अनोखी वटपौर्णिमा

वट पौर्णिमेस समस्त स्त्री वर्ग हाच पती सात जन्म लाभू दे अशी प्रार्थना करतो. हीच प्रार्थना जर पत?

शेखर ला आज उठायला थोडा उशीर झाला. म्हणजे ऑफिस ला उशीर होणार हे नक्की होतं.
पटकन तो आवरायला पळाला. येऊन पाहतो तर काय.. मावशींनी मधुराला म्हणजेच त्याच्या बायकोला अगदी छान तयार केले होते..
जरी काठाची साडी, नाकात नथ, हातात बांगड्या आणि लांबसडक केसांचा अंबाडा घालून त्यावर छानसा गजरा माळलेला..तो पाहतच राहिला तिच्याकडे..

आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली मावशी, मधुरा अजुन आहे तश्शीच आहे ना!
शेखर हसत - हसत आपल्या बायको कडे पाहत म्हंटला..  तेवढ्यात मावशी बोलल्या.. दादा आज वट पौर्णिमा हाय..म्हणून तयार केलंय ताईंना...त्यांची पूजा कशी व्हायची बघा बाई तुम्हीच...आणि त्या कामाला पळाल्या.

गेल्या दहा वर्षात मधुरेची वट पौर्णिमेची पूजा आणि उपवास चुकला नव्हता.
पण दोन महिन्या पूर्वी झालेल्या ॲक्सीडेंट मुळे मधुरा नीट चालू शकत नव्हती. पूर्ण बरे होण्यासाठी तिला अजून दोन - तीन महिने सहज लागणार होते.

डॉक्टरांनी शेखरला बजावून सांगितल होत, पायावर अजिबात ताण पडता कामा नये..
तेव्हा पासून शेखर मधुराची नीट काळजी घेत होता. तिचं औषध, पाणी सगळ अगदी वेळेवर होत. घरातली छोटी ,मोठी कामे ही करत होता. बाकी स्वयंपाकाला तर मावशी बाई होत्याच..

आज पूजा कशी व्हायची? याची काळजी मधुराला लागून राहिली होती. शेखरची रोजची धावपळ ती पाहत होतीच आणि आज नेमका उशीर...म्हणून काही न बोलता ती शांतपणे बसून राहिली.

काही सुचल्याच्या आनंदात शेखरने देवपूजा करता करता ऑफीस मध्ये दोन तास उशीर होईल म्हणून कळवले.
थोड्याच वेळात मावशींच्या मदतीने त्याने पूजेचे साहित्य आणून ताट तयार करून घेतले आणि आपल्या लाडक्या लेकी च्या कानात एक गंमत सांगितली.
मनू ...मधुरा आणि शेखरची नऊ वर्षांची गोड मुलगी....
पाच एक मिनिटात ती तयार होऊन बाहेर आली.  तिचा उत्साह पाहून शेखरला हसूच आले..
काही वेळातच पुजेचे साहित्य त्याने मनूच्या हातात देऊन मधुराला अलगद उचलून गाडीत बसवले.

आज माझा उपवास आहे हा..असे म्हणत त्याने गाडी थांबवली ती कॉलनी च्या शेवटच्या टोकाला असलेल्या वडाच्या झाडाजवळ..
शेखर ने मधुराला गाडीतून हळुवार उचलून पारावर नेऊन बसवले. तसे मनूने पूजेचे सामान देऊ केले.
..मधुराच्या सोबतीने शेखरने स्वतः वडाची पूजा केली , फेऱ्या ही त्यानेच पूर्ण केल्या.
मनोभावे नमस्कार करून म्हंटला .. मधुरेची साथ अशीच सात जन्म लाभु दे..
जमलेल्या सगळ्या बायका आश्चर्याने बघत होत्या शेखर कडे..
मधुराला  खुपच अभिमान वाटला त्याचा.
पूजा न चुकल्या चा आनंद ही वेगळाच होता तिच्या चेहेऱ्यावर... वडाच्या झाडाला एकचं आशिर्वाद मागितला तिने, अगदी दर वर्षीप्रमाणे... हाच पती जन्मो जन्मी लाभू दे म्हणून...
ही अनोखी वटपौर्णिमा ती सात जन्म विसरणार नव्हती..