Dec 05, 2021
स्पर्धा

अनोखी गाठ  ३५          # मराठी _ कादंबरी 

Read Later
अनोखी गाठ  ३५          # मराठी _ कादंबरी 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अनोखी गाठ  ३५          # मराठी _ कादंबरी 

 

© आरती पाटील

 

( मागच्या भागात आपण पाहिलं की, स्वाती , जानकी आणि समीरा शेतातल्या घरात जेवण बनवतात. समीराने बनवलेल्या अर्ध्या कच्या , अर्ध्या करपलेल्या भाकरी अभिषेक खातो. संध्याकाळी समीरा शेवयांची खीर बनवते. कावेरी आजीला खीर आवडते आणि आजी समीराला सोन्याच्या बांगडया देते. सर्वजण आता जेवण आटोपून गच्चीवर आजीची वाट पाहत होते. आजीच्या पुढच्या कथेची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता पुढे........)

 

 समीरा गच्चीवर गादी टाकत होती आणि सारखी वाकून पायऱ्यांकडे पाहत होती. अभिषेकला ते पाहून हसू येत होतं . तो म्हणतो," समीरा , असं तू पायऱ्यांकडे बघत राहिलीस तर आजी लवकर येणार नाहीये. किंवा नाही पाहिलंस तर तिला उशीरही होणार नाहीये. शतपाऊली करून आजी लगेच वर येईल. डोन्ट वरी ." अभिषेकच्या बोलण्यावर समीरा कसुनस हसते. गादीवर जानकी चादर लावून सरळ करत असते. इकडे आकाशात चंद्र आपला शीतल प्रकाश पसरवून डोळ्यांबरोबरच मनाला सुद्धा गारवा देत होता. गच्चीतल्या फुलझाडांजवळ बसून आकाशातल्या चंद्राकडे पाहणाऱ्या समीराला अभिषेक एकटक पाहत होता. अबोली रंगाच्या पंजाबी ड्रेसवर हायलाईट केलेल्या केसांची सैलसर वेणी, कानात नाजूक झुमके , चेहऱ्यावर चंद्राचा नितळ प्रकाश. यामुळे तीच खानदानी सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. आज तिच्याकडे पाहून अजिबात वाटत नव्हतं की ती अमेरिकेहून आली आहे. 

" मी आली आहे अभी, माझ्याकडे सुद्धा थोडं लक्ष दे." आजीने समीरामध्ये हरवलेल्या अभिषेकला आवाज दिला , त्याबरोबर अभिषेक भानावर आला. अभिषेक आजीकडे जात म्हणतो," तुझीच तर वाट पाहतोय आम्ही कधीपासून." आजी फक्त हसते. आजी येवून गादीवर बसते आणि सर्वजण तिच्याभोवती घोळका करतात. जानकी म्हणते," आजी आज तू डिप्रेशनमधून कशी बाहेर आलीस हे सांगणार आहेस. " आजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते," हो, हो सर्व लक्षात आहे माझ्या. मग करू सुरुवात पुढच्या कथेला ?"  " हो........" सर्वजण एकसुरात म्हणतात. आजी आपली उरलेली गोष्ट पुन्हा सुरु करते. 

आजी," 'हे' सरस्वती ताईंना सोडायला काशीला गेले. इकडे मी एकटी पडले. तशी माझ्यासोबत जुली होती तरीसुद्धा मी सर्व गमावल्याची भावना मनात होतीच. 'हे' ताईंना सोडायला काशीला गेले म्हणजे येऊन- जाऊन १५ - २० दिवस जाणारच होते. कारण त्यावेळी इंग्रजांनी रेल्वे भारतात आणली असली तरी , रेल्वे भारतभर पसरली नव्हती आतासारखी. मोजक्याच रेल्वे , मोक्याच्या जागी सुरु केल्या होत्या. इंग्रजांना माल ने- आण करण्यासाठी. बाळ गमावून आणि ताईंना जाऊन फार वेळ झाला नव्हता. शिवाय माझ्या शरीरावरच्या आणि मनावरच्या जखमा ताज्या होत्या. मी तासंतास एका जागी बसून राहायची, सारखा तोच विचार डोक्यात असायचा. नैराश्य एक आजार आहे , हे त्यावेळी कोणाला माहीतच नव्हतं. या आजारामुळे माणूस मनाने खचतो, स्वतःला कुठल्याही गोष्टीच्या लायक समजत नाही, स्वतःला दुसऱ्यांबरोबर , दुसऱ्यांच्या सुखाबरोबर तुलना करत असतो. परिणामी एका वेळेनंतर आत्महत्या हाच शेवटचा पर्याय वाटतो. 

शेतात काय चालू आहे ? मुलं काय करतात ? सरकारला 'ह्यांनी ' दिलेल्या अर्जाचं आणि त्यानंतरच्या चर्चेचं काय झालं ? मला काही माहित नव्हतं. मुळात मला काही माहित करूनच घ्यायचं नव्हतं. जुलीने मला समजावण्याचा , मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण कदाचित ' सगळं संपलं' ही भावना माझ्या मनात पक्कं घर करून होती. अश्यातच दिवस जात होते ह्यांना जाऊन १० - १२ दिवस झाले होते. त्यादिवशी दुपारी माझ्या डोक्यात तोच - तोच घटनाक्रम फिरत होता. माझं पहिलं ठरलेलं लग्न, त्या मुलाच्या मृत्यूची बातमी , त्याच्या घरच्यांनी माझ्यावर केलेलं आरोप, माझ्याच घरच्यांनी मला देवाला सोडायचा घेतलेला निर्णय , ह्यांच्याशी झालेलं लग्न, अनेक महिने भोगलेला एकांतवास , गृहप्रवेश, सासूचा जाच, शिक्षणाला विरोध , त्यामुळे घराच्या बाहेर काढणं, माझं बाळ, सरस्वती ताईंवर झालेला हल्ला, मी जमलेलं मुलं आणि ताई..... ...... थैमान घातला होतं माझ्या डोक्यात आतापर्यंत जे भोगलं ते सर्व आता कायमचं थांबवण्याचा निर्णय घेतला होता मी. तशीच चालत विहिरीकडे निघाले. सर्व डोक्यात सुरु होतं, त्यामुळे कोणाचंही बोलणं माझ्या कानावर पडतच नव्हतं. तशीच जाऊन मी विहिरीच्या कट्टयावर उभी राहिले. 

" आजी....." रडवेला सूर करून आजीचा हात हातात घेत जानकीने आजीला आवाज दिला," आजी तू असं कसं करू शकत होतीस ? तू तर स्ट्रॉंग होतीस ना ? मग ? 

आजी तिच्याकडे स्मित करत बघत बोलते," बाळा, त्यावेळी माझं वय फार नव्हतं. शिवाय त्यावेळी आधार नव्हता आणि तीच भावना बळावली होती." कावेरीला आजीला मुलींच्या मनात आपल्याबद्दल असलेल्या भावनांमुळे भरून आलं. आजीने जानकीला आपल्या कुशीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर पापा घेत गोष्ट पुढे नेली.  आजी," मी पाण्यात उडी मारणार तोच मागून मला कोणीतरी खेचलं आणि माझ्या गालावर पाच बोटे उमटली.  त्यासरशी मी भानावर आले. समोर 'हे' म्हणजेच तुमचे पणजोबा उभे होते. त्यांना समोर पाहून मला खूप रडू आलं. त्यांच्या कुशीत मी खूप रडले. त्यांना माझं दुःख सांगू लागले. माझं सगळं बोलणं झाल्यानंतर ' हे' बोलू लागले," कावेरी जगात सगळ्यात मोठं दुःख फक्त तुलाच आहे ? असं तुला वाटतंय पण तसं नाहीये. मनुष्य जन्म म्हणजे संघर्ष आलाच. आपल्याच आजूबाजूला बघ. माझ्यापेक्षा कितीतरी दुःख असलेले लोक आपल्या आसपासच आहेत. माझं बघ, माझी पहिली बायको लहान - लहान मुले सोडून गेली. तुझ्याशी लग्न झालं आणि जगाशी वैर झालं. घर- दार सुटलं, जमीनदार म्हणून मिरवायचो आता ती जमीनदारी सुद्धा धोक्यात आहे. मुलं गमावलं, सरस्वती ताईंसारखी वहिनीचं छत्र हरवलं. " 'हे पुढे बोलतच होते," सरस्वतीताईंबद्दल विचार कर. बालपणापासून श्रीमंतीत वाढल्या, सासर श्रीमंत आज काय वेळ आली आहे त्यांच्यावर ? चूक नसताना सुद्धा अपराधीपणाची भावना घेऊन जगतायत आणि कदाचित हे ओझं आयुष्यभर घेऊनच त्या जगतील. 

 "आजूबाजूला बघ,  तू उचलेल्या एका धाडसी पावलामुळे स्त्रिया शिक्षणाकडे वळतायत. कचरत आणि नाईलाजाने किंवा तुझ्या अटीमुळे का होईना स्त्रीना समान वागणुक मिळायला सुरुवात झालीये. शेतीत बदल येतोय. तू अशी आपल्याच दुःखाला कवटाळून बसलीस तर बाकीचं कसं होणार? तुझ्या अश्या वागण्याने मुलांवर काय परिणाम होत असेल ? तुझ्या अश्या वागण्यामुळे पुढे होणारी प्रगती खुंटेल त्याचं काय ? हे बघ कावेरी जेव्हा - जेव्हा असं वाटेल की आपलं दुःख खूप मोठं आहे त्यावेळी आपल्यापेक्षा अधिक दुःखात असून संघर्ष कारण्याकडून प्रेरणा घेऊन पुन्हा नव्याने आयुष्याची लढाई सुरु करायची असते. कळतंय का मी बोलतोय ते ? " मला त्यांचं बोलणं पटलं. मी 'ह्यांची' माफी मागितली. मुलांना जवळ घेतलं आणि मला कळून चुकलं. माझ्या पदरात आधीपासूनच सोन्यासारखी मुलं असताना जो या जगातच आला नाही , त्याच्यासाठी मी माझ्या या गोड लेकरांवर अन्याय करत होते. त्यादिवशी 'ह्यांनी ' मला एक नवीन शिकवण दिली, जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यामध्ये आनंदी रहा. जे आहे ते वाढावा.

मी उठले आणि अंघोळीला गेले. केसावरुन पाणी घेत डोक्यापासून पायापर्यंत असलेली सर्व नकारत्मकता निघून जात असल्याचा भास मला होतं होता. बाहेर येऊन देवाला निरंजन लावताना मुलांना पोटाशी धरलं आणि देवाजवळ एकच मागणं मागितलं, की यापुढे माझ्या मनात चुकूनही नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस. आपल्या विरुद्ध गेलेली प्रत्येक गोष्ट आता मला माझ्या बाजूने पुन्हा वळवून घ्यायची होती. माझ्या चेहऱ्यावरचे शांत आणि आत्मविश्वासाचे भाव पाहून 'ह्यांनी' उसासा सोडला. मी देवाजवळ आभार व्यक्त करत होते की ज्या काळात स्त्रीला बोलण्याचा हक्क नव्हता , तिथे माझा नवरा मला समाजात बदल घडवायला सांगत होता. मुलं न देऊ शकणारी बाई काय कामाची अशी धारणा समाजात असतानाही मला नव्याने माझ्या नवऱ्यानेच उभं केलं. देवाने आमची अनोखी गाठ खूप विचार करूनच बांधली होती. 

मी पुन्हा जोमाने माझ्या ध्येयाकडे वाटचाल करायला सज्ज झाले होते. तोच सरकारी पत्र घेऊन सरकारी माणूस दारात हजर झाला. 'ह्यांनी' पत्र वाचलं आणि माझ्याकडे पाहत ते म्हणाले," कावेरी मला उद्या मुंबईला निघावं लागेल. "

 

क्रमश.........

       

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now