Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आणि कृष्ण भेटला...

Read Later
आणि कृष्ण भेटला...


..आणि कृष्ण भेटला.

"वृंदा अगं तुला कितीवेळा समजावू की दहीहंडी सारखी थेरं ही काय पोरींच्या जातीला शोभत नाही, उद्या काही कमीजास्त होऊन तू पडली बिडली आणि तूला काही झालं तर मी कोणाकडे पहायचं गं? माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी हे असंच जग आहे ना आपलं?"
वृंदाची आई म्हणाली.

"हे बघ आई जेव्हापासून बाबा तूला आणि मला सोडून गेले तेव्हापासून मी एवढूशी असताना तू मला कसं सांभाळलं हे ठाउक आहे मला . तू होतीस म्हणून मी इतकी शिकले आणि आज स्वतःच्या पायावर उभी राहून कॉम्प्युटर इंजिनिअर झालेय, आपल्या दोघीना पुरेल एवढा पगार देखील आहे मला. लहानपणापासून मला खूप लांबसडक केसं होते म्हणून मला तूच टॉम बॉय बनवून एकट्या मुलीने कसं बिनधास्तपणे शाळा, कॉलेजला जायचं न घाबरता, कसं पोरांच्या ग्रुपमध्ये वावरायचं हे तूच मला समजवलं जेणेकरून कोणीही परक्या मुलीला वाईट नजरेने पाहून तिच्या नाजूकपणाचा फायदा नाही घेणार. अगं तूच तर म्हणतेस नेहमी की मी तूझा मुलगा आहे पण आता दरवर्षीप्रमाणे ठाण्यात सर्वत्र नाव असलेल्या आम्हा मुलींच्या ग्रुपच्या दहीहंडीत तू मला दरवेळी असं नकार देणं चांगलं नाही बरं." वृंदा म्हणाली

"हो हो माहीत आहे मला तूम्ही मुली खूप फेमस आहात या दहीहंडीच्या उत्साहात . दरवर्षी तूला अडवायला पाहते पण तू दरवेळी असं इमोशनल काहीतरी बोलते आणि माझ्याकडून परवानगी घेते. मला तुझी काळजी आहे गं म्हणून अडवतेय तूला."
वृंदाची आई म्हणाली.

"अगं जो थरावर थर चढवून दहीहंडी फोडायला बळ देतो तो माझा कान्हा मला कसकाय पडू देईल आणि पडले तरी मला काहीही इजा तो होऊ देणार नाही." वृंदा म्हणाली

"ते काही नाही तू तिकडे जायचं नाही म्हणजे नाही ,बघतेच मी यावर्षी कशी जातेय तू. थांब मी तुला कोंडूनच जाते घरात आणि शेजारी काकुला सांगते दार अजिबात उघडू नका. मागच्या वाडीतील मावशीकडे राहते आज आणि येते उद्या सकाळी." वृंदाची आई म्हणाली.

"अगं आई ऐक ना, असं नको करू ना गं प्लिज, आई नको नाsss...आई, आईsss... आई!"
वृंदा ओरडत ओरडत आवाज देत होती.

बोलताबोलता वृंदाच्या आईने तिला घरात बंद केलं आणि ती निघून गेली .

बिचारी वृंदा खूप रडली, खिडकीतून शेजारील काकूंना आवाज दिला तर त्या उलट तिच्यावर हसल्या. तिला खूप राग येत होता त्यांचा. बघताबघता संध्याकाळ झाली. वृंदा ऐनवेळी गायब होती पण तरीही असं एका सदस्यामुळे पुर्ण ग्रुप थांबू शकत नाही म्हणून बाकीच्या मुलींनी थरावर थर रचवून दहीहंडीला सुरुवात केली. पहिल्यांदा पाच थर लावले पण हात काही पुरला नाही हंडीपर्यत.


इकडे वृंदा खिडकीत बसून रडत होती. आता तर शेजारचे पाजरचे सुद्धा दहीहंडी बघायला गेलेले. एवढ्या मोठ्या चाळीत ती एकटीच कोंडून होती. तेवढ्यात तिथे अचानक त्यांचा दूधवाला आला. पांढरा सदरा घातलेला,डोक्याला मफलर मोरपंखी रंगाचं मफलर बांधलेला.
सगळ्यांची घरं बंद बघून पुन्हा त्याने सायकल फिरवली तेवढ्यात त्याला वरच्या मजल्यावरील खिडकीत बसलेल्या वृंदाने आवाज दिला. तो सायकल खाली लावून वरती गेला.

"काय ओ ताई तुम्ही एकट्याच आहात काय इथे? सगळ्या चाळीत एक बी माणूस नाही. एक मिनीट, एक मिनीट, त्या तुम्हीच ना ज्या दरवेळी दहीहंडी स्पर्धेत असतात? अहो इथं काय करताय तुम्ही जावा की तिकडं ,सगळ्या पोरी वाट बघत असतील." दूधवाला बोलला.

"हो ना दादा, अहो माझी आई त्याच काळजीमुळे मला इथे कोंडून गेलीय. तुम्ही प्लिज दार उघडा ना."
वृंदा म्हणाली.

"हो बरोबर आहे आईचं. तिची काळजी, माया वेगळीच असते."
दूधवाला बोलला.

"अहो दादा मी घेईल स्वतःची काळजी पण तिकडे आज गेले नाही तर पुढील काही दिवस माझं मन मला स्वतःला आतून खात राहील. कशातच लक्ष नाही लागणार. " वृंदा म्हणाली.

"ठिके उघडतो मी दार...तुम्ही माझ्यासोबतच चला, मी सायकल आणली आहे,डबलसीट जाऊयात."
दूधवाला बोलला.

"हो हो चला दादा पटकन, आधीच उशीर झालाय."वृंदा बोलली.

त्या दूधवाल्याने वृंदाला सायकलीवरून जिथे दहीहंडी होती त्या चौकात नेलं.

वृंदाने त्याचे आभार मानून लगेच धावत पळत आपला ग्रुप गाठला. सगळ्या मुलींनी थरावर थर लावले होते, नऊ थर लावून सुद्धा शेवटी एक मुलगी कमी पडली. वृंदा आलेली पाहून खालच्या मुली ओरडल्या...
"वृंदा, जा तू वर पटकन "

"नटखट बंसी वाले गोकुल के राजा
मेरी अँखियाँ तरस गयी
अब तो आजा
आजा.. आजा..
नटखट बंसी वाले गोकुल के राजा
मेरी अँखियाँ तरस गयी
अब तो आजा
आजा.. आजा.. आजा.."

खालच्या मोठ्या वर्तुळाकार थरावर वृंदा चढली नंतर हळूहळू करत वरच्या थरांवर चढत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तिने वरच्या उभ्या असलेल्या मुलीच्या खांद्यावर पाय ठेवला. आता तिचा हात दहीहंडीच्या दोरीला लागला, तिने एका हाताने दोरी पकडली आणि दुसऱ्या हाताने नारळ बाहेर काढला हंडीतून, खाली उभ्या असलेल्या दूध वाल्याकडे बघून तिने डोळ्यांच्या पापण्या मिटवून मान खाली करून मनोमन पुन्हा एकदा आभार मानले. त्यानेही मंदस्मित हास्याने तिच्याकडे पाहिलं पण झालं काही वेगळंच. अचानक मधल्या थरातील एका मुलीचा पाय सटकला. एक एक करून सगळे थर खाली आले,सगळ्या मुली खाली पडल्या. सुदैवाने कुणालाही जास्त दुखापत झाली नाही, पण वृंदा?

अहो वृंदा तर तशीच लटकली होती वरच्या दोरीला पकडून, तिने नारळ पुन्हा हंडीत ठेवला. दुसऱ्या हाताने देखील दोरी पकडली आणि पायांना सुद्धा दोरीत आखडून लटकून राहिली त्या दोरीवर.

सगळे खालून ओरडत होते.
"वृंदाss...वृंदाss...वृंदाsss..
ए वृंदा मटकी फोड गं."

वृंदा हंडी फोडूनच खाली येणार होती असा जणू तिने पण केलेला स्वतःच्या मनाशी. तिने पुन्हा एक हात दोरीवरुन काढून हंडीतून तो नारळ बाहेर काढला आणि एका फटक्यात तिने हंडीवर तो नारळ आपटून हंडी फोडली. सगळीकडे नुसता जल्लोष सुरू झाला, सगळ्या मुली आनंदाने नाचू लागल्या. एकाबाजूने रस्सी हळूहळू खाली घेऊन कार्यकर्त्यांनी वृंदाला खाली यायला मदत केली. वृंदा खाली आल्यावर सगळ्या मुलींनी तिला खांद्यावर घेऊन आनंदाने उड्या मारल्या हा सगळा प्रसंग लोकांनी मोबाईलमध्ये टिपला आणि रातोरात वृंदा सोशल मीडियावर #ठाण्याचीवाघीण ,#कान्हाचीगोपिका आशा नावाने प्रसिद्ध झाली.

वृंदा घरी आली, घरी अजूनही आई आलेली नव्हती. वृंदा जेवण करून झोपी गेली, पहाटे आई आली तेव्हा तिला दिसलं की दार तर आतून बंद आहे म्हणजे ही पोरगी तरीही बाहेर गेलेली.

आईने घरात आल्याआल्या तिच्यावर ओरडा सुरू केला, तिला विचारू लागली की
"कुणी उघडली कडी? कसकाय गेलेली तू बाहेर?"

तेव्हढ्यात त्यांचा दूधवाला दूध घेऊन आला,

"वहिनी दूध घ्या" दुधवाल्याने आवाज दिला.

"अगं आई हाच तो दादा ज्याने मला बाहेर काढलं, खरंच हा नसता तर मी काल जे अनुभवलं ते कधीच अनुभवलं नसतं. थँक्स हा दादा पुन्हा एकदा" वृंदा बोलली.

"काय रे किसना का काढलं हिला खोलीच्या बाहेर आणि तू काल संध्याकाळी का आलेला चाळीत?"
वृंदाची आई म्हणाली.

"अहो काय बोलताय तुम्ही, मी आणि चाळीत? नाही हॊ, मी नव्हतो आलेलो, मी तर माझ्या गावी गेलेलो, आजच आलो आणि लगेच दूध वाटायला सुरुवात केली."
किसना म्हणाला.

"अहो असं काय करता दादा, तुम्हीच तर मला बाहेर काढलं ना दार उघडून, तुमची सायकल सुद्धा आणलेली तुम्ही."वृंदाने प्रश्न केला.

"अहो का गरीबाची चेष्टा करताय? मी नव्हतो ठाण्यात काल तर कसकाय येईल इथे बिनकामाचं?" किसना बोलला.

"तूम्ही नव्हता तर तो कोण होता काल आलेला?
कळलं मला, आई तूला बोलले नव्हते माझा कान्हा मला काहीही होऊ देत नाही,बघ कालच मला त्याने किसनाच्या रुपात येऊन दहीहंडीसाठी बाहेर नेलं.
खरंच मनात कृष्णाप्रती प्रित भरभरून ओसंडून वाहत असेल ना तर आपल्याला आपला कृष्ण कधी ना कधी, कुठं ना कुठं नक्कीच भेटतो." वृंदा बोलली.

आईनेही समाधानाने देव्हाऱ्यातल्या कृष्णाला हात जोडले.

समाप्त.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//