अनोळखी दिशा पर्व २ (भाग ६)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की,  हर्षने नेत्राची खूप समजूत घातली तसेच त्याने स्वतः हर्षिता आणि आदित्यच्या नात्याला भक्कम पाठींबा दर्शवला. त्यामुळे नेत्राचाही नाईलाज झाला. तिनेही मग इच्छा नसताना त्यांच्या नात्याला पुढे नेण्यासाठी परवानगी दिली. हर्षिता आणि आदित्य तिथून निघून गेल्यावर हर्ष नेत्राला काहीतरी सरप्राइज देणार होता म्हणून मग तेही तिकडून जायला निघतात. तेवढ्यात पलीकडच्या रस्त्यावर खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. हे दोघेही मग नेमके काय घडले असेल हे जाणून घेण्यासाठी घाईतच रस्ता क्रॉस करुन पलिकडे जातात.

आता पाहुयात पुढे...

हर्ष आणि नेत्रा दोघेही रस्ता क्रॉस करून पलीकडे पोहोचेपर्यंत क्षणात तिथे खूपच गर्दी जमा झाली.

गर्दीत चर्चा सुरू होती.

"खूप लागलंय हो त्या मुलीला, कॉलेजवरुन घरी जात असावी बहुतेक."

"त्यात आजकालची ही तरुण पिढी विमानासारखी गाडी चालवते. त्यात मग अशा निष्पाप जीवांचा बळी जातो."

"हो ना, ह्या मुलीची काहीच चूक नव्हती. तोच शहाणा सिग्नल तोडून अचानक समोर आल्यावर ती बिचारी तरी काय करणार?"

"मग काय. देव करो नि त्या मुलीचं काही बरं वाईट होऊ नये."

दोन वृद्ध व्यक्तींची चर्चा हर्ष आणि नेत्राच्या कानावर पडली. तसे त्या दोघांच्याही काळजात धस्स झाले.

"नेत्रा, पटकन् हर्षुला फोन लाव." घाबरतच हर्ष बोलला.

नेत्राने लगेचच मग पर्स मधून मोबाईल काढला आणि हर्षुला फोन लावला. फोनची रिंग जात होती पण हर्षु काही फोन उचलत नव्हती.

"अरे त्या मुलीचा फोन वाजतोय, उचला कुणीतरी म्हणजे तिच्या घरी कळवता तरी येईल." गर्दीतून एकजण बोलला.

"नका नका, ही पोलीस केस आहे. कोणीही हात लावू नका." दुसरी व्यक्ती म्हणाली.

लोक फक्त तमाशा पाहत उभे होते. हर्ष आणि नेत्राच्या तर काळजाचा ठोकाच चुकला. गर्दीतून रस्ता काढत दोघेही मग पुढे गेले.

"हर्षु..." हर्ष जोरात ओरडला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या.

समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या लाडक्या बहिणीला पाहून हर्षला धक्काच बसला. नेत्राला काय करावे काहीच समजेना. हर्षला सांभाळू की हर्षिताला तेच तिला कळेना.

समोरचे दृष्य काळजाचा थरकाप उडवणारे होते. दहा मिनिटापूर्वी हर्षिता घरी जायला म्हणून निघाली आणि काही वेळातच तिला रक्ताच्या थारोळ्यात असे निपचित पडलेले पाहून हर्ष आणि नेत्रा दोघेही सैरभैर झाले.

"कोणीतरी ॲम्बुलन्स बोलवा प्लीज." नेत्राने जमलेल्या गर्दीला मोठ्या आवाजात हात जोडून विनवणी केली.

गर्दीतील एकाने माणुसकीला जागत लगेच मदत केली. अनेकजण बघ्याची भूमिका घेऊन फक्त बघत होते आणि कुजबुजत होते.

त्या व्यक्तीने हर्षुला रस्त्याच्या कडेला घ्यायला मदत केली. नेत्राने पर्स मधून बाटली काढून हर्षुच्या तोंडावर थोडे पाणी शिंपडले. पण त्याने काहीही उपयोग झाला नाही. रक्त खूपच वाहिल्यामुळे हर्षु बेशुद्ध पडली होती. डोक्याला जबर मार लागला होता. दोन्ही हात आणि पाय रक्तबंबाळ झाले होते. आता ट्रीटमेंटसाठी उशीर होऊन चालणार नव्हते.

"बापरे! खूपच वाईट झाले हे! खूप रक्त गेले आहे ह्या मुलीचे. लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू झाली नाही तर..." गर्दीतून एक महिला बोलली.

"काहीही होणार नाही माझ्या बहिणीला. उगीच कोणीही काहीही तर्क वितर्क लावू नका, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो मी." कुजबुज कानी आलेल्या दिशेने गर्दीकडे रागाने पाहत हर्ष बोलला.

"हर्षु उठ गं ना बाळा. तुला काही होणार नाही. मी तुला असं काही होऊच देणार नाही. प्लिज माझ्यासाठी, माझ्यासाठी एकदा डोळे उघड ना गं." रडत रडत हर्ष बोलत होता.

"हर्ष...काहीही होणार नाही आपल्या हर्षुला. तू शांत हो ना आधी." नेत्रा रडतच बोलली.

"नेत्रा, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तरी तू म्हणत होतीस, थांबू दे तिला. पण मीच तिला घरी जायला सांगितले. तुझे ऐकायला हवे होते मी नेत्रा."

"असे काही नाही हर्ष, तुझ्यामुळे काही झाले नाही. तू उगीच काहीही बोलू नकोस ना रे."

इकडे ह्या दोन भावंडांची अशी अवस्था पाहून नेत्राला काही सुचत नव्हते. आता ह्या क्षणी कोणाला सावरावे? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. समोर लाडक्या ननंदेला असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून 'घरी तरी काय सांगावे? आणि कसे सांगावे?' हा प्रश्न नेत्राच्या मनाला सतावत होता. घरचे हा एव्हढा मोठा धक्का कसा सहन करणार होते देवच जाणे?
त्या क्षणी घरी फोन करुन सांगण्याची देखील परीस्थिती नव्हती.

घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले लोकांमधे चर्चा सुरु होती.

"चूक ह्या मुलीची नाही. ती नियमात रस्ता क्रॉस करत होती. पलीकडचा सिग्नल तोडून एक कार अचानक आली त्यामुळे हे सगळे घडले. कार चालक मात्र फरार झाला." गर्दीतून एक काका बोलले.

"हे असे करतात लोक. स्वतः बरोबरच इतरांच्या जीवाशी सुद्धा खेळतात." लोकांची चर्चा सुरू होती.

अपघातामुळे हर्षुचे खूपच रक्त वाहून गेले होते. हर्ष आणि नेत्रा दोघेही रक्ताने माखले होते. पुढच्या दहाव्या मिनिटाला ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली.

इनामदारांसारख्या बड्या हस्तीची मुलगी असल्यामुळे जास्त विचार करण्यात वेळ न घालवता त्वरित लीगल प्रोसिजर झाली आणि ट्रीटमेंटदेखील सुरू झाली.

हर्षुला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आले. हर्षने कसेबसे स्वतःला सावरले. हिम्मत करून वडिलांना फोन लावला. बाबांना धक्का बसू नये म्हणून फोनवर सर्वकाही खरं न सांगता त्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळ सावरली.

"बाबा, तुम्ही लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये याल का?" कातर स्वरात हर्ष बोलला.

"का रे हर्ष काय झालं? तू ठीक आहेस ना आणि नेत्रा?"

"बाबा आम्ही दोघेही एकदम ठीक आहोत पण आधी तुम्ही याना इकडे."

"हर्ष! काय झालंय नेमकं सांगशील का मला आणि एक गोष्ट सांग मला आताच मेल आलाय तू पंचवीस हजार रुपये कुठे ट्रान्स्फर केलेस? कोणाची मदत करत आहेस का तू?"

"बाबा... सगळं सांगतो, तुम्ही या बरं आधी. प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही बाबा आणि फोनवर नाही सांगू शकत मी काही. प्लिज बाबा मला तुमची गरज आहे असं समजा आणि या ना लवकर."

"बरं बरं...काळजी करू नकोस आलोच मी."

विचार करण्यात जास्त वेळ न दवडता महेशरावांना सांगून माधवराव लगेचच निघाले.

"दादा काय झालंय?" महेशरावांनी विचारले.

"काहीच माहीत नाही. हर्षचा फोन होता. त्याने सिटी हॉस्पिटलला लगेच या म्हणून सांगितलंय." माधवराव उत्तरले.

"बरं दादा, मी येऊ का सोबत?" महेशरावांनी पुढचा प्रश्न केला.

"अरे पण मग इथेही कोणीतरी हवंच ना. मी बघतो आधी नेमकं काय झालंय ते आणि मग तुला कळवतो. गरज पडलीच तर मग तुला कॉल करतो; पण मग त्याआधी महाजनांना फोन करून बोलावून घे. आज त्यांची सुट्टी आहे, तरीही इथे कोणीतरी विश्वासू व्यक्तीच असायला हवी. वेळप्रसंगी महाजन घेतील समजून."

"हो चालेल दादा. मी करतो लगेच फोन."

"ओके," म्हणत माधवराव तिथून निघाले.

सिटी हॉस्पिटलला पोहोचायला त्यांना कमीत कमी अर्धा तास तरी लागणार होता. त्यांचा जीव मात्र अजिबात थाऱ्यावर नव्हता. दरम्यानच्या काळात त्यांनी हर्षला खूपदा फोन ट्राय केले पण समोरून काहीच रिप्लाय नाही.

"हर्षवर्धन इनामदार, तुमच्या बहिणीला त्वरित रक्ताची आवश्यकता आहे. नेमकी हवा असलेला ब्लड ग्रुप हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत सध्या उपलब्ध नाहीये." डॉक्टर म्हणाले.

"असा कसा नाहीये? अहो ब्लड ग्रूप इतका रेअर सुद्धा नाही तरी स्टॉक नाही म्हणताय. काय उपयोग मग ह्या तुमच्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा?" हर्षला राग अनावर झाला. त्याने डॉक्टरांना खूप काही सुनावले. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याची बहीण फक्त त्याला दिसत होती.

"काम डाऊन हर्ष. ही आपली परीक्षा सुरू आहे असं समज. अशावेळेसच ह्या गोष्टी घडत असतात." नेत्राने मग हर्षची समजूत घातली.

"अहो आज दुपारी आणखी एक ॲक्सिडेंटची केस आली होती. त्या व्यक्तीचाही ब्लड ग्रुप हाच होता. त्यामुळे जेव्हढा स्टॉक होता तेव्हढा आजच संपलाय. सो सॉरी फॉर दॅट." डॉक्टरांनी शेवटी हर्षची माफी मागितली.

"इट्स ओके सर. उलट मी त्याच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणते. बहिणीच्या बाबतीत खूपच हळवा आहे तो. पण मग आता काय करायचे? प्लिज अजून कुठून अरेंज होतोय का पहा ना. नाहीतर आम्हाला पत्ता द्या आम्ही पण कुठून अरेंज करता येईल का ते पाहतो." नेत्राने संयमाने परीस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

"एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. बाहेरून कुठून मागवत बसले तर त्यात वेळ जाणार. बाय द वे तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे? तुमचा आणि तुमच्या बहिणीचा सेमच असणार." डॉक्टर हर्षला म्हणाले.

"डॉक्टर पण मी नाही देऊ शकत." नजर चोरत लगेचच हर्ष उत्तरला.

"हर्ष! अरे हे काय बोलतोस तू? हर्षुला का नाही तू ब्लड देऊ शकत?" आश्चर्यकारकरित्या नेत्राने विचारले.

"तू थांब गं नेत्रा. किती पॅनिक होशील!" हर्ष नेत्राला थोडं तोडूनच बोलला.

'एरव्ही सर्वांच्या मदतीला न सांगता धावून जाणारा हर्ष आज स्वतःच्या बहिणीची मदत करायला नाही म्हणतो आहे.' या गोष्टीवर नेत्राचा खरंतर विश्वासच बसेना.

"डॉक्टर अगदी पंधरा एक मिनिटात माझे बाबा पोहोचतील इकडे. त्यांचे ब्लड चालेल हर्षुला. मी बोलतो बाबांशी."

"ओके तुम्ही म्हणाल तसं. पण त्यांना कुठला आजार वगैरे नाही ना? म्हणजे बीपी, शुगर असे काही."

"नाही नाही. बाबा एकदम फिट अँड फाईन आहेत."

"ओके मग डन. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो."

"डॉक्टर पण माझी बहिण ठीक होईल ना?" हर्षने विचारले.

"आम्ही आमचा बेस्ट देऊ. तुम्ही काळजी करू नका." डॉक्टर उत्तरले.

एवढे बोलून डॉक्टर. ऑपरेशन थिएटरच्या दिशेने गेले.

"नेत्रा हे काय होऊन बसलंय गं." रडवेल्या सुरात हर्ष बोलला.

नेत्रा मात्र अजूनही हर्षच्या बोलण्याचाच विचार करत होती.

'हर्ष नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय. देवा हे काय सुरू आहे? काहीच कळेना झालंय. कोणाची दृष्ट लागली आमच्या सुखी आणि आनंदी कुटुंबाला? आजच हर्षु आणि आदीच्या नात्याबद्दल आम्हाला समजावं आणि आजच हर्षु सोबत हे असं व्हावं! त्यात हर्षचं कोड्यातील वागणं...काहीच कळत नाहीये.' नेत्रा खोल विचारांत गुंतली होती.

हर्षने मुद्दाम तिला डिस्टर्ब केले नाही. त्यालाही कळून चुकले होते की नेत्राच्या डोक्यात नेमके काय सुरू आहे. नेत्रा मात्र शून्यात नजर लावून बसली होती. तिचे हर्षच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.

तेवढ्यात माधवराव हॉस्पिटलमधे पोहोचले.

वडिलांना पाहून हर्षचा बांध तुटला. माधवरावांच्या गळ्यात पडून तो हमसून हमसून रडू लागला.

हर्षला असं लहान मुलासारखं रडताना पाहून नेत्रालादेखील रडू कोसळले.

"हर्ष अरे नेमके काय झाले आहे इकडे? आतातरी सांगशील का?" घाबरतच माधवरावांनी प्रश्न केला.

"बाबा... आपली हर्षु!"

"हर्षु! काय झाले हर्षुला?"

"बाबा हर्षुचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय. खूप रक्त गेलंय."

"काय?" झटकन माधवरावांच्या डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळले.

"हे काय बोलतोस तू हर्ष?" लाडक्या लेकीचा चेहरा वडिलांच्या डोळ्यासमोर तरळला. क्षणभर माधवरावांना काहीच कळेना.

"बाबा...दुर्दैवाने हे खरं आहे. नशीब आम्ही तिथे जवळच होतो. त्यामुळे वेळेत तिला हॉस्पिटलमध्ये आणता आले." नेत्रा बोलली.

"माधवराव इनामदार तुम्हीच का?" तेवढ्यात एक नर्स तिथे आल्या.

"हो मीच. कशी आहे माझी लेक आता?" घाबरतच माधवरावांनी प्रश्न केला.

"आता लगेच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण डॉक्टरांनी तुमचे ब्लड घ्यायला सांगितले आहे. पेशंटला आता रक्ताची खूप गरज आहे आणि हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत हव्या असलेल्या ब्लड ग्रूपचे ब्लड सध्या शिल्लक नाही."

"हो चालेल ना सिस्टर. हवे तेवढे ब्लड घ्या पण माझ्या लेकीला वाचवा हो" रडवेल्या सुरात अगदी हतबलपणे माधवराव म्हणाले.

"काका प्लीज असे हात नका ओ जोडू. मला तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. काही होणार नाही तुमच्या मुलीला. माझे मन मला सांगत आहे."

"देव करो नि असेच होवो." समाधानी शब्दात माधवराव बोलले.

"तुम्ही चला माझ्यासोबत." सिस्टर बोलल्या.

त्यांच्या पाठोपाठ मग माधवराव आत गेले. त्यांच्या पायातील त्राणच जणू निघून गेले होते असेच वाटले क्षणभर त्यांना. लेकीसाठी बापाचे काळीज तिळतीळ तुटत होते.

क्रमशः

आता काय होणार पुढे? जाणून घेण्यासाठी वाचत रहा अनोळखी दिशा.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all