आणि कृष्ण भेटला ...

-------

आणि कृष्ण भेटला ..........

" सर , सर मी टेंडरची माहिती नाही लीक केली. माझ्यावर विश्वास ठेवा सर." मनोज जीव तोडून आपल्या सिनिअर मॅनेजरला सांगत होता. हात जोडत होता, समजून घ्या म्हणत.

सिनिअर मॅनेजर ," मिस्टर मनोज, या टेंडर विषयी अगदी मोजक्याच लोकांना माहित होतं. मी, तुम्ही आणि या कंपनीचे ओनर. मग आता तुम्हीच सांगा तुमच्याशिवाय अजून कोण हे करू शकतं ? मी की सर ? " सिनिअर मॅनेजरचा आवाज आता वरच्या पट्टीत होता. 

मनोज ," सर, अहो मी स्वतः जुनिअर मॅनेजर आहे. चांगलं पॅकेज आहे. मग मी असं का करेन ?" 

सिनिअर मॅनेजर," पैसा .... , पैसा खूप मोठी गोष्ट असते मनोज. कंपनीचं किती मोठं नुकसान झालं आहे ? याची तुम्हांला कल्पना असेलच. असो, उद्या सर्व ' बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ' येणार आहेत. तेव्हा तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे दया नाहीतर शिक्षेसाठी तयार रहा. " एवढं बोलून सर निघून गेले. 

मनोज मटकन खुर्चीत बसला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. मनोजला ८ वर्षे झाली होती या कंपनीमध्ये. आपल्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने पटापट पदे मिळवली. ऑफिसमध्ये त्याची प्रगती पाहून जळणारे खूप होते, त्यातच सिनिअर मॅनेजर लवकरच सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे सिनिअर मॅनेजर पदासाठी चढा- ओढ सुरु होती. मनोज काम करत असलेलं टेंडर पास झालं असतं तर नक्कीच सिनिअर मॅनेजर पद त्याचंच होतं हे नक्की. पण आता परिस्थिती अगदी उलट होती. त्यांच्यावर कारवाई होण्या इतपत गोष्ट आली होती. 

मनोजने आपली बॅग घेतली आणि ऑफिसमधून निघाला. बाईक चालवत असताना सुद्धा त्याच्या डोक्यात तेच विचार सुरु होते. कंपनीला दिलेली एवढी वर्षे, मेहनत, टेंडरसाठीची धडपड, रात्र- रात्र जागून काम करणं आणि आता .....? आता सध्या तो एका ट्रॅपमध्ये होता. कारवाई झाल्यावर बेअब्रू होईल, दुसरीकडे कुठे नोकरी मिळणार नाही. कठोर कारवाई झाली तर कदाचित जेल....... एवढं सगळं सहन करणं कठीण आहे. त्यापेक्षा जीव दिलेला बरा..... असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने बाईक नदीवरच्या पुलावर नेली. बाईक बाजूला लावून अभिषेक पाण्याकडे पाहत होता. सर्व संपवायचं हे त्याने मनाशी पक्कं केलं होतं, तोच त्याच्या कानावर आवाज पडला," ओ दादा, देवासाठी हार, गजरे , फुलं घ्या ना. " मनोजने तिकडे न पाहताच " नकोय " सांगितलं. 

पुन्हा तोच आवाज," अहो दादा, घ्या ना. देव आपल्यावर प्रसन्न असला ना की बिघडलेली काम पण होतात आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी फुलांचा सुगंध खूप महत्वाचा असतो. घ्या ना. " 

मनोज मागे वळून वैतागून ओरडणार तोच त्याचं लक्ष त्या हार- फुले विकणाऱ्या मुलाकडे जातं. १३- १४ वर्षांचा मुलगा, एका पायाने अपंग, एका हातात आधार घ्यायला काठी तर दुसऱ्या हातात फुल, हार , गजरे यांची टोपली, घामाने डबडबलेला चेहरा, त्यात त्यांच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य. त्याचं ते हास्य नक्कीच वेगळं होतं. मनोजने त्याचं ते हास्य पाहिलं आणि काही प्रमाणात त्याच्या मनावरचा ताण कमी झाला. 

मनोज," नाव काय तुझं ?" 

तो मुलगा," मोहन...." 

मनोज," तुझी अशी अवस्था असताना सुद्धा तू एवढी मेहनत घेत का फ़िरतोयस ?"

मोहन," मग काय करू ?" 

मनोज," घर रहा, आराम कर..." 

मोहन," त्याने काय होईल ?" 

मनोज त्याच्या प्रश्नांनी थोडा गोंधळतो आणि पुढे म्हणतो," अरे तुला आरामाची गरज आहे. घरी कोणी नाही का काळजी घेणारं ?" 

मोहन," आहेत ना , आई आहे, बाबा आहेत, एक छोटी बहीण आहे." 

मनोज," मग तू अपंग असुन का काम करतोयस ? घर आराम करायचा ना." 

मोहन ," किती वर्षे ?" 

मनोज असमंजसपणे मोहनकडे पाहतो. मोहन म्हणतो," मला म्हणायचं आहे की किती वर्षे आराम करायचा ? " 

त्याच्या या बोलण्यावर मनोज गप्प बसतो.

मोहन पुढे बोलतो," आई- बाबा , दोघेही बिगारी कामगार आहेत. तरीसुद्धा ते मला बसून पोसतील कारण त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. पण मी किती दिवस घरात बसून राहू? आई- बाबा मला किती दिवस पुरणार ? माझ्यामागे राहिले तर उद्या छोटया बहिणीच्या लग्नाचं कसं होईल ?"  

मनोज त्याचं बोलणं मन लावून ऐकत होता. 

मोहन," कसं आहे ना दादा, आयुष्य म्हटलं तर संघर्ष हा आलाच. श्री कृष्णाला तरी कुठे संघर्ष टाळला होता ? जन्मापासून संघर्षच करत होता ना ? आपण तर माणसं आहोत. तसं ही देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो स्वतः लढायला तयार असतो. महाभारतात सुद्धा देवांनी मदत तेव्हाच केली जेव्हा पांडवांनी लढायचा निर्णय घेतला. त्यांनी तो निर्णय घेतलाच नसता तर देव मदत कशी करणार होते ? आता मला सांगा, तुमच्यावर एखादं संकट आलं तर तुम्ही आत्महत्या कराल की त्या संकटाला सामोरे जाल ?" 

" संकटाला सामोरा जाईन, संकटाच्या विरोधात लढेन." मनोज मोहनच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे देतो. त्यानंतर तो स्वतःच्याच बोलण्यावर विचार करतो. अगदी थोडयाच वेळापूर्वी जीव दयायला आलेला मनोज , संकटाचा सामना करणार म्हणाला. 

मोहन मनोजची तंद्री भंग करत म्हणाला," मग मी सुद्धा तेच करतोय.. संघर्ष...... ! , दादा मग घेताय ना फुलं ?" 

मनोज ," अ... हा .. दे , थोडी फुलं दे आणि २ हार पण दे. " मनोज खिशातून पैसे काढत म्हणाला. 

मोहनने हार आणि फुले व्यवस्थित बांधून मनोजला दिली आणि दोघेही विरुद्ध दिशेला निघाले. मनोजने मागे वळून पाहिलं तर मोहनही मनोजकडेच पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं पण आता ते हास्य " खटयाळ " होतं. 

मनोजच्या मनात अचानक विचार चमकून गेला , मोहन म्हणजे....... कृष्णच ना ?.........

समाप्त ...............