अन्नपूर्णा???

How Woman Have To Struggle For Small Things

सुमेधा मंद गॅसवर तूपावर रवा भाजत होती. गेले अनेक दिवस तिची आई करते तसा उपमा तिला खायचा होता. तिला आठवत होते लहानपणी तिचे आणि तिच्या बहिणीचे होणारे भांडण . तिला उपमा हवा असायचा तर बहिणीला सांजा. आई मग एकदा उपमा करायची तर एकदा सांजा..तिने मटार वगैरे काढून ठेवले.. तितक्यात तूपाचा वास घेत तिची लेक पळत पळत आली आणि तिने विचारले ,

"ममा गोड शिरा करते आहेस ना?"

तिच्या पाठोपाठ आलेल्या लेकाने ऑर्डर सोडली, " आई मस्त प्रसादाचा शिरा कर.."

बाहेर जप करत असलेल्या सासूबाईंनी पुस्ती जोडली,

" काजूबदाम अगदी बारीक करून टाक. नाहीतर चावता येत नाही.."

    सुमेधाने निमूटपणे कांद्याच्या ऐवजी केळ्याचे तुकडे करायला घेतले. आणि स्वतःशीच आठवायला लागली कि मागच्या वेळेस आपण आपल्या आवडीचे कधी खाल्ले होते.. आताशा तर ते नेहमीचे झाले होते.. म्हणजे घरी काही भाजी करायची झाली तरी दोन मुले, नवरा, सासूबाई यांच्या आवडीचे करायचे..साधी पालकाची भाजी करायची झाली तरी मुलांना पालक पनीर , नवरा आणि सासूबाईंसाठी ताकातली पातळ भाजी हे सगळे करे करे पर्यंत तिला आवडते तशी भाजी करायचा कंटाळा यायचा..एकदोनदा तिने तशी भाजी करायचा प्रयत्न केला.. पण सगळ्यांनी ठरवून कट केल्यासारखे ती भाजी खाल्लीच नाही.. मग तिनेही चार चार भाज्या करण्याऐवजी ते जे खातील ते करायला सुरुवात केली..

       बरं हॉटेलमध्ये गेले तरी तेच, बाकीचे स्वतःच्या आवडीचेच एवढे मागवायचे कि स्वतःच्या आवडीची एखादी डिशही मागवायची तिची हिंमत व्हायची नाही..कारण अन्न वाया गेलेले तिला आवडायचे नाही.. मग काय आहेच.. याच्या डिशमधले थोडे, थोडे त्याच्या डिशमधले.. कधी तरी हिच्यावर उपकार केल्यासारखे एखादी तिच्या आवडीची डिश मागवायचे पण सगळ्यांचे चेहरे असे असायचे कि तिच्या घशाखाली घास उतरत नसे.. आईकडे जेवायला जावे तर जावई हे खात नाही, नातवंडांना ते आवडते म्हणून त्याचे कौतुक.. त्यांच्यासाठी तिने एवढे काय काय केलेले असे कि माझ्यासाठी हे कर असे सांगायला पण तिला जीवावर येई. त्यामुळे सध्या तरी तिच्या साध्याच इच्छा होत्या , कधीतरी आवडीचे गरमगरम खावे आणि खाताना कोणी उठवू नये.. हो म्हणजे नेहमी काय व्हायचे, सगळ्यांना गरम जेवायला वाढून , मुलांना शाळेत पाठवून हि जेवायला बसली कि त्यांच्या कामवाल्या मावशी यायच्या.. मग उठून त्यांना चहापाणी देईपर्यंत हिचे जेवण थंडगार झालेले असायचे. हिने वेळ पुढेमागे केली कि त्यांचीही झालीच म्हणून समजायचे..

      पण सध्या झाले असे होते कि चाळिशीच्या उंबरठ्यावर आलेल्या सुमेधाला या सगळ्याचा वैताग येत चालला होता.. तिचा स्वतःचा पार्ट टाईम चालणारा व्यवसाय होता.. मुले शाळेत गेली कि आवरून ती सुद्धा जाई.. आणि मुले घरी यायच्या वेळेस परत येई.. सगळ्यांनाच पौष्टिक आणि गरम खायला मिळावे असा तिचा स्वतःशीच अट्टाहास असायचा.. पण घरातल्यांना त्याचे कौतुक वाटत नाही असे तिला दिसत होते..असेच दिवस जात होते.. पण घरातल्यांची वागणूक काही बदलण्याचे चिन्ह दिसत नव्हते.

        एक दिवस सुट्टीच्या दिवशी सुमेधाला कामानिमित्त बाहेर जायला लागले. ती नव्हती म्हणून घरातल्यांची बाहेरची भेळ,शेवपुरी अशी मस्त पार्टी झाली होती.. आणि नेमका तिला बाहेर चहादेखील घ्यायला सवड मिळाली नव्हती. घरापासून जवळच मिटिंग होती मग घरी जाऊनच खाऊया असा तिने विचार केला.. घरी आज इडलीसांबारचा बेत ठरवला होता. चटणी, सांबार, इडलीचे पीठ सगळे तयार होते. फक्त जाऊन इडल्या केले कि झाले काम. ती घरी आली.. आल्यावर नेहमीप्रमाणे तिने विचारले, " चला पटकन इडली खाऊन घेणार का?"

" आता अजिबात नाही.. आमचे पोट तुडुंब भरले आहे.. आम्ही मस्त भेळ आणि शेवपुरी खाल्ली आहे.." मुले एकसुरात म्हणाली..

" तू यांना देशील , तेव्हाच मलाही दे." सासूबाई..

" तुला भूक लागली असेल तर तू खाऊन घे. आमचे नंतर बघू. आमचे सगळ्यांचे खाणे झाले आहे." नवरा..

पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुमेधाने मस्त इडल्या लावल्या.. सांबार गरम केले.. तोंडात घास घालणार तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला,

"दे बाई इडल्या. खाऊन मोकळी होते."

सुमेधाच्या डोळ्यात पाणी आले. खरेतर सगळ्यांना विचारूनच ती खायला बसली होती. आज तिने ठरवले होते कि काही झाले तरी खाणे झाल्याशिवाय उठायचे नाही. ती उठत नाही हे बघून नवरा म्हणाला, 

" अग आई काही तरी बोलते आहे."

" मला ना आता खूप भूक लागली आहे. जसे तू मगाशी म्हणालास तसे मी खाते आणि मग देते."

" अग , पण तू देऊन बस ना.."

आता मात्र सुमेधाचा संयम संपला..

" कधी तरी माणुसकी दाखवा ना.. नेहमी तुम्हाला आधी जेवायला वाढून नंतर मी बसते. आज तुमचे पोट भरले आहे, मी उपाशी आहे म्हणून एक दिवस आधी खायला बसले तर एवढा गोंधळ? आपल्या घरी कामाला आलेल्या मावशींनासुद्धा मी खाताना उठू देत नाही आणि तुम्ही गृहलक्ष्मी,अन्नपूर्णा म्हणताना मला? मग एक दिवस सुखाचे दोन घास खाऊ देऊ शकत नाही. असे कसे रे तुम्ही..?"


" सॉरी ममा, यापुढे आम्ही नक्कीच हे लक्षात ठेवू.." मुले तिला येऊन चिकटली..

" प्रश्न सॉरीचा नाहीये.. इथे माणूस म्हणून जगण्याचा आहे. प्रत्येकजण खाण्यासाठी काम करते आणि जर एखाद्या व्यक्तीस तुम्ही खाताना जर छळले तर नाही म्हटले तरी त्याला राग येणारच ना..."

नवर्‍याने नजरेनेच ' सॉरी पण आता जाऊ दे' असे खुणावले..

" पुढच्या वेळेस मला देऊनच तू बसत जा.. मला बाई हाताने घ्यायला आवडत नाही." सासूबाईंनी त्यांच्याकडून विषय संपवला....





खरेतर आपल्या आजूबाजूला आपण अनेक स्त्रियांना काम करताना बघतो. रोज नाही पण कधीतरी तरी त्या घरच्या स्त्रिला तिच्या आवडीचे शांतपणे खाऊ द्या.. बघा तिच्या चेहर्‍यावर कसा आनंद दिसतो ते..



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई