अन्नपूर्णा

Annpurna Annpurna mhanaje parvati Sampurn vishwala ann purvinyache kam annpurna mata karte

अन्नपूर्णा
अन्नपूर्णा म्हणजे पार्वती...
संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे काम
 अन्नपूर्णा माता करते...

आपल्याकडे लग्न झाल्यावर सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात... 
मुलीनी सासरी गेल्यावर सासरच्यांना छान छान पदार्थ बनवून खाऊ घालावे,  त्यांना समाधानी ठेवावे हाच त्यातला हेतू असावा...

लग्न झाल्यावर पहिल्या दिवशी नवीन सुनेला गोडाच बनवायला सांगतात, तिच्या हाताला किती चव आहे हेच बघण्याचा उद्देश असावा...

मी लग्न होऊन जेव्हा सासरी आले, तेव्हा स्वयंपाका व्यतिरिक्त बाकीचे पदार्थ तेवढे जमायचे नाहीत...माझ्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईनी मला हळूहळू सगळे पदार्थ शिकवले...
माझ्याकडे म्हणजे माझ्या माहेरी वेजीटेरीयण असल्यामुळे मी नानवेज कधी बघितलही नव्हतं... पण सासरी आली आणि हळूहळू सगळं शिकले, भाजी धुण्यापासून ते बनवण्यापर्यंत सगळं शिकवलं,आणि त्यानंतर नानवेज खायला नवरोबांनी शिकवलं...
लग्नाला 10 वर्षे झालीत तरी अजूनही कुठला ना कुठला बेत फसतोच... पण माझ्या सासूबाई त्यांचं मात्र मला अप्रूप वाटत, त्यांचा कुठलाच बेत कधीच फसत नाही, एखादा बिघडलेला पदार्थही त्या व्यवस्थित करू शकतात...

 त्या लहान असतानीच त्यांच्या आई मरण पावल्या, मोठे भाऊ आणि वहिनी यांच्याहाताखाली त्या वाढल्या,शिक्षणही जेमतेम....मला आश्चर्य याच वाटत की आई नसतानाही माझ्या सासूबाई अगदी सर्वगुणसंपन्न झाल्या.... त्यांचं व्यवहारचातुर्य, प्रेझेन्स ऑफ माईंड... त्यांचा अनुभव सगळंच खूप भारी आहे... घरातल्या पुरुष मंडळींना जे जमत नाही ते त्यांना आरामात जमत... 
पारंपरिक पदार्थांपासून ते साऊथ इंडियन डिशेस पर्यंत सगळं येत त्यांना... एखादा पदार्थ यु ट्यूब वर बघून जरी केला तरी तो परफेक्ट बनतोच बनतो.... त्यांच्या हाताची चवही भारीच....त्यांनी बनवलेला पदार्थ त्याच पद्धतीने मी बनवला तरी चवीत फरक पडतोच....हाताला चव आहे म्हणतात ते हे.....
सासूबाई नसताना होळीला पुरण आणि डाळीचे वडे दोन्हीचे बेत फसले होते... नवरोबा जाम चिडले तुला काहीच कस जमत नाही... आई कडे असताना फारस काही करण्याचा प्रसंग नाही आला , अभ्यासामुळे किचन मध्ये लक्ष कमीच असायचं,सगळं आईच करायची....
अगदी सणावाराचे पदार्थ, दिवाळीचा फराळ माझ्या सासूबाईच समोर होऊन करायच्या मी त्यांना फक्त मदत करायचे.... वयाची साठी उलटली तरी स्मरणशक्ती तेज आहे म्हणजे एखादा पदार्थ कुणाला बनवतानी बघितला तरी त्या सेम पदार्थ बनवू शकतात...त्यांचं नेहमीच एक वाक्य जे आम्हाला नेहमीच ऐकायला मिळते ते म्हणजे “एकदा बघितलं तरी बनवता येत, नजरेचा खेळ आहे सगळा”आम्हाला तर कुणी शिकवल पण नाही” खरच आहे त्या सगळं बघून बघूनच शिकल्या म्हणून त्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे..... आणि खरच त्याबाबतीत मला ही अभिमान वाटतोच...
तर अश्या  माझ्या सासूबाई त्यांचं कितीही कौतुक करावं ते कमीच.....