अनोखं वळण भाग ५ अंतीम भाग.विषय नातीगोती.जलद कथा लेखन स्पर्धा

एक हळवी कथा
अनोखं वळण ५वा
विषय…नातीगोती
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे

सुधा स्वयंपाकघरात स्वयंपाकाचं बघत असते. स्वयंपाक झाल्यावर ओटा पुसून नंतर सुधा घरचं दही फ्रीजमधून काढते आणि त्याचं ताक करायला घेते.

सुधा विचारच करत असते. किती काळ लोटला मध्ये. आपण दहावी झालो तेव्हा कसे लाजरे होतो. बारावीत ही फारसा फरक नव्हता आपल्या स्वभावात.

त्याच्याशी बोलायला खूप लाज वाटायची. आपण कोणाला तरी आवडतो ही भावना किती आनंदाची आहे. हा आनंद मनाला मोहोर आणायचा. तो घरातल्या लोकांपासून लपवता लपवता पुरेवाट व्हायची. कितीदातरी मला आवडत नसलेलं काम सुद्धा करायचे.

****


सुधाला आत्ता दही घुसळत असताना जुना प्रसंग आठवला.

एकदा आपण दही घुसळत होतो.लोणी वर आलं तरी आपल्याला भान नव्हतं शेवटी आई ओरडली तेव्हा भानावर आलो.

आपल्याला खूप हसू यायला लागलं. आपण लोणी काढण्याऐवजी हसत. बसलो.

आत्ताही सुधा स्वतःशीच हसत होती.

"सुधा अगं स्वतःशीच काय हसते आहेस?" भानावर येऊन सुधाने बघीतलं तर तिच्या सासूबाई तिला हाताने खूण करून विचारत होत्या काय झालं.

सुधा हसत म्हणाली "काही नाही हो काॅलेज मधली गंम्मत आठवली म्हणून हसायला आलं."

"अगं मला सांग नं.त्या गमतीमध्ये तुझा तो होता का?"

सासूबाईंच्या या प्रश्नाने ती सुरवातीला गांगरली मग हसत तिने सगळी गंम्मत सासूबाईंना सांगीतली.

सासूला सुधाने हसण्यामागची गंम्मत सांगीतली तश्या दोघी हसायला लागल्या.

"सुधा तू माझ्याशी खूप हसून मोकळेपणाने बोलायला लागलीस पण घरातील इतरांशी कधी बोलणार? ते समोर आले की तू गप्प असतेस असं का?" सासू

" आई मी अजून पूर्ण त्या आठवणींमधून बाहेर आले नाही.म्हणून पटकन यांच्याशी बोलता येत नाही. यांच्याशी बोलताना मला विद्यूतची नजर आठवते. क्षणभर मी त्यात गुंतून जाते मग हे काय विचारतात आहे,काय बोलतात आहे हे काहीच कळत नाही.म्हणून मी यांच्याशी बोलणं टाळते." सुधा

" कळतंय मला तू सध्या द्विधा मनस्थितीत आहेस पण तुला लवकरच विद्यूतची आठवण कमी करावी लागेल. त्या ठिकाणी सुदेशची नजर,त्यांचं बघणं बोलणं ठामपणे रूजवावं लागेल.हे जितक्या लवकर करशील तेवढं चांगलं." सासू

"आई मला कळतंय तुम्ही जे सांगताय ते.मी करीन प्रयत्न." सुधा

" आज एक काम करूया?" सासू

" काय?" सुधाने विचारलं

" आज आपण दोघींचं बाहेर जाऊ." सासू

" बाहेर! कुठे?" सुधा

"आपण जाऊ पाणीपुरी खायला.तुला आवडते नं!" सासू

" कधी जायचं?" राधा

"जाऊ मुलं आणि सुदेश येईपर्यंत परत येऊ." सासू.

"बघते." विचारात पडलेली राधा म्हणाली.

"बघायचं नाही. जायचंय पक्कं." सासू

सुधा विचारात असताना तिच्या लक्षात आलं

" आई अहो तुमचा भजन क्लास असतो नं त्यांचं वेळी."राधा

"असू दे. एक दिवस नाही गेली भजन क्लासला तर काही बिघडत नाही. पण आजचा क्षण आपण दोघींनी जपून ठेऊ. कोणी मध्ये नको. ना माझा मुलगा ना तुझी मुलं. चल लवकर तयार हो."

सुधाला सासूचे नवीन रुप बघून हसू आलं तशी सासूबाई पण हसू लागल्या आणि लगेच म्हणाल्या.

"आज आपण हा आनंद सेलिब्रेट करू. चल पाणीपुरी खायला जाऊ."


आज त्यांच्या घरात किती तरी दिवसांनी आनंदाला उधाण आलं होतं. राधाला सासूचे हे रूप हवंहवंसं वाटलं. ती पटकन तयारीला लागली. तिला न समजणारी पोकळी सासुबाईंनी ओळखली होती. तिनं स्वत:लाच प्रश्न केला की,


“कितीजणांच्या सासूबाई आपल्या सुनेची ही अवस्था ओळखत असतील...मी किती भाग्यवान मला अशी सासू मिळाली जी आपली जिवलग मैत्रीणच झाली. आता काहीही त्यांच्यापासून लपवायचं नाही. त्याच मला मार्ग दाखवू शकतात.”


विचारात गुंतलेली सुधा नेहमीपेक्षा लवकर तयार झाली. आधी काहीच करायची इच्छा नसल्याने तिला बाहेर जायचे कपडे सुद्धा शोधायाला त्रास वाटायचा. आज मात्र सासुबाईंच्या बोलण्यानी जादू झाली होती. सुधा झटकन तयार झाली.

ती आणि तिची जिवलग मैत्रीण फक्त दोघीच या सुंदर क्षणांना बांधून ठेवणार होत्या. राधा तयार होऊन बाहेर आली तर ती सासूकडे आश्चर्यानी बघू लागली. कारण आज त्यांनी साडी न नेसता राधाला आवडतो तसा आणि तिने त्यांच्यासाठी आणलेला पंजाबी ड्रेस घातला होता.

दोघीही एका वेगळ्याच आनंदात घराबाहेर पडल्या. तो आनंद त्या दोघींच्या चालण्यातुनही दिसत होता. दोघी एकमेकींचा हात धरून चालत होत्या. हा मैत्रीचा हात आता दोघींनाही सोडायचा नव्हता.

***

सगळे घरी यायच्या आत त्यांना घरी परतायचं होतं सुधा साधीच तयार झाली होती पण चेह-यावर मात्र खूप छान हसू होतं. ते हसू बघून सासूबाई मनातून आनंदल्या. त्या दोघी नेहमीच्या पाणीपुरी वाल्याकडे गेल्या. मनसोक्त हसत बोलत दोघी पाणीपुरीचा यथेच्छ समाचार घेत होत्या. दोघीही आपल्या ख-या वयापेक्षा वीस वर्षांनी लहान झाल्या होत्या.


दोघींनाही आपल्या गतजीवनातील फुलपंखी दिवस आठवू लागले. त्या दिवसातील गमती-जमती त्या एकमेकींना सांगू लागल्या आणि मनमुराद हसू लागल्या. आज त्यांना इतर लोकांचं, जगाचं भान नव्हतं. आज त्या दोघी आपल्या कोषातून निघालेलं फुलपाखरू होत्या. त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही.

पाणीपुरी खाताना दोघी मनमुराद हसत होत्या.
त्यांच्या हसण्याच्या आवाजांनी तिथूनच आपल्या घरी जाणा-या सुधाच्या नवा-यांनी सुदेशनी ऐकला आणि तो त्या दोघींना हसता-खिदळतांना बघून चकीत झाला.

हसणा-या सुधा आणि आईजवळ सुदेश गेला पण त्या दोघींचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.त्या आपल्याच विश्वात होत्या.

तो त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला तरी त्या दोघींना कळलं नाही. तो मात्र खूष झाला कारण खूप दिवसांनी त्यानी बायकोला आणि आईला असं आनंदाने हसतांना बघितलं होतं.


सुधाच्या गप्प राहण्यामुळे घरात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. तो ताण त्याला आणि मुलांना कोणालाच सहन होत नव्हता. पण ती ओरडत नव्हती किंवा चिडत नव्हती. आपली रोजची सगळी कामं शांतपणे करत होती. त्यामुळे कोणालाही तिच्या निरुत्साही असण्याचं कारण कळत नव्हतं. आज खूप दिवसांनी त्यानी सुधाच्या चेह-यावर आनंद बघीताला होता. तो मनातच खूप खूष झाला. जवळ जाउनही त्या दोघींना कळलं नाही म्हणूनच त्यांना हाक न मारता तो हळूच त्यांना चाहूल न लागू देता घरी परतला.

सुधा आणि सासूबाई काॅलेज कन्या झाल्या होत्या. त्यांच्या हसण्या खिदळण्यानी आजूबाजूचे लोक त्या दोघींकडे बघू लागले. दोघींच्या वयातील अंतर कळत होतं म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं.

घरी दोघींची मुलं आलेली होती. दोघी घरात शिरताच सुधा एका वेगळ्याच आनंदात आपल्या खोलीत गेली.

सुदेशनी लगेच आईला विचारलं,

"अगं काय जादू केली तू? किती महिन्यांनंतर सुधाला पाणी पुरी गातांना आणि हसताना बघीतलं."

आईनी सुदेश कडे फक्त हसून बघीतलं आणि त्याही आपल्या खोलीत निघून गेल्या. सुदेश उत्तर न मिळाल्याने विचारात पडला. मुलांना मात्र सुदेश सारखे प्रश्न पडले नाहीत. त्यांना त्यांची आई पुर्वी सारखी झाली याचाच आनंद झाला होता.

_________________________________
समाप्त

अनोखं वळण भाग ५वा ( अंतिम)
जलद कथा लेखन स्पर्धा
© लेखिका….मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all