गोष्टी वेल्हाळ आजी

This Years Literatures Noble Prize Winner Annie Ernaux


गोष्टी वेल्हाळ आजी अ‍ॅनी अर्नो…

असं म्हणतात स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते, आणि ते खरंही आहे नाही का? स्त्री जन्मच नाकारणाऱ्या समाजाने किती चौकटी, किती साचे बनवले आहेत स्त्रियांसाठी. मुलींनी म्हणजे पुढे होणाऱ्या स्त्रीने मोठ्याने बोलू नये, जोरात हसू नये, अंगभर कपडे घालावे, मोठ्यांचा आदर करावा, घरकाम, स्वयंपाक तर तिला यायलाच हवा इथ पासून ते हिजाब आणि मग अमेरिकेमधील गर्भपातावरची बंदी. किती ठिकाणी स्त्रियांची अडवणूक, किती अडथळे, किती कुंपण स्त्रीला घातली आहेत! जणू स्त्री मानव नसून पुरुषाच्या दावणीला बांधलेली केवळ एक मादी. काही आशियाई देशांमध्ये तर तिला नावही नाही आहे. डॉक्टर कडे जाताना सोबत एखादा पुरुष म्हणजे वडील, भाऊ, मुलगा किंवा पतीसोबत असणं गरजेचं . डॉक्टरच्या चिठ्ठीवरही आमक्याची बहीण, तमक्याची मुलगी, याची बायको किंवा त्याची आई असाच उल्लेख. स्त्री म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती मधील एक गुलाम असल्यासारखी कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती आणि वातावरण तयार केल आहे. हो ना?


यंदाचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे अ‍ॅनी अर्नो या फ्रेंच लेखिकेला. वय वर्षे 82 असलेली अ‍ॅनी आजीची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. स्त्रियांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ओढावलेल्या काही प्रसंगांबद्दल व्यक्त होऊच नये. समाजमान्य चौकटी झुगारून केलेल्या गोष्टींचा उच्चार करू नये असा स्त्रीच्या लैंगिकेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित आणि परंपरागत आहे.

स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा होत असते पण काम जीवनातील कोंडमारा किंवा त्या संदर्भात तिच्यावर ओढवलेले प्रसंग या विषयांवर थोडक्यात स्वतःच्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने  बोलणारी किंवा लिहिणारी स्त्री ही उच्छृंखल आणि चारित्रहीन मानली जाते.

1901 पासून साहित्यासाठी नोबेल पारितोषिक दिले जाते यामध्ये अ‍ॅनी फक्त सतरावी स्त्री लेखक आहे. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास फार कमी लेखिकांना हा पुरस्कार लाभलेला आहे.

एका स्त्रीच्या आयुष्यात जे जे काही दुःखद वेदनादायी ते सर्व या आजीने भोगले आहे. दु:खद लैंगिक अनुभव, बेकायदेशीर गर्भपात, विवाहित पुरुषाशी प्रेम संबंध, लग्नानंतर दोन अपत्य झाल्यावरही आलेलं घटस्फोटीतच जीवन, ब्रेस्ट कॅन्सर असं सर्व काही.

फ्रान्समधील एका लहानशा गावात निम्न मध्यमवर्गीय खरंतर दारिद्र्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या रोमन कॅथलिक कुटुंबात अ‍ॅनीचा जन्म झाला. कॅफे आणि किराणा दुकान एकत्रित चालवणाऱ्या आई-बाबांमधील दाहक संघर्ष तिने अगदी जवळून पाहिला आणि तो तिने स्वतःच्या कादंबऱ्यातून व्यक्त केलेला आहे.


आधी शाळा शिक्षिका आणि नंतर विद्यापीठांमध्ये साहित्याची प्राध्यापिका असा तिचा प्रवास झाला आहे. पहिलं पुस्तक तिने तिशीनंतर लिहिलेल त्यामुळे पुरेशी प्रगल्भता त्या लेखनात होती.


\"क्लींड आऊट\" तिची पहिलीच कादंबरी. कॉलेजमधील एका अंधारलेल्या खोलीत सामाजिक दडपणामुळे मनाविरुद्ध केलेला बेकायदेशीर गर्भपात आणि त्यामुळे विलक्षण गळून गेलेल्या आणि दुःखी झालेल्या अ‍ॅनीचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे.

\"शेम\" या कादंबरीत वयाच्या बाराव्या वर्षीच लेखिका व्हायचे ठामपणे ठरवलेल्या अ‍ॅनीचे चित्रण येते. \"हॅपनिंग\" या कादंबरीत 23 वर्षाच्या नायिकेला आपलं बाळ हवं आहे पण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सामाजिक रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून ती नाईलाजाने गर्भपात करते. या कादंबरीवर चित्रपटही झालेला आहे.


\"द इयर्स\" कादंबरी फ्रान्समधील समाज जीवनाचा सारांश रेखाटते. लेखिका या कादंबरीत आपल्या बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंतचा प्रवास चित्रीत करते. फ्रान्समधील ग्रामीण भागातील एका लहानशा खेड्यातील कामगारांचे कष्टकरी जीवन, तेथून शहरातील कॉलेज लाईफ, विवाह, दोन अपत्यांचा जन्म आणि घटस्फोट इथपर्यंतचा व्यक्तिगत जीवनाचा परिघ रेखाटत असतानाच अत्यंत तटस्थपणे तत्कालीन फ्रान्समधील समाज जीवनाचाही वेध तिने घेतला आहे. व्यक्ती आणि समाज या दोन्हीचा वेध समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला असल्याने ही साहित्यकृती फ्रेंच समूह मनाचे प्रतिनिधित्व करते.


\"गेटिंग लास्ट\" कादंबरीत अ‍ॅनी तरुणपणी पॅरिसमध्ये राहत असताना आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या आणि रशियन अ‍ॅमबेसी मध्ये काम करणाऱ्या एका विवाहित तरुणांमध्ये गुंतलेली होती. ती फरफट तीने इथे व्यक्त केलेली आहे.

\"अ गर्ल्स स्टोरी\" हे पुस्तक अ‍ॅनीला वयाच्या अठराव्या वर्षी वयाने मोठ्या असणाऱ्या एका पुरुषाकडून जो लज्जास्पद लैंगिक अनुभव प्राप्त झाला त्यावर आहे. त्या घृणास्पद प्रसंगातच पुढे लेखिका होण्याची बीज सामावली आहेत असं तिनेच नमूद केलेलं आहे.

फ्रान्समधील तत्कालीन सामाजिक परिस्थिती, पुरुषधार्जिणे कायदे फाट्यावर मारून धाडसाने आपल्या कादंबऱ्यातून व्यक्त झालेली अ‍ॅनी आज वयाच्या तब्बल 82 व्या वर्षी नोबल पारितोषिक आणि एक लाख स्वीडीश क्राउन्स म्हणजे नऊ लाख 14 हजार 740 अमेरिकन डॉलरची मालकीण झालेली आहे.

अ‍ॅनी अर्नोच्या कादंबऱ्या वाचताना वाटतं की, स्वतःच्या हिमतीवरच स्वतःच जगणं, लढणं आणि आलेल्या दुःखालाच मित्र बनवून भरभरून लिहिणं यालाच खरे जीवन म्हणावं.

या लेखिकेच्या जगण्याला मनापासून शतशः नमन. जगभरातील अ‍ॅनी सारख्याच अविरत लढणाऱ्या आणि झगडणाऱ्या करोडो महिलांना अ‍ॅनीच आयुष्य नक्कीच स्फूर्ती आणि प्रेरणा देणारं आहे.

©® राखी भावसार भांडेकर.

13/10/22

***********************************************

संदर्भ - लीना पांढरे यांचा लोकमत नागपुर आवृत्ती मधील लेख.

फोटो साभार गुगल.


🎭 Series Post

View all