अनोखी गाठ  ४५               # मराठी _ कादंबरी 

-------

अनोखी गाठ  ४५               # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरीला स्वरक्षणाचे धडे घेताना पाहून गावातल्या बायका सुद्धा सरावासाठी येऊ लागल्या. काही दिवसांनी पुन्हा गावात लूट करायला काहीजण शिरले पण आधीपासून सज्ज असलेल्या गावाने त्यांना पिटाळून लावलं. कावेरीने वाड्याचे, शेतीचे सर्व व्यवहार आपल्या हाती घेतले होते. दिवसां मागुन दिवस जात होते. मोठ्या मुलाचे शालेय शिक्षण झाल्यावर कावेरीने त्याला पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी पाठवलं. आता पुढे.......) 

आजी पुढे गोष्ट सांगते," त्या दिवशी , ज्या दिवशी वसंत तालुक्याला गेला, मी खूप रडले 'ह्यांच्या' जवळ जाऊन. 'ह्यांनी' मला समजावलं," कावेरी, वसंतला पुढील शिक्षणासाठी तालुक्याला पाठवायचं असं तूच म्हणाली होतीस ना ? मग आता कशाला रडतेस ? त्याच्या भविष्याचा विचारू करूनच पाठवलंस ना ? तुझा जसा त्याच्यावर जीव आहे , तसाच त्याचा सुद्धा तुझ्यावर आहे. तो शिकून आल्यावर तुला खूप मदत होणार बघ. " मी माझ्या मनाची समजूत घातली आणि नेहमीच्या दिनचर्येचे सुरुवात झाली. 

'ह्यांची' तब्बेत आता बरी होती. स्वतः हुन उठता - बसता येत होतं. सासूबाईचं आजारपण खूप वाढलं म्हणून मग दिवसभर त्यांना सांभाळायला बाई होत्या. रात्री मुलांबरोबर त्यांना सुद्धा माझ्याबरोबरच झोपवायचे मी. लहान मुलांना समजावतो तसं समजावून ठेवलं होतं त्यांना की ,' रात्री तहान लागली किंवा स्नान घराकडे जायचे असेल तर मला उठवायचं.' त्यांनी सुद्धा लहान मुलाप्रमाणेच ते मान्य केलं होतं. 

एके दिवशी सकाळी बाबांच्या सेवेसाठी ठेवलेला सालगडी धावत माझ्याकडे आला. स्वयंपाकीण बाईंना त्यांची कामे सांगून शेतावरच निघाले होते. तो म्हणाला," मालकीण बाई , थोरले मालक हालचाल करत नाहीयेत. तुम्ही पटकन माझ्याबरोबर चला." त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले. मी धावतच बाबांच्या खोलीकडे निघाले. एका गड्याला डॉक्टरांना आणायला पाठवलं. मी खोलीत गेले तर बाबा खरंच हालचाल करत नव्हते. झालेल्या आरडाओरड्यामुळे सर्वजण तिथे जमले. 'हे' सुद्धा हळूहळू चालत बाबांच्या खोलीत आले. आम्ही बाबांना उठवायचा बराच प्रयत्न केला पण..... आता मात्र सर्वांना भीती वाटू लागली. माझ्या मनात सुद्धा शंकेची पाल चुकचुकली. तेवढ्यात गडी डॉक्टरांना घेऊन आला. 

डॉक्टरांनी बाबांना तपासलं आणि आता बाबा आपल्यात नाहीत असे सांगितले. माझ्यासोबत काहीही झालेलं असलं तरी मोठ्या माणसांचा डोक्यावर हात असेल तर संकटांशी लढायला दुपट्ट बळ मिळत. एक आधार गेला होता माझा. अश्रूंना वाट करून दिली. 'ह्यांना' सुद्धा धक्का बसला बाबांच्या अश्या जाण्याने. रात्री केव्हातरी त्यांनी प्राण ज्योत मावळली असणार असे डॉक्टरांनी सांगितले. सासूबाईंना दुःख वाटण्याचे कारण नव्हते, कारण त्यांना काही आठवतच नव्हते. त्याचे अलंकार काढताना मात्र त्यांनी खूप आकांत - तांडव केला. मी त्यांना समजावून सुती साडी नेसायला लावली. अवलण वगैरे काही काढली नाहीत मी. ते पाहून आलेल्या बायकांनी कुजबुज केली. तेव्हा मी स्पष्ट सांगितलं. विधवा झाल्यावर निसर्ग त्यांचे रंग त्या स्त्री उधळत नाही का ? मग तुम्ही विधवेला रंगापासून वंचित ठेवणारे कोण ?  तसही त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांना हेही माहित नाही की , त्यांच्या आयुष्याच्या एका भाग कायमचा दुरावलेला आहे. त्यांना मला अजून त्रास द्यायचा नाही. त्यामुळे सौभाग्य अलंकार सोडल्यास त्या आधी सारख्याच राहतील. " माझं ठाम मत पाहून बायका गप्प बसल्या. 

बाबा गेल्यापासून 'हे' सुद्धा अगदी शांत झाले. मी मागच्या खोल्या जिथे मी आणि सरस्वती ताई राहिलो होतो. त्या नवीन करून घेतल्या आणि कायम आमच्या इथे कामाला असलेल्या बायकांना दिल्या. यापुढे कधीही कुठल्याही स्त्रीला विधवा म्हणून तिथे राहायला लागू नये म्हणून. कधी- कधी सासूबाईंना भरवावं लगे. एकदा मी 'ह्यांच्या' जवळ बसून होते. त्यांच्याशी संवाद सुरु होता. मध्येच 'हे' म्हणाले," कावेरी , माझ्या आईने तू सुवासिनी असताना सुद्धा तूला मागच्या खोलीत ठेवलं. सरस्वती ताईंना त्रास दिला. हल्ला करवला. एवढं सगळं होऊन सुद्धा तू आईची काळजी एखाद्या लहान मुलासारखी घेतेस. बायका कुजबुजत असताना सुद्धा तू आईचा विचार केलास. कसं जमत तूला ?" त्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह होतं. 

" आजोबांच्याच नाही तर माझ्यासुद्धा डोळ्यात प्रश्नचिन्ह आहे. नीट बघ आजी." असं म्हणून जानकी डोळे मोठे करून आजीकडे पाहू लागली. 

तिच्या अश्या कृतीवर सर्वजण हसू लागले. 

" आजी , मला पण तेच विचारायचं आहे. तूला एवढं चांगलं वागायची काय गरज होती ? त्या तुझ्याशी कधी नीट बोलल्या नाहीत तरी ?" समीरा म्हणाली.

आजी," असं नाही वागता येत बाळा, माझ्याशी वाईट वागणाऱ्या सासूबाई आता नव्हत्या. त्या तर कधीच हरवल्या होत्या. त्यांच्या जागी माझ्याजवळ एक गोड पण हट्टी मुलगी राहत होती. आता तू सांग, सासूबाईंनी जे केलं , त्याबद्दल मी त्या मुलीला कशी का शिक्षा करणार होते. हेच उत्तर मी तुमच्या आजोबांना सुद्धा दिलं." 

स्वाती, समीरा, जानकी आणि अभिषेक आजीच्या बोलण्यावर विचार करतात आणि त्यांना आजीचं बोलणं पटतं. 

आजी पुढे बोलते," वसंत शिकून आला. त्याने माझ्या कामात मदत करायला सुरुवात केली. वसंत पाठी मनोहर आणि त्याच्या पाठी जाई. माझ्या मनात आता जाईच्या लग्नाचे विचार सुरु झाले होते. जाईचं लग्न झाल्यावर वसंताचं लग्न करता येणार होतं. म्हणून मी 'ह्यांच्याशी' बोलून वर संशोधन सुरु केलं. चार गाव लांब असलेल्या पाटीलांच्या मुलाचं स्थळ मला आवडलं. मी त्याची चौकशी केली. मुलगा हार तऱ्हेने योग्य वाटला. मी 'ह्यांच्याशी, वसंत आणि मनोहरशी सल्ला- मसलत केली आणि पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. मुलाकडून होकार आल्यानंतर मी जाईला तिचं मत विचारलं. तिने सुद्धा लाजून होकार दिला. एका शुभ मुहूर्तावर कु. जाई महादेव इनामदार ची सौं. जाई कृष्णा पाटील झाली. घरातलं पाहिलं मंगल कार्य असल्यामुळे धुमधडाक्यात लग्न लावलं. कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली नव्हती. 

जाई वर माझं विशेष प्रेम होतं. एकतर ती सर्वात लहान , दुसरं खूप मधाळ बोलायची ती. ती माझ्या कुशीत झोपायची तेव्हा पूर्णत्वाची , मातृत्वाची पुरेपूर जाणीव व्हायची मला. तिन्ही मुले माझ्या पोटची नाहीत असं आयुष्यात एकदाही नाही जाणवलं मला. सख्या आईला देतील एवढं प्रेम आणि आदर मला मुलांकडून भरभरून मिळालं. माझा शब्द मुलांनी कधीही खाली पडू दिला नाही. जाईची पाठवणी करताना खूप भरून आलं होतं. जाईने जी मला त्यावेळी मिठी मारली होती. ती आजही आठवतेय मला. " असं बोलताना आजीच्या डोळ्यात पाणी आलं. 

समीराने आजीच्या पाठीवरून हात फिरवला. आजी पुढे बोलू लागली, " जाईच लग्न झाल्यावर ६ महिन्यातच वसंतच लग्न ठरलं. लग्न महिन्याभरावर असताना सासूबाई खेळताना पाय घसरून जिन्यावरून पडल्या. त्यातून त्या सावरून नाही शकल्या आणि त्यांनी हे जग कायमच सोडलं. त्या आधी कशाही असल्या तरी नंतर त्या माझ्या मुलीप्रमाणे झाल्या होत्या. त्यांचं जाणं माझ्या जिव्हारी लागलं. मी माझ्याच तंद्रीत असायचे. काही दिवसांनी माझ्या कानावर बोलणं पडलं. शेतावर काही बायका बोलत होत्या," लग्न महिन्याभरावर असताना घरात मृत्यू झाला, म्हणजे मुलीचा पायगुण काही चांगला नाही. त्या मुलीचं आता काही होऊ शकत नाही. " त्यांच्या या बोलण्याने मी भानावर आले. एवढ्या दिवसात मी स्वतःहून मुलीकडच्यांना संपर्क केला नव्हता. मी माझ्याच दुःखात होते. वसंतही मी काह न बोलल्यामुळे शांतच होता. मी विषय काढल्याशिवाय तो बोलाही नसता.    

मी संध्याकाळी घर आले आणि सर्वांना एकत्र बसवून बोलायला सुरुवात केली," सासूबाईंच्या जाण्याने मी सैरभैर झाले होते म्हणून माझ्या डोक्यात आलं नाही पण आपण उद्याच मुलीच्या घर जाऊन भेटूयात. त्या मुलीची यात का चूक ? उगाच तिला समाजाचं बोलणं ऐकावं लागत असेल. " माझ्या बोलण्यावर सर्वानी सहमती दर्शवली. 

दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण मुलीच्या घरी पोहचलो. तिथे काहीतरी गंभीर सुरु असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्हांला अचानक आल्याचे पाहून त्यांना नवल वाटलं आणि ते चाचपडले. त्यानं आम्हांला बसण्याची विनंती केली. मला आतून रडण्याचा आवाज येत होता. त्यावर मी त्यांना विचारलं," आतून रडण्याचा आवाज कोणाचा येतोय ?" त्यावर ते म्हणाले," गौरीला देवाला सोडतोय आज. तिचाच आवाज आहे." त्यांचं बोलणं ऐकून आम्ही सर्व चमकलो. माझा, 'ह्यांचा', वसंत आणि मनोहरचा सुद्धा राग उफाळून वर आला. मोठे समोर असताना लहानांनी बोलू नये म्हणून वसंत अन मनोहर गप्प बसले होते. 'हे' मात्र त्यांच्यावर कडाडले," कोणाला विचारून तुम्ही हा निर्णय घेतलात ? लग्न ठरलं, तेव्हाच मुलगी आमची झाली, मग तिला देवाला सोडायचा निर्णय तुम्ही परस्पर कसा घेतलात ?"  

आमच्याकडून अश्या बोलण्याची बहुदा त्यांना अपेक्षा नसावी , त्यामुळे त्यांची त त ....प प ... सूर झालं. त्यावर मी सुद्धा ओरडले," आताच्या आता मुलीला माझ्या समोर आणा." आमच्या बोलण्याचा आवाज आतपर्यंत गेला होता. बायका गौरीला घेऊन बाहेर आल्या. तिचे डोळे रडून - रडून सुजले होते, अंगावर साधी सुती साडी होती, अस्ताव्यस्त केस. तिची अवस्था पाहून ती, कोणत्या प्रसंगातून गेली असणार याची कल्पना मला आली. त्यामुळं मला अजूनच चीड आली. तिचे मोठे काका अन वडील तिथे होते. मी त्यांना म्हणाले, " ही नक्की तुमचीच मुलगी आहे ना ? कारण स्वतःच्या  मुलीचे असे हाल कोण करतो ?" 

त्यावर मुलीच्या मोठ्या काकांनी बोलायला सुरुवात केली," बाईसाहेब, लग्नाला महिना असताना तुमच्या घरात मृत्यू झाला. त्यानंतर तुमच्याकडून काहीच सांगणं झालं नाही. त्यात गावातली माणसे नको ते बोलू लागले. तुमच्याकडे आल्यावर तुम्ही आमचा अपमान करून घरातून बाहेर काढाल असं वाटलं आम्हांला. एवढं होऊनही पांढऱ्या पायाची लेक आमच्या माथी मारताय असे म्हणाला असतात त तर? म्हणून समाजाच्या भीतीने आम्ही तिला देवाला सोडायला निघालो होतो. "

त्यावर 'हे' म्हणाले," अहो मुलींसाठी थोडा अपमान सहन करायची तयारी ठेवायची होती मग. जास्तीत जास्त अपमान होईल पण मुलींसाठी एकदा प्रयत्न करावा असं नाही वाटलं तुम्हाला ? आमच्या घरात जो प्रसंग झाला होता त्यानंतर लगेच तुम्हांला सांगावा कसा पाठवणार होतो आम्ह आम्ही?" 

'ह्यांच्या' बोलण्यावर सर्वांनी माना खाली घातल्या. मी म्हणाले," आम्ही लग्नाच्या बाबतीतच बोलायला आलो होतो. घरात आताच वाईट प्रसंग झाला आहे , त्यामुळे लग्नाचा मुहूर्त सहा महिन्यानंतरचा काढूयात हे सांगायलाच आलो होतो आम्ही पण आता असं वाटतंय तुमच्या मुलीबद्दल तुमच्या मनात प्रेमच नाही. तिला लग्न लागेपर्यंत तरी इथे ठेवायचं की नाही यावर आम्हांला आता विचार करावा लागेल. " 

त्यावर 'हे' म्हणाले," विचार काय करायचा ? त्या मुलीची अवस्था बघ. आताच चल घेऊन तिला. " 

आमच्या अश्या बोलण्याने कधीची अस्वस्थ उभी असलेली गौरी येऊन माझ्या गळ्यात पडली आणि हमसून रडू लागली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत केलं. तिच्या घरच्यांनी सुद्धा आमच्या सोबतच गौरीची माफी मागितली आणि सहा महिन्यांनी आम्ही थाटामाटात लग्न लावूनच मुलीला तुमच्या घरी पाठवून असं वचन देतं म्हणाले. आम्ही त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तिथून निघालो. 

माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळ फिरत होता. गौरीमध्ये मला मी दिसत होते. आज जर वेळेवर आलो नसतो  तर.......?

क्रशम ...........

🎭 Series Post

View all