॉमिस यू."

दोघींनीही मग एकमेकींकडे पाहून गोड स्माइल दिली. नणंद भावजयीच्या नात्याची वीण मैत्रीच्या धाग्याने बांधली गेल्यामुळे दिवसागणिक ती अधिकच घट्ट होत होती.

क्रमशः

आता पुढे काय काय ट्विस्ट येणार कथेत. जाणून घेण्यासाठी वाचा अनोळखी दिशा...कथा अनोख्या प्रेमाची.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all