अनोखी गाठ  ४१            # मराठी _ कादंबरी 

------

अनोखी गाठ  ४१            # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( दिवाळीच्या काळात भाग पोस्ट करता आला नाही त्याबद्दल क्षमस्व.) 

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरीच्या लक्षात येत की सासूबाई गोष्टी विसरत आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ती ही गोष्ट महादेवरावांना सांगते. महादेवरावांनासुद्धा या गोष्टीचा अनुभव येतो. जॅकशी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूबाईंना डॉक्टरांना दाखवायचं ठरतं. मात्र सकाळी कावेरी उठते तेव्हा सासूबाई घरात नसतात. आजूबाजूला शोधाशोध करून देखील सासूबाई भेटत नाहीत तेव्हा कावेरी चिंतेत पडते. आता पुढे......) 

" आजी म्हणजे तुझ्या सासूबाई हरवल्या का ?" जानकी.

" त्या परत भेटल्या की नाही ?" स्वाती.

आजी पुढे सांगते," माझ्या ओळखीचा सर्व परिसर मी धुंडाळून काढला पण सासूबाई सापडल्या नाहीत. त्यांना काही आठवत असेल की नाही हे सुद्धा कळत नव्हतं. आजूबाजूला राहणाऱ्या बायकांनी माझं सांत्वन केलं आणि चाळीतली तरणी मुलं सासूबाईंना शोधायला बाहेर गेले. मला सुद्धा घरात बसवत नव्हतं म्हणून मी शेजारच्या काकींसोबत सासूबाईंना शोधायला बाहेर पडले. तो भाग त्यांच्या चांगलाच ओळखीचा होता. शोधता शोधता आम्ही खूप पुढे आलो. दुमली बस, टॅक्सी , रिक्षा या गोष्टींची सवय नसल्यामुळे मला भांबवायला झालं. माझ्या डोळ्यांमुळे अश्रू धारा सुरूच होत्या. डोळे त्यावेळी फक्त आणि फक्त सासूबाईंना शोधत होते.

सासूबाईंना शोधत असताना एका ठिकाणी गोंधळ सुरु असल्याच लक्षात आलं. जवळ जाताच सासूबाईंचा आवाज कानावर पडला. त्या कोणावर तरी ओरडत होत्या. मी धावतच तिथे गेले. मला पाहून त्या रागाने म्हणू लागल्या," कावेरी,   झाड मला न विचारता कापायची हिंमत कशी झाली तुझी ? तूच पाठवलंस ना यांना झाड कापायला? विसरू नकोस मी य वाड्याची आणि जमिनीची मालकीण आहे. " 

त्यांचं बोलणं सुरूच होतं तेवढ्यात दुसरा माणूस म्हणू लागला," अहो ताई कोण आहेत या ? हा रहदारीचा रस्ता आहे. येथून सारखी माणसं ये- जा करतात. रस्त्याला लागून हे झाड आहे ज्याची फांदी पावसामुळे अर्धी तुटली आहे. येणाऱ्या - जाणाऱ्यांच्या डोक्यात पडू नये म्हणून आम्ही ती फांदी तोडतोय तर या बाई आमच्यावर ओरडायला लागल्या. भांडायला लागल्या. माझ्या मालकीचं झाड आहे म्हणतायत." त्यावर मी त्या माणसाला हातानेच 'थांबा ' असा इशारा केला आणि सासूबाईंजवळ जात म्हणाले," सासूबाई, मी यांना झाड नाही तोडू देणार. तुम्ही नका चिंता करू आणि एवढ्या मोठ्या वाड्याच्या मालकिणीने असं छोट्या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष देणं बरोबर नाही वाटत. तुम्ही या काकींबरोबर पुढे चला, मी यांना झाड न तोडण्याबद्दल बजावून येते." 

त्यांना जो मोठेपणा मी दिला त्यामुळे त्या काकींबरोबर निघाल्या. मी तिथे जमलेल्या लोकांची क्षमा मागितली आणि सत्य परिस्थिती सांगितली. ते ऐकून त्यांना सुद्धा वाईट वाटलं. मी त्या विनंती केली सासूबाईंसमोर तुम्ही इथून जाण्याचं नाटक करा आणि आम्ही गेलो की तुम्ही तुमचं काम करा. त्यांना माझं म्हणणं पटलं. सासूबाई जाताना सुद्धा मागे वळून -वळून पाहत होत्या. त्या जमलेल्या माणसांनी तिथून जाण्याचं नाटक केलं. मी जवळपास धावतच सासूबाईंना गाठलं आणि म्हणाले," तंबी दिलीये मी त्यांना. आता पुन्हा आपल्या झाडाकडे ते फिरकणार नाहीत. " माझं बोलणं ऐकून आणि त्यांना गेलेलं पाहून सासूबाईंना बरं वाटलं. 

मी सासूबाईंना कसबसं तयार करून हॉस्पिटलला नेलं. 'ह्यांना' तिथे पाहून सासूबाई म्हणाल्या," तू इथे काय करतोयस ?" त्यावर 'हे' म्हणाले," माझं थोडं काम होतं म्हणून आलो होतो. आई माझे एक मित्र आहेत . 'ते' डॉक्टर आहेत. चाल तुझी भेट करून देतो. " 'हे' म्हणाले म्हणून सासूबाई डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेल्या. डॉक्टर सुद्धा आपल्या मित्राच्या आईची चौकशी करावी तसं बोलत होते. सासूबाईंशी थोडं बोलल्यावर डॉक्टरांनी 'ह्यांना' इशारा केला. तसं हे सासूबाईंना म्हणाले," आई चल आता त्यांना सुद्धा रुग्णांना तपासायचं असेल." असं म्हणून त्यांनी सासूबाईंना बाहेर आणलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर मंदिर होत तिथे दर्शनाला नेलं. मी, 'हे' आणि सासूबाई मंदिरात गेलो तसं 'हे' म्हणाले," आई बहुतेक माझी पिशवी आत राहिली मी घेऊन येतो. सासूबाईंनी मान डोलावली आणि डोळे बंद करून देवाला नमस्कार करू लागल्या. मी पटकन 'ह्यांच्या' जवळ जाऊन विचारलं," अहो, तुम्ही आमच्यासोबत आलात तर बाबांजवळ कोण राहणार ? आणि मी इथे थांबले तर सासूबाई अनेक प्रश्न विचारतील. " त्यावर 'हे' म्हणाले," कावेरी , तू चिंता नको करुस, जॉन राहील आज बाबांसोबत. बाबांना पूर्ण शुद्ध आली आहे. आता मी जाऊन डॉक्टरांना भेटून येतो. बाकी नंतर बोलूयात." असं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले. 

सासूबाई आणि मी देवाचं दर्शन घेतलं. थोडा वेळ 'हे' येईपर्यंत मंदिरात बसलो. माझं पूर्ण लक्ष मात्र सासूबाईंवर होतं. सकाळचा प्रकार पुन्हा नको होता. थोड्यावेळाने 'हे' आले. देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी परतलो. घरी जाऊन 'ह्यांनी अंघोळ केली आणि मी तोपर्यंत जेवण बनवलं. डॉक्टरांनी काय सांगितलं हे मला जाणून घ्यायचं होतं. सासूबाई तिथेच असल्यामुळे याविषयी बोलता येत नव्हतं. एवढंच कशाला कोणतीच गोष्ट बोलता येत नव्हती. कारण सासूबाईंना काय आठवतंय आणि काय नाही हे आम्हांला कळत नव्हतं. मी दुपारी जेवण वाढलं तेव्हा 'ह्यांनी' सासूबाईंना बाहेरच्या नळावरून स्वच्छ पाणी आणायला सांगितलं. लेक मागतोय म्हटल्यावर सासूबाई काहीही न बोलता पाणी आणायला गेल्या. मी त्यांना काही विचारणार तोच 'ह्यांनी' एक पुडी काढून त्यातली पावडर सासूबाईंच्या जेवणात मिसळली. माझ्या लक्षात आलं की या करिताच 'ह्यांनी' सासूबाईंना बाहेर पाठवलं. 

सासूबाई पाणी घेऊन आल्या. जेवणं झाली. थोडया वेळाने सासूबाई म्हणाल्या," कावेरी, मला खूप झोप येतेय मी झोपते." आणि अगदी काही क्षणातच त्या गाढ झोपी गेल्या. सासूबाईंना झोप लागल्याची खात्री केल्यावर मी 'ह्यांना' हॉस्पिटलमध्ये काय झालं म्हणून विचारलं. 'हे' सांगू लागले," कावेरी मी डॉक्टरांना भेटलो, डॉक्टर म्हणाले की आईच्या बोलण्यावरून असं कळतंय की आईला विसरण्याचा आजार झाला आहे. आईच्या काही तपासण्या कराव्या लागतील. त्यानंतरच ते योग्य औषध सुरु करतील. आता दिलेली ही पावडर फक्त काही वेळ मेंदू शांत करते आणि शांत झोप येते. ही पावडर आपल्याला कायम सुरु ठेवावी लागणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त औषधे सुरु करावी लागतील.  त्यासाठी तपासण्या करणं गरजेचं आहे. त्या कश्या करायच्या ? तपासण्या करायला नेलं तर अनेक प्रश्न विचारेल आई. काय उत्तर देणार ? तरी बरं बाबा आहे बरे आहेत. डॉक्टर म्हणाले १५ दिवस अजून त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवावं लागेल , त्यानंतर आपण त्यांना घरी नेऊ शकतो. " 

मी विचारलं," अहो, १५ दिवसानंतर सुद्धा बाबांना तपासण्यांसाठी डॉक्टरकडे न्यावंच लागेल. त्याचं काय ? आणि आईचं ?" त्यावर 'हे' म्हणाले," कावेरी , आपल्याबरोबर आलेले डॉक्टर बाबांच्या प्रत्येक ट्रेंटमेण्टच्या वेळी सोबत आहेतच. त्यामुळे त्यांना सर्व माहित आहे. आपण गावी गेल्यानंतर ते बाबांना बघतील. आणि अगदीच गरजेचं असेल तरच आपल्याला परत यावं लागेल. तसं डॉक्टर सांगतीलच. बाबांना मी आईच्या आजाराविषयी थोडी माहिती दिली आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा आजार एकदम एवढा बळावणार नाही. आईला आधीपासून याची सुरुवात झाली असणार, सुरुवात छोट्या- छोट्या गोष्टी विसरण्यापासून होते. कदाचित आपण तिथं राहत नाही म्हणून आपल्याला कळलं नाही. " 

मी आणि 'हे' सासूबाईंना तपासणीसाठी कसं न्यायचं यावर विचार करत होतो. आयुष्यात एका मागे एक घडामोडी सुरूच होत्या. आयुष्यात थोडा शुद्ध निवांतपणा येतच नव्हता. सासूबाईंच्या आजारामुळे पुढे खूप काही होणार आहे हे कळलं होतं मला. त्याचा अनुभवसुध सकाळी घेतलाच होता. नवीन आव्हान समोर उभं होतं , मला पेलून दाखव असं म्हणत होतं. 

क्रमश......... 

🎭 Series Post

View all