अनोखी गाठ  ५३          # मराठी _ कादंबरी

------

अनोखी गाठ  ५३          # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, समीरा आपण अमेरिकेला परत जाणार असल्याचे सांगत रूममध्ये सामान पॅकिंग करायला जाते. अभिषेक आणि कावेरी आजीला समीराच्या वागण्याचा उलगडा होत नव्हता. अभिषेक समीराच्या मागे तिच्या रूममध्ये जातो. तिला तो तिच्या परत जाण्याबद्दल विचारतो. त्यावर मी तिथे लहानाची- मोठी झाले सो मला इथे राहता येणार नाही असे सांगते. अभिषेकने प्रेमाबद्दल प्रश्न केल्यावर ती सिरिअस नसल्याचे सांगते. अभिषेक मनातून खूप दुखावला जातो. त्यादिवशी समीरा पूर्ण दिवस कुटुंबामध्ये असल्यामुळे कावेरी आजीला तिच्याशी बोलायला जमत नाही. अभिषेक स्वतः समीराला सोडायला एअरपोर्टला जातो. समीरा एअरपोर्टमध्ये आत जाताना मागे वळूनही पाहत नाही. विमानाने भरारी घेल्यावर अभिषेक मनातून तुटतो आणि गाडीत बराच वेळ तसाच बसून राहतो. 

२ महिन्यांनी ....... ( अमेरिकेत ) समीरा ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना डोअरबेल वाजते. दरवाजा उघडल्यावर समोर पाहून तिच्या हातातली फाईल खाली पडते. आता पुढे .........) 

समीरा दरवाजा उघडते आणि तिच्या हातातली फाईल गळून खाली पडते. समोर अभिषेक उभा असतो. समीरा काही क्षण त्याला पाहतच राहते. अभिषेक तिच्या समोर टिचकी वाजवतो. समीरा भानावर येऊन विचारते ," तू.... तू  इथे कसा ? " 

अभिषेक ," मला आत घेणार की दरवाज्यातच सर्व सांगू ?" 

समीरा, " ओह्ह... सॉरी... ये ना आत ये. बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते." सोफ्याकडे हात दाखवत समीरा म्हणाली आणि किचन मध्ये पाणी आणायला गेली. 

अभिषेक घर न्याहाळत होता. त्याचा लक्षात आलं की समीराने नुकतीच देवपूजा केली आहे. समीरा पाणी घेऊन येते आणि अभिषेकच्या हातात देत विचारते," तू इकडे कसा ? मॉम- डॅड कसे आहेत ? कावेरी आजी ? सरस्वती आजी ? आत्या ? घरी सर्व ठीक आहे ना ?" समीरा थोडी चिंतेत विचारते. 

अभिषेक," सर्व व्यवस्थित रादर मस्त आहेत. मामांची तब्येत तर अगदी ठणठणीत झाली आहे. तिथे सर्व क्षेम आहे." 

" आता हा कोणता नवीन शब्द ' क्षेम '?" समीरा हळू आवाजात पुटपुटते. अभिषेकला तीच पुटपुटणं कळत. त्यावर अभिषेक म्हणतो," 'क्षेम' म्हणजे सर्व उत्तम आहे." 

समीराला अभिषेकच्या उत्तरामुळे त्याला आपलं पुटपुटणं ऐकू गेल्याचं तिच्या लक्षात आलं. समीरा पुढे म्हणाली," पण तू इकडे कसा ? म्हणजे तुझं लग्न अगदी काही दिवसांवर आलेलं असताना शॉपिंग करायची सोडून इकडे ? म्हणजे काही काम होतं का ? " समीराने अधिरतेनं विचारलं.

अभिषेक शांतपणे म्हणाला," हो, एक काम आहे म्हणूनच आलो आणि काम कावेरी आजी आणि सरस्वती आजीचं आहे त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता." 

समीरा आश्चर्याने," कावेरी आजी आणि सरस्वती आजीचं काम ?" 

अभिषेक," हो, तुला माहितीचं आहे की माझं लग्न ठरलं आहे. तर सर्वांची इच्छा आहे की तू सुद्धा लग्नाला हजर राहावं. तुला अनेक वेळा सर्वांनी बोलावून सुद्धा येत नव्हतीस म्हणून दोन्ही आजींनीच मला पाठवलं तुला घेऊन यायला." अभिषेक अगदी शांतपणे म्हणाला.

समीरा,"  अरे मला खरंच वेळ नाही मिळत आहे, मी काय करू ? डॅड तिकडे आहेत. अर्थात त्यांनी आता तिथेच आराम करायला हवा पण इकडे ऑफिस सांभाळायला सुद्धा कोणीतरी हवं ना ? मिटींग्स, क्लायंट, नवीन प्रोजेक्ट्स सर्व बघावं लागतं मला. " 

अभिषेक," समीरा , ८ - १० दिवसांनी काही फरक पडणार नाही. माझी पर्वा नाही केलीस जाऊदे पण किमान कावेरी आजी आणि सरस्वती आजीचं मन राखायला ये. आजीचं म्हणणं आहे की या लग्नाच्या निमित्ताने सर्व घर एकत्र येईल. पुढे असा योग पुन्हा कधी येईल माहित नाही. त्यात दोघींची वये पाहता त्यांनी सर्व कुटूंब एकत्र पाहण्यासाठी मला इथे पाठवलं यात काही विशेष नाही." 

समीरा," अरे पण ........"

अभिषेक हात जोडून , " मी विनंती करतो. नाही बोलू नकोस. मी इथपर्यंत येऊन कधीच फोर्स केला नसता पण मला आजीला आनंदी पाहायचं आहे म्हणून मी एवढ्या लांब आलो आहे. माझ्यावर उपकार कर. प्लिज ..." 

समीराचा नाईलाज होतो. समीरा म्हणते," मला २ दिवस दे. मी माझी जी महत्वाची कामे आहेत ती करून मग जाऊ आपण." समीराला ऑफिसला निघायचं होतं. ती अभिषेकला ," मी दुपारपर्यंत येते." असं बोलून जाते. समीराला पुन्हा भारतात जायचं नव्हतं पण कावेरी आजी- सरस्वती आजीची इच्छा, अभिषेकाची आर्जवं यामुळे तिला जावं लागणार होतं. 

समीराने दुपारपर्यंत पटापट कामे संपवली. काही महत्वाच्या मिटींग्स तिने उद्याच करायच्या ठरवल्या आणि क्लायंटला तसा मेल करून कळवलं. तिने स्टाफला तश्या सूचना दिल्या आणि घरी निघाली. रस्त्यात भारतीय फूड कॅफे मधून तिने बासुंदी घेतली. घरी आल्यावर ती जेवण बनवायला किचनमध्ये जाते तर तिथे डाळ- भात आणि भाजी तयार होती. तोच अभिषेक मागून येतो आणि म्हणतो," मी बनवलं आहे. तू येऊन कधी बनवणार म्हणून."

दोघेही जेवण करतात पण कोणीही काहीही बोलत नव्हतं. समीरा अलिप्त वागत होती. जेवण झाल्यावर समीरा म्हणते," आता थोडा आराम कर. संध्याकाळी तुला थोडं फिरवून आणते आणि मॉम नेहमी जाते ते मंदिरही दाखवते. उद्या माझ्या काही मिटींग्स आहेत, त्या संपवून आपण उद्या रात्रीच्या फाईटने निघुयात." अभिषेक काही न बोलता फक्त मानेने होणार देऊन आराम करायला जातो. 

संध्याकाळी समीरा पंजाबी ड्रेस घालून तयार होते. आकाशी रंगाचा ड्रेस, नाजूक कानातले, हातात आजीने दिलेल्या बांगड्या. अभिषेकने समीराकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. समीराला अवघडल्यासारखं झालं. अभिषेकच्या लक्षात आल्यावर त्याने मान खाली घातली. समीरा अभिषेकला तिथे थोडं फिरवते आणि मग मंदिरात घेऊन जाते. अभिषेकला मंदिर खूप आवडतं. दर्शन घेतल्यावर अभिषेक मंदिरात डोळे लावून शांत बसतो. समीरा त्याच्याकडे पाहत विचार करत होती की,' अभिषेकने आल्यापासून एकदाही मला प्रश्न विचारला नाही. दोषारोपण नाही. अभिषेकने मला ओरडायला हवं , चिडायला हवं, मला शिक्षा द्यायला हवी पण त्याने असं काहीही केलं नाहीये. माझंच मन मला खातंय.' 

थोड्यावेळाने बाहेरच खाऊन दोघेही घरी जातात. रात्री समीरा अभिषेकला पाणी वगैरे देऊन," माझी पॅकिंग करते मी, तू झोप. " असं बोलून आपल्या रूममध्ये येते. थोड्या वेळाने अभिषेक समीराला पॅकिंगमध्ये मदत करावी म्हणून तिच्या रूमकडे जातो. तो रूमचा दरवाजा वाजवणार तोच त्याच्या लक्षात येतं की दरवाजा उघडाच आहे. तो आत डोकावतो आणि काही क्षण शांतपणे आत पाहतो आणि काहीही न बोलता परत जातो. 

दुसऱ्यादिवशी समीरा आपलं ऑफिसचं काम आटोपून घरी येते. अभिषेकने बऱ्यापैकी कामे आवरून ठेवली होती. समीरा आणि अभिषेक एअरपोर्टच्या दिशेने निघाले. समीराच्या डोळ्यासमोर ती मागच्या वेळी भारतात गेली होती , तेव्हाचे प्रसंग फिरू लागले. एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास त्यानंतर मुंबई आणि मुंबई वरून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास हा अबोलच झाला. वाड्यात पाऊल ठेवताच सर्वजण तिच्याभोवती जमा होतात. वाडा नवरीसारखा सजला होता. वाड्यात मंगलकार्य असल्याची जाणीव ती सजावट आणि मांडव करून देत होता. 

कावेरी आजी आणि सरस्वती आजी समीराची नजर काढतात. थोडावेळ सर्वांसोबत बसून समीरा तिच्या रूममध्ये जाते. वाड्यातली लगबग , सजावटी, अन्न पदार्थांचे घमघमणारे सुवास यामुळे वाड्याचं रूप पाहण्यासारखं होतं. संध्याकाळी सर्व एकत्र जमलेले असतात. आजी सर्वांना ज्याचा - त्याचा काम समजावत होती. समीरा शांतपणे तिथे बसली होती. "समीरा" स्वतःच नाव ऐकून समीरा चापचतें. ती आजीकडे पाहते. कावेरी आजी म्हणते," अगं एवढं दचकायला काय झालं ? " 

समीरा," अअ... काही नाही. बोल ना आजी." 

कावेरी आजी," अगं परवा आपल्याला मंदिरात जायचं आहे. नवरीच्या घरच्यांचं म्हणणं आहे की ' टिळा ' चा कार्यक्रम मंदिरातच देवाच्या साक्षीने व्हावा. परवा टिळा, त्यानंतर लगेच साखरपुडा, हळद आणि लग्न करायचं आहे आणि ही घाई तुला अमेरिकेला लवकर परत जाता यावं म्हणूनच हो. तेव्हा उद्या जाऊन तुझी खरेदी कर. या सर्व कार्यक्रमांना नवीन कपडे लागतील ना. आणि हो ,परवा मंदिरात नवरी यायच्या आधी जा तू. आपल्या गावच्या मंदिरात कार्यक्रम आहे तर व्यवस्था आपल्यालाच बघायला हवी. " 

समीरा होकारार्थी मान डोलावते. थोडा वेळ बसून ती पुन्हा आपल्या रूम मध्ये येते. रात्री तिला जेवायला बोलवायला स्वाती येते पण भूक नाही सांगत समीरा खाली यायचं टाळते. 

क्रमश : .............. 

🎭 Series Post

View all