आणि तो आई म्हणाला भाग १

Most Awaited Moment Of Her Life

आणि तो आई म्हणाला भाग १


"श्वेता खूप डोकं दुखतंय ग. एक कप चहा मिळेल का?" दरवाजातून घरात पाऊल टाकत असतानाच मंदारने विचारले.


श्वेता मंदारकडे बघून म्हणाली,

"तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते."


मंदार रुममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला, तर श्वेता चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. मंदार फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. तेवढ्यात श्वेताचा मोबाईल वाजला.


"मंदार कोणाचा फोन आहे? बघ रे."


इंटरनॅशनल नंबर दिसल्याने मंदारने लगेच फोन उचलला. पुढील पाच ते दहा मिनिटे मंदार समोरच्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होता. तोपर्यंत श्वेता चहाचे दोन कप घेऊन किचनमधून हॉलमध्ये आली होती. मंदारचं फोनवर बोलून झाल्यावर श्वेता म्हणाली,


"मंदार कोणाचा फोन होता? तू कोणासोबत इंग्लिश मधून बोलत होतास?"


"श्वेता तुला पुढच्या फ्लाईटने लंडनला जावे लागणार आहे. मी आपल्या ट्रॅव्हल एजंटला तिकीट बुक करायला सांगतो, मग तुला सविस्तर सांगतो." मंदारने ट्रॅव्हल एजंटला फोन लावता लावता सांगितले.


लंडनचे नाव ऐकल्यावर श्वेताच्या मनात आदीतचे विचार चालू झाले. आदीतला काही झाले तर नसेल ना. असं अचानक घाईघाईने लंडनला का जावे लागणार आहे? 


मंदारचं फोनवरील बोलणं झाल्यावर तो म्हणाला,

"थँक गॉड. उद्या दुपारच्या फ्लाईटचं तिकीट मिळालंय."


"अरे पण मंदार आपण दोघे पंधरा दिवसांनी लंडनला जाणार होतो ना. आपण त्यासाठीच व्हिसा काढून ठेवला होता. मग मी उद्याचं का जायचं आहे? आणि तेही एकटीने." श्वेताने विचारले.


मंदार म्हणाला,

"श्वेता मला उद्या लगेच सुट्टी मिळणार नाही. कंपनीत ऑडिट सुरु आहे. आदीतच्या शाळेतून प्रिन्सिपल मॅडमचा फोन होता, त्यांनी आपल्यापैकी कोणालातरी ताबडतोब बोलावलं आहे. नेमकं काय झालंय? याची त्यांनी कल्पना दिली नाहीये."


"आपला आदीत ठीक असेल ना?" श्वेताने विचारले.


"माहीत नाही ग. मलाही तेच टेन्शन येतंय. आपण पॉजिटीव्ह विचार करुयात. आदीतला काहीही झालेलं नसेल." मंदार म्हणाला.


"आदीत झाल्यापासून पॉजिटीव्ह विचारच करत आहे, पण पॉजिटीव्ह असं काही घडलंच नाहीये." श्वेता हतबल होऊन म्हणाली.

श्वेताच्या डोळ्यातील पाणी बघून मंदार म्हणाला,

"श्वेता आता बसून चालणार नाही. चल पटकन पॅकिंगला सुरुवात करुयात. बाहेरुन काय काय आणायचं? याची यादी करुन दे. मी पटकन सर्व सामान आणून देतो."


दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता दिल्लीहून लंडनला जाण्यासाठी फ्लाईट होती. श्वेता पहाटे मुंबई वरुन दिल्लीला फ्लाईटने गेली, मग तेथून ती लंडनच्या फ्लाईट मध्ये बसली. दिल्ली ते लंडन हा साधारणतः साडेनऊ ते दहा तासांचा प्रवास होता. श्वेताला आदीतची काळजी वाटत होती. श्वेताच्या चेहऱ्यावर काळजी दिसून आल्याने तिच्या शेजारी बसलेल्या काकू तिला म्हणाल्या,


"तुम्ही काही टेन्शनमध्ये आहात का?"


श्वेता त्यांच्याकडे बघून म्हणाली,

"काकू मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. तुम्ही मला अहो जाहो करु नका. माझा मुलगा आदीत नऊ वर्षांचा आहे, तो लंडनला शाळेत असतो. काल त्याच्या प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला होता, त्यांनी ताबडतोब मला तिकडे बोलावलं आहे, म्हणून मी त्याच्याच टेन्शनमध्ये आहे."


आदीतच्या प्रिन्सिपल मॅडमने एवढ्या अर्जंट श्वेताला का बोलावून घेतलं असेल? बघूया पुढील भागात…


©® Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all