आणि तो आई म्हणाला भाग २

Most Awaited Moment Of Her Life

आणि तो आई म्हणाला भाग २


"चेहऱ्यावरुन तू टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटत आहेच. आता हा एवढा मोठा प्रवास सोबत करायचा म्हटल्यावर मला काही गप्प बसवलं जाणार नाही. मुलं कितीही मोठी झाली, तरी आईला त्यांची काळजी असतेच ना. माझं नाव सुलभा दळवी. मागच्या कोरोनात माझे मिस्टर आणि माझा एकुलता एक मुलगा हे जग सोडून गेले. पैसा, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण आपली म्हणावी अशी माणसं नाहीयेत. माझी बालमैत्रिण लंडनला सेटल झालेली आहे. तिचं मला म्हणाली, "एकटीच तिकडे बोअर होण्यापेक्षा इकडे ये. मी तुला लंडन फिरवते. जमलं तर आजूबाजूचे देश पण फिरुयात."

इतकी वर्षे नवरा आणि मुलगा यातून वेळचं मिळत नव्हता. सून आणि एक नातू आहे, पण ते त्यांच्या जगात व्यस्त आहेत. सूनेनेच पासपोर्ट आणि व्हिसा काढून द्यायला मदत केली." सुलभा काकूंनी सांगितले.


श्वेता म्हणाली,

"काका गेल्याच्या दुःखात तुम्ही रडत न बसता आयुष्याची मजा घेत आहात, हे छान केलंत."


"बरं मला सांग. तू तुझ्या मुलाला एवढ्या लांब का शाळेत टाकलेस?" सुलभाने विचारले.


श्वेता म्हणाली,

"काकू कोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून इतक्या दूर पाठवण्याची इच्छा होते. आमच्यापुढे काही पर्यायचं उरला नव्हता. मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून सांगते, म्हणजे तेवढंच माझं मन तरी हलकं होईल.


मी व मंदार आम्ही दोघे एका कंपनीत नोकरी करत होतो. मंदार माझा सिनिअर होता. एकत्र काम करता करता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमची जात वेगळी असल्याने आमच्या दोघांच्याही घरुन लग्नाला संमती मिळाली नाही. आम्ही दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. माझ्या व मंदारच्या आई वडिलांनी आमच्यासोबत नातेसंबंध तोडून टाकले.


आम्ही दोघे लग्नानंतर आनंदी होतो. घरच्यांची आठवण यायची, पण आम्ही काही करुही शकत नव्हतो. दोन वर्षांनंतर मला प्रेग्नन्सी राहिली, तेव्हा आईची खूप आठवण आली, तिला बऱ्याचदा फोनही केले, पण आई एकदाही माझ्यासोबत बोलली नाही. मला ना त्यावेळी आईचं एक वाक्य आठवलं. मी जेव्हा मंदारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती म्हणाली होती की, "तू आई झाल्यावर मी तुझ्यासाठी किती यातना सहन केल्या आहेत, हे तुला समजेल, त्यावेळी तुला माझी किंमत समजेल."

आई खरं बोलली होती. मुल वाढवण्यासाठी नऊ महिने किती त्रास घ्यावा लागतो, हे फक्त एक आईचं समजू शकते. आदीतचा जन्म झाल्यावर आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो. आमच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती आली होती. 


आमच्या दोघांचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. आदीतला सांभाळण्यासाठी मी स्वतःहून नोकरी सोडून काही दिवस घरी राहण्याचा निर्णय घेतला. आदीत सव्वा महिन्यांचा होईपर्यंत शांत होता, पण त्यानंतर आदीतचे रडणे वाढले होते. आदीत रात्ररात्र स्वतःही झोपत नव्हता आणि मलाही झोपू देत नव्हता. 


लहान मुल म्हटल्यावर थोडाफार त्रास देईलचं, असा विचार करुन मी एकेक दिवस पुढे ढकलत होते. दर महिन्याला आम्ही आदीतचा बर्थडे साजरा करायचो. आदीतचे फोटो काढण्यासाठी मंदारने डिजीटल कॅमेरा विकत घेतला होता. आम्ही आदीतसाठी कुठल्याच वस्तूची कमी ठेवली नव्हती. आदीतच्या रडण्यावर आजूबाजूच्या बायका सांगतील तो उपाय मी करत होते. 


आदीतच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी एकदम नॉर्मल होत्या. आदीत वेळेवर रांगायला, बसायला, उभं रहायला, चालायला लागला. आदीतला दात पण वेळेवरच आले होते. आदीत फक्त काहीच बोलत नव्हता. आदीतचा पहिला बर्थडे आम्ही हॉटेलमध्ये ग्रँड पद्धतीने साजरा केला होता. सर्व मित्र मंडळींना बर्थडेसाठी आमंत्रित केले होते. आम्ही आमच्या घरच्यांना बोलावले होते, पण ते आलेच नाही.


काकू आमचा आदीत दिसायला खूप गोड आहे. कोणाचीही त्याला पटकन नजर लागेल असा. आदीत जवळपास दीड वर्षांचा होत आला होता, तरी तो काहीच बोलत नव्हता. त्याला जी वस्तू लागायची, ती तो खुणेने दाखवायचा. बऱ्याचदा असं व्हायचं की, त्याचं म्हणणंच आम्हाला कळायचं नाही, मग तो चिडचिड, रडारड करायचा. रात्री दोन वाजेपर्यंत तो झोपायचा नाही. 


शेवटी कंटाळून आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही थेरपी चालू करायला सांगितल्या. आदीत बोलेल, इतर मुलांसारखा नॉर्मल वागेल या आशेने डॉक्टर जे म्हणतील ते उपचार आम्ही करायला सुरुवात केली. माझ्या नोकरीला मला रामराम करावा लागला. मी एकटी त्याला थेरपीला घेऊन जायचे, कारण मंदारला सुट्टी घेणे पॉसिबल व्हायचे नाही. मंदारने नोकरी केली नाहीतर आदितच्या उपचारांसाठी लागणारा खर्च कुठून येणार होता?


दरम्यानच्या काळात मी स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष दिले नाही. आदीतकडे बघून वाईट वाटायचं. आदीत कधी मला 'आई' म्हणून हाक मारेल याची वाट मी बघत होते. काकू मला कोणी समजून सांगायला पण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. माझी आई, बहीण यापैकी कोणीच माझ्यासोबत बोलत नव्हते. आपणचं आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आणि पुढे जायचं,हे चालू होतं.


बोलता बोलता आदीत तीन वर्षांचा झाला. थेरपीमुळे आदीतमध्ये थोडेफार बदल झाले होते, पण तो काहीचं बोलत नव्हता. मी भरपूर उपवास केले. ज्या ब्राम्हणाचा पत्ता मिळेल, त्यांच्याकडे जाऊन ते सांगतील तो उपाय करत होते. मी माझ्या आदीतसाठी काहीही करायला तयार होते. आपण जे काही करतोय त्याने काहीच बदल होत नसल्याने मी दिवसेंदिवस हतबल होत चालले होते."


आदीतला लंडन मधील शाळेत का टाकलं असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all