#अनोखे रक्षाबंधन

नवा भाऊ मिळाला...


देशसेवेत स्वतःला झोकून दिलेल्या आपल्या लाडक्या भावाची आठवण आली की त्याच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल करून सुमन हमखास बोलत होती. पण रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणाला मात्र तिचे डोळे भरून यायचे. 


मनातून ती खूप उदास असायची. एकुलत्या एक आपल्या भावाला या सणांना सुमन खूप मिस करायची. नुकतेच लग्नाला वर्ष झाले होते. सुमन लग्न करून सासरी आल्यानंतरचा  सासरी असणारा हा तिचा पहिलाच रक्षाबंधनचा सण होता. तिचे दीर, दोन्ही नंदा रक्षाबंधनसाठी माहेरी आल्या होत्या. म्हणूनच की, काय ? तिला तिच्या भावाची खूपच आठवण येत होती. कारण तिच्या दोन्ही नंदा रक्षाबंधनसाठी दोन दिवस आधीच माहेरी आल्या होत्या. बहीण भावांना छान गप्पा मारताना पाहिलं की सुमनला मनातून राकेशची आठवण यायची. 


"काय ग वहिनी ? तुझा भाऊ येणार आहे ना रक्षाबंधनला?" रिया म्हणाली.


"नाही ताई, त्याला रजा नसते. सणावाराला नाही येता येत त्याला सहसा." सुमन म्हणाली.


"हो मिल्ट्रीतले रुल फॉलो करावे लागतात."रिया म्हणाली.


"हो ना. मी आलेच." म्हणून सुमन नाराज होऊन किचनमध्ये गेली. 


"रिया तुला काय होत गरज होती का विचारायची तिला तिच्या भावाबद्दल ? आधीच ती थोडीशी नाराज वाटतेय. परवाही मला सांगत होती जेव्हापासून राकेश मिल्ट्रीत गेलाय तेव्हापासून एकही रक्षाबंधन त्या दोघांनी एकत्र साजरी केली नाही." रोहन आपल्या लाडक्या बहिणीला रियाला म्हणाला.


"सॉरी रे दादा ! मी आत्ताच वहिनीचा मुड ठीक करते बघ." म्हणून रिया किचनमध्ये गेली. घरातलं लाडकं शेंडेफळ असल्यामुळे रियाचा खूप लाड होत होता. रिया वहिनीजवळ जाऊन गोड गोड गप्पा मारत होती. दोन्ही नंदांनी वहिनीला कामातही मदत केली पण वहिनीच्या चेहऱ्यावरील ते गोड हासू हरवलेय हे घरातल्या सगळ्यांना जाणवत होते. दुसऱ्या दिवशी सुमनने रक्षाबंधनसाठी सगळी तयारी करून ठेवली होती. नंदांना छान साड्याही आणल्या होत्या. रक्षाबंधनच ताट तर तिने अप्रतिम सजवले होते. सुमनच्या नंदा आपल्या लाडक्या भावांना राखी बांधत होत्या.  राखी बांधून झाल्यावर रिया आत गेली आणि लॅपटॉप घेऊन बाहेर आली. रिया म्हणाली, "वहिनी हे बघ कोण आहे ऑनलाइन आत्ता?"


"हाय ताई! कशी आहेस?" राकेश गोड हसून म्हणाला. सुमनच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. 


"चल चल पटकन, ओवाळ मला. मला काल रियाने फोन करून सांगितले म्हणून थोडासा वेळ तुझ्यासाठी काढलाय.मला खूप काम आहे." राकेश पुन्हा म्हणाला. रियाने सुमनच्या हातात ताट देऊन राकेशला ओवाळायला सांगितले. सुमननेही आपल्या लाडक्या भावाला लॅपटॉपवरच ऑनलाइन ओवाळले. अशी राखी पौर्णिमा साजरी झाली. राकेश काम असल्यामुळे ऑफलाईन गेला.   ऑनलाईन ओवाळले तरी राखी कशी बांधणार ? सुमन राखीकडे पाहत होती. लगेचच तिच्या लाडक्या छोट्या दिराने हात पुढे केला आणि म्हणाला, " वहिनी आजपासून मी तुझा लहान भाऊ असेन. चालेल ना तुला." 


सुमन गोड हसली.


"बांध मग मला राखी." हात पुढे करून रोहित म्हणाला. सुमनने आपल्या लाडक्या दिराला राखी बांधली. घरातील सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. प्रसंगावधान दाखवत आपल्या वहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्यामुळे रोहनने तर रोहितला मिठीच मारली. अशाप्रकारे रक्षाबंधनचा सण साजरा झाला.


सौ.प्राजक्ता पाटील 

# गोष्ट छोटी डोंगराएवढी 

#रक्षाबंधन-अतूट बंध