अनोखी गाठ  ५५            # मराठी _ कादंबरी

------

अनोखी गाठ  ५५            # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की,  घरात अभिषेकच्या लग्नाची तयारी सुरु असते. वसुधा आत्या समीराला सुनेसाठी केलेले दागिने दाखवते तर नंतर कावेरी आजी आणि सरस्वती आजी समीराला स्वातीसोबत खरेदीला पाठवतात. दुसऱ्या दिवशी समीराला मंदिरात सर्वांच्या आधी जाऊन व्यवस्था बघायची असते पण बराच वेळ होऊनही समीरा खाली न आल्यामुळे आजी जानकीला समीराला बोलवायला पाठवते. थोड्यावेळाने जानकीच्या ओरडण्याचा आवाज येतो. सर्वजण समीराच्या रूममध्ये जाऊन पाहतात तर समीराच्या पायाला जखम असते आणि त्यामुळे तिला तापही आलेला असतो. डॉक्टरांच्या उपचारांनंतर समीरा शुद्धीवर येते. स्वयंपाक घरात रात्री चुकून विळीवर पाय पडल्यामुळे जखम झाल्याचे ते सांगते. शिवाय ती आता बरी असल्यामुळे सर्वांना 'टिळा' च्या कार्यक्रमासाठी मंदिरात जायला सांगते. काही वेळाने समीरा आराम करत असताना समीराच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरत असल्याचे जाणवत. आता पुढे ...........)  

समीराला चेहऱ्यावर मायेचा , सुरकुतलेला हात फिरत असल्याचे जाणवले. समीरा जागी झाली. समोर कावेरी आजी तिच्या बाजूला बसली होती. समीरा लगबगीने उठायचा प्रयत्न करते. आजी तिला,' सावकाश उठून बस.' म्हणते. समीरा उठून बसते. 

समीरा," आजी अजून गेले नाहीत तुम्ही सर्व ? उशीर होईल जायला." 

कावेरी आजी," घरातले सर्वजण गेले आहेत. मी पण जाणार होते पण तुझ्या या अवस्थेत माझा पाय वाड्याबाहेर नाही पडला. " 

समीरा," अगं आजी , असं काय करतेस ? मी अगदी छान आहे आणि आरामच करतेय ना ? तू ३ - ४ तासात जाऊन आली असतीस. थांबायची काही गरज नव्हती." 

कावेरी आजी तिच्या गालावरून हात फिरवते , तिचे केस कानामागे करते आणि म्हणते," बाळा , तुला असं सोडून नाही जमलं मला जायला. माझ्या लेकराचा चेहरा लगेच सुकला." 

समीरा आजीच्या कमरेत हात घालून तिच्या तिच्या खांद्यावर डोकं ठेवते. आजी तिच्या केसांवरून, डोक्यावरून हात फिरवत म्हणते," समीरा , माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माहित आहे ना तुला ?" 

समीरा ," हे काय विचारणं झालं आजी. मला माहित आहे तुझा माझ्यावर खूप जीव आहे." 

कावेरी आजी," मग तुझा माझ्यावर का नाही ?" 

समीरा झटकन बाजूला होते आणि म्हणते," तुला असं कोण म्हणालं आजी. माझा खूप ... खूप जीव आहे तुझ्यावर." आजीला परत घट्ट मिठी मारत समीरा म्हणाली. 

कावेरी आजी," असं असतं तर माझ्याशी खोट बोलली नसतीस." 

समीराची आजीला मारलेली मिठी सैल होते. ती आजीकडे पाहत म्हणते," असं का बोलतेस आजी ? मी काय खोटं बोलले तुझ्याशी ?" 

कावेरी आजी समीराच्या डोळ्यात डोळे घालून, तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली," मग मला सांग तुझा खरंच चुकून विळीवर पाय पडला होता ?" आजीच्या बोलण्याच्या पद्धतीत आणि डोळ्यांमध्ये समीराचं खोटं पकडल्याचे भाव होते. आजीचं बोलणं ऐकून समीराचे डोळे भरून आले आणि ती आजीच्या कुशीत शिरून हमसून- हमसून रडू लागली. आजीने तिला थोडा वेळ थोपटलं.

समीरा थोडी शांत झाल्यावर आजीने तिच्या हनुवटीला धरून मान वर केली आणि विचारू लागली," का केलंस असं समीरा ? मला कारण जाणून घ्यायचं आहे."  

समीरा अजूनही काही बोलत नव्हती, शांतपणे मान खाली घालून बसली होती. आजीने समीराला पुन्हा विचारलं," समीरा मी काय विचारतेय ? का असं केलंस ?"

समीरा शक्य तितका आपला हुंदका दाबत म्हणते," आजी मी माझ्या डोळ्यांसमोरच अभिषेकला दुसरं कोणाचं होताना नसते पाहू शकले." 

कावेरी आजी," मला माहित आहे , तुझं अभिषेकवर आणि अभिषेकचं तुझ्यावर प्रेम आहे." 

समीरा आजीकडे एकटक पाहते. आजी पुढे म्हणते," जीवनाचा तुझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे मला. मला कळणार नाही असं कसं वाटलं तुला ? मी वसुधाशी या विषयी बोलणारच होते पण त्याआधीच तू अमेरिकेला परत जाणार असं जाहीर केलंस. मग मी तरी काय करणार ? पण मला एक गोष्ट कळली नाही, तुझं अभिषेकवर प्रेम असताना तू असं का वागलीस ? का निघून गेलीस ? तुला एअरपोर्टला सोडून आल्यावर किती वेळ माझ्याजवळ रडत बसला होता. " 

समीरा हुंदके देत होती, रडत होती. कावेरी आजी पुन्हा तिला विचारते," मी काय विचारतेय समीरा ? का वागलीस अशी ? सगळं नीट सुरु असताना असं अचानक का गेलीस ? माझ्यावर विश्वास आहे ना? मग सांग मला सगळं." 

समीरा," आजी सर्व सुरुवातीपासून सांगते. अमेरिकेत असताना मी लिवइन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. मॉम- डॅडने मान्य केलं पण त्याआधी भारतात जाऊन ये असं म्हणाले. मी आधी कधी भारतात आले नव्हते. मी भारताबद्दल जे ऐकलं म्हणजे गरिबी, भेदभाव, जातीभेद आणि देवांमध्ये पण भेद या सगळ्यांमुळे मला भारतात यायचंच नव्हतं. मॉम- डॅडने मला रिक्वेट केली त्यामुळे मी यायला तयार झाले. 

इथे आल्यावर मला इथलं वातावरण आवडू लागलं. हळूहळू मी इथे रुळू लागले. अभिषेकचं जबाबदार वागणं मला आवडू लागलं. त्यात एक दिवस डेव्हिडचं खरं रूप मला कळालं. मी खूप खचले होते. ज्याच्यासोबत मी लिवइन मध्ये राहणार होते, तोच माझा विश्वासघात करत होता. दुसरीकडे अभिषेकचा नात्यावरचा विश्वास. त्याचं प्रत्येक नात्याला मान - सन्मान देणं, माझ्या मनात घर करू लागलं. मला त्या सर्वातून अभिषेकानेच सावरलं. एका नात्यात असलेला सन्मान मला अभिषेककडून पुरेपूर मिळत होता.  प्रेम नक्की काय असतं ते मी तुझ्याकडून शिकले आजी आणि प्रेमाची जाणीव मला अभिषेकने करून दिली. काशीवरून परत आल्यावर मी मॉम- डॅडला सर्व सांगून भारतात बोलावून घेणार होते पण घरी आले तेव्हा ते आधीच हजर होते. सरस्वती आजी आल्यामुळे घर आनंदी होतं. म्हणून विचार केला की एक- दोन दिवसात अभिषेकसोबत सर्वांना सांगायचं. मी अभिषेक जवळ माझ्या प्रेमाबद्दल तोपर्यंत स्प्ष्ट बोलले नव्हते. तरीही आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे आम्हांला माहित होतं. 

अभिषेकशी स्प्ष्ट बोलून मग घरी सांगायचं असं ठरवलं होतं मी. त्या दिवशी जेव्हा सरस्वती आजीसोबत सर्व घरी आलो त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत सर्व जागे होते. नंतर जेव्हा सर्व झोपायला गेले तेव्हा मी वसुधा आत्याच्या रूममध्ये पाणी द्यायला गेले होते पण आतून आवाज आला म्हणून मी तिथेच थांबले. वसुधा आत्याने अभिषेकसाठी मुलगी पाहिल्याचे त्या बोलत होत्या काकांसोबत. त्या म्हणत होत्या," शर्वरी खूप आधीपासून सून म्हणून माझ्या मनात होती. जाऊबाईंच्या बहिणीची मुलगी पण फार जीव लावते, घरातलं सर्व निगुतीने करते, घरच्याचं मन राखणं छान जमत तिला. अभिषेकासाठी अगदी शोभेल. शिवाय अभिषेक माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही कधी. मी मुलीच्या घरी बोलून आले आहे. त्यांना तर आनंदच आहे अभिषेक त्यांचा जावई होणार म्हणून. आता सर्व वाड्यात जमले आहेत तर दोन दिवसात सर्वांना ही आनंदाची बातमी देऊयात. " 

समीरा हमसून रडू लागली. समीरा म्हणाली," आजी तूच सांग मी काय करायला हवं होतं ? वसुधा आत्याचा विश्वास की अभिषेक त्यांच्या शब्दा बाहेर नाही जाणार. त्यात त्या मुलीच्या घरच्यांशी बोलून आल्या होत्या. मला माहित आहे आजी आजही लग्न ठरणं आणि मोडणं भारतात मोठी गोष्ट आहे. त्यात मी विदेशात वाढलेली. मला काहीच येत नाही. वसुधा आत्याला त्यांचं घर सांभाळणारी मिळाली, तिच्या १० % सुद्धा मला काहीही करता येणार नाही. मला कळून चुकलं होतं की आमचा जोडा विजोड आहे. आम्ही दोघेही पूर्व- पश्चिम आहोत. इतके दिवस माझ्या या गोष्टी लक्षातच आल्या नव्हत्या. दुसऱ्या दिवशी लगेच मी परत अमेरिकेला जायचं म्हणाले कारण वसुधा आत्या काही बोलण्याआधी मी निघून जाणं महत्वाचं होतं. नाहीतर वसुधा आत्या बोलल्यानंतर अभिषेकने सांगितलं असतं तर वसुधा आत्या दुखावल्या गेल्या असत्या. 'माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही.' असं त्यांचं बोलणं खोटं ठरलं असतं. शिवाय आत्या मुलीकडे बोलून आल्या होत्या. आत्याचा शब्द पडला असता. एवढं सगळं घडू नये म्हणून मग मीच अभिषेकला दुखवून अमेरिकेला परत गेले. मला माहित आहे अभिषेकला खूप राग आला आहे माझा पण त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आजी. त्याला दुखावल्याशिवाय त्याच्या मनातून मी उतरले नसते आणि आभिषेक शर्वरीसोबत लग्नाला तयार झाला नसता.

किंवा उलट पकडू जर वसुधा आत्या म्हणाली तसं जर अभिषेक आत्याच्या शब्दाबाहेर नसता गेला आणि त्याने शर्वरीसाठी होकार दिला असता तर ? त्याचाही मला खूप त्रास झाला असता म्हणून मीच निघून गेले. मला परत यायचं नव्हतं. अभिषेकचं लग्न होताना मी नाही पाहू शकत आजी म्हणून मी येत नव्हते पण तुझ्यासाठी आणि सरस्वती आजीसाठी आले मी. तुझ्यासाठी करेन सहन असं ठरवलं होतं पण आजी नाही जमलं गं मला. माझ्यासमोर तो दुसरं कोणाचा होणार, ही गोष्ट  नव्हती होतं सहन. मग माझं जाणं टाळण्यासाठी मी रात्री स्वयंपाक घरात गेले होते आणि मीच स्वतःचा पाय विळीवर मारला. मग थोडी हळद भरली जेणेकरून तुम्हांला पटावं की हे चुकून झालं आहे आणि पायाला लागल्यामुळे मला तिकडे जावं लागणार नाही, शिवाय लग्नातही उपस्थित राहावंच लागेल असं काही राहिलं नसतं. माझा थोडा अंदाज चुकला आणि जखम मोठी झाली. एवढं रक्त जाईल, ताप येईल असं वाटलं नव्हतं पण ठीक आहे. तू म्हणतेस तसं 'जे होतं चांगल्यासाठीच होतं.' आता फक्त माझी एक मदत कर आजी, मला शक्य तितका यातून लांब ठेव. प्लिज....." समीरा अजूनही रडत होती. 

कावेरी आजीचा हात अजूनही समीराच्या हातात होता. 

क्रमश : ................

🎭 Series Post

View all