आणि तो आई म्हणाला....

Most Awaited Moment Comes In Her Life.

कथेचे शिर्षक: आणि तो आई म्हणाला....

विषय: आणि ती हसली

फेरी: राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा


"श्वेता खूप डोकं दुखतंय ग. एक कप चहा मिळेल का?" दरवाजातून घरात पाऊल टाकत असतानाच मंदारने विचारले.


श्वेता मंदारकडे बघून म्हणाली,

"तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते."


मंदार रुममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला, तर श्वेता चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. मंदार फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. तेवढ्यात श्वेताचा मोबाईल वाजला.


"मंदार कोणाचा फोन आहे? बघ रे."


इंटरनॅशनल नंबर दिसल्याने मंदारने लगेच फोन उचलला. पुढील पाच ते दहा मिनिटे मंदार समोरच्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होता. तोपर्यंत श्वेता चहाचे दोन कप घेऊन किचनमधून हॉलमध्ये आली होती. मंदारचं फोनवर बोलून झाल्यावर श्वेता म्हणाली,


"मंदार कोणाचा फोन होता? तू कोणासोबत इंग्लिश मधून बोलत होतास?"


"श्वेता तुला पुढच्या फ्लाईटने लंडनला जावे लागणार आहे. मी आपल्या ट्रॅव्हल एजंटला तिकीट बुक करायला सांगतो, मग तुला सविस्तर सांगतो." मंदारने ट्रॅव्हल एजंटला फोन लावता लावता सांगितले.


लंडनचे नाव ऐकल्यावर श्वेताच्या मनात आदीतचे विचार चालू झाले. आदीतला काही झाले तर नसेल ना. असं अचानक घाईघाईने लंडनला का जावे लागणार आहे? 


मंदारचं फोनवरील बोलणं झाल्यावर तो म्हणाला,

"थँक गॉड. उद्या दुपारच्या फ्लाईटचं तिकीट मिळालंय."


"अरे पण मंदार आपण दोघे पंधरा दिवसांनी लंडनला जाणार होतो ना. आपण त्यासाठीच व्हिसा काढून ठेवला होता. मग मी उद्याचं का जायचं आहे? आणि तेही एकटीने." श्वेताने विचारले.


मंदार म्हणाला,

"श्वेता मला उद्या लगेच सुट्टी मिळणार नाही. कंपनीत ऑडिट सुरु आहे. आदीतच्या शाळेतून प्रिन्सिपल मॅडमचा फोन होता, त्यांनी आपल्यापैकी कोणालातरी ताबडतोब बोलावलं आहे. नेमकं काय झालंय? याची त्यांनी कल्पना दिली नाहीये."


"आपला आदीत ठीक असेल ना?" श्वेताने विचारले.


"माहीत नाही ग. मलाही तेच टेन्शन येतंय. आपण पॉजिटीव्ह विचार करुयात. आदीतला काहीही झालेलं नसेल." मंदार म्हणाला.


"आदीत झाल्यापासून पॉजिटीव्ह विचारच करत आहे, पण पॉजिटीव्ह असं काही घडलंच नाहीये." श्वेता हतबल होऊन म्हणाली.


श्वेताच्या डोळ्यातील पाणी बघून मंदार म्हणाला,

"श्वेता आता बसून चालणार नाही. चल पटकन पॅकिंगला सुरुवात करुयात. बाहेरुन काय काय आणायचं? याची यादी करुन दे. मी पटकन सर्व सामान आणून देतो."


दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता दिल्लीहून लंडनला जाण्यासाठी फ्लाईट होती. श्वेता पहाटे मुंबई वरुन दिल्लीला फ्लाईटने गेली, मग तेथून ती लंडनच्या फ्लाईट मध्ये बसली. दिल्ली ते लंडन हा साधारणतः साडेनऊ ते दहा तासांचा प्रवास होता. श्वेताला आदीतची काळजी वाटत होती. श्वेताच्या चेहऱ्यावर काळजी दिसून आल्याने तिच्या शेजारी बसलेल्या काकू तिला म्हणाल्या,


"तुम्ही काही टेन्शनमध्ये आहात का?"


श्वेता त्यांच्याकडे बघून म्हणाली,

"काकू मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. तुम्ही मला अहो जाहो करु नका. माझा मुलगा आदीत नऊ वर्षांचा आहे, तो लंडनला शाळेत असतो. काल त्याच्या प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला होता, त्यांनी ताबडतोब मला तिकडे बोलावलं आहे, म्हणून मी त्याच्याच टेन्शनमध्ये आहे."


"चेहऱ्यावरुन तू टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटत आहेच. आता हा एवढा मोठा प्रवास सोबत करायचा म्हटल्यावर मला काही गप्प बसवलं जाणार नाही. मुलं कितीही मोठी झाली, तरी आईला त्यांची काळजी असतेच ना. माझं नाव सुलभा दळवी. मागच्या कोरोनात माझे मिस्टर आणि माझा एकुलता एक मुलगा हे जग सोडून गेले. पैसा, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण आपली म्हणावी अशी माणसं नाहीयेत. माझी बालमैत्रिण लंडनला सेटल झालेली आहे. तिचं मला म्हणाली, "एकटीच तिकडे बोअर होण्यापेक्षा इकडे ये. मी तुला लंडन फिरवते. जमलं तर आजूबाजूचे देश पण फिरुयात."

इतकी वर्षे नवरा आणि मुलगा यातून वेळचं मिळत नव्हता. सून आणि एक नातू आहे, पण ते त्यांच्या जगात व्यस्त आहेत. सूनेनेच पासपोर्ट आणि व्हिसा काढून द्यायला मदत केली." सुलभा काकूंनी सांगितले.


श्वेता म्हणाली,

"काका गेल्याच्या दुःखात तुम्ही रडत न बसता आयुष्याची मजा घेत आहात, हे छान केलंत."


"बरं मला सांग. तू तुझ्या मुलाला एवढ्या लांब का शाळेत टाकलेस?" सुलभाने विचारले.


श्वेता म्हणाली,

"काकू कोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून इतक्या दूर पाठवण्याची इच्छा होते. आमच्यापुढे काही पर्यायचं उरला नव्हता. मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून सांगते, म्हणजे तेवढंच माझं मन तरी हलकं होईल.


मी व मंदार आम्ही दोघे एका कंपनीत नोकरी करत होतो. मंदार माझा सिनिअर होता. एकत्र काम करता करता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमची जात वेगळी असल्याने आमच्या दोघांच्याही घरुन लग्नाला संमती मिळाली नाही. आम्ही दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. माझ्या व मंदारच्या आई वडिलांनी आमच्यासोबत नातेसंबंध तोडून टाकले.


आम्ही दोघे लग्नानंतर आनंदी होतो. घरच्यांची आठवण यायची, पण आम्ही काही करुही शकत नव्हतो. दोन वर्षांनंतर मला प्रेग्नन्सी राहिली, तेव्हा आईची खूप आठवण आली, तिला बऱ्याचदा फोनही केले, पण आई एकदाही माझ्यासोबत बोलली नाही. मला ना त्यावेळी आईचं एक वाक्य आठवलं. मी जेव्हा मंदारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती म्हणाली होती की, "तू आई झाल्यावर मी तुझ्यासाठी किती यातना सहन केल्या आहेत, हे तुला समजेल, त्यावेळी तुला माझी किंमत समजेल."

आई खरं बोलली होती. मुल वाढवण्यासाठी नऊ महिने किती त्रास घ्यावा लागतो, हे फक्त एक आईचं समजू शकते. आदीतचा जन्म झाल्यावर आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो. आमच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती आली होती. 


आमच्या दोघांचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. आदीतला सांभाळण्यासाठी मी स्वतःहून नोकरी सोडून काही दिवस घरी राहण्याचा निर्णय घेतला. आदीत सव्वा महिन्यांचा होईपर्यंत शांत होता, पण त्यानंतर आदीतचे रडणे वाढले होते. आदीत रात्ररात्र स्वतःही झोपत नव्हता आणि मलाही झोपू देत नव्हता. 


लहान मुल म्हटल्यावर थोडाफार त्रास देईलचं, असा विचार करुन मी एकेक दिवस पुढे ढकलत होते. दर महिन्याला आम्ही आदीतचा बर्थडे साजरा करायचो. आदीतचे फोटो काढण्यासाठी मंदारने डिजीटल कॅमेरा विकत घेतला होता. आम्ही आदीतसाठी कुठल्याच वस्तूची कमी ठेवली नव्हती. आदीतच्या रडण्यावर आजूबाजूच्या बायका सांगतील तो उपाय मी करत होते. 


आदीतच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी एकदम नॉर्मल होत्या. आदीत वेळेवर रांगायला, बसायला, उभं रहायला, चालायला लागला. आदीतला दात पण वेळेवरच आले होते. आदीत फक्त काहीच बोलत नव्हता. आदीतचा पहिला बर्थडे आम्ही हॉटेलमध्ये ग्रँड पद्धतीने साजरा केला होता. सर्व मित्र मंडळींना बर्थडेसाठी आमंत्रित केले होते. आम्ही आमच्या घरच्यांना बोलावले होते, पण ते आलेच नाही.


काकू आमचा आदीत दिसायला खूप गोड आहे. कोणाचीही त्याला पटकन नजर लागेल असा. आदीत जवळपास दीड वर्षांचा होत आला होता, तरी तो काहीच बोलत नव्हता. त्याला जी वस्तू लागायची, ती तो खुणेने दाखवायचा. बऱ्याचदा असं व्हायचं की, त्याचं म्हणणंच आम्हाला कळायचं नाही, मग तो चिडचिड, रडारड करायचा. रात्री दोन वाजेपर्यंत तो झोपायचा नाही. 


शेवटी कंटाळून आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही थेरपी चालू करायला सांगितल्या. आदीत बोलेल, इतर मुलांसारखा नॉर्मल वागेल या आशेने डॉक्टर जे म्हणतील ते उपचार आम्ही करायला सुरुवात केली. माझ्या नोकरीला मला रामराम करावा लागला. मी एकटी त्याला थेरपीला घेऊन जायचे, कारण मंदारला सुट्टी घेणे पॉसिबल व्हायचे नाही. मंदारने नोकरी केली नाहीतर आदितच्या उपचारांसाठी लागणारा खर्च कुठून येणार होता?


दरम्यानच्या काळात मी स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष दिले नाही. आदीतकडे बघून वाईट वाटायचं. आदीत कधी मला 'आई' म्हणून हाक मारेल याची वाट मी बघत होते. काकू मला कोणी समजून सांगायला पण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. माझी आई, बहीण यापैकी कोणीच माझ्यासोबत बोलत नव्हते. आपणचं आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आणि पुढे जायचं,हे चालू होतं.


बोलता बोलता आदीत तीन वर्षांचा झाला. थेरपीमुळे आदीतमध्ये थोडेफार बदल झाले होते, पण तो काहीचं बोलत नव्हता. मी भरपूर उपवास केले. ज्या ब्राम्हणाचा पत्ता मिळेल, त्यांच्याकडे जाऊन ते सांगतील तो उपाय करत होते. मी माझ्या आदीतसाठी काहीही करायला तयार होते. आपण जे काही करतोय त्याने काहीच बदल होत नसल्याने मी दिवसेंदिवस हतबल होत चालले होते.


अशातच एके दिवशी मी व मंदार मॉलमध्ये गेलो होतो. तिथे माझ्या लहान बहिणीची श्रेयाची व माझी भेट झाली. श्रेयाने आदीतला बघितल्यावर घाईघाईने कडेवर उचलून घेतले, त्याची पप्पी घेतली. जो माझा आदीत कोणत्याचं परक्या व्यक्तीकडे जायचा नाही, तो त्याच्या मावशीला असा चिटकला की, माझ्याकडे परत यायलाच तयार नव्हता. श्रेया व माझ्या आम्हा दोघींच्या डोळयात पाणी आले. मंदार आदीतला घेऊन गेम झोनमध्ये गेल्यावर आम्हाला दोघींना बोलायला वेळ मिळाला. मी श्रेयाला आजवर घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. माझं मन मोकळं केलं होतं. काकू श्रेया एक वाक्य त्यावेळी मला बोलली आणि त्यामुळेच मी आजवर मानसिकरित्या ठीक आहे. ती म्हणाली होती की,

"ताई देव त्याच्याच आयुष्यात समस्या निर्माण करतो, जी व्यक्ती त्या समस्यांना तोंड देऊ शकेल. ताई तू एक लढाऊ वृत्तीची स्त्री आहेस. तू अशी हरु शकत नाही. ही तुझ्या आयुष्याची लढाई आहे, ती लढाई तुलाचं लढावी लागणार आहे."


काकू तेव्हापासून मी मानसिकरित्या कधीच हतबल झाले नाही. आदीत नॉर्मल व्हावा, म्हणून जे काही प्रयत्न करावे लागतील, ते मी केले. आदीतला महिन्याला जवळपास साठ हजारांचा खर्च लागायचा. मंदारने यासाठी कधीच नाही म्हटले नाही. आदीत पाच वर्षांचा होईपर्यंत आम्ही खूप काही केलं.


जसं वय वाढत चाललं होतं, तसा आदीत जास्त अग्रेसिव्ह होत चालला होता. आदीत चिडला की, हाताला, पायाला येऊन चावायचा, चिमटे घ्यायचा, केस ओढायचा. आदीतमध्ये ताकद पण खूप होती. हळूहळू माझ्यातील पेशन्स संपत चालले होते. आदीतला असं किती दिवस सांभाळायचं? हा प्रश्न आमच्या दोघांसमोर उभा राहिला होता. 


अशातच एके दिवशी एका डॉक्टरांनी लंडन मधील ह्या शाळेबद्दल सांगितलं. शाळेची फी व ट्रीटमेंटचे चार्जेस भरपूर होते. पण आदीत त्यामुळे पूर्णपणे बरा होईल ही आशा वाटत होती. आम्ही लगेच सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या. आदीतला घेऊन आम्ही लंडनला आलो. आदीत त्यावेळी साडेपाच वर्षांचा होता. 


काकू मी तोपर्यंत आदीतला माझ्यापासून असं एक क्षण पण दूर केलं नव्हतं. इतक्या लांब माझं बाळ कसं राहिल? याची काळजी लागून होती. आदीतच्या भविष्यासाठी आम्हाला हे कठीण पाऊल उचलावे लागणार होते. आदीतला शाळेत सोडल्यावर पुढील एक आठवडा आम्ही दोघे लंडनमध्येच राहिलो होतो. आदीत सेटल होत आहे, हे कळल्यावर आम्ही दोघे भारतात परत गेलो. सहा महिन्यांतून एकदा आम्ही दोघेही आदीतला भेटायला येतो. आम्ही पंधरा दिवसांनी त्याला भेटायला येणारचं होतो, पण काल त्यांचा अचानक फोन आल्यावर मला यावं लागलं."


श्वेताची कथा ऐकल्यावर सुलभा काकूंच्या डोळयात पाणी आले. डोळे पुसता पुसता त्या म्हणाल्या,

"आदीतमध्ये काही बदल झाला का?"


"हो. आदीतच्या वर्तनामध्ये बरेच सकारात्मक बदल झालेत, पण काकू तो मला आई म्हणालाचं नाहीये. आदीतच्या तोंडून 'आई' हे वाक्य ऐकण्यासाठी माझे कान आतुरले आहेत."श्वेताने सांगितले.


श्वेता व सुलभा काकूंच्या गप्पांमध्ये लंडन कधी आले, ते त्यांना कळले पण नाही. एअरपोर्टला पोहोचल्यावर सुलभा काकू म्हणाल्या, 

"माझी मैत्रीण मला न्यायला आली असेल. आपण दोघी तिच्या गाडीत बसून आदीतला भेटायला जाऊयात. तू एकटी जाऊ नकोस. मी पण तुझ्यासोबत येते."


श्वेता म्हणाली,

"काकू नको. मी जाईल. तुम्ही उगाच त्रास घेऊ नका."


सुलभा काकू म्हणाल्या,

"मला आदीतला भेटायचं आहे. मी तुझं काही ऐकणार नाही."


श्वेता नाही म्हणत असताना सुद्धा सुलभा काकू त्यांच्या मैत्रिणीच्या गाडीतून श्वेताला सोबत घेऊन आदीतच्या शाळेत गेल्या. शाळेत गेल्यावर श्वेता सुलभा काकूंना घेऊन प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये गेली. श्वेताला बघितल्यावर प्रिन्सिपल मॅडमने शिपायामार्फत आदीतला बोलावून घेतले. आदीत प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये येऊन श्वेताला समोर बघून तिला मिठी मारत म्हणाला,

"आई तू केव्हा आलीस?"


आदीतच्या तोंडून 'आई' ही हाक ऐकून श्वेताचे डोळे पाण्याने भरुन आले. सुलभा काकूंच्या डोळयात सुद्धा पाणी आले. प्रिन्सिपल मॅडमने त्यानंतर श्वेताला सांगितले की, त्यांच्या शाळेत एक टीचर महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनीच आदीतला 'आई' म्हणण्यास शिकवले आणि आदीतने आई म्हणायला सुरुवात केली, म्हणूनच त्यांनी श्वेताला ताबडतोब तिकडे बोलावून घेतले.


नऊ वर्षांनंतर आपल्या मुलाच्या तोंडून 'आई' ही हाक ऐकल्यावर त्या माऊलीच्या चेहऱ्यावरील हास्याची व तिच्या मनातील आनंदाची तुलना आपण करुच शकत नाही. नऊ वर्षांनी मनमोकळे हसू तिच्या चेहऱ्यावर उमलले होते.


©®Dr Supriya Dighe

टीम: अहमदनगर