अनोळखी दिशा पर्व २ (भाग ५)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, आदित्य म्हणजेच नेत्राचा सावत्र भाऊ आणि हर्षिता म्हणजेच तिची सख्खी नणंद, यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे हे हर्ष आणि नेत्राला समजते. हर्ष त्यांच्या प्रेमाला पाठिंबा दर्शवतो पण नेत्राला मात्र त्यांचे नाते मान्य नसते. याचे कारण एकच ते म्हणजे दोन्ही कुटुंबात असलेली खूप मोठी आर्थिक दरी.

आता पाहुयात पुढे...

खूप सारे प्रयत्न करूनही नेत्राचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना. पण हर्षचा जर हर्षु आणि आदित्यच्या नात्याला पाठिंबा असेल तर नेत्रालाही तिच्या विचारांत तडजोड करावी लागणार होती. म्हणूनच इच्छा नसतानाही तिने स्वतःच्या मनाला कसेबसे समजावले पण तरीही होणाऱ्या परिणामांची चिंता तिला खूप सतावत होती.

"आदी तू प्रॉमिस कर मला, आधी तू स्वतःला प्रूफ करशील. त्यानंतरच हे असे बाहेर फिरणे, भेटणे. तेव्हा मीही अभिमानाने तुमच्या नात्याबद्दल घरच्यांना सांगू शकेल. या विषयावर मनमोकळेपणे घरच्यांशी बोलू शकेल. त्यात आता हर्षुचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तिच्यासाठी आई बाबा स्थळं शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे असे समजून तू तुझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न कर."

"हो नक्कीच दी. आता मला माझ्या प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे." हर्षिताकडे पाहत आदित्य बोलला.

हर्षिताने नजर खाली झुकवली. तिलाही क्षणभर भरुन आले. सुखी जीवनाला आणखी काय हवं? काही वर्षांपूर्वी एका अनोळखी वाटेवर हर्ष आणि नेत्राची भेट झाली आणि त्यांच्यामुळेच त्याच वाटेवर आज पुन्हा एकदा आणखी एक प्रेमकहाणी फुलू पाहत होती. आदित्य आणि हर्षिता देखील त्याच अनोळखी वाटेवर भेटले असे म्हणायला हरकत नाही.

"बरं चला मॅडम आतातरी टेन्शन कमी झालं ना? आणि
विशेष म्हणजे तुला सर्व पटलं हे महत्त्वाचं." हसतच हर्ष बोलला.

ओठांवर जबरदस्तीचे हसू आणत नेत्राने मान डोलावली. हर्षिता आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात आहेत या गोष्टीवर अजूनही नेत्राचा विश्वास बसत नव्हता. तिच्यासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती.

'देवा हे काय होऊन बसले आहे? ह्यांच्या लग्नाला घरचे परवानगी देतील की नाही ही नंतरची गोष्ट झाली पण अत्यंत लाडाकोडात वाढलेली हर्षु लग्नानंतर कसं काय मॅनेज करणार आहे देवच जाणे? या सगळ्यांवर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आदित्यने स्वतःला प्रूफ करणे. तरच काही अंशी का होईना पण त्यांच्या लग्नाचे चांसेस वाढतील.' नेत्रा विचारांत इतकी गुंतली होती की हर्ष तिला आवाज देतोय हे तिच्या लक्षातच आले नाही.

"नेत्रा...बस झालं गं आता. आणखी किती विचार करणार आहेस? त्याने केलंय ना प्रॉमिस, तो नक्की स्वतःला प्रूफ करणार याची खात्री आहे मला आणि शेवटी तो तुझाच भाऊ आहे." नेत्राचा हात हातात घेत हर्ष बोलला नंतर त्याने त्याचा मोर्चा आदित्यकडे वळवला.

"काय आदित्य! चॅलेंज घेतलंय खरं; पण माझी बहिण हवी असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुला तशी मेहनत करावी लागेल. नाहीतर तुझ्या बहिणीच्या नकाराला होकारात बदलवणे वाटते तितके सोपे नाही बरं का! कसंबसं आता तात्पुरतं तिला मनवलंय पण तीही खूप हट्टी आहे हे चांगलंच माहितीये तुला. एकवेळ मी आई बाबांना मनवू शकेल पण तुझ्या बहिणीला नाही मनवू शकणार. त्याबाबतीत तिची तत्त्व खूपच कडक आहे. आमच्याच लग्नाच्या वेळी त्याचा अनुभव आलाय मला." हर्ष आदित्यला म्हणाला..

"डोन्ट वरी भाऊजी, मी पण तिचाच भाऊ आहे. एखादी गोष्ट एकदा का मनावर घेतली की मग घेतलीच." आत्मविश्वासपूर्ण शब्दांत आदित्य बोलला.

"ये हुई ना बात. आता खरंच नेत्राचा भाऊ आणि माझा मेहुणा शोभतोस बघ." आदित्यच्या खांद्यावर शाबासकीची थाप मारत हर्ष बोलला.

"आय एम प्राऊड ऑफ यू आदी. माझी चॉईस एकदम परफेक्ट आहे, हे एक ना एक दिवस वहिनीला नक्की मान्य होईल याची मला खात्री आहे." नेत्राकडे एक कटाक्ष टाकत अभिमानाने हर्षिता बोलली.

नेत्रालाही आता कळून चुकले होते खरंच हे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. दोघांच्याही बोलण्यात नेत्राला खूपच आत्मविश्वास जाणवला. त्यात हर्षची त्यांना साथ आहे म्हटल्यावर अर्धी लढाई तर ते इथेच जिंकले होते.

नेत्राचा मुड एकदम ऑफ झाला होता. जेव्हापासून हर्षिता आणि आदित्यबद्दल तिला समजले तेव्हापासून ती खूपच शांत झाली होती.

"वहिनी..? अगं किती टेंशन घेशील? अगं एवढं टेन्शन तर मी पण घेतलं नाही. हे बघ प्रेम जर खरं असेल तर ते आपोआपच आपल्याला मिळतं नाहीतर नाही. यावर तरी तुझा विश्वास आहे ना? दूर नको जाऊस, तुझं आणि दादाचंच उदाहरण घे ना."

"सगळं पटतंय गं हर्षु; पण तरीही.."

"अगं विश्वास आहे ना...झालं तर मग. आता पण आणि परंतु मनात आणू नकोस. घरचे काय म्हणतील वगैरे सगळं डोक्यातून आधी काढून टाक बरं. आता मला एक सांग आदित्य माझ्यासाठी एक जोडीदार म्हणून योग्य नाही का गं? बाकी आर्थिक दरी वगैरे सगळं थोडा वेळ बाजूला ठेव आणि उत्तर दे, तेही अगदी मनापासून."

"हर्षु, आदित्य तुझ्यासाठी एक जोडीदार म्हणून एकदम परफेक्ट आहेच किंबहुना त्याच्यासारखा जोडीदार मिळायला भाग्यच लागेल. त्याबाबतीत तू खरच खूप नशीबवान आहेस." आदित्यचे कौतुक करत नेत्रा म्हणाली.

"मग आता तूच मला सांग आयुष्यात आपल्यावर अतोनात प्रेम करणारा जोडीदार महत्त्वाचा असतो की पैसा? आणि पैसा काय गं आज आहे तर उद्या नाही, याउलट विचार केला तर प्रेमाची ताकद मग तुलनेने खूप मोठी ठरेल बघ." हर्षिता सर्वतोपरी नेत्राला समजावण्याचा प्रयत्न करतच होती.

हर्षिताचे म्हणणे नेत्राला मनातून पटले होते. पण तरीही एका प्रतिष्ठित उद्योगपतीची लेक एका सामान्य मुलाची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करते हे तिचे मन मानायला तयारच नव्हते. त्यातच तो सामान्य मुलगा जर तिचा स्वतःचा भाऊ आहे हे समजल्यावर तिला धक्का बसणे स्वाभाविक होते. कारण हर्ष जेव्हा तिच्या प्रेमात पडला तेव्हाही तिच्या मनाला ही गोष्ट पटत नव्हती. इनामदारांच्या घरची सून होण्याची आपली लायकी नाही हे तिचे मन तिला वारंवार सांगत होते. त्यात निलम काकीचे वारंवार नेत्राला कमी लेखणे, घालून पाडून बोलणे या सर्व गोष्टींमुळे आता आदित्य आणि हर्षुच्या बाबतीत देखील तोच कित्ता नको गिरायला. हा विचार तिच्या मनातून जायला तयारच नव्हता. पण त्यावेळी हर्षच्या प्रेमामुळे नेत्रा आणि हर्ष ह्या दोन अनोळखी दिशा एक झाल्या होत्या. आता ह्यावेळी देखील असाच काहीतरी चमत्कार व्हावा आणि ह्या दोघांच्या प्रेमाची ताकद अशीच कामी यावी असे नेत्राला मनापासून वाटत होते.

नेत्रा अजूनही विचारांत अडकून पडली होती.

"वहिनी...तू अजिबात काळजी करू नकोस. विश्वास ठेव आमच्यावर. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही. आजही आम्ही भेटणार नव्हतो; पण योगायोगाने आज आमची भेट झाली. आम्ही ठरवून नाही भेटलो. नाहीतर मागच्या एक वर्षात ही एवढी मोठी गोष्ट लपून राहिली असती का?

"म्हणजे तुम्ही दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात आहात की काय?" आश्चर्यकारकरित्या हर्षने विचारले.

"तसेच समज...पण वहिनीचा भाऊ म्हणजे अगदीच वहिनी सारखा. अरे भावच देईना सुरुवातीला. पण मग मीही खूप हट्टी आहे, हे कुठे माहीत होतं त्याला." आदित्यकडे पाहत मोठया तोऱ्यात हर्षिता बोलली.

"म्हणजे हे संकट आदित्यने स्वतःहून ओढवून नाही घेतले. जबरदस्ती त्याच्या गळ्यात पडले असे म्हणायला हरकत नाही! जरा सांभाळून रे बाबा आदित्य." बहिणीची खेचत हसतच हर्ष बोलला.

"काय रे दादा, तू तरी असं नको ना बोलू. मी काय इतकी वाईट आहे का रे?" तोंड फुगवून लटक्या रागातच हर्षिता बोलली.

"गंमत केली गं... पण ते काही का असेना खूपच छुपे रुस्तुम निघालात राव तुम्ही दोघेही हे मात्र नक्की. असेच एकमेकांच्या सोबत राहा नेहमी. काहीही झालं तरी एकमेकांची साथ कधीही सोडू नका."

"हो दादा...तू आणि वहिनी आमच्या सोबत आहात ना..मग आमची साथ कधीच सुटणार नाही याची खात्री आहे मला." हर्षिता म्हणाली.

"दी.. हस ना गं आता. नको ना जास्त विचार करू." केविलवाण्या सुरात आदित्य नेत्राला म्हणाला.

"हो रे.. पण काळजी वाटते बाकी काही नाही." चेहऱ्यावर जबरदस्तीचे हसू आणत नेत्रा बोलली.

"नको काळजी करुस. देवाची जी इच्छा असते नेहमी तेच होते यावर विश्वास आहे ना तुझा?" आदित्यने प्रश्न केला.

"हो."होकारार्थी मान हलवत नेत्रा उत्तरली.

"झालं तर मग."

"आदी पण काहीही म्हण तुला बदलवलं आमच्या हर्षुने. वेगळाच काँफिडन्स आलाय बघ तुझ्यात. आता हाच आत्मविश्वास कायम ठेवून लवकरात लवकर सी.ए.ची पदवी लागू दे तुझ्या नावासमोर."

"नक्कीच दी...तुझी ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार. तुझे आणि भाऊजींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना आणखी मग काय हवंय मला?" हसत हसत आदित्य बोलला.

"बरं चला मी निघतो आता. आई वाट पाहत असेल. अजून उशीर केला तर एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील."

"सावकाश जा रे आणि गाडी हळू चालव. उगीच कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नकोस." काळजीपोटी नेत्रा बोलली.

"हो गं..चला बाय." म्हणत आदित्य निघाला.

"दादा तुम्ही आता पुन्हा ऑफिसला जाणार आहात का?" आदित्य गेल्यानंतर हर्षिताने हर्षला प्रश्न केला.

"नाही..का गं?" हर्ष उत्तरला.

"काही नाही म्हणजे तुम्ही लगेच घरी येणार आहात की कसं करणार आहात?"

"अगं बाई तुमच्यामुळे आमच्या प्लॅनिंगची पुरेपूर वाट लागली आज. एकतर किती दिवसांनी असं बाहेर पडलो होतो. पण त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही." कपाळावर आठ्या आणत हर्ष बोलला.

"सो सॉरी फॉर दॅट. पण मग तुम्ही लगेच नसाल येणार तर मी निघते." थोडे आढेवेढे घेत हर्षु म्हणाली.

"बरं जा तू..आम्ही येतो नंतर." हर्षने लगेचच तिच्या तिथून जाण्याला दुजोरा दर्शवला.

"ओके बाय पण आईला काय सांगू?" हर्षुचा पाय काही तिथून निघत नव्हता, म्हणूनच एकामागून एक प्रश्न विचारत ती तिथेच रेंगाळत बसली.

"तू नको काही सांगू मी आईला फोन करून सांगेल?" खोचकपणे हर्ष बोलला.

"करा मग एंजॉय आम्हाला सोडून...एकटे एकटे." अखेर हर्षु मुद्द्यावर आलीच.

"आम्हाला सोडून तू एन्जॉय करत होतीस ते कुठे गेलं? आणि तसेही तू कशाला आमच्यामध्ये हवियेस गं...कबाब मे हड्डी!"

"मी कबाब मे हड्डी काय! आता जाते मी...पण बघुन घेईल तुम्हा दोघांनाही. बाय." म्हणत हातपाय आपटतच हर्षिता तिथून निघणार तोच नेत्राने तिला थांबवले.

"अगं हर्षु थांब की, याचे काही ऐकू नकोस. गंमत करतोय तो. हो ना हर्ष?" नेत्रान म्हणाली.

"ए नाही आ, मी अजिबात गंमत करत नाहीये." हर्षुला चिडवण्यासाठी हर्ष मुद्दाम तसे बोलला.

"जाऊ दे वहिनी, तू नको माझी बाजू घेऊ. याच्या लगेच पोटात दुखतं." असे बोलून फायनली चिडून हर्षिता तेथून निघून गेली.

"तू पण ना हर्ष! का छळत असतोस रे सारखं तिला?"

"माझा हक्कच आहे तो. ते जाऊ दे, बरं सॉरी यार..आज आपला सगळाच प्लॅन फसला." नेत्राचा हात हातात घेत हर्ष बोलला.

"गप रे...तू कशाला सॉरी म्हणून मला लाजवतोस?" नेत्रा बोलली.

"बरं चल अजूनही वेळ गेलेली नाही. एक खूप छान सरप्राइज आहे तुझ्यासाठी." आनंदाने हर्ष बोलला.

"कसलं सरप्राइज?" आश्चर्याने नेत्राने विचारले.

"उगीच सरप्राइज म्हणालो का मी? काय तू पण. चल अगोदर, नंतर आपोआप समजेल तुला."

हर्ष आणि नेत्रा गाडीजवळ आले. तेवढ्यात पलीकडच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर 'धाडकन' असा एकच आवाज झाला.

"नेत्रा अगं खूप मोठा अक्सिडेंट झाला आहे तिकडे असं वाटतंय."

"चल जाऊन पाहुयात."

हर्षने नेत्राचा हात घट्ट पकडला आणि घाईतच त्याने रस्ता क्रॉस केला. समोरील दृष्य पाहून तर दोघांनाही भोवळ यायचीच तेवढी बाकी होती.

क्रमशः

नेमके काय झाले तिकडे? जाणून घेण्यासाठी वाचत राहा अनोळखी दिशा, पर्व दोन.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all