अनोळखी दिशा पर्व २ (भाग ३)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की कॉफीच्या निमित्ताने हर्ष आणि नेत्रा बाहेर गेले असताना रस्त्यात नेत्राला तिची बालमैत्रीण सुखदा भेटते आणि गंमत अशी की सुखदा हर्षची सुद्धा कॉलेजची मैत्रीण असते. खूप दिवसांनी भेटल्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. पण हर्ष कॉलेजमध्ये सुपर्णाच्या प्रेमात असताना आता त्याचे अर्पिता म्हणजेच नेत्रासोबत कसे काय लग्न झाले? या विचाराने ती जरा गोंधळते.

आता पाहुयात पुढे..

"अरे किती वेळ झाला आपण इथेच गप्पा मारत उभे राहिलोत. चला कॉफी तरी घेऊयात." नेत्रा म्हणाली.

"नाही नको गं..तुम्ही दोघे घ्या हवंतर. मला खूप उशीर होईल. आई वाट पाहत असेल. पुन्हा केव्हातरी डिनर किंवा लंच प्लॅन करुयात, पण आज नको." सुखदा म्हणाली.

"बरं बाई...पण जमलं तर लग्नाचे पेढे तेवढे खाऊ घाल लवकरात लवकर." मस्करीच्या सुरात हर्ष बोलला.

"हो त्याचीच तयारी सुरू आहे सध्या." हसतच सुखदा बोलली.

"मग आता आम्हाला लग्नाला बोलवायला विसरु नकोस." हर्ष मुद्दाम सुखदाची खेचत होता.

"नाही रे, असं कसं होईल?"

"होईल बाई तुझं काही सांगता येत नाही. ध्यानात आलं तर  काँटॅक्ट लिस्टमधून आमचा पत्ता पुन्हा कट करशील."

"इतका तरी विश्वास ठेव रे बाबा. तुला वाटते तितकीही वाईट नाही हा मी." नाराजीच्या सुरात सुखदा म्हणाली.

"बरं चला येऊ का मी आता? खूपच उशीर होतोय. मला आता निघायला हवं. फोनवर काँटॅक्ट मध्ये राहूच." असे बोलून सुखदा जायला निघाली.

"अगं आलीच आहेस तर एक दिवस घरी येऊन जा. सगळ्यांसोबत ओळख होईल." नेत्राने आपुलकीने सुखदाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.

"हो हो नक्कीच. फोन करते तुला. चल बाय, ऑटो आली मी निघते." म्हणत सुखदा ऑटोमध्ये बसली.

ऑटो दिसेनाशी झाली तसे हर्ष आणि नेत्रादेखील मग गाडीत बसले.

"तुला माहितीये नेत्रा, जेव्हा सुपर्णा आणि मी नवीन नवीन एकमेकांमध्ये गुंतत होतो तेव्हा ह्या सुखदाला खूप राग यायचा आमचा."

"का बरं, तिलाही तू आवडत होतास की काय?"

"नाही गं, तसे काही नाही. जी अजूनही अनमॅरिड आहे, जिला लग्नाची भीती वाटते ती अशी डेरींग थोडीच ना करेल." हसतच हर्ष बोलला.

"पण मग तिला तुम्हा दोघांचे वागणे बोलणे खटकण्याचे कारण काय?" उत्सुकतेपोटी नेत्राने विचारले.

"अगं खूप अभ्यासू मुलगी होती ती. 'हे वय अभ्यास करण्याचे आहे, प्रेमात पडायचे नाही. पुढे आयुष्य पडलंय प्रेम करायला; पण सध्या अभ्यासाला महत्त्व दिले तर भविष्यकाळ आनंदी असेल. आता तरी हा प्रेम नावाचा थिल्लरपणा थांबवा.' असे बोलून वारंवार आम्हाला अभ्यासापासून डायव्हर्ट होण्यापासून थांबवायची ती. ते वयच तसे होते म्हणा. पण सुखदाने आम्हाला वेळोवेळी खूप छान सल्ले दिले. ही होती म्हणून निर्विघ्नपणे आमचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले. नाहीतर सुपर्णा तर अशी मुलगी होती की तिची बडबड, तिचे फोन कॉल्स, घरी येणं जाणं, अधूनमधून बाहेर भेटणं आणि लेक्चर बंक करुन कॉलेज कॅन्टीन मध्ये टाईमपास करणं किंवा मग मुवीला जाणं या सर्व गोष्टींवर मर्यादा ठेवणं खरंच खूप अवघड झालं असतं. अर्थातच या सर्वांत तिची एकटीचीच चूक होती असं नाही. मलाही सुपर्णाच्या ह्या गोष्टी मनापासून आवडायच्या. पण सुखदा आम्हाला वेळोवेळी वेळेचे महत्त्व समजावून सांगायची आणि आम्हाला डायवर्ट होण्यापासून वाचवायची.
आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची वेळोवेळी जाणीव करुन द्यायची. खरंतर त्यावेळी तिचा खूप धाक वाटायचा पण.."

बोलता बोलता हर्ष मध्येच थांबला.

हर्ष सुखदाबद्दल भरभरून बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. एरव्ही कॉलेजच्या गोष्टी बोलण्याचे तो मुद्दाम टाळायचा. सुपर्णा हा विषय तर त्याच्यासाठी केव्हाच मागे पडला होता. आता आयुष्यात तो नेत्राच्या बरोबरीने पुढे निघून आला होता; पण तरीही आज कुठेतरी हर्ष जुन्या गोष्टी आठवून आनंदी झाला होता. कदाचित सुखदामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील अनेक आनंददायी गोष्टींना उजाळा मिळाला होता. जे क्षण, जे दिवस तो भरभरून जगला होता.. त्या नुसत्या आठवणीने देखील क्षणभर हर्ष वेगळ्याच दुनियेत रममाण झाला होता. एरव्ही सुपर्णाचे नाव कानावर जरी पडले तरी चिडचिड करणारा हर्ष आता हळूहळू त्यातून बाहेर येत असल्याचे नेत्राला जाणवले. सुपर्णाबद्दल त्याच्या मनात अजूनही कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर होता. फरक फक्त एवढाच की हे  तो कधीही मान्य करणार नाही.

हर्षमधील हा बदल चांगला की वाईट? ते मात्र नेत्राला समजेना.

"काय मग, आज नेमकं काय झालंय? सुखदाला जाऊन दहा मिनिटे झाली. तू मात्र अजूनही त्याच विचारांत आहेस." नेत्राने मुद्दाम विषय काढला.

"म्हणजे..?" नेत्राचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून आश्चर्यकाकरीत्या हर्षने प्रश्न केला.

"काही नाही." रागातच नेत्रा बोलली.

"काय झालं नेत्रा?"

"कुठे काय?"

"खोटं बोलू नकोस. अशी का बोललीस मग?"

"जाऊ दे, चल तसाही खूप वेळ झाला आहे आपण बाहेर येऊन. जाऊयात आता घरी?"

"अगं अजून आपण कॉफी पण घेतली नाही आणि लगेच घरी?"

"आता माझा मुड नाहीये." रागातच नेत्रा उत्तरली.

"मी काही चुकीचं बोललो का? तसे असेल तर खरंच सॉरी यार. पण आपला प्लॅन नको ना चेंज करायला. एकतर किती दिवसांनी असा क्वालिटी टाईम मिळालाय. प्लिज नको ना रागावू."

"याला म्हणतात का क्वालिटी टाईम? जिच्यासाठी हा प्लॅन केलास ती बायको शेजारी असताना मैत्रिणींबद्दल गप्पा मारतं का कोणी हर्ष? जाऊ दे बोलूच नकोस माझ्याशी!" तोंड फुगवून नेत्रा बोलली.

"सॉरी ना यार, चुकलं माझं, नाही लक्षात आलं पटकन्." विनवणीच्या सुरात हर्ष बोलला.

"अरे पण एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करता यावा म्हणून कॉफीचा प्लॅन केलास ना आणि आता तेच विसरलास वाटतं तू, सुखदा आणि सुपर्णाच्या जुन्या आठवणींत इतका तू रमलास की दोन कॉफी शॉप गेलेसुद्धा मागे. तरी तुझं लक्ष नाही मग राग येणार नाही का रे? तूच सांग."

"हो गं..समजलं मला. पण मग आता मी काय करू तुझा राग जाण्यासाठी? एकतर तू जास्त कधी रागवत नाहीस माझ्यावर त्यामुळे मला समजेना तुझा राग कसा घालवू?"

"तेच तर चुकतं ना माझं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी राग धरून बसायची सवयच नाही. पण खरं तर त्याची सवय करून घ्यायला हवी म्हणजे तुलाही मला मनवण्याची प्रॅक्टिस होईल." आज नेत्रा हर्ष सोबत भांडण्याच्या मुड मध्ये होती जणू.

"बरं बाई...हवं तर कान पकडू का? जमलंच तर गाडी थांबवून उठाबशा पण काढतो. पण चिडू नकोस ना. तू चिडली की मला काहीच सुचत नाही." लाडीक स्वरात हर्ष नेत्राची समजूत काढू लागला.

"इतक्यात माघार? पण माझा आज भांडण्याच्या मूड आहे त्याचे काय करू?" खोचकपणे नेत्रा बोलली.

हर्षने तेवढ्यात गाडीचा ब्रेक दाबला.

'आता काय खरंच उठाबशा काढतो की काय हा?' नेत्रा मनातच विचार करू लागली.

"गाडी का थांबवलीस?" लटक्या रागातच नेत्राने विचारले.

"तुझा भांडण्याच्या मुड जाऊ नये म्हणून. ह्ममम आता भांड." मुद्दाम हर्ष बोलला आणि चेहऱ्यावर गोड स्मित आणत, एकटक तो नेत्राला न्याहाळू लागला.

त्याच्या अशा एकटक पाहण्याने नेत्रा क्षणात विरघळली. आपण हर्षवर रागावलो आहोत हेच ती विसरुन गेली. लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावर पसरली. हर्षच्या नजरेचा ती सामना करुच शकत नव्हती.

"हर्ष नको ना रे असं पाहूस. गेला माझा भांडण्याचा मूड." लाजत मान खाली घालत नेत्रा बोलली.

नेत्राचा राग कसा घालवायचा हे हर्षलाही चांगलेच माहीत होते. त्याच्यावर जास्त काळ ती रागावू शकत नव्हती. फक्त तिच्यातील बायको कधीकधी तिला असे वागायला भाग पाडायची.

"ये ते बघ कॉफी शॉप. नवीनच सुरू झालंय वाटतं. चल जाऊयात तिथे?" हर्षचे लक्ष विचलित करत नेत्रा बोलली.

नेत्राचा राग निवळलेला पाहून हर्षला मनातून थोडे हायसे वाटले.

"अगं पण नवीन आहे. चव कशी असेल, काही अंदाज नाही. इथे नको. थोडं पुढे गेल्यावर छान कॉफी शॉप आहे. तिथे छान कॉफी मिळते. तिथे जाऊयात?"

"आता थांबलो आहोतच तर टेस्ट तर करुयात ना. अनुभव घेतल्याशिवाय कसे कळेल इथे कशी कॉफी मिळते ते."

"ह्मममम...तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. बरं चल जाऊयात इथेच."

दोघेही मग गाडीतून खाली उतरले. आत जाता जाता न राहवून हर्षने नेत्राचा हात हातात घेतला. क्षणभर ती बावरली. नवरा बायकोच्या नात्यात त्यांच्या बिझी शेड्युलमुळे आलेला
दुरावा हळूहळू कमी होत होता. त्याची गरजच होती त्यांच्या सुखी संसाराला.

तेवढ्यात एक कपल त्यांच्या क्यूट बाळाचे फोटो काढण्यात इतके रममाण झाले होते की त्यांना पाहून नेत्राची पावले जागेवरच थबकली. त्या बाळाला पाहून तिच्या ओठांवर आपसूकच हास्य फुलले.

क्षणभर ती त्या कपलमध्ये स्वत:ला आणि हर्षला इमॅजिन करु लागली.
'आपल्या लग्नालादेखील आता दोन वर्ष होत आली. आपणही आता बाळाचा विचार करायला हवा.'

न राहवून नेत्राच्या मनात मातृत्वाची ओढ निर्माण झाली. हर्ष देखील त्या बाळाच्या बाललीलांत क्षणभर हरवून गेला.

लगेचच नेत्रा आणि हर्षची नजरानजर झाली. दोघांच्याही डोळ्यांत जणू एकच स्वप्न चमकले. ओठांवर आपसूकच मग हास्य फुलले. न बोलताही दोघांनीही एकमेकांची मने जणू जाणली होती. हर्षने हातात घेतलेल्या नेत्राच्या हाताची पकड अधिकच घट्ट करत नजरेतूनच तिच्या निर्णयाला त्याने दुजोरा दिला.

दोघेही मग कॉफी शॉपमध्ये गेले. संसाराला दोन वर्ष होऊन देखील आज दोघेही नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे फिलिंग क्षणभर दोघांनाही आले.

अजूनही नेत्राच्या मनात त्या बाळाविषयी विचार सुरु होते. अडून अडून ती त्या बाळाकडे कटाक्ष टाकत होती. आता धावत जाऊन त्याला उचलून घ्यावे आणि त्याचे भरपूर लाड करावे. असे क्षणभर नेत्राच्या मनात आले.

कॉफीची दिलेली ऑर्डर आलीदेखील; पण नेत्राचे लक्ष मात्र त्या बाळाकडेच होते.

"हर्ष ते बाळ किती क्यूट आहे ना रे." हसतच नेत्रा बोलली.

"हो गं... पण त्या बाळाच्या नादात कॉफी थंड होईल बघ. ती आधी संपव. अजिबात लक्ष नाही तुझे. ना कॉफीकडे ना नवऱ्याकडे. निघालो तेव्हा आपण भलत्याच मूडमध्ये होतो आणि आता पहा हा मुड कुठे पोहोचलाय. बाळ हवे असेल तर आधी माझ्याकडे लक्ष द्यावे लागेल ना मॅडम."थोडं रोमँटिक मूडमध्ये हर्ष बोलला.

"गप रे काहीही काय?" नजर चोरत लाजतच नेत्रा बोलली.

"बरं आता पुढचे प्लॅनिंग काय आहे." नेत्राने प्रश्न केला.

"अजून कुठे आपण काही प्लॅनिंग केलं आहे. मागे एकदा बोललो तर तुला अजून वेळ हवा होता. इतक्यात नको बाळाची जबाबदारी असे तूच तर म्हणाली होतीस ना आणि आता मला विचारतेस पुढचे प्लॅनिंग काय आहे म्हणून!"

"अरे ये! पुढचे प्लॅनिंग म्हणजे आता पुढे काय करायचे? म्हणजे घरी जायचे की आणखी कुठे? असे विचारले मी. तू पण ना हर्ष." हर्षच्या खांद्यावर हलकीशी चापट मारत लाजतच नेत्रा बोलली.

"अच्छा! असे आहे होय. पण आता सगळे प्लॅनिंग तुझ्याकडे. मी फक्त एक आज्ञाधारक नवरा बनून ते फॉलो करणार."

"हो का माय डियर नवरोबा."

"हो मग. बरं तूच सांग आता काय करायचं पुढे?"

"माझे फक्त कॉफीवर भागणार नाही आ. आज मला खूप काही चटपटीत खावसं वाटतंय."

"अरे देवा! असं कसं झालं! इतक्यात गुड न्यूज आली सुद्धा!"
नेत्राची खेचत मुद्दाम आश्चर्यकारकरित्या हर्ष बोलला.

"गप रे. काहीही काय, पण आज वेड लागलंय तुला हे मात्र नक्की. स्वारी भलतीच खुशीत आहे."

"असणारच की मग...आपल्या लाडक्या बायकोसोबत असा कॉलिटी टाईम स्पेंड करायला मिळतोय मग मला सांग कोणता नवरा खुशीत नसणार? त्यात रोज आमची बायको सतत डोळ्यासमोर असूनही फक्त दुरुनच तिला पाहून समाधान मानावे लागते. आजकाल फक्त फाईल्स, मीटिंग्ज, डील्स हे सोडून बोलण्यासाठी दुसरा विषयच नाही. हे असे आमचे नशीब!"

हर्षच्या बोलण्याने नेत्राला हसूच आले.

"बरं आता हसू नको, कुठे जायचे? फक्त ऑर्डर सोडा राणीसरकार."

"तू नेशील तिथे." नेत्रा उत्तरली.

"बरं चल तुझ्या आवडीच्या ठिकाणी जाऊयात. तुला जे हवं ते खा मग."

हर्ष आज खूपच खुश होता. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. हीच तर खरी ताकद होती त्यांच्या खऱ्या प्रेमाची. नेत्राच्या आवडीच्या स्ट्रीट फूड कॉर्नरवर येऊन त्याने गाडी थांबवली. दोघेही गाडीतून खाली उतरले. आज खूप दिवसांनी दोघेही हे सर्व एन्जॉय करत होते.

"ये वाव...न सांगताही तुला माझ्या मनातले बरोबर समजले. थँक्यू यू सो मच हर्ष."

"चल जाऊयात!" नेत्राचा हात हातात घेत हर्ष बोलला.

तेवढ्यात त्यांना समोर असे काही दृश्य दिसले की ते पाहून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. त्या क्षणी नेमके काय करावे ते दोघांनाही समजेना. अर्थातच दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता.

क्रमशः

काय दिसले असेल हर्ष आणि नेत्राला. जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all