अनोखं वळण भाग ४.विषय नातीगोती.जलद कथा लेखन स्पर्धा

एक हळवी कथा
अनोखं वळण भाग ४था
विषय…नातीगोती
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे…

त्या दिवशी सासूबाई तिच्या खोलीत डोकावल्या तर सुधा बाल्कनीत इझीचेअरवर झोके घेत डोळे मिटून बसली होती. इझीचेअरला पायाने हलके झोके घेत होती.

" सुधा झोपलीस का?"

सासूबाईंनी विचारलं. सासूचा आवाज ऐकून सुधाने हळुच डोळे उघडले.

" काय आई?" सुधा

" अगं आपलं बोलणं अर्धवटच राहिलं." सासू

"कोणतं बोलणं"

काही न समजून सुधाने विचारलं

सासुबाई हळूच बाजूच्या खुर्चीवर बसल्या.हसून म्हणाल्या.

" तुझ्या मनाला काय टोचतं आहे हे मला शोधून काढायला मदत करशील."

" आई…"

" सांग मला तुझ्या मनात काहीतरी आहे.जे तुझ्या मनाला बोचतय.तुला कुठेतरी असं वाटतंय की असं व्हायला नको‌ होतं. ते काय आहे? हेच मला माहिती करून घ्यायची आहे. पण ते मला तेव्हाच समजेल जेव्हा तू मला खरं खरं सांगशील."सासू

सासूबाईंचं बोलणं ऐकून सुधा विचारात पडली. सांगावं सासूबाईंना की न सांगावं या द्विधा मनस्थितीत पडली.

थोडावेळ वाट बघून सासूबाईंनी सुधाचा हात धरून हलवला तेव्हा ती तंद्रीतून बाहेर आली. म्हणाली,

"अहो आई मी बारावीत होते ना तेव्हा मी खूपच बावळट होते." सुधा म्हणाली तश्या सासूबाई लगेच म्हणाल्या

"अजूनही कुठे शहाणी झालीस?" सुधाने हे ऐकल्याबरोबर त्यांच्याकडे खोट्या खोट्या रागानी बघीतलं. तश्या सासूबाई हसू लागल्या.नंतर सुधा पण हसायला लागली.

" सुधे तू काय सांगत होतीस?" हसू आवरत सासूबाईंनी विचारलं.

"अहो एक मुलगा माझ्या मागे लागला होता अकरावीपासून. हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही. माझ्या मैत्रीणीने निलूनी सांगीतलं. मग मी जाम घाबरले.अहो आमच्या घरी हे कळलं असतं तर आप्पांनी वेतानीच फोडलं असतं दुस-या दिवशी पासून मी त्याच्याकडे बघायचे पण नाही. आधी हसायचे तरी नंतर तेही बंद केलं. बिचा-याचा चेहरा मलूल व्हायचा."

खाली बघत सुधा बोलत होती.सासूबाई तिचं बारकाईने निरीक्षण करत होत्या.

" नंतर काय झालं?" सासूबाईंनी विचारलं.

"नंतर? नंतर काही नाही. एकदोनदा त्याने रस्त्यात थांबवलं पण मी नाही थांबले. नंतर निलू मला म्हणाली त्याला खूप वाईट वाटलं. तो बारावीची परीक्षा झाल्यानंतर निघून गेला."

सुधाचा आवाज थोडा गहिवरला होता.

"त्याची आठवण येते का तुला अजून? म्हणून तू अशी गप्प असतेस का?" सासूबाईंनी विचारताच सुधा गडबडली.

" नाही हो असं काही नाही.पण " सुधा एकदम गप्प झाली.

सासूबाईंनी पुन्हा विचारलं " सुधा गप्प का झालीस?"

"आई तो मला बघायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात मला खूप प्रेम दिसायचं. हे मला आधी नाही दिसलं. निलूनी सांगीतल्यावर दिसलं आणि मी खूप घाबरले." सुधा पुन्हा गप्प झाली.


" मी त्याच्याशी बोलायचे नाही.त्याच्याकडे बघत पण नव्हते. मला घरच्या लोकांची खूप भीती वाटली.त्याने एकदोनदा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला पण मी…मी बोललेच नाही." सुधाचा आवाज जरा जडावला होता.

"सुधा खरं खरं सांग. नक्की काय झालंय." सुधाचा चेहरा आपल्याकडे वळवत सासूबाईंनी सांगीतलं.

" महिन्याभरापूर्वी निलूने सांगीतलं की निलूला अचानक तो बाजारात भेटला. खूप आलीशान गाडीतून उतरला. निलूला त्याने हाक मारली. दोघही बराच वेळ बोलले. निलूने त्याला म्हटलं बायको गाडीतच बसली आहे का? ओळख करून दे की माझ्याशी? लग्नं कधी झालं विचारलं. तर तो म्हणाला मी लग्न नाही केलं. मला लग्न सुधाशीच करायचं होतं. असतं एकेकाचं नशीब. सुधा कशी आहे? तिचं झालं का लग्नं? हे ऐकल्यापासून मला अपराधी वाटतंय."

यावर सासूबाई तिचा हात थोपटत म्हणाल्या," ते वय तसंच असतं. पण आता तू ज्या वयाच्या उंबरठ्यावर आहेस तिथे तुला त्याच्या खूप जवळ जाता येणार नाही. तुला कितीही वाटलं त्याच्याशी बोलावं पण असं नाही करता येणार. ऊगीचच तुझ्या आणि सुदेशमध्ये दरी निर्माण होईल.‌ जी भविष्याच्या दृष्टीनं योग्य नाही. त्याची आठवण तू फक्त तुझ्या मनात जप. कधी बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बोलं. आपण आता मैत्रीणी आहोत नं"सासू

" हो. मी मला वाटलं की तुमच्याशीच बोलत जाईन." सुधा

सासूबाईंनी लगेच तिच्या हातावर थोपटत हसत म्हटलं
" गुड. मी निघते भजनाला." सासू

सुधाने होकारार्थी मान डोलावली.
______________________________
क्रमशः अनोखं वळण भाग ४

© मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all