अनोखी गाठ  ३४         # मराठी _ कादंबरी 

-------

अनोखी गाठ  ३४         # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, सरस्वती ताई घर सोडून जाण्याच्या निर्णयावर ठाम असतात. महादेव राव त्यांच्या काळजीमुळे स्वतः त्यांना सोडायला काशीला जातात. इकडे बाळ गमावल्यामुळे शिवाय काहीही आई होऊ न शकण्याच्या दुःखामुळे आणि आता बहिणीची माया लावणारी सरस्वती ताई सोडून गेल्यामुळे कावेरी नैराश्यात गेली आहे. कावेरी आजी गोष्ट सांगत असताना जानकी आणि समीरा मध्ये काही शब्द न समजल्याने सांगतात. त्यांचे अर्थ सांगून आजी आपली गोष्ट थांबवते. दुसऱ्या दिवशी समीरा , जानकीला पुन्हा शेतातल्या घरी जाऊन कावेरी आजीसोबतच सरस्वती आजीच्या स्पर्श झालेल्या जागी त्यांना अनुभवायचं होतं. स्वाती त्यांच्याकडून घरकाम मदत घेते आणि त्या तिघीही शेतातल्या घरी येतात. जेवण तिथेच बनवायचं ठरवतात...... आता पुढे.....)

अभिषेक काहीतरी घेण्यासाठी शेतातल्या घरात येतो. चुलीजवळ बसलेल्या समीरा आणि जानकीला पाहून त्याला आश्चर्य वाटत. तो तस बोलून नाही दाखवत पण त्याच्या चेहऱ्यावरून ते कळत असतं. समीराला आणि जानकीला आज सर्वच छान वाटत होतं. त्या या मातीशी नकळत जोडल्या जात होत्या. या सर्वामध्ये डेव्हिडचा विचार एकदाही समीराच्या मनात आला नव्हता. हे सर्व ती एन्जॉय करत होती. माठातल्या गार पाण्यापुढे आज फ्रिज सुद्धा फिका पडला होता. गरमागरम भाकरीपुढे पिज्जा कुठेच नव्हता. समीरा आणि जानकी स्वयंपाक बनवताना जमेल तेवढी मदत स्वातीला करत होत्या. स्वाती भाकरी थापत होती.

स्वाती म्हणते," समीरा - जानकी तुम्हाला माहित आहे , मला आणि अभि दादाला अश्या गरमागरम भाकरीला दुधात भिजवून त्यात गूळ आणि तूप घालून खायला खूप आवडतं."

समीरा आणि जानकी स्वातीकडे बघतात आणि मग आळीपाळीने एकमेकींकडे. समीरा म्हणते," भाकरीत दूध, गूळ आणि तूप ? ऑईली फूड ? हेअल्थचं काय ? आणि कसं लागत असेल ते ?"

स्वाती म्हणते," मुळात या सर्व पदार्थात ऑईल कुठेच नाही. उलट तूप आणि गुळामुळे पचन शक्ती चांगली होते,  भाकरी तर शुगर असलेल्या माणसाला डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात. आणि टेस्टच म्हणशील तर " स्वर्ग सुख ". 

स्वातीचं बोलणं ऐकून समीरा आणि जानकीला थोडं कौतुहल वाटू लागलं. स्वाती त्या दोघींकडे पाहून म्हणते," तुम्हांला करून देऊ का तसं ? एकच भाकरीचं बनवते, दोघी खाऊन बघा नाही आवडलं तर जाऊ द्या. " 

मुळात स्वातीने ज्या प्रकारे वर्णन केलं होतं , त्यावरून त्या दोघीनांही टेस्ट करण्याची इच्छा झाली आणि दोघीही होकारार्थी मान डोलावली. स्वातीने ताटात गरमागरम भाकरीचे तुकडे केले. त्यावर घट्ट दूध ओतलं, त्यावर गुळ आणि तूप दिलं. त्या दोघींनी जेव्हा एक घास तोंडात टाकला , तेव्हा खरंच त्यांना ' स्वर्ग सुखाची' अनुभूती झाली. यापूर्वी कदाचित एवढं सूंदर जेवण त्यांनी केलं नव्हतं. समीरा आणि जानकीने स्वतःहून मागून पुन्हा घेतलं. स्वातीनेही हसत त्यांना वाढलं. समीरा आणि जानकी पोट टूम झाल्यावर पाट सोडला. स्वाती अजून भाकरी करत होती. समीराच्या मनात काय आलं माहित नाही पण ती स्वातीला म्हणाली," स्वाती मी एकदा ट्राय करू का भाकरी ?" समीराच्या या बोलण्यावर जानकी आणि स्वाती तिच्याकडे पाहतच राहिल्या. 

समीरा स्वतःहून बोलल्यामुळे स्वातीने तिला सांगितलं," शेवटच्या दोन तू बनव बाकी मी बनवून घेते. " भाकरी करण्यासाठी समीरा एक्ससायटेट होती. स्वातीने भाकरी करत असताना समीरा तिचं निरीक्षण करत होती. स्वाती कशी पीठ मळते ?कशी भाकरी थापते ? तव्यावर भाकरी कशी फिरवते ? चुलीतली लाकडे कशी मागे-पुढे करते ? अगदी सर्व ती अमूल्य डोळ्यांनी टिपत होती. स्वाती उठते आणि समीराला त्या जागी बसायला सांगते. समीरा पहिल्यांदा करत असल्यामुळे तिला बराच गोंधळ उडतो. स्वाती तिला नीट समजवत तिला एक- एक पायरी शिकवत असते. समीराची छोटीशी भाकरी कशी- बशी तयार होते. एका बाजूने पातळ , दुसऱ्या बाजूने जाड. तीन ती कशीबशी उचलून तव्यावर टाकली. त्यावर ती लगेच पाणी लावायला जाणार तोच स्वाती म्हणाली," समीरा, भाकरीला लगेच पाणी नाही लावायचं. भाकरी तव्यावर टाकल्या - टाकल्या पाणी लावलं तर भाकरीला तडे जातात त्यामुळे भाकरी नीट शेकत सुद्धा नाही. त्यामुळे नेहमी भाकरी थोडी गरम झाल्यावर, आपल्या हाताला भाकरीचा वरचा भाग गरम जाणवायला लागल्यावर त्यावर पाणी लावायचं."

समीरा आता स्वयंपाकाचे धडेही गिरवू लागली होती. समीराने आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करून भाकरी बनवल्या.  तेवढ्यात अभिषेक जेवायला आला.  स्वातीने बाहेर अंगणात जेवण घेतलं. जानकीने पाणी बाहेर आणलं तर समीराने ताटे. समीरा आणि जानकीला आपल्या मातीत असं रूळलेलं पाहून अभिषेकला बरं वाटत होतं. जेवण वाढताना सर्वांना जेवण वाढल्यावर समीराच्या लक्षात येतं तिने बनवलेल्या भाकरी अजून कोणाच्याही ताटात नसतात. अभिषेकचं लक्ष समीराकडे जातं जी दुरडीकडे पाहत असते आणि तो स्वातीला विचारतो," या छोट्या भाकरी का बनवल्या आहेत? "

स्वाती म्हणते," अरे दादा, समीरा पहिल्यांदा प्रयत्न करत होती. तिनेच बनवल्या आहेत. अभिषेक म्हणतो," अरे वाह...  मग मला आज आधी त्याच भाकरी वाढ. " समीरा पटकन म्हणते," नको ... नको.., त्या चांगल्या नाही बनल्या." 

त्यावर अभिषेक म्हणतो," चांगल्या झाल्या आहेत की नाही? हे खाणारा ठरवेल. तू वाढ स्वाती." 

स्वाती अभिषेकला समीराने बनवलेल्या भाकरी वाढते. भाकरी जाड- पातळ, अर्धी कच्ची , तर एखाद्या बाजूने करपलेली. समीराला माहित होतं ती स्वतः सुद्धा ती भाकरी खाणार नाही. अभिषेक मात्र नेहमी प्रमाणे जेवणाला सुरुवात करतो. समीराला अभिषेकबद्दल एक आदर आधीपासून असतोच आज मात्र त्यापेक्षा वेगळं जाणवत होतं. जेवल्यावर समीरा म्हणते," अभिषेक कश्या खाल्यास त्या भाकरी? मलाही नसल्या खाता आल्या. " त्यावर अभिषेक म्हणतो," तुझा पहिला प्रयत्न होता आणि आज पर्यंत पहिल्या प्रयत्नात यश कोणालाही मिळालेलं नाहीये. या स्वातीलाच विचार किती महिने हिने मला कधी करपलेल्या, कधी कच्च्या , कधी कडक  तर कधी जाड भाकरी खाऊ घातल्या आहेत. अश्या भाकरी बनवायची आणि कोणी खाल्या नाही की रडारड. मग त्या मला खाव्या लागायच्या. खूप सरावानंतर आज एवढ्या छान भाकरी करते ती. तसही तुझा पहिला प्रयत्न चांगला होता. पुन्हा बनव. मी खाईन. अगदी तुला परफेक्ट जमेपर्यंत. " असं बोलून अभिषेक आपल्या कामाला निघून जातो. इकडे मात्र समीराच्या मनात अभिषेकासाठी एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. 

आजवर एखादा पदार्थ नाही आवडला की सर्रास आपण प्लेट बाजूला सरायचो. त्यामागच्या मेहनतीचा विचार कधी केला नव्हता. अभिषेक मात्र या जगात सगळ्यात वेगळा भासत होता समीराला. अभिषेकने तिच्या हातचं जेवण केल्यामुळे तिला एकप्रकारचा हुरूप आला होता. तिने स्वातीला आवरायला मदत केली. काही नाही जमल तर ती स्वातीला विचारू लागली. ती स्वतःहून स्वातीला म्हणाली," स्वाती रात्री जेवणात मी , मागे तू बनवलेल्या तशी शेवयांची खीर  बनवेन. तू मला सांगशील का कसं बनवायचं ? " स्वातीला हे गोड धक्के आवडत होते. तिने हसून होकारार्थी मान डोलावली.  संध्याकाळी त्या लवकर घरी आल्या. समीरा आणि जानकी स्वतःहून स्वातीला कामात मदत करू लागल्या. स्वातीच्या निर्देशानुसार समीराने शेवयांची खीर बनवली. 

रात्री सर्व जेवायला बसले तेव्हा शेवयांची खीर पाहून कावेरी आजीने स्वातीकडे पाहत विचारले ," आज काय विशेष? शेवयांची खीर?" त्यावर स्वाती म्हणाली," आजी मी नाही आज समीराने बनवली आहे. तिला बनवायची होती. मी फक्त कृती सांगत गेले बस." आजीला हे ऐकून समीराचं कौतुक वाटत. आजी एक चमचा खीर खाते आणि उठून आत आपल्या खोलीत जाते. समीराला वाटत की आजीला खीर आवडली नाही. तिचा चेहरा पडतो, डोळ्यात पाणी साचत. यापूर्वी तिच्यासोबत असं कधीही झालं नव्हतं. कोण जेवत ? कोण नाही ? याने तिला कधीही फरक पडला नव्हता. मग यावेळी का? हा प्रश्न तिला स्वतःच पडला होता. तेवढ्यात आजी बाहेर येते आणि समीराला आपल्या जवळ बोलावते. समीरा आजी जवळ जाते मात्र तिची मान अजून खालीच असते. आजी समीराचा हात घेते आणि त्यावर दोन सोन्याच्या बांगडया ठेवते. ते पाहून समीराला रडू येतं. आजी म्हणते," आपल्या कामाची दाद मिळाली की हे असं होतंच. खीर खूप छान झाली आहे. मी तर अगदी दोन वाटया खाईन. म्हणून तुला हे बक्षीस. " बांगडया जुन्या असल्या तरी कोरीव, भरीव आणि सुंदर होत्या. समीराला भावल्या. जानकी म्हणाली," आजी तिला दिल्या मग मला ?" त्यावर आजी हसून म्हणाली," तू पण बनव छानसं काहीतरी मग तुला पण देईन मी. " 

हास्य विनोद करत जेवण पूर्ण होतं. आता सर्वाना आजीच्या पुढच्या गोष्टीची आतुरता होती..... 

क्रमश......... 

🎭 Series Post

View all