अनोळखी दिशा पर्व २ (भाग १५)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, निलम काकी हर्षुला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये जाते. सवयीप्रमाणे सर्वांसोबत उद्धटपणेच वागते. त्यात आदित्य आणि नेत्राला तर ती खूप काही सुनावते. मोठयाने बोलत असल्यासमुळे सिस्टर जेव्हा सर्वांना रागावतात तेव्हा मात्र ती तिथून निघून जाते.

आता पाहुयात पुढे...

बघता बघता हर्षुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन आता दोन आठवडे होत आले होते. हळूहळू आता ती रिकव्हर होत होती. वरवरच्या जखमा बऱ्यापैकी भरुन आल्या होत्या. पण तरीही खोलवरच्या जखमा पूर्णपणे भरुन यायला वेळच लागणार होता.

"दादा खूप कंटाळा आलाय रे आता. डिस्चार्ज कधी मिळेल मला? तू एकदा बोलून घे ना डॉक्टरांसोबत."

"हर्षु अगं उगीच घाई नको गं करायला. घरी गेल्यावर तू शांत नाही बसली आणि जर पुन्हा काही प्रॉब्लेम वाढला म्हणजे मग काय करायचं?" समजावणीच्या स्वरात हर्ष बोलला.

"दादा मी घेईल ना अरे काळजी आणि वहिनी पण आहेच की... सोबत आई, आजी, आजोबा सगळेच आहेत ना. त्यात आता मला माझी प्रॅक्टिस पण सुरू करायची आहे आणि डॉक्टर पण काल म्हणाले तुमची रिकव्हरी इतर पेशंटच्या तुलनेत फास्ट आहे म्हणून."

"सगळं मान्य आहे बाई, पण अगं इथे तुझी जशी प्रॉपर काळजी घेतली जाते तशी घरी घेतली जाईलच असे नाही. कालच डॉक्टर म्हणाले अशा केसेसमध्ये बोन रिकव्हर व्हायला सात ते आठ आठवडे आरामशीर लागतात. काही पेशंटला यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागतो. त्यामुळे मला वाटतंय स्वतःहून घाई नको करायला आणि तुझ्या प्रॅक्टिसचं म्हणशील तर ती तू नंतरही करू शकतेस. पुढे आयुष्यभर तेच तर करायचं आहे. हुशार आहेस, हव्या तेवढ्या केसेस मिळतील बघ तुला. काळजी करू नकोस. पण तरीही तू म्हणतेस तर तुझ्यासाठी मी एकदा बोलून घेतो डॉक्टरांसोबत. डोन्ट वरी." असे बोलून हर्षने तिची समजूत काढली.

हर्षुचे पायाचे टाके आता कुठे काढले होते पण तरी अजूनही तिला आधाराशिवाय उभे राहणे शक्य होत नव्हते. पायात रॉड टाकल्यामुळे अजून तरी तिला पायावर जास्त जोर देता येत नव्हता. त्यामुळे स्वतःच्या पायावर चालणे अजूनही जमत नव्हते. वॉकरच्या साहाय्याने हळूहळू ती चालण्याचा प्रयत्न करत होती. ह्या कठीण काळात नेत्रा मात्र ढाल बनून इनामदार कुटुंबासोबत खंबीरपणे उभी होती. आपल्या लहान बहिणीप्रमाणे ती ननंदेची काळजी घेत होती. नेत्राकडे पाहूनच तर हर्षला ह्या सगळ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाणे सोपे जात होते.

हर्षला अचानक एक मीटिंग आल्यामुळे त्याला लगेचच ऑफिसला जावे लागणार होते. महत्त्वाचे क्लायंट येणार होते. ही डील त्यांना हातची जाऊ द्यायची नव्हती. त्यात नेत्रामुळे काम बऱ्यापैकी सोपे होत होते. काही मुद्दे ती अगदी परफेक्ट पटवून देऊ शकत होती. त्यामुळे नेत्रा जर या मीटिंगला असली तर फायदाच होणार होता. पण हर्षुमुळे तिला गेले पंधरा दिवस ऑफिसला जाताच आले नाही.

हर्षने लगेचच घरी नेत्राला फोन केला.

"हॅलो नेत्रा, अगं आजच्या मीटिंगसाठी तुला यायला जमेल का? महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत. माझ्या मते आजचे प्रेझेंटेशन देखील तूच द्यावेस. तू लकी आहेस यार कंपनीसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा." थोडा पॉज घेत हर्ष बोलला.

"हो का!" हसतच नेत्रा बोलली.

"अरे माझी काहीच हरकत नाही पण मग हर्षुजवळ आई एकट्या कशा थांबतील?"

"थांबेल गं, हवं असेल तर आजच्या दिवस आजीला पाठवू आईसोबत. एक दिवसाने काही फरक पडत नाही. आईकडे फोन दे मी सांगतो तिला आणि आता बाकीची सगळी कामं बाजूला ठेव आणि मी जे काही डॉक्युमेंट्स पाठवतो त्याचा आधी स्टडी कर. दुपारी तीन वाजता मीटिंग आहे. प्रेझेंटेशनदेखील रेडी आहे. त्यात काही बदल गरजेचे वाटले तर ते करून घे. कारण ह्यावेळी एका नवीन मेंबरने प्रेझेन्टेशन रेडी केलंय. त्यामुळे बदल करावेच लागतील असं मला तरी वाटतंय. मलाही माहित नाही कोण आहे ती व्यक्ती. पण बाबांनी नंबर पाठवलाय त्यांचा. कोणीतरी नवीन जॉईन झालंय ऑफिसमध्ये. गरज पडली तर त्या नंबरवर कॉल कर."

"अच्छा! ओके, चालेल मी बघते. तू आईंसोबत बोल." असे म्हणून नेत्राने नयना ताईंकडे फोन दिला.

हर्षने मग नयना ताईंना मीटिंगची कल्पना दिली.

नयना ताई हर्षसोबत बोलत असताना त्यांचे बोलणे निलम काकीच्या कानावर पडले. एकंदरीतच नेमके काय सुरू आहे ते काकीला समजले. मग काय टोमणे द्यायला तिला नवीन कारणच सापडले.

"जगाच्या वेगळ्याच बिझनेस वूमन झाल्यात ह्या मॅडम. आता हिच्याशिवाय मीटिंग पण होईना झाल्यात. ही नव्हती तेव्हा कंपनी तोट्यातच होती जणू. हिच्यामुळेच कंपनीची एवढी भरभराट झाली आहे. किती डोक्यावर घ्यावं एखाद्याला यालाही काहीतरी मर्यादा असतात की नाही?" सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात निलम काकी मुद्दाम बोलली.

काकीचे हे बोलणे ऐकून नेत्राचा चेहराच पडला. पण निलम काकीच्या बोलण्यावर शांत बसेल ती आजी कुठली.

"का गं बाई तुला का इतका त्रास होतोय?" खोचकपणे आजीने सुनेला प्रश्न केला.

"आणि हो तू म्हणाली ते अगदी बरोबर आहे बरं का, नेत्रामुळे खरंचच इनामदार गार्मेंट्सची भरभराटच झाली आहे. कारण लक्ष्मीच्या पावलांनी ती या घरात आली आहे आणि तू सून म्हणून या घरात जेव्हा आली होतीस तेव्हा काय घडलं होतं कंपनीत हे एकदा आठव मग कळेल कोणाला डोक्यावर घ्यायला हवं आणि कोणाला आपटवायला हवं ते." जुन्या काही गोष्टींची आठवण करून देत मिश्कीलपणे हसत आजी बोलल्या.

क्षणभर निलम काकी पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी आठवून रागाने लालबुंद झाली.

नवीनच लग्न होऊन निलम काकी जेव्हा घरात आली तेव्हा नव्या सुनेला कंपनी दाखवायला म्हणून महेश काका बायकोला घेऊन कंपनीत गेले होते; पण निलम काकीचे बॅड लक म्हणा किंवा मग आणखी काही पण निलम काकीने कंपनीत एन्ट्री केली आणि चार ते पाच मशिन्स अचानक बंद पडल्या. यालाच म्हणतात पायगुण, सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावर मात्र हा एकच भाव दिसत होता.

"आठवलं ना? आणि हो... नेत्रा कशीही वागली तरी तुझ्या डोळ्यात खुपतेच का? नसेल तिचं काही पटत तर नको लक्ष देऊ तिच्याकडे. हर्षु बोलते म्हणून तिच्याशी वाद घालायची सवय लागली तुला हे तूच सांगतेस पण मग नेत्रा तर शब्दाने काही बोलत नाही तुला तरी का सारखं तिच्या वाटेला जात असतेस गं?" सवयीप्रमाणे आजीने सुनेला फैलावर घेतले.

"ती जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत मी असेच वागणार. त्यामुळे मला जाब विचारायचा नाही कुणी आताच सांगून ठेवते." उद्धटासारखी निलम काकी उत्तरली.

"जाऊ दे बाई नेत्रा तू जा आपल्या कामाला, तिच्या नादी लागून काहीही साध्य होणार नाही." समजावणीच्या सुरात नयना ताई बोलल्या.

"काय जाऊ दे, प्रत्येक वेळी जाऊन दिल्यामुळेच ह्या गोष्टी वाढत चालल्या आहेत आणि काय गं नेत्रा तू कसं काय एवढं ऐकून घेतेस? येताजाता सतत ती तुझा पाणउतारा करत असते, चार दोन वाक्य सूनवायची ना तूही तिला. हे असं ऐकून घेतेस म्हणून मी तिची मजल दिवसेंदिवस वाढतच आहे."

"आजी...तुमच्या सून आहेत ओ त्या आणि माझ्या सासू. मग तुम्हीच सांगा कसं बोलणार मी त्यांना. तुमचा हक्क आहे त्यांना बोलण्याचा आणि माझा ऐकून घेण्याचा. मला नाही असं तोडून बोलता येत कोणालाही. खरंच कुठे नादी लागायचं रोज उठून. जाऊ द्या मी जाते, मला मीटिंगची तयारी करायची आहे." म्हणत नेत्रा तिच्या रुममध्ये निघून गेली.

"तुम्ही दोघीही सासू सून सारख्याच. अन्याय सहन करण्याचा जणू ठेकाच घेतलाय." खुनशी नजरेने नयना ताईंकडे बघत आजी बोलल्या आणि त्याही मग बाहेर निघून गेल्या.

नेत्रा प्रेझेंटेशनची तयारी करत होती. कंपनीत नवीन जॉईन झालेल्या एका तरुणाने ते प्रेझेन्टेशन रेडी केले होते. आता नवीन व्यक्ती आहे म्हटल्यावर खूप साऱ्या चुका असणार त्यात याची नेत्राला मनातून कुठेतरी खात्री होती. पण जशी तिने फाईल ओपन केली तशी त्या व्यक्तीवर मनापासून खुश झाली.

' अरे... कसलं सॉलिड प्रेझेंटेशन रेडी केलंय ह्या मुलाने. कदाचित यातील काही गोष्टी मलाही सुचल्या नसत्या.' चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणत मनाशीच नेत्रा पुटपुटली. न राहवून तिने लगेच हर्षला फोन केला.

"हॅलो हर्ष...!"

"का गं काही प्रॉब्लेम आहे का?"

"प्रॉब्लेम नाही रे उलट सगळाच प्रॉब्लेम सॉल्व झालाय हे सांगायला फोन केलाय मी."

"कसला प्रॉब्लेम सॉल्व झालाय? नीट सांगशील का काही."

"अरे ते प्रेझेंटेशन..."

"हो त्याचं काय झालं...?"

"झालं काही नाही रे...पण तू म्हणालास की कोणीतरी नवीन जॉईन झालंय कंपनीत त्यानेच हे प्रेझेंटेशन बनवलंय."

"हो... मला बाबांनी तर हेच सांगितलं."

"अरे पण मला हे सांगायचंय की अप्रतिम प्रेझेंटेशन बनवलंय त्या मुलाने. म्हणजे एका अनुभवी व्यक्तीने बनवाववं ना अगदी तसं. मला तर त्यात काहीच बदल करण्याची गरज वाटत नाही."

"अरे वा! हे तर छानच झालं मग."

"हो ना...खूपच सोप्पं काम झालं बघ. आता अजून छान छान आयडिया सुचतील बोलण्यासाठी."

"ते तर तू करशीलच गं... याची खात्री आहे मला."

"एकदा त्या मुलासोबत बोलून घेऊ का? तुला काय वाटतंय."

"ऑफ कोर्स...बोल ना...त्यात विचारायचं काय? त्यालाही जर असं ॲप्रिशिएट केलं तर पुढच्या वेळी तो अजून जोमाने काम करेल. घे बोलून एकदा त्याच्याशी." हर्ष म्हणाला.

"ओके चल बाय..लगेच करते कॉल त्याला? "

"बाय.." म्हणत दोघांनीही फोन ठेवला.

नेत्राने मग लगेचच हर्षने दिलेल्या त्या नंबरवर कॉल केला.

क्रमशः

कोण असेल ही नवीन व्यक्ती? त्याची एंट्रीच जर अशी धमाकेदार झाली असेल तर पुढे जाऊन ही व्यक्ती इनामदार फॅमिलीसाठी तसेच कंपनीसाठी फायद्याची असणार की तोट्याची जाणून घेण्यासाठी वाचत राहा अनोळखी दिशा.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all