आणि म्हातारी हसली...

म्हातारी का हसत नव्हती. आणि ती कशी हसली याचे विनोदी वर्णन.
विषय : आणि ती हसली
शीर्षक : आणि म्हातारी हसली.
फेरी : राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा


" म्हातारे... आगं हास की जरा . आता दोन महिन झाल्याती बा ला जाऊन . किती दिस आशीच गप गप राहणार हाईस ?"
सदाने घरी येताच ओसरीवर बसलेल्या सत्तर वर्षांच्या गंगूबाईना विचारलं .

त्या रोज त्याच जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत असत . अधून मधून गप्पा मारत हसायच्या . शेजारी गेल्या की चहा घेऊन गप्पा मारायच्या .

पण गेले दोन महिने त्या फक्त ओसरीवर बसून होत्या. हसत मात्र नव्हत्या आणि शेजारी सुद्धा जात नव्हत्या .

" तू माझ्याकडं नग लक्ष देऊस . जा पायावर पाणी घाल जा तुझ्या जरा . मळ्यातून आलाय नव्हं ."
गंगूबाई पदर नीट करत म्हणाल्या .

सदाने नकारार्थी मान हलवली आणि मोरीत जाऊन हात पाय धुतले .

" च्या टाकलास का ?" बाहेर येत त्याने बायकोला विचारलं . तस म्हातारीचे कान टवकारले पण पुन्हा लगेच ती पदर झटकत समोर बघू लागली .

" व्हय " सदाच्या बायकोने त्याच्यासमोर चहाचा कप पकडला .

" काय हे रोज रोज म्हातारीच्या मागे लागत असता ? त्यांना हसायचं तवा हासतील त्या " . बायको वैतागून म्हणाली . नाही म्हणायला तिने सुद्धा बरेच प्रयत्न केले होते . तिच्या मुलांनी पण प्रयत्न केले पण म्हातारी काय हसली नव्हती .

" आसं कसं ?आय हाय माझी ती . आजपातुर हासताना बघितली हुती आन बा गेल्यापासून एकदम गुपचूप झाल्या . लै वंगाळ वाटतं मला ." सदा बाहेर बसलेल्या म्हातारीकडे नजर टाकत उदास होत म्हणाला .

" व्हय , पर तुम्ही समदे प्रयत्न केल्याती . आता त्यांना हासायच न्हाय तर कोण काय करणार ? आता मागच्याच आठवड्यात नव लुगडं आणलं त्यांना . पुण्यांदा म्या त्यांच्या आवडीच जेवण पण करतीया पर त्यांना काय सुख मिळत न्हाय . आपन तरी किती दिस त्यांना हसवण्याच्या मागे लागणार ?
पोरांची परीक्षा जवळ आल्या तर थोडं त्यांच्याकडं लक्ष द्या आता ." बायको त्याला समजावत म्हणाली .

" व्हय , खरं हाय . पर म्हातारी हसली पाहिजेल ग . लय आठवतं तिचं हसू ." सदा दुःखी होत म्हणाला .

बायकोने एक उसासा सोडला आणि स्वयंपाक करायला आत निघून गेली .

दुसऱ्या दिवशी सदा गंगूबाईना बाजारात घेऊन गेला .

" म्हातारे , काय घ्यायचं ते घे . आज पैश्याची काळजी नग करूस ." सदा म्हणाला .

" मला न्हाय काय बी घ्याचं ." म्हातारी पुन्हा पदर सावरून घेत म्हणाली .

     आता हिला नक्की झालंय काय ? दोन महिने होऊन गेले होते . आतापर्यंत तिने नॉर्मल व्हायला हवं होतं पण म्हातारी काय हसत नव्हती आणि म्हणून सदाला दुःख होत होतं .

     ती नको नको म्हणत असताना पण सदाने तिच्या आवडीच काय काय तिला घेऊन दिलं आणि पुन्हा घरी आणून सोडलं .

घरी येताच म्हातारी पुन्हा ओसरीवर बसली .

" आत्या .. आवं काय झालया ? आसं गप गप राहून तुम्ही लेकाला पण तरास देताय . काय पायजे आसल तर सांगा की ." सदाच्या बायकोने जवळ येऊन विचारलं .

" काय बी नग ." म्हातारीने पुन्हा उत्तर दिलं .

" आवं , तुम्हाला मामंजीची आठवण येत्या का ? आवं वय झालेलं त्यांच . शंभरला फकस्त इस वरिस कमी व्हतं . उलट आरामात गेल्याती वरती .न्हायतर माझी माय तर खंगुन खंगुन मिली ." सदाची बायको तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागली .

" तू जा बरं . मला काय बी बुलू नग . पोरं येत्याली शाळेतन . जा चूल पेटव ." गंगुबाई म्हणाल्या .

सदाच्या बायकोने नकारार्थी मान हलवली आणि आतमध्ये निघून गेली .

दिवसामागून दिवस सरत होते पण म्हातारी काय हसत नव्हती . सदा तिला हसवण्याचा खूप प्रयत्न करत होता पण ती काय हसत नव्हती . त्याने तिच्यासाठी घरात कधी नव्हे ते टीव्ही आणून ठेवला . पोरं खुश झाली पण म्हातारी काय हसली नाही .

सदा आता थकून गेला . तिला हसण्याचा प्रयत्न करणं त्याने सोडून दिलं . त्याच्या बायकोने पण म्हातारीला समजावणं सोडून दिलं . म्हातारी ओसरीवर कायम बसून असायची . पण हसत काय नव्हती . व्यवस्थित खात पित होती , बोलत होती , फक्त हसत मात्र नव्हती .

आता सदाच्या वडिलांना जाऊन एक वर्ष झालेलं .
त्याने छोटंस त्यांच प्रथम पुण्यस्मरण घातल . काही नातेवाईकांना बोलावलं . पण त्यांच्यासोबत सुद्धा म्हातारी हसली नाही .

कार्यक्रम योग्य रित्या पार पडला आणि रात्र झाली .

" वंदे....." म्हातारीने सदाच्या बायकोला हाक मारली .

" काय..?" तिने विचारलं .

" झालं आता एक वरीस झालं . मला च्या दे आता ." म्हातारी म्हणाली .

तिने चहा केला आणि म्हातारीला दिला . म्हातारीच्या चेहऱ्यावर चमक दिसू लागली . तेवढ्यात सदा पण तिथं आला .

म्हातारीने चहाचा एक घोट घेतला आणि म्हातारी किंचित हसली तसं हे दोघे चकित झाले .

" आता कसं बरं वाटतया ." म्हातारी बाशितला चहा पित पित म्हणाली आणि तिथं असणाऱ्या दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं .

" म्हातारे ... आग तू हसली की ग ." सदा हसत म्हणाला .

" व्हय .. झालं एक वरीस पाळल हुत . आता ह्यो भेटला नव्हं मग माझं हसू पण परत आल ." म्हातारी चहाकडे कौतुकाने बघत म्हणाली आणि सदाच्या बायकोने डोक्यावर हात मारून घेतला .

" आवं , जर च्याच पाजजेल हुता तर अगोदर सांगायचं की ." सदाची बायको वैतागून म्हणाली . कारण म्हातारीला हसवायला तिने बरेच प्रयत्न केले होते .

" अगं , च्या एक वरीस पाळला हूता नव्हं . ह्याच्या बा ला पण लय आवडायचा आणि मला पण लय आवडतू . आज इतक्या दिसातून च्या पिऊन लय झ्याक वाटल बघ . च्या सोबत लय चांगल्या चांगल्या आठवणी पण हायेत . आणि च्या पिता पिता गप्पा पण लय मारायला येत्याती . आता शेजारच्या घरी पण जाईल मी च्या प्यायला ." म्हातारी कप ठेवत म्हणाली . आता तिच्या चेहऱ्यावर हसू होतं .

" म्हातारे..अशीच हसत रहा." सदा खुश होत म्हणाला . तेवढ्यात त्याची बायको पुन्हा एक कप चहा घेऊन आली आणि म्हातारी चहाकडे पाहून पुन्हा हसली .

लेखिका - प्रीती चव्हाण.
जिल्हा - सातारा,सांगली

______________समाप्त______________