अनोखं वळण भाग१
विषय…नातीगोती
जलद कथा लेखन स्पर्धा
जलद कथा लेखन स्पर्धा
स्त्री च्या आयुष्यात एक वळणं असं येतच की त्या वळणाला ती चुकवू शकत नाही आणि आनंदानी त्यावर चालूही शकत नाही. सुधा अशाच वळणावर उभी आहे. ती आता पोक्त झालीय पण मन मात्र सोळावं लागल्या सारखं ऊधाणलय. आयुष्यात सगळं काही आहे तरी कुठेतरी, कशाची तरी न्यूनता जाणवते. काय असेल हे?
आपल्या मनात काय चालु आहे? सुधाला उमजत नव्हतं. परवा शालु म्हणाली की
"बायकांना पाळी जाण्याची वेळ आली की असे त्रास होतात. त्या पिरीयड मध्ये असं होतं."
होत असेल. पण सुधाला तसा काहीच शारीरिक त्रास होत नव्हता वेगळंच काहीतरी वाटत होतं. जे तीला सांगता येत नव्हतं. आयुष्याची चौकट पूर्ण असूनही आणखी एक भूतकाळातला कोन का जोडावासा वाटतोय! हे तिला उमगत नव्हतं.
"का त्याला भेटायची ओढ आहे? तो काय माझा प्रियकर आहे? नाही. मग जेवतांना अन्नात खडा लागावा तसं घरातील सगळ्यांबरोबर असूनही मला त्याचीच आठवण का येते?"
"मन का हूरहुरतं? आयुष्यातल्या दुस-या टप्प्यात माझी अशी रस्सीखेच का होतेय ?या नवीन पिढीचे किती छान असतं.जे पटेल, जसं पटेल तसंच वागतात. कोणाची फिकीर करत नाही. म्हणणारे त्यांना उथळ, बेजबाबदार म्हणतात.पण ही पिढी आपल्या स्वातंत्र्याबद्दल,आपल्या विचारांबद्दल ठाम असते. कोणाशी बोलायचं कोणाशी नाही हे ते ठरवतात. कोणाला आठवणीच्या पुस्तकात ठेवायचं हे ठरवतात. मी का नाही ठरवायचं?"
"माझ्या किशोरवयीन काळातील एक सुंदर आठवण आहे.
\"तो\" एक मोरपीस आहे \"तो\".
ते गालावरून हळूच फिरवल्यावर अंगभर शिरशिरी येते. ती शिरशिरी आवडते मला. मग...मी त्या मोरपिसाला स्पर्शही करायचा नाही? का? मी एक स्त्री आहे म्हणून. स्त्रीलाच का सगळे नियम असतात?
गणित आणि शास्त्र विषयात नियमाला अपवाद असतात पण स्त्रीच्या आयुष्यातील नियमाला कधीच कुठलाच अपवाद नसतो, सूट नसते. का? स्त्रीने असंच वागायचं, असंच बोलायचं, असंच उभं राहायचं हे कोणी ठरवलं?
ईश्र्वरानी ? नाही. देव स्वत: देवतांना मान देतात ते कसे स्त्रीला कुंपणात बांधतील? ही सगळी करामत मनुष्यानीच केलेली आहे. मी तोडू शकेन हे कुंपण? मी वयाच्या ऊतरत्या वळणावर उभी आहे. सांभाळून चालावं लागणार आहे. पाय घसरू नाही म्हणून माझ्या मनाला शांतता देणार मोरपीस सोडू. त्याचं अस्तीत्व विसरू? शक्य होईल? असं सगळ्यांचं स्त्रीयांच्या बाबतीत घडत असेल का. माझ्यासारखं मोरपीस सगळ्यांजवळ असेल का? असेल तर त्या बोलून दाखवतात की माझ्यासारख्या घुसमटतात. आता फार विचार नाही करणार. विचार करून त्रासच होतो.
आजपर्यंत सगळ्यांचं सगळं केलं. तेव्हा हे मोरपीस कधीही आठवलं नाही. आता सगळ्यांच्या इच्छा, अपेक्षांची झोळी भरलीय. आता माझ्या मनाला थोडं स्थैर्य आलंय. म्हणून या काळातच मला ते मोरपीस आठवलं. का?
आता मी ते मोरपीस घेतलं तर काय हरकत आहे! घेऊ का मग ? पूर्वी त्याचं नाव घेतलं तरी मनात शरीरात एक संगीत ऊमटायचं.तसं आज होईल की ऊतरत्या वयात ते पूर्वीसारखं मंजूळ वाजेल की त्याचा आवाज बद्द झाला असेल!
या विचारतच सुधाचं मन गुंतलं. हल्ली तिचं स्वतःतच रमून जाणं घरातल्या सगळ्यांनाच जाणवत होतं पण त्यामागचं कारण कोणाला कळत नव्हतं. मुलांनी विचारलं तर हसून तिनं विषय टाळला.
नव-याने विचारलं तेव्हाही काही न बोलता ती हसून खोली बाहेर गेली. तिचं तिच्यातच असणं थोडंसं सासूला कळत होतं पण त्याही सूज्ञपणे तिला काही न विचारता तिला निरखत असतं. तासन् तास आराम खुर्चीवर डोळे मिटून ती बसायची. खुर्चीला हळुवार झोका द्यायची. त्या झोक्याबरोबर तिचं मनही उंच-उंच झोके घ्यायचं. त्या झोक्यावर तिच्या बरोबर त्याच्याशिवाय दुसरं कोणी नसायचं. \"ती आणि ते मोरपीस.\" एका वेगळ्या आणि नाजूक सुंदर जगात तिचं मन विहार करू लागायचं.
_____________________________
क्रमशः अनोखं वळण भाग १ला
सुधा पहिल्या सारखं बोलेल.बघू पुढील भागात.
© मीनाक्षी वैद्य
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा