Jan 28, 2022
स्पर्धा

अनोखी गाठ  ४३             # मराठी _ कादंबरी 

Read Later
अनोखी गाठ  ४३             # मराठी _ कादंबरी 

अनोखी गाठ  ४३             # मराठी _ कादंबरी 

 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरी बहाण्याने सासूबाईंना तपासणीसाठी नेते. सासूबाईंच्या तपासणी नंतर आजार खूप बळावल्याचं लक्षात आलं. सासूबाईंना कायमची काही औषधे सुरु झाली. बाबांना डिस्चार्ज मिळताच सर्वजण गावी परत आले. नाईलाजाने का होईना कावेरीला वाडयात परत यावं लागलं. सासूबाईंचा आजार दिवसेंदिवस वाढत होता. वाडा आता कावेरीच्या ताब्यात आला होता. काही कालावधीनंतर गांधीजींच्या मृत्यूनंतर देशभरात जाळपोळ सुरु झाली. त्या कचाट्यात कावेरीचं घर देखील सापडलं. घुसखोरांना रोखताना महादेवरावांच्या पोटात डाव्या बाजूला कोणीतरी वार केला होता. महादेवरावांवर उपचार सुरु असलेल्या खोलीच्या बाहेर कावेरी आपलं आतापर्यँतचं आयुष्य पाहत होती. आजीची गोष्ट ऐकून समीरा, जानकी, स्वाती आणि अभिषेकच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं. आता पुढे...........)  

" आजी तुला किती टेन्शन आलं असेल ना ?" जानकी रडक्या आवाजात विचारते.

" हो ना, आणि त्यावेळी तूला भक्कम आधार देणारं कोणीच नव्हतं. तुला किती त्रास झाला असेल ना आजी ?" स्वाती.

समीराला तर काही बोलायचं सुचतंच नव्हतं. अभिषेक आजीचा हात हातात घेऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो काहीही न बोलता. आजी पुढे बोलते," हो , त्यावेळी खूप घाबरले होते मी. माझ्याजवळच सर्व एका फटक्यात सर्व हिरावून घेतल्यासारखं वाटत होतं. मजबूत हात हवे होते जे मला त्यावेळी सावरतील. सासूबाई आणि बाबा दोघेही आजरी. मुले लहान त्यामुळे त्यावेळी मी पूर्णपणे खचले होते. अश्रू थांबत नव्हते. मी रात्रभर खोलीच्या बाहेर तशीच उभी होते. 

सकाळी वैदय बाहेर आले. मी अधीरतेने त्यांच्याकडे गेले आणि 'हे' कसे आहेत असं विचारलं. वैद्य काकांचा आवाज थोडा जड वाटला मला. ते बोलू लागले," कावेरी बाळा, मी खूप प्रयत्न केला. मी महादेवचे प्राण तर वाचवले पण अति रक्तस्त्राव झाला आणि जखम खूप आतपर्यंत आहे, त्यामुळे........" त्यांच्या आवाजात एक वेदना होती. मी त्यांना विचारलं," काका जे असेल ते सांगा मला. एवढं सहन केलं आहेच, जे असेल त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये माझ्याकडे. " 

त्यावर वैद्य काका म्हणाले," बाळा , महादेवच्या डाव्या अंगाला लकवा मारला आहे. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले." असं म्हणून वैद्य काका हात जोडून रडू लागले. माझ्यासाठी हा एक मानसिक धक्का होता. जे आयुष्यभर माझा आधार होते, आता त्यांना आधाराची गरज होती. मी धावतच खोलीत गेले. 'ह्यांना' झोप लागली होती. मी काहीही न बोलता उभी होते, डोळ्यातून अखंड अश्रुधारा सुरु होत्या.  त्यांची शांत झोप मला मोडायची नव्हती. मी तोंडात पदराचा गोळा कोंबून तिथून धावतच देवघरात गेले. देवाच्या पायावर डोकं ठेवून रडरड रडले. 

थोड्यावेळाने माझ्या पाठीवर कोणतरी हात ठेवला. मी चटकन उठले. समोर सासूबाई होत्या. मला म्हणाल्या," मला भूक लागलीय. जेवायला दे ना काहीतरी. " लहान मुलाच्या चेहऱ्यावर जसा निरागस भाव असतो अगदी तसाच भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. रात्री काय झालं त्या क्षणी त्यांना कल्पना नव्हती. मी स्वतःला सावरलं. मला कोलमडून चालणार नव्हतं. यापुढे मला सर्व काही एकटीने सांभाळायचे होते. या प्रसंगाने 'हे' खचून जातील. 'ह्यांना' पुन्हा नव्या उमेदीने उभं करायचं होतं. सासू - सासरे, मुले आणि 'हे' सर्वांना आता मलाच सांभाळायचं होतं. मी खचून चालणारच नव्हतं. मी सासूबाईंना म्हणाले, " तुम्ही बसा इथे, मी जेवण घेऊन पाठवते कोणालातरी. " सासूबाईंनी शहाण्या बाळासारखी मान डोलावली. त्यांना तसं पाहून मला वाईट वाटत होतं. या वाड्याची मालकीण, नेहमी सोन्या- चांदीने नटलेल्या, भरजरी वस्त्र ल्यालेल्या, एका आवाजात समोरच्याला गार करणाऱ्या सासूबाई आज अगदीच दीनवाण्या होत्या. 

मी स्वयंपाक घरात गेले. तिथे काही भाग जळालेला होता. माझ्या डोळ्यात ते पाहून पाणी आलं तरीही मी ते अडवून धरलं. स्वयंपाकीण बाईंना आवाज दिला. त्यांना बोलावून सांगितले की , बाकीच्या बायकांना बोलावून स्वयंपाक घर स्वच्छ करून घ्या आणि न्याहारी बनवायला घ्या. " त्यांना काम सांगून मी न्हाणीघरात गेले. अंगावरून पाणी ओतताना नकरात्मक सर्व त्या पाण्याबरोबरच बाहेर टाकत होते. न्हाणं उरकून मी देवघरात गेले. सासूबाई तिथेच बसून होत्या. मी देवपूजा केली आणि हात जोडून देवाला प्रार्थना केली की 'जो प्रसंग समोर उभा आहे , त्याला पेलायची ताकद दे.' मी स्वतःला घट्ट केल होतं. कारण सर्व आता मला सांभाळायचं होतं. 

मी देवघरातून बाहेर पडणार तोच मला पुन्हा सासूबाई म्हणाल्या," मला भूक लागली आहे." मी त्यांना म्हणाले," हो आता लगेच जाऊन आणते." मी लगबगीने स्वयंपाक घरात गेले आणि सासूबाईंची न्याहारी घेऊन आले. त्या लहान मुलासारख्या न्याहारी करू लागल्या. मी त्यांना 'नीट जेवा, सांडवू नका.' वगैरे सूचना करून 'ह्यांना' पाहायला गेले. 'ह्यांना' जाग आली होती. 'हे' माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना बोलता येतं नव्हतं. 'ह्यांना' असं पाहून माझ्या मनात कालवाकालव होतं होती पण खंबीर बनणं मला क्रमप्राप्त होतं. मी 'ह्यांचा' हात हातात घेतला आणि म्हणाले," तुम्ही थोडे आजारी आहात. काल जे झालं त्यात तुम्हाला बरंच लागलं आहे. तुम्ही आराम करा. तुम्ही पूर्ण बरे व्हाल मला खात्री आहे. तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा. मी सर्व लवकरच नीट करेन. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका." माझं बोलणं ऐकून 'ह्यांच्या ' डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलं. मी त्यांचे डोळे पुसत म्हणाले," सर्व आधीसारखं नक्की होईल. " 

मी वैद्य काकांशी सल्ला- मसलत करून 'ह्यांच्या' जेवणाचे नियम आणि वेळापत्रक तयार केलं. त्यानुसार त्यांना जेवण भरवून , मुलांना अभ्यासाला बसवलं. मुनीमजीना बोलावून त्यांना मजूर बोलवून वाड्याची डागडुजी करायला सांगितली. सर्वांना कामे वाटून दिली आणि ग्रामपंचायतीमध्ये दुपारी सभा असल्याचे सर्वांना सांगायला सांगितलं. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात गेले. तिथे जमीनदारीण म्हणून मला मान आणि दरारा होताच. मी जाऊन त्यांना म्हणाले," काल जे झालं, ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे पोलिसांचा पहारा गावाला द्या. असा अर्ज करते." माझा अर्ज ते नाकारू शकत नव्हते. त्यानंतर मी सभेला गेले. जे झालं त्याची बातमी गावभर पोहचलीच होती. एवढं झालं तरी मी एवढी खंबीर आहे हे पाहून सर्वाना नवल वाटलं. त्यांना वाटलं होतं की रडत बसले असेंन. 

मी सभेत बोलायला सुरुवात केली, "स्त्री- पुरुष भेद आपण आधीच मोडला आहे , त्यामुळे मी इथे उभी राहून बोलेन तर तुम्हाला त्यात त्रास नसावा. " गर्दीतून आवाज आला,' ताई तुम्ही बोला सगळे ऐकतील. तुम्ही बोललं तसंच होईल. " सर्वानी त्याला होकार दिला. मी पुढे म्हणाले," काल जे गावात झालं , ते पुन्हा होऊ शकतं. त्यासाठी मी पोलिसांना पहाऱ्याचा अर्ज केला आहे पण तेवढं पुरेसं नाहीये. आपल्या सर्वाना सुद्धा आता स्वतःसाठी उभं राहावं लागेल. आपल्या गावातील तरुण मंडळी आलटून - पालटून रात्री पोलिसांबरोबर पहारा देतील. प्रत्येक घरातून किमान एक जण तरी हवा. मग स्त्री असो किंवा पुरुष. त्यासाठी स्त्रियांना लाठीकाठी आणि इतर गोष्टी कोणी शिकवणार असेल तर चांगला होईल. " 

माझ्या बोलण्यावर हरी तात्या प्रशिक्षण द्यायला तयार झाले. प्रशिक्षक तर होता पण शिकायला किती बायका तयार होतील यात शंका होती. कोणतीही स्त्री पुढे यायला तयार नव्हती. शेवटी मी म्हणाले," तात्या, कोणी येवो न येवो मी उद्यापासून शिकायला येणार. शेवटी आता माझ्या घरातून मीच येणार आहे पहाऱ्याला. " मी पुढे काहीही न बोलता सभा संपवून घरी निघाले. खूप काही करायचं आहे पण कसं ? हा प्रश्न माझ्यासमोर होताच.  " 

 

क्रमश................

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now