अनोखं वळण भाग २.विषय नातीगोती.जलद कथा लेखन स्पर्धा

एक हळवी कथा


अनोखं वळण भाग २ या
विषय…नातीगोती
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे.


भूतकाळातील आठवणीत सुधाचं मन गुंतून जायचं. एकदा सासूने तिला आवडतो तसा चहा करून तिच्या हातात दिला. तीनेही अगदी यांत्रीकपणे तो घेतला. ती अजूनही तंद्रीत होती. सासूबाई बराच वेळ तिच्याजवळ उभ्या होत्या. त्यांना वाटलं की ही सांगेल चहा कसा झालाय. पण सासुबाइंनी आपल्याला चहा आणून दिलाय हे तर तिच्या लक्षातही आलं नाही. सुधा अजूनही आपल्याच तंद्रीत होती. सासूबाईंना वाटलं की काहीतरी करायला हवं.


ही तिची स्तब्धता सोडवायला हवी.तिला बोलकं करायला हवं. इतक्या वर्षांनी असं काय घडलं की कोसळणा-या धबधब्याला अचानक खीळ बसली? सासूबाई नोकरी करत होत्या त्यामुळे सुधाच्या वयातही त्या कामात मग्न असायच्या. तिला जाणवते तशी पोकळी त्यांना जाणवली नव्हती. नोकरी न करणा-या बायकांना या वयातील ही पोकळी खायला उठते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यात भर म्हणून पाळी जातानाचे होणारे त्रास. हा सगळा गुंता बाईच्याच वाट्याला येतो.

त्या गुंत्याचा होणारा त्रासही बाईलाच सहन करावा लागतो. नवरा कुठे येतो. हळुवारपणे विचारायला? सासूबाईंना सुधाची मन: स्थिती कळत होती.

सुधाला या तंद्रीतून बाहेर काढलचं पाहिजे, काहीतरी तोडगा शोधलाच पाहिजे असं ठरवून त्या सुधाला तिच्या तंद्रीतून बाहेर न काढता हळूच पावलं न वाजवता आत गेल्या.

***

सुधा सगळी जबाबदारी पूर्वीसारखीच सांभाळत होती. कधीही मुलांना नाश्ता केल्याशिवाय, डबा घेतल्याशिवाय जावं लागलं नाही. सुदेशचे कपडे वेळेवारी धुवून इस्त्री होऊन येत होते. त्याला कधी विनाइस्त्रीचे कपडे घालून ऑफीसला जावं लागलं नाही. सासुबाई भजनाला जाण्याआधी त्यांना चहा मिळतच असे. इतकं सगळं व्यवस्थीत होत होतं.पण ते यांत्रिक पणे होतं होतं.

हे सगळं करताना पुर्वीची सुधा कोणाला सापडत नव्हती. मग काय तिचं बिनसलं होतं? कुणालाच काही कळत नव्हतं.

पुर्वीसारखी धबधबा होऊन ती आजकाल बोलत नसे. पूर्वी घरातील इतरांना तिला म्हणावं लागायचं

" प्लीज खूप प्रश्न नको विचारू." आता ती एकही प्रश्नच काय एकही शब्द बोलत नाही.

त्यामुळे घरातले सगळे खरंतर घाबरले. तिचा आवाज यायचा तेव्हा त्यांना नको वाटायचं आणि आता तिचा आवाज नाही येत तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की सुधाच्या बोलण्यामुळे घरात आनंद होता.तिच्या आवाजाचे तरंग सगळ्यांना उत्साहीत ठेवतात हे सत्य आता घरच्यांच्या लक्षात आलं.


या चौघांच्या आयुष्यात काय चाललंय हे देखील विचारत नसे. पूर्वी प्रत्येक गोष्ट तिला माहिती करून घ्यायची असायची. आता काहीच तसं होत नाही मुलं आणि नवरा यावर फार विचार करत नसत कारण ती तिघंही स्वत:च्या आयुष्यात मग्न होती. पण सासूबाईंना मात्र यावर तोडगा शोधलाच पाहिजे असं जाणीवपूर्वक वाटू लागलं होतं.


पूर्वीच्या सुधाला परत आणलच पाहिजे असं त्यांना मनापासून वाटायला लागलं होतं. गृहलक्ष्मीचा मनमोकळा सहवास या घराच्या चार भिंतींना मिळायलाच हवा त्यासाठी तिचं हे स्वत:तच रमणं आणि तिचं मौन मोडायला हवं.

तिच्या मनाला काय टोचतय यांचा शोध घेतलातच पाहिजे असं सासूबाईंना प्रकर्षानं वाटू लागलं. सुधाच्या मनात कोणत्यातरी मोरपीसाबद्दल आठवणी आहेत हे त्यांना माहीत नव्हतं.

त्यांना तिच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी माहिती नव्हत्या. साधारणपणे बाईच्या मनात या वयात काय उलथापालथ होते याबद्दल त्यांना माहिती होतं. त्यांचं आधारे त्या मुलाचं निरीक्षण करत होत्या.

***

त्या दिवशी सुधा नेहमीप्रमाणे; सासूबाईंसाठी चहा करीत होती. त्यांची भजनाला जायची वेळ झाली होती. शुन्य नजरेनी अगदी यंत्रवत तिच्या हालचाली चालू होत्या. सासूबाई तिच्या बाजूला ऊभ्या होत्या पण तिचं लक्षच नव्हतं. गॅसवर चहा ऊतू जाण्याच्या बेतात होता सासूबाईंनी गॅस बंद केला. तरीही ती निर्वीकार नजरेनी त्या चहाकडे बघत होती.त्यांनी तिला हलवून विचारलं

,"अगं लक्ष कुठंय तुझं?" "

अं....”सुधानी दचकून सासूकडे बघीतल. त्यांना तिचा इतका निर्विकार चेहरा बघवेना. तिच्या डोळ्यात डोळे घालुन त्यांनी विचारलं

"काय टोचतय ग तुझ्या मनाला. सांग न मला. .इतकी वर्ष झाली तुझ्या लग्नाला मी अजून परकी आहे का तुझ्यासाठी? तुझ्या संसारात तुला काही उणीव वाटते आहे का?" "

"नाही हो आई असं का म्हणता?"सुधानी रडवेल्या आवाजात विचारलं.

"मग कुठे हरवलेली असतेस आजकाल? पूर्वीसारखी बडबडत नाहीस. तुझं हसणं आजकाल उंबराचं फुल झालय. कशाचा विचार करतेस? मला सांगून बघ. मला काही तोडगा काढता आला तर बघू. पण तू अशी स्वत:तच हरवल्यासारखी वागू नकोस."

"मलाच कळत नाही आई मला काय झालंय."

तिच्या डोळ्यात पाणी आलं. सासूबाईंनी ते आपल्या हातांनी हळूवारपणे पुसलं आणि म्हणाल्या.

" ही अवस्था प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येते. सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. अशी गप्प गप्प नको राहूस. तुला असं बघीतल की मला मनातून रडू येत. सावर स्वतःला."

सुधा काही न बोलता सासूच्या मिठीत शिरली.
______________________________
क्रमशः अनोखं वळणं भाग२
©…मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all