अनोळखी दिशा पर्व २ (भाग ८)

कथा अनोख्या प्रेमाची.
मागील भागात आपण पाहिले की, हर्षुच्या अपघाताची बातमी नेत्राने घरी सांगितली. सर्वांना त्यामुळे खूपच धक्का बसला. सहजासहजी ही बातमी कोणाच्याही पचनी पडणारी नव्हती.

आता पाहुयात पुढे..

"नेत्रा...तू खोटं बोलत आहेस ना? म्हण की हे खोटं आहे म्हणून. मी अजिबात नाही रागावणार गं. पण एकदा म्हण तू हर्षुच्या सांगण्यावरूनच हा प्रँक करत आहेस." रडतच नयना ताई बोलल्या.

"सुदैवाने हा प्रँक असता तर किती छान झाले असते आई. पण दुर्दैवाने ह्यावेळी हा प्रँक नाहीये." नेत्रा उत्तरली.

तसा सगळ्यांच्या भावनांचा बांध तुटला. आता कोणी कोणाला सावरायचे हा मोठा प्रश्न होता.

नेत्राने कसेबसे स्वत:ला सावरले. कारण हर्षला तिने तसा शब्द दिला होता.

"आई...आजी...आजोबा अजिबात कोणीही रडायचे नाही. काहीही होणार नाही आपल्या हर्षुला. ही आपली परीक्षा आहे असे समजुयात आपण. तो वरचा आहे ना न्याय करायला. आपण जर कोणाचे वाईट केले नाही मग तो आपल्या बाबतीत इतका निष्ठूर कसा होईल. माझा पूर्ण विश्वास आहे, हर्षु लवकरच बरी होऊन घरी येणार आहे."

"अगं... पण माझी हर्षुच का? तिने कोणाचं काय बिघडवलं होतं. देवाने तिच्या बाबतीतच असं का करावं?" रडत रडत नयना ताई बोलत होत्या.

"देवा, इतकी पापं करणारी माणसं या जगात आहेत, गुन्हा करुन मोकाट फिरणारे गुन्हेगार देखील काही कमी नाहीत मग माझ्याच लेकरासोबत हे असे का व्हावे?" आजीदेखील खूपच भावूक झाल्या.

"असं रडत बसून काही होणार आहे का आता? नेत्रा बरोबर बोलत आहे. ही आपली परीक्षा आहे असे समजुयात. मलाही खात्री आहे लवकरच आपली बाई बरी होऊन घरी येईल." धीर एकवटून आजोबा बोलले. तसे पाहिले तर त्यांनाही खूप मोठा धक्का बसला होता. पण सगळ्यांनीच खचून चालणार नव्हते. कारण त्यांच्याशिवाय सद्ध्या तरी घरात कोणीही पुरुष मंडळी नव्हते.

'घे म्हणावं असंच पाहिजे. माझ्या वाटेला जात होती काय! येता जाता मला टोमणे मारल्याशिवाय तिचा दिवस सरत नव्हता. निस्तर म्हणावं आता. निदान आता काही दिवस तरी मी सुखाची झोप घेऊ शकेल.' मनातल्या मनात निलम काकी खूपच खुश होत होती. तिला जणू आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण सगळ्यांसमोर उगीच रडण्याचे नाटक ती करत होती.

"आई, बाबा मला जायचे आहे हॉस्पिटलला. मी नाही थांबू शकत आता घरी. कधी एकदा माझ्या लेकराला डोळे भरून पाहते असे झाले आहे." नयना ताई म्हणाल्या.

"अहो आई, तिकडे जाऊन काहीच उपयोग नाही होणार आता. आज आपल्याला हर्षुला भेटताच येणार नाही. ऑपरेशन सुरू असेल. अजून किती वेळ लागेल माहीत नाही." समजावणीच्या सुरात नेत्रा म्हणाली.

"ते काही माहीत नाही मला. आधी मला हॉस्पिटलला घेऊन चला." रडतच नयना ताई बोलल्या.

"नयना, अगं ऐक जरा. नेत्रा बरोबर बोलत आहे. आपण उद्या ,सकाळी जाऊयात ना." सासूने सुनेची समजूत घातली.
  
"आई तुम्ही असं कसं बोलू शकता? एका आईचे काळीज तुमच्याशिवाय दुसरं कोणी इथे समजू शकतं का? माझ्यात आता जास्त पेशन्स नाही उरले. आधीच सकाळपासून खूप विचित्र फील होत होते. असे का होत होते ते आता समजतंय आणि आता इथे थांबून तरी काय होणार? हर्षु ठीक आहे हे जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत माझा जीव भांड्यात नाही पडणार. प्लिज मला जाऊ द्या हॉस्पिटलला." हात जोडून नयना ताई दवाखान्यात जाण्यासाठी परवानगी मागत होत्या.

"आई थांबा मी हर्षला फोन करते, तो काय म्हणतो ते पाहू." नेत्रा म्हणाली.
लगेचच नेत्राने मग हर्षला फोन लावला.

"हॅलो हर्ष.."

"बोल नेत्रा.."

"कशी आहे रे आता हर्षु..?"

"ऑपरेशन सुरू आहे. पण डॉक्टर म्हणाले ते आता काहीच सांगू शकत नाहीत." 

"तू टेंशन घेऊ नकोस. होईल सगळं ठीक." हर्षला धीर देत नेत्रा बोलली.

"कसं नेत्रा? कसं होणार सगळं ठीक?" हतबल झाल्यासारखा हर्ष बोलला.

" बरं आई ठीक आहे ना?"
 
"त्यासाठीच तुला फोन केला हर्ष."

"हा बोल ना मग..."

"अरे आई ऐकतच नाहीयेत. हॉस्पिटलला यायचं आहे असा तगादा लावला आहे त्यांनी. हे घे तूच समजावून सांग त्यांना." नेत्राने मग नयना ताईंकडे
फोन दिला.

हर्षचा आवाज कानी पडताच नयना ताईंच्या भावनांचा पुन्हा एकदा बांध तुटला.

"हर्ष मला येऊ दे ना रे तिकडे."

"आई ऐक माझे, अगं आता इकडे येऊन काहीच उपयोग होणार नाही. ऑपरेशन सुरू आहे. आम्हाला देखील हर्षुला भेटण्याची परवानगी नाही. आता डायरेक्ट सकाळीच तिला भेटता येईल. तुम्ही सगळे सकाळी या."

रडत रडत नयना ताईंनी नेत्राकडे फोन दिला.

"हॅलो आई... अगं रडू नको ना गं."

"हर्ष मी बोलतिये. काय रे काय म्हणाले डॉक्टर?"

"नेत्रा खूपच अवघड आहे गं."

"का रे काय झालं?"

"तू तिथून बाजूला जातेस का थोडं म्हणजे मला तुला सगळं सविस्तर सांगता येईल."

"हॅलो... हॅलो...अरे हर्ष तुझा आवाज ब्रेक होतोय. थांब एक मिनिट मी रेंजमध्ये जाते." कोणाला शंका येऊ नये म्हणून नेत्रा रेंज नसल्याचे नाटक करत बाहेर निघून गेली.

"हा बोल आता."

"अगं हर्षुच्या डोक्याला आणि दोन्ही पायांना जबर मार लागलाय. उजव्या पायाचे हाड बहुतेक कुठेतरी क्रॅक झाले असावे असा डॉक्टरांचा अंदाज आहे. स्पेशालिस्ट येऊन गेलेत आताच. एक्सरे काढल्यावर समजेल फ्रॅक्चर आहे की नाही?
जर फ्रॅक्चर मेजर असेल तर उद्या लगेचच ऑपरेशन करावे लागेल."

"हर्ष काय होऊन बसले आहे रे हे? मला तर काही सुचतच नाहीये आणि मग आता सध्या कोणती सर्जरी सुरू आहे?"

"अगं डोक्याला आणि उजव्या बरगडीला देखील जबर मार आहे. आता तीच ट्रीटमेंट सुरू आहे बहुतेक."

"अरे देवा!"

"अगं डॉक्टर पण नीट सांगत नाहीत काहीच. आम्ही आता काहीच सांगू शकत नाही एवढेच बोलत आहेत ते."

"पण हर्षु शुद्धीवर आली का रे?"

"अगं मी म्हणालो ना, मगाशी जसं तिला आत नेलंय तसं अजून तिला पाहिलं सुद्धा नाही आम्ही कोणी. बाबांची अवस्था तर खूपच वाईट आहे. अगदी सुन्न झालेत ते. त्यांनाही अजून पूर्ण कल्पना नाहीये, हर्षुला कितपत मार लागला आहे याची फक्त वरवर कल्पना दिली मला डॉक्टरांनी. मगाशी  मी स्वतः डॉक्टरांसोबत बोललो. तेव्हा कुठे एवढी तरी माहिती मिळाली मला."

"हर्षवर्धन इनामदार." तेवढ्यात नर्सने आवाज दिला.

"नेत्रा मला जावं लागेल. सिस्टर बोलवत आहेत. मी बोलतो नंतर." एवढे बोलून हर्षने मग घाईतच फोन ठेवला.

नेत्राला तर काहीच सुचेना. घरातील सर्वांची अवस्था तिला बघवेना. एकटी निलम काकी सोडली तर सर्वचजण टेन्शन मध्ये होते.

नेत्राने मग कसेबसे सर्वांना समजावले. दोन दोन घास सर्वांना खाऊ घातले. हॉस्पिटल मध्येही डबा पाठवायचा होता पण त्याआधीच कंपनीतील कामगारांनी डब्याची व्यवस्था केली होती.

खरंतर कोणाच्याही घशाखाली घासच उतरत नव्हता. तिकडे हर्षु निपचित पडली होती. नुकतेच तिला रक्तदेखील भरले होते. अजूनही तिला शुद्ध आली नव्हती. त्यामुळे सर्वचजण खूपच टेन्शन मध्ये होते. पण अशा परिस्थितीचा सामना करायचा म्हटले म्हणजे अंगात त्राण तर असायलाच हवेत. त्यात आजी आजोबांचे पण वय झाले होते. त्यांनाही औषधं घ्यायची असतात. त्यामुळे दोन दोन घास त्यांच्या पोटात जाणेदेखील तितकेच गरजेचे होते. आता प्रत्येकाने विचारपूर्वक वागणेही तितकेच महत्त्वाचे होते.

नेत्राने अगदी संयमाने परीस्थिती हाताळली. सुरुवातीला कसे होईल, म्हणून तिलाही टेन्शनच आले होते; पण मग मन घट्ट करत तिने स्वतःबरोबरच घरातील प्रत्येकाला सावरले. पुढचे काही दिवस इनामदार कुटुंबासाठी खूपच कसोटीचा काळ असणार होता.

"बाबा...तुम्ही जा घरी मी थांबतो इथे."हर्ष माधवरावांना म्हणाला.

"मी नाही जाणार. मी पण थांबतो तुझ्यासोबत. माझी लेक इथे या अशा अवस्थेत असताना घरी जाऊन मला थोडीच ना शांत झोप लागणार आहे. त्यापेक्षा मीही थांबतो." रडवेल्या सुरात माधवराव बोलले.

"दादा, अरे आज सकाळपासून तुझी खूप धावपळ झालीये. तू जा घरी. हवं तर मी थांबतो हर्षसोबत." महेशराव म्हणाले.

"एक काम करा तुम्ही दोघेही घरी जा मी करतो मॅनेज."

"नाही आ हर्ष. मी नाही जाणार."

"बाबा! अहो घरी आई,आजी, आजोबा यांचा तरी विचार करा ना. एकटी नेत्रा कसं मॅनेज करेल? आईला देखील तुमची गरज आहे. मगाशी तर इकडे येण्यासाठी तिचा हट्ट सुरू होता. कसेबसे आम्ही समजावले तिला. हवं तर आता जा आणि सकाळी लवकर या. तसेही आता इथे थांबून काहीच उपयोग होणार नाही." हर्ष समजवणीच्या स्वरात बोलत होता.

माधवरावांना देखील हर्षचे म्हणणे पटले.

"काका तुम्हीदेखील घरी जा. दिवसभर थकला असाल. मी थांबतो इथे."हर्ष महेशरावांना म्हणाला.

"अरे पण तू एकटा?"

"मग आणखी कोणी कशाला हवंय? तसेही पेशंट सोबत थांबायला एकच व्यक्ती अलाऊड आहे. तशी कल्पना देतीलच ते आपल्याला.  आणि डोन्ट वरी तशी काही गरज पडलीच तर मी फोन करेल तुम्हाला."

"बरं मग तू काळजी घे. आम्ही निघतो आणि तसे काही वाटलेच तर फोन कर." महेशराव म्हणाले. 

"हो काका. बाबांना व्यवस्थित घेऊन जा. घरी गेल्यावर पण सगळ्यांना टेन्शन येईल असे काही सांगू नका. उद्या कळेल तेव्हा कळेल."

"हो रे तू नको टेन्शन घेऊ. तू तुझी काळजी घे. चल निघू मग आम्ही."

हर्षने होकारार्थी मान डोलावली. महेश काका माधवरावांना घेऊन मग घरी गेले.

हर्षुचे एक ऑपरेशन तर व्यवस्थित पार पडले होते. आता उद्या तिचे दुसरे ऑपरेशन होते.

रात्री उशिरा हर्षु शुद्धीवर आली.

"मिस्टर इनामदार तुमची बहीण शुद्धीवर आलीये. तुम्ही पाहू शकता त्यांना. हो पण पाचच मिनिट बरं का." नर्स म्हणाल्या.

हर्षुची अवस्था पाहून हर्षला रडूच कोसळले. पण हर्षुसाठी त्याने कसेबसे स्वतःला सावरले. भावाला समोर पाहून तिलाही खूप रडू आले.
किलकिल्या नजरेने आणि भरल्या डोळ्यांनी तिने हर्षकडे पाहिले. खूप काही बोलायाचे होते तिला पण बोलता येत नव्हते. बोलण्यासाठी तिच्यात अजिबात त्राण उरले नव्हते. अर्धवट उघडलेल्या नजरेच्या कप्प्यात तिने हर्षला सामावून घेतले. पण प्रयत्न करूनही तिला जास्त वेळ डोळे उघडे ठेवता येईनात आणि मग पुन्हा एकदा तिने डोळे बंद केले.

हर्षुची अवस्था हर्षला बघवेना. डोळे पुसत तो तिथून लगेचच बाहेर पडला. वॉश रूममधे जाऊन तो खूप रडला. अजूनही त्याच्या मनाला एकच खंत वाटत होती, 'मी का हर्षुला तिथून जा म्हणालो?'

क्रमशः

काय होणार आता पुढे? ह्या धक्क्यातून कसे सावरणार इनामदार कुटुंब. जाणून घेण्यासाठी वाचत राहा अनोळखी दिशा पर्व दोन.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all