Mar 02, 2024
प्रेरणादायक

अंकूर- नव्या नात्यांचा...

Read Later
अंकूर- नव्या नात्यांचा...
 

       "गौरी काय करतेस गं?? जरा बाहेर ये." सासूबाईंचा आवाज ऐकून पळतच स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात आली."काय झालं आई? मी जरा कामात होते." गौरी बोलली. "जरा मागे वळून बघ,तुझी लेक काय उद्योग करतेय. किती पसारा करून ठेवलाय." सासूबाई रागातच बोलल्या.
      गौरीने जरा मागे वळून पाहिले तर तिची इवलीशी लेक सान्वी तिच्या बाललीलांमध्ये मग्न होती. त्या पाच वर्षांच्या लेकराची बाललीला बघून तिचे मन भरुन आले. वाटले तिचे पटापट मुके घ्यावे. तिचे खूप लाड करावे असे वाटत होते पण मागे सासूबाई होत्या म्हणून तिने तिच्या भावनांना आवर घातला आणि तिला बाजूला सारून सगळा पसारा आवरला आणि ऑफिसला जायची तयारी करू लागली. तेवढ्यात पुन्हा सासरे बोलवतात म्हणून पुन्हा तिला बाहेर यावे लागले,पण सगळ्यांची मर्जी सांभाळणारी गौरी आजकाल मनात एक अनामिक भिती बाळगून होती . घरात सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते. तिचे सासरे सरजेराव देशमुख शहरातील खूप मोठे गृहस्थ होते. तिच्या घरात सासू सासरे, दिर जाऊ सगळे चांगले होते, आधुनिक विचारांचे होते परंतु गेल्या पाच वर्षांत झालेल्या काही घटना ज्या सगळ्यांना हेलावून टाकणाऱ्या होत्या.

सर्जेराव : गौरी तुला ऑफिसला जायला उशीर होत नाही ना? जरा बोलायचे होते. शौनकविषयी!

गौरी : बोला ना आप्पा. काय झालं? आपण आपल्या परीने सगळे करतोय ना? हवं तर मी overtime करेन. त्यापेक्षा मी कर्ज काढू का?
(गौरी शौनकविषयी ऐकून खूप सैरभैर झाली. )

सर्जेराव : मी समजू शकतो गौरी तुझ्या मनात का आहे ते पण तो माझा पण मुलगा आहे. काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. आता पाच वर्षे झाली. अपेक्षा ठेवू नको . तुझा नाही पण सान्वीचा तरी विचार कर. आई आहेस तिची तू.

गौरी : नाही आप्पा मला हे मान्य नाही. मी सानूला शाळेत सोडून ऑफिसला जाते. चिण्मय तिला घरी घेऊन येईल.

       सर्जेरावांना गौरीचं हे रूप काही नवीन नव्हते; पण त्यांना तिची खूप चिंता होती. तडक उठून ते त्यांच्या खोलीत गेले. अचानक त्यांच्यासमोर नऊ वर्षे साठवलेला भुतकाळ दत्त म्हणून उभा राहिला. सर्जेरावांना तीन मुले. मोठा पराग नंतर सारिका आणि धाकटा मुलगा शौनक होता. शौनक जरा हट्टी असला तरी त्याच्यात एक वेगळीच झिंग होती. काहीतरी वेगळे करून दाखवायची. मोठा मुलगा पराग जरी घराण्याचा कपड्यांचा व्यापार पुढे चालवत होता तसा शौनकला त्यात काही रस नव्हता. मोठ्या बहिणीप्रमाणे तो एक कम्प्युटर इंजिनिअर झाला. हळूहळू दुसर्‍या कंपनीत काम करत असताना त्याने स्वतःच्या पायावर उभे राहून नवी आय.टी. फर्म काढली.आणि तिचे नाव "शालिनी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड " ह्या आईच्या नावाने काढली. तेव्हा सर्जेरावांना आनंद गगनात मावेनासा झाला. नंतर त्याने प्रेमविवाह केला. तरी त्याची बायको गौरी खरंच नावाप्रमाणे गौरीच होती. लोभस स्वभावाने तिने सगळ्यांना कमी वेळेत आपलेसे केले. तिच्या सकारात्मक विचारांनी तर घरात एक वेगळेच चैतन्य आलेलं. खुद्द सर्जेरावांना असलेली तपकीर ओढण्याची सवय तिने त्यांच्याही नकळत मोडली हे त्यांना कळलेच नाही. लग्नानंतर तीन वर्षे त्यांना मूल नव्हते तरी तिने जावेच्या मुलाला (चिण्मय) आईप्रमाणे प्रेम दिले. एक दिवस गौरीने गोड बातमी दिली तेव्हा सारे घर आनंदून गेले. सासूबाई आणि तिची जाऊ पूनम तिला स्वतःला लहान बाळाप्रमाणे जपत होते. तिचे दिवस भरत आले तेव्हा सगळ्यांनी हौसेने तिचे ओटीभरण केले . तेव्हा शौनकचा आनंद डोळ्यात दिसत होता. नंतर काही दिवसांनी गौरी गोंडस मुलीला जन्म देते. तेव्हा शौनकचा आनंद डोळ्यातल्या अश्रूंमधून दिसत होता. नंतर बाळाच्या बारश्याला तर शौनकने सगळ्यांशी भांडून स्वतःच्या आवडीचे नाव ठेवले. सान्वी! खरंच नावाप्रमाणे ती खूप सुंदर होती. तेवढ्यात एक फोन आला आणि तडक त्याला निघावे लागले. समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिल्याने त्याच्या गाडीला बसला आणि तो कोमात गेला. पण त्या आधी त्याचे वाक्य मला एकदा सान्वीला भेटू द्या मगंच मी श्वास सोडेन हे सारखं डोक्यात रूंजी घालत होते. वरून डाॅ. पाटकरांचा सल्ला कि त्याला कायमचा निरोप देण्याची वेळ आली. आशा सोडा. आता आपल्या हाती काही नाही. तुम्ही त्याला लवकरात लवकर घरी घेऊन जा. शालिनीबाईंना सान्वी ही एकमेव कारण वाटत होती शौनकच्या आजारपणाचं. इतके विचार करून त्यांचा डोळा लागला त्यांना कळले नाही. काही वेळाने एक आवाजाने ते जागे झाले.

सान्वी : आजोबा हे बघा मी चित्र काढलं!! कसं आहे?
सर्जेराव: अरे वा! माझं बाळ किती छान आहे ! आणि हे चित्र पण! बोल काय बक्षिस देऊ?

सान्वी : प्राॅमिस!

सर्जेराव :कसलं ? ते तरी सांग ना. मग ठरवू.

सान्वी : मला बर्थडे गिफ्ट म्हणून बाबाला भेटायचंय. मला माहितीये तो माझ्याशी बोलू शकत नाही पण मी बोलेन ना. त्याचा पण आहे ना त्याच दिवशी बर्थडे. प्लिज! !

तेवढ्यात सर्जेरावांच्या पत्नी शालिनीबाई आल्या अन् अक्षरशः सान्वीवर खेकसल्या," काही गरज नाही. तुझ्यामुळे माझ्या लेकाची अवस्था झाली. त्याच्या जागी तू गेलीस तरी चाललं असतं. .." अन् पुन्हा काही बोलणार इतक्यात सर्जेरावांनी त्यांना अडवले. सान्वी रडतच खोलीबाहेर निघून गेली .

सर्जेराव : हे बघा परागची आई .मला मान्य आहे तो तुमचा लेक आहे पण ही तुमची नातच आहे. असे का वागता तुम्ही तिच्याशी. बाकीचे नातवंडांवर तर जीव ओवाळून टाकता.

शालिनीबाई : तुम्हाला आठवतंय ना! मुलगी झाल्यानंतर किती आनंदाने कामाला जायला निघाला आणि असं झालंय. मुळात तिची सावली त्याच्यावर पडायला नको. मी बोललेली गौरीला तुला यायचं तर ये पण त्या पोरीला आणू नकोस . ती ऐकेल तर खरं ना!

सर्जेराव: बस झालं तुमचं. येतो मी.

सायंकाळी गौरी ऑफिसमधून घरी आल्यावर सान्वी तिच्या अंगावर झेप घेते आणि तिच्या चित्राविषयी सांगितले. तेवढ्यात चिन्मय आला.

चिन्मय : अगं काकू सानू पहिली आली चित्रकला स्पर्धेत. सगळे शिक्षक बोलत होते तुझी बहिण तुझ्यापेक्षा हुशार आहे.

गौरी : हो पण आजी आजोबांना दाखवलंस का चित्र?

सान्वी : हो आई. आजोबांना खूप आवडलं. काकूने चाॅकलेट पण दिलं पण आई आजी अशी का आहे गं? मला नुसती ओरडत असते. ती खूप वाईट आहे.

गौरी : सान्वी आजीबद्दल असं नाही बोलायचं. तुला माहिती आहे का आपल्याला जास्त कोण रागवतं?
सान्वी : कोण?

गौरी : जे आपल्यावर जास्त प्रेम करतात ते. ते हक्काने आपल्याला ओरडतात.

सान्वी : म्हणजे आजी माझ्यावर चिन्मय दादाइतकं प्रेम करते.

गौरी : हो.

   शालिनीबाई हे सगळे ऐकत होत्या. सान्वी खेळायला निघून गेली अन् लगोलग त्या गौरीजवळ आल्या आणि बोलल्या,    " का तिच्या मनात माझ्याविषयी प्रेम भाव तयार करतेस ?"  

   " मी तिला तुमचं तिच्यावरचं प्रेम दाखवतेय. बाहेरच्या लोकांचं ऐकून स्वतःच्या नातीला तुम्ही स्वतःपासून दूर करताय. काळजी करू नका मी तिला शौनकला भेटू देणार नाही." अन् गौरी निघून गेली.

असेच दिवस जात होते. आजी किती ओरडली तरी ती पहिल्यासारखी रडत किंवा धुसफुसत नव्हती. " जे आपल्यावर जास्त प्रेम करतात ते हक्काने आपल्याला ओरडतात" हे वाक्य तिने पक्कं मनात ठेवून होती. आजीला काय हवं काय नको ते एका शहाण्या बाळासारखं बघायची. पाच वर्षांच्या पोरीला एवढं कसं शहाणपण याचं सगळ्यांना अप्रूप वाटत होते. आता शालिनीबाईंना नाही म्हटले तरी सान्वीची काळजी होती. अबोल असूनही त्या सान्वीला जपत होत्या. शौनक काही केल्या बरा होत नव्हता. सगळ्यांच्या सहमतीने त्याला घरी आणले होते. गौरी तर त्याची सेवासुश्रुषा करण्यात गुंग झालेली. डाॅ. पाटकर वेळोवेळी येऊन शौनकचे चेकअप करून जात असत. पण काही केल्या  त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती म्हणून सर्जेरावांनी  तर मुलाच्या बरं होण्याची अपेक्षा सोडलेली.
  
     सान्वीचा वाढदिवस नेमका गुढीपाडव्याच्यादिवशी आलेला म्हणून चिन्मय तिचा वाढदिवस साजरा झालाच पाहिजे असा हट्ट करत होता परंतु सान्वी लगेच बोलली " नको दादा आता नको बाबा बरा झाल्यावर मी बर्थडे करेल." हे ऐकून शालिनीबाईंचे  पण डोळे भरून  आले पण सगळ्यांसमोर शांत राहिल्या. मनोमन त्यांना त्या इवल्याशा चिमुरडीचे कौतुक वाटले.

     गुढीपाडव्याचा दिवस आला. आज पहिल्यांदा शालिनीबाईंनी सान्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेपण सगळ्यांच्या आधीच. म्हणून स्वारी जाम खुश होती. वरून आजीने स्वतः तिच्या आवडीची कोथिंबीर वडी बनवली होती तर तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला. सर्जेराव, पराग ह्या एका प्रकारच्या आनंदी क्षणाचे स्पंदन मनात साठवत होते. पण एवढे दिवस झाले तरी सान्वीला शौनकच्या खोलीत जायला परवानगी नव्हती. ती आज बाबाशी बोलायचंच म्हणून हट्ट करून बसलेली. पराग बाबा आणि मोठी आई म्हणजे पूनम काकू तर तिच्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नसत. ती त्यांच्याकडे जाते.

पराग : अरे माझी चिमणी आली. ये!ये!ये! पूनम तुला माहितीये का आज कोणाचातरी बर्थडे आहे. बोल काय गिफ्ट हवं सानू तुला. तू जे मागशील ते देईल आज मोठा बाबा.

पूनम: आई ओरडली कि आजी गं ? एवढी शांत का?
सान्वी : आज बाबाचा पण बर्थडे आहे. दादाने दिलेलं chocolates मला त्याला खायला द्यायचंय. आजी माझ्यासाठी कोथिंबीर वडी बनवत होती तेंव्हा मी ऐकलं बाबाने जवळ जवळ सहा वर्षं काही नाही खाल्ल. मला त्याला भेटायचं आणि त्याच्याशी बोलायचं आहे जसं मोठे बाबा दादाशी बोलतात. प्लिज पूनम आई तू आईला सांग ना परवा मी फक्त बाबाच्या खोलीबाहेर उभी होती तरी आई किती चिडली माझ्यावर.

पुढे काय बोलावे दोघांनाही कळेना. पण तिचं मन रमवावं म्हणून तिच्याशी दुसर्‍या विषयावर बोलू लागले पण त्यांच्या मनात तेच विचार होते.

डाॅ. पाटकर नेहमीप्रमाणे सकाळी शौनकला तपासायला आले होते आणि जाताना आई , आजी, पूनम आई आणि  आजोबा  तिथेच आहेत म्हणून ती दाराच्या अडून त्यांचं बोलणं ऐकत होती.

डाॅ. पाटकर: हे बघा! शौनकच्या हार्ट पल्सेस खूप लो होत आहेत. आता कोणाच्या हातात काही नाही.

हे सगळे ऐकून आई आणि आजी खूप रडत होत्या, हे बघून तिला पाटकर काकांचा राग आला होता. ती तडक तिथून निघून गेली. चिन्मय दादाने दिलेला नवीन बाॅल घेऊन ती खेळत असताना देवघरात आजी रडत होती हे तिने ऐकले. बाबासाठी आजी रडते याची तिला दाट शक्यता वाटत होती. ऐन सणाच्या आणि तिच्या बर्थडेच्या दिवशी आई आणि आजी रडतात हे बघून तिला प्रचंड त्रास होत होता.
    तडक सगळ्यांची नजर चुकवून ती शौनकच्या खोलीत जाते. आपल्याला हातात घेऊन फोटो काढणारा  आणि आत्ता असा झोपलेल्या बाबाला बघून तिला रडू कोसळले. शौनकच्या पोटावर डोकं ठेवून ती रडतच बोलली," काय रे बाबा तू असा आजारी का पडलाय. आज माहितीये का तुझा आणि माझा बर्थडे आहे. सगळ्यांनी मला गिफ्ट दिलं. तू तर कधीच माझ्याशी बोललास का आठव जरा? आजी आणि आई किती रडतात काय कळतं का तुला? तू सांग ना बाप्पाला मला बरं कर. मला माझा बाबा हवाय. माझ्या सगळ्या बेस्ट फ्रेंड्स त्यांच्या बाबांसोबत फिरायला जातात आणि त्यांचे बाबा त्यांना शाळेत सोडायला येतात. मला तर दादाच घेऊन जातो. एकदा उठून बोल माझ्याशी. Please. " थोडावेळ बाबाच्या कुशीत रडून जेव्हा ती   खोलीबाहेर जायला निघते तेवढ्यात शौनक तिचा हात पकडतो आणि अडखळत  विचारतो " कोण आहेस तू?" सान्वी घाबरून रडू लागली आणि आई, आजी,  चिनू दादा  ओरडू लागली तसे सगळे खोलीत जाऊन बघतात तर शौनकला शुद्ध आलेली.
गौरी त्राग्यातच सान्वीला ओढून खोलीबाहेर येते अन् तिच्यावर हात उचलणार तेवढ्यात शालिनीताई गौरीला अडवतात.

शालिनीताई : गौरी थांब हिची काही चूक नाही. हिच्यामुळे माझा शौनक पूर्णपणे बरा झाला. तू जाऊन बघ शौनक ठिक आहे.

त्या सान्वीला कडेवर घेऊन शौनककडे जातात. शौनकला सान्वीशी म्हणजे त्याच्या लेकीची ओळख करून देतात. सान्वीचा वाढदिवस आज खर्‍या अर्थाने साजरा झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी खरंच एक नवीन अंकूर फुटलेला. पुन्हा एकदा नव्याने उलगडलेल्या आजी आणि तिच्या नातीचा. एका बापाचा आणि लेकीचा. आणि सगळ्यात महत्वाचे गौरीच्या विश्वासाचा. सगळीकडे नकारात्मक विचार होते तरी सकारात्मक विचार करून आयुष्याला नवी आनंदाची कलाटणी देण्याचा!!

~ ऋचा निलिमा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//