अनोळखी दिशा पर्व २ (भाग १९)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, मीटिंग झाल्यानंतर हर्ष कुठेतरी गेला. पण कुठे? ते त्याने नेत्राला सांगितलेच नाही. त्यामुळे तिलाही खूप टेन्शन आले. तिने खूप प्रयत्न केला त्याच्या मनातील गोष्टी काढून घेण्याचा पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दोन दिवसांनी सांगतो हे एकच वाक्य तो वारंवार बोलत होता. अखेर आता दोन दिवस वाट बघण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

आता पाहुयात पुढे...

दुसऱ्या दिवशी नेत्रा आणि हर्ष आवरून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. आज हर्षुला डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे दोघेही खूपच आनंदात होते. आज नयना ताई हर्षुसोबत हॉस्पिटल मध्ये असल्याने सकाळ सकाळी नेत्राची खूपच धावपळ झाली. तशा आजी मदतीला होत्या पण त्यांनाही आता घरातील कामाची जास्त सवय राहिली नव्हती. तरीही त्यांनी नेत्राला जमेल तितकी मदत केली. घरातील काम आणि निलम काकी यांचा दूरदूर पर्यंत काहीही संबंधच नव्हता. त्यामुळे ती घरात असून नसल्यासारखीच होती. फक्त प्रत्येकाला लागेल असे बोलणे आणि काहीतरी खुसपट काढून वादाचा मुद्दा तयार करणे यांत मात्र तिचा हातखंड होता.

"आज ताई नाहीत तर एकही काम सरळ झाल्यासारखं वाटत नाही." 
आयता नाश्ता प्लेटमध्ये वाढून घेत चेहऱ्यावर एक खोचक स्माईल आणत निलम काकी बोलली. नेत्राला बरोबर टोमणा मारला काकीने.

"एवढंच वाटत आहे तर स्वतः उठून करायचं होतं सगळं. तसंही टोचून बोलल्याशिवाय तुझा दिवस तरी कसा जाणार म्हणा."

आता आजी समोर असताना त्या थोडीच ना गप्प बसणार होत्या. त्यांनीही मग सुनेला चार दोन वाक्य सुनावली.

"ते कसं असतं माहितीये नेत्रा... कुत्र्यांचं शेपूट कितीही नळीत घातलं ना तरी ते वाकडं ते वाकडंच. तसं आहे आपल्या घरातील काही लोकांचं." हर्षने निलम काकिलादेखील उलट टोमणा मारला.

'अरे गप्प बस ना, जाऊ दे कशाला त्यांच्या तोंडी लागतोस.' नजरेतूनच नेत्राने हर्षला हलकासा दम भरला.

"एकदम बरोबर बोललास बघ हर्ष." निलम काकी काही प्रतिउत्तर देणार तेवढ्यात आजीने मात्र नातवाच्या बोलण्याला हसतच दुजोरा दिला.

"आणि काही लोकांना ना स्वतः हून स्वतःचा पानउतारा करून घेण्याची जणू सवयच लागली आहे." निलमवर एक जळजळीत कटाक्ष टाकत आजी बोलल्या.

"तरी म्हटलं लाडक्या नातवाच्या लाडक्या आजीबाई अजून इतक्या शांत कशा काय बरं?" खोचकपणे निलम काकी बोलली.

"अगं आजी कोणाला समजावून सांगत आहेस तू? हिला... हिला 'माणुसकी' शब्दातील 'म' तरी माहितीये का? तिला जर हर्षुची काळजी असती तर दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये येऊन हिने हर्षुला त्रास देण्यासाठी विनाकारण तमाशा केलाच नसता.

"काय..? म्हणजे ही आम्ही एवढं सांगूनही हॉस्पिटलमध्ये आलीच होती का? काय करावं हीचं! देवा, हिला सद्बुद्धी दे रे बाबा." देवासमोर हात जोडत आजी म्हणाल्या.

"हे बघ निलम मी आज तुला स्पष्टच सांगते, आज हर्षु घरी येणार आहे, त्यामुळे थोडीफार जरी तुझ्यात माणूसकी शिल्लक असेल तर  कृपा करुन ती घरी आल्यावर घरात शांतता टिकेल यासाठी थोडे प्रयत्न कर. शक्य झाल्यास आम्हाला सर्वांना सहकार्य कर आणि यातील काहीच जमणार नसेल तर चांगली आठ दहा दिवस माहेरपणाला जाऊन ये."

"हो का? तसंही मी माहेरी जाण्याचीच वाट पाहताय तुम्ही सगळेजण. पण तुमच्या मनासारखे काहीही होणार नाही त्यामुळे काळजीच करू नका." मिश्कीलपणे हसत निलम काकी बोलली.

"पण काहीही म्हण आजी, काही सूना खूपच नशीबवान असतात आणि तुझ्यासारखी सासू असेल तर मग काही टेन्शनच नाही बघ. कारण कोणती सासू असं स्वतःहून सुनेला माहेरी जायला सांगेल."

"काय करावं हर्ष नशिबाचे भोग म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं." आजी म्हणाल्या.

"नाहीतर काय...मी घरात आले आणि इनामदार घराण्याचे नशिबाचे चक्र उलटे फिरले वाटतं." रागातच निलम काकी बोलली.

"नशीब स्वतःच्याच तोंडाने सगळं मान्य केलंस." हसतच आजी बोलल्या.

"मला मान्य आहे म्हणून नाही बोलले, तुमच्या मनातले फक्त बोलून दाखवले. तसंही या घरात मला किती किंमत आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. आणि जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत माझ्याकडून जास्त अपेक्षा कोणीही ठेवू नयेत."

"हो...." शब्दावर जोर देत आजी बोलल्या.

"बरं हर्ष तुम्ही जा आता, उशीर नको व्हायला. तिकडे नयना वाट पाहत असेल तुमची. हे काय रोजचंच आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. " आजीने मग दोघांनाही जायला सांगितले.

हर्ष आणि नेत्रा मग दोघेही निघून गेले.

"हे बघ निलम उगीच आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. तुला नसेल आमचं काही पटत तर येत जाऊ नको आमच्या समोर. बाकी तू तर तुझ्या मनाची मालकीण आहेस. म्हणून सांगितीये तूही सुखाने जग आणि आम्हालाही जगू दे आणि एक लक्षात ठेव, सगळं काही ह्याच जन्मात फेडायचंय हे तर कधीच विसरू नकोस. जेव्हढा त्रास तू इतरांना देशील त्यापेक्षा जास्त त्रास तुला सहन करावा लागेल हे ध्यानात ठेव." आजीने सुनेला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.

"झालं का तुमचं लेक्चर देऊन? जाऊ मी आता? येता जाता फक्त अक्कल शिकवत फिरायचं. बस! तेवढंच चांगलं जमतं या इनामदार फॅमिलीतील प्रत्येकाला!" एवढे बोलून  तणतण करत निलम काकी तिच्या रूममध्ये निघून गेली.

"देवा...चोर तो चोर वर शिरजोर." असं आहे हीचं. जाऊ दे हर्ष म्हणतो तसं हिला समजावून काही उपयोग नाही." आजी मनातच बोलल्या.

थोड्याच वेळात हर्ष आणि नेत्रा हॉस्पिटलमधे पोहोचले.

"नेत्रा... तू हो पुढे, मी डॉक्टरांना भेटून येतो." हर्ष म्हणाला.

हर्षुच्या डिस्चार्जची कल्पना त्याने ड्युटीवर असलेल्या नर्सला दिली. डॉक्टरांना यायला अजून थोडा वेळ होता. फोनवरून नर्सने हर्षचा निरोप डॉक्टरांपर्यंत पोहोचवला. डॉक्टरांच्या परवानगीने नर्सने मग डिस्चार्ज पेपर बनवायला घेतले. त्यांनतर हर्ष हर्षिताच्या वॉर्डमध्ये गेला.

बहिणीची खेचण्याची क्षणभर त्याला हुक्की आली.

"गुड मॉर्निंग हर्षु."

"व्हेरी गुड मॉर्निंग दादा." हसतच हर्षुने रिप्लाय दिला.

"हर्षु, अगं आताच माझे डॉक्टरांसोबत बोलणे झाले."

"काय म्हणाले मग ते? आज भेटेल ना डिस्चार्ज?"

"नाही.." नकारार्थी मान हलवत आणि चेहऱ्यावर तणावपूर्ण हावभाव आणत हर्ष बोलला.

"म्हणजे आजही घरी जाता येणार नाही." रडवेल्या सुरात हर्षु बोलली.

"आई... अगं तू बोल ना डॉक्टरांसोबत. रात्रीच तुझ्यासमोर बोलले होते ना ते, की उद्या मिळेल डिस्चार्ज म्हणून, मग आता असे अचानक काय झाले? मला नाही राहायचं यार इथे आता. प्लिज समजून घ्या ना. कंटाळा आलाय मला आता. जेलमध्ये टाकल्यासारखं वाटतंय." हर्षुचे डोळे पाण्याने डबडबले.

"हर्षु...असेल काहीतरी कारण बाळा. एवढे दिवस थांबलीस मग अजून दोनच दिवस, असे निघून जतील बघ दोन दिवस."

"आई.. अगं दोन दिवस काय? दोन तास सुद्धा इथे राहायची इच्छा नाही. प्लिज दादा... अरे कर ना काहीतरी."

हर्षुला असे आगतिकपणे बोलताना पाहून हर्षला तर हसूच आवरेना.

"आई, सांग ना याला. इथे मला किती टेन्शन आलंय आणि ह्याला हसायला येतंय. माझ्यात अजिबात पेशन्स राहिले नाहीत आता. कसं समजत नाहीये कुणाला?"

"हर्षु, अगं रडू नकोस तो गम्मत करतोय तुझी. इतकंही कळलं नाही का तुला?"

" खरंच वहिनी?"

"हम्ममम.." नेत्रा उत्तरली.

"काय रे दादा! तू पण ना! मला किती टेन्शन आलं होतं माहितीये. जा बोलूच नको आता माझ्याशी. तू नेहमी असंच करतोस." लाडीक सुरात हर्षु बोलली.

तिच्या डोळ्यांतील पाणी हलकेच गालावर ओघळले.

"सो सॉरी माय डार्लिंग सिस्टर." हर्षुचे डोळे पुसत आणि प्रेमाने तिला जादूची झप्पी देत हर्ष बोलला

दोन्ही भावंडांमधील प्रेम पाहून नयना ताईंना आणि नेत्राला भरुन आले. दोघींनाही त्या क्षणी मात्र वेगळेच समाधान भेटले.

हॉस्पिटलमधील सर्व प्रोसिजर कंप्लीट करुन दुपारी बाराच्या सुमारास हर्षुला डिस्चार्ज मिळाला. आज मनातून ती खूपच खुश झाली. क्षणभर दुखावली गेली पण खरं समजल्यावर लगेचच नॉर्मल सुद्धा झाली. तब्बल पंधरा दिवसांनी आज ती घरी जाणार होती. त्यामुळे कधी एकदा घरी पोहोचते असे झाले होते तिला. घरी गेल्यावर देखील तिची खूप काळजी घ्यावी लागणार होती.

तेवढ्यात आदित्य तिथे आला. आज हर्षुला डिस्चार्ज मिळणार म्हणून आदित्य हॉस्पिटलमध्ये आला होता. एकदा का हर्षु घरी गेली की मग लवकर काही तिला भेटता यायचे नाही म्हणून मग कोणालाही न सांगता तो तिकडे आला होता.

"अरे आदित्य, तू इकडे?" नेत्राने प्रश्न केला.

"अगं काही बुक्स हवे होते तेच घ्यायला आलो होतो इकडे. हॉस्पिटलच्या जवळच होतो तर म्हटलं जाऊन यावं."

आदित्यला असं अचानक समोर पाहून हर्षु मात्र खूपच खुश झाली. पण नयना ताई असल्यामुळे दोघेही एकदम फॉर्मल वागत होते.

"कसं वाटतंय आता?" आदित्यने हर्षुला विचारले.

"छान." एकाच शब्दात ती उत्तरली.

"बरं झालंस आदित्य आलास तू. नाहीतर मला प्रश्नच पडला होता हे सगळ समान घेऊन पार्किंग पर्यंत कसं जायचं?" नयना ताई बोलल्या.

हर्षुला मात्र हे अजिबात आवडले नाही.

"आई, अगं त्याला कुठे काम सांगतेस?"

"मग झालं? जसा मला हर्ष अगदी तसाच आदित्य. थोडक्यात आदित्य मला माझ्या मुला सारखाच आहे. हक्काने त्याला एखादं काम सांगितलं तर कुठे बिघडलं मग?" हसतच नयना ताई बोलल्या.

"हो हो काकू काहीच हरकत नाही माझी. उलट मलाही आवडले तुम्ही हक्काने मला काम सांगितले." हसतच आदित्य बोलला.

हर्षुने एक रागीट कटाक्ष टाकला आदित्यवर.

क्रमशः

©® कविता वायकर.


🎭 Series Post

View all