अनोखं वळण भाग ३.विषय नातीगोती.जलद कथा लेखन स्पर्धा

एक हळवी कथा
अनोखं वळण भाग ३रा
विषय…नातीगोती
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे…


सुधाच्या मनात कोंडून ठेवलेली अस्वस्थता डोळ्यातून अश्रूंच्या रुपानी बाहेर पडू लागली. सासू तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत होती. सुधानीही डोळ्यातून वाहणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. सासूने ही तिला आपल्या मिठीतून बाजूला केलं नाही.

त्या दोघींची ही भेट दोघींमधलं सासू सुनेचं अंतर संपवणारी ठरली. कितीतरी वेळ दोघी तश्याच उभ्या होत्या. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं पण ते चिंतेचं नव्हतं तर चिंता दूर झाली म्हणून आनंदानी पाणी होतं. त्यांना सुधा हळूहळू सापडू लागली होती.


सासूबाई हळूच त्या सुधाच्या कानाशी बोलल्या,

"सुधा आज माझी काळजी मिटली. माझं कोमेजत चाललेलं फूल पुन्हा टरारून आलं." सासू

" मलाच कळत नाही मी अश्या वेड्या मनस्थितीत का आहे?" सुधा

" फार विचार करू नकोस.या वयात होतं अस़." सासू

" तुम्हाला व्हायचं असं ?" सुधा

" नाही. कारण मी तू ज्या वयात आहेस त्या वयातही नोकरी करत होते त्यामुळे घर,ऑफीस आणि ऑफीसमधलं काम ऑफीसमधल्या मैत्रीणी यात वेळ कसा जायचा कळायचं नाही. त्यामुळे तुला तुला जशी अस्वस्थता जाणवते तसं मला झालं नाही. पण तू खूप विचार करू नकोस." सासू

" आई कशातच माझं मन रमत नाही. मला कळतंय मी विचीत्र वागतेय. यातून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर मला सापडत नाही. आत्तापर्यंत मी स्वतःशीच रात्रंदिवस झगडते आहे. आई मला मदत करा या चक्रव्यहातून बाहेर पडायला."

सुधा सासूच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली. सासूनेही तिला रडू दिलं.

तिच्या मनात काय आहे ज्याने सुधा अशी अस्वस्थ झाली आहे हे सासूला अजून कळलं नव्हतं. तरी ते लवकरात लवकर माहिती करूंन घ्यायला हवं तर यावर आपण हिच्या अस्वस्थेवर उपाय शोधता येईल.

कितीतरी वेळ सुधा सासूच्या खांद्यावर डोकं ठेवून मुसमुसत होती.

आयुष्याच्या या वळणावर सगळ्याच स्त्रियांना असं होतं पण सुधासारख्या हळव्या स्त्रियांना यांचा फार त्रास होतो. त्यांना त्यांच्या ऑफीस मधली त्यांची मैत्रीण कावेरी आठवली. तिची अवस्था अगदी सुधासारखीच झाली होती.

कधी कधी तिला ऑफीसमध्ये येताना भान रहात नसे. साडी नेसली तर त्यावर कोणत्याही रंगाचं ब्लाॅऊज घालायची. सगळ्यां तिला हसायच्या. सासूला कावेरीच्या चेह-यावर जसे भाव दिसायचे तसेच आता सुधाच्या चेह-यावर दिसतात आहे हे सासूच्या लक्षात आलं.

कावेरीच्या मनाला जे टोचायचं तसंच सुधाच्या मनाला काय टोचतय हे बघीतला हवं. सुधाला माझ्यावरचा विश्वास अजून वाढायला हवा तर ती सगळं सांगेल.

बराच वेळाने सुधा भानावर आली आणि डोळ्यातून ओघळणारंं पाणी पुसत म्हणाली

"आई तुम्ही खूप विचार करू नका. मला काय होतंय मलाच कळत नाही. संसाराच्या अर्ध्या वाटेवर हे काय होतंय मलाच कळत नाही. नव-याचा त्रास नाही, मुलांचा त्रास नाही, तुमचा पण नाही मग काय होतंय. आई नाही हो मला कळत नाही." पुन्हा रडू लागली.

सासूबाईंनी पुन्हा तिला कुशीत घेतलं आणि तिला हळूच थोपटू लागल्या.म्हणाल्या

" रडू नको. हळूहळू सगळं निवळेल.तू काळजी करू नको."

सासूच्या नव्हे एका जवळच्या मैत्रीणीच्या कुशीत आपण आहोत असं सुधाला वाटू लागलं. सासूबाईंनापण एक वेड कोकरू आपल्याकडे मदतीची याचना करतात असं वाटलं.त्यांनी ठरवलं. सुधाच्या मनाला जे टोचतय ते काय आहे ते शोधून काढायचं.
____________________________
क्रमशः अनोखं वळण भाग ३
© मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all