आणि गौराई हसली..

कथा एका गौराईची

नाव : आणि गौराई हसली..

विषय : आणि ती हसली.

फेरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा..


" विनीत आज ना मला एक विचित्र स्वप्न पडले रे.." सुमेधा उत्साहाने सांगत होती..

"सांग ना.."

" माझ्या स्वप्नात मी गौरी बसवत होते. ते मुखवटे घेऊन मी घरात येत होते."

" गौरी?"

" हो. आणि ते ही दोन.. मी छान साडी नेसून दागिने घालून ते घरात आणत होते.. नक्की काय अर्थ असेल तर याचा?" 

विनीत थोडा घुटमळला..

" सुमेधा, आमच्या घरी बसतात गौरी. ज्येष्ठा कनिष्ठा.."

" त्याच तर नसतील? आपण जाऊ या तुझ्या घरी गौरी गणपतीला?"

" मी आईला विचारतो.."

" का तुझ्या आईला आवडणार नाही मी तिथे गेलेले?"

" असे नाही ग.. तू पाहिलेस ना, आईचे ओवळेसोवळे थोडे कडक असते.."

" म्हणजे? अजूनही त्यांना आपले लग्न मान्य नाही?" सुमेधाने नाराज होत विचारले..

" अग माझी आई थोड्या जुन्या वळणाची आहे. तिचे देवाधर्माचे खूपच कडक असते. आम्हाला पण ती हात लावू देत नाही कधी कधी.." विनीत तिची समजूत काढत म्हणाला.

" अरे पण मी सून आहे ना या घरची.. आज ना उद्या मलाच हे बघायचे आहे ना.. मग मला नको कळायला?"

" उद्याचे उद्या बघू.. नको एवढा विचार करूस.. पण तुला तिथे जायचे आहे तर आपण नक्की जाऊ. तू सुट्टीचे बघ. आपण जाऊ तिथे गौरी गणपतीला.."

     सुमेधा विनीत एक नवविवाहित जोडपे.. दोघांचा आंतरजातीय विवाह. दोघांच्याही घरातल्यांची नाईलाजाने मिळालेली परवानगी.. त्यामुळे लग्नानंतर दोघेही नवीन शहरात रहात होते. आता या निमित्ताने विनीतही घरी जाणार होता. त्याने आईला सरप्राईज द्यायचे ठरवले. सुट्टी कमी मिळाल्यामुळे त्याने ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी निघायचे ठरवले म्हणजे सुमेधाला गौरीभोजन तरी बघता येईल. सुमेधाच्या माहेरी गौरी नव्हत्या त्यामुळे या सगळ्यासाठी ती खूप उत्सुक होती. सरप्राईज द्यायचे होते म्हणून विनीतने घरी काहीच सांगितले नाही. आईचा फोन आल्यावर तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा. पण गणपतीला घरी येणार का हा विषय नाही काढायचा. आश्चर्याची गोष्ट हि कि दरवर्षी तू गणपतीच्या आदल्या दिवशीच ये असा आग्रह करणाऱ्या आईने एकदाही तू येणार का असे विचारले नाही. आई रागावली असेल पण आपल्याला बघून सगळा राग विसरेल असे विनीतला वाटत होते म्हणून तो हि गोष्ट सुमेधाला बोलला नाही. तिने जायच्या आधी दोन छानशा साड्या, खास गौरी गणपती साठी बनवून घेतलेले दागिने आणि काय काय अशी खरेदी केली होती. पहिल्यांदाच कोणत्यातरी सणासाठी ती सासरी जाणार होती. तिचा आनंद त्याला हिरावून घ्यायचा नव्हता.

      दोघेही रात्री गाडीत बसले. घरी गेल्यावर कोणाची काय प्रतिक्रिया असेल दोघेही विचार करत होते. सकाळी सकाळी दोघे घरी पोचले. विनीतने बेल वाजवली. दरवाजा त्याच्या आईने उघडला. "विनीत तू?" आईच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून त्याला आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पण मागे उभ्या असलेल्या सुमेधाला पाहून ते हसू मावळले..

" या आत.. विनीत हिला घेऊन वरच्या खोलीत जा. मी सांगेपर्यंत खाली येऊ नका.. देवासमोरून नको जाऊस. तू पाठच्या दरवाजाने जा.." विनीतच्या आईने सुमेधाला सांगितले.

" चल मी येतो, तुझ्यासोबत.." विनीत सुमेधासोबत निघाला.

" विनीत मी इथे आलेले आईंना आवडले नाही का?"

" असे काही नाही. आज जरा कामाचे टेन्शन आहे ना.. म्हणून जरा.." विनीतने आईची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. सुमेधा अंघोळीला जाताच तो खाली उतरला..

" आई काय झाले?"

" विनीत अंघोळ झाली?"

" आई, सुमेधा गेली आहे. तुला आवडले नाही का आम्ही इथे आलेले?"

" तसे समज हवे तर. तुला माहित आहे माझे ओवळेसोवळे कडक असते ते. तिला कशाला घेऊन आलास?"

" आई पण ती माझी बायको आहे, या घराची मोठी सून आहे. तिला किती आवड आहे या सगळ्याची.."

" ती तुझी बायको आहे, एवढेच खरे. अजूनतरी मी तिला या घरची सून मानत नाही."

" आई, गौरीच्या दिवशी घरच्या सुनेचा अपमान बसतो का ग तुझ्या तत्त्वात?"

" तू मला शहाणपण शिकवू नकोस. मी तुला आधीच सांगितले होते मला आंतरजातीय विवाह मान्य नाही म्हणून."

यावर काय बोलावे ते विनीतला सुचेना. त्याने समोर पाहिले तर सुस्नात सुमेधा समोर उभी होती. बहुतेक तिने ते सगळे ऐकले होते. ती तशीच वर गेली. आता हिला काय सांगायचे हा विचार करत असतानाच ती खाली आली. तिच्या हातात आणलेले सामान होते. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने ते सगळे खाली ठेवले..

" हे मी हौसेने आणले होते. ते वापरायचे कि नाही हे तुम्ही ठरवा. माझ्यामुळे तुमच्या कोणत्याच विधीत काही अडथळा यावा अशी माझी इच्छा नाही. माफ करा मला. विनीत मी परत जाते आहे. तू नंतर आलास तरी चालेल.."

आईकडे दुखरा कटाक्ष टाकून विनीतदेखील आल्यापावली परत निघाला. त्याला ना त्याच्या बाबांनी अडवले ना त्याच्या धाकट्या भावाने. गाडीत बसल्यावर मात्र सुमेधाचा बांध फुटला.. इतका वेळ थांबवून ठेवलेले रडू आता मात्र थांबत नव्हते. ती विनीतच्या खांद्यावर डोके ठेवून रडायला लागली.

" हाच अपमान दाखविण्यासाठी गौराई माझ्या स्वप्नात आली होती का रे? मला बघायला सुद्धा मिळाले नाही काही." तिच्या हातावर हात ठेवून विनीत काही न बोलता सुमेधाची माफी मागत होता. रडून रडून थकलेल्या सुमेधाचा डोळा लागला होता. पण विनीत मात्र खिडकीबाहेर बघत होता. मध्येच गाडी थांबली. थांबलेल्या गाडीमुळे सुमेधाला जाग आली..

" विनीत मला परत तेच स्वप्न पडले." सुमेधा अपराधी स्वरात बोलली. विनीतचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो जिथे बघत होता तिथे सुमेधाने पाहिले..

"सावित्रीबाई फुले ,मुलींचे अनाथाश्रम"

" सुमेधा खाली उतर.." विनीत म्हणाला. दोघेही खाली उतरले.. चालत त्या अनाथाश्रमात गेले.. वेगवेगळ्या वयोगटातील अनेक लहान मुली तिथे होत्या. त्यांना पाहून सुमेधाच्या पोटात गलबलले.. ते तसेच आत गेले. आत व्यवस्थापक चिंतित बसले होते.

" आम्ही आत येऊ का?" विनीतने विचारले.

" हो या ना.." व्यवस्थापक उठत म्हणाले.

" आम्हाला इथे थोडी मदत करायची होती."

" अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. आज सणासुदीचा दिवस आणि आमच्या आश्रमात अन्नाचा दाणा नाही. या मुलींना काय खायला देऊ तेच समजत नव्हते." त्यांचे बोलणे संपतच नव्हते. विनीतने त्यांना शांत केले. त्यांना घेऊन ते दोघेही बाजारात गेले. भरपूर किराणामाल, भाजीपाला खरेदी केला. सुमेधा स्वतः त्यांच्या परवानगीने स्वयंपाकघरात मदतीला गेली. एका लहान मुलीला स्वतःच्या हाताने तिने भरवले.. मगाशी रडणारी सुमेधा कोणीतरी वेगळीच होती हे विनीतला जाणवले.. थोडी अजून देणगी देऊन ते दोघे तृप्त मनाने तिथून निघाले.

घरी जाणाऱ्या गाडीत बसले..

" विनीत आता मला कळले, गौराई स्वप्नात येऊन काय सांगत होती ते.."

" काय सांगत होती?"

" ती सांगत होती कि माझा काही अंश इथे भुकेला आहे. तो भुकेला असल्यावर गोडाधोडाचा नैवेद्य मला कसा जाईल.." सुमेधाला उत्साहाने बोलताना बघून विनीतलाही मस्करी करायची हुक्की आली..

" मग आता झाली का गौराई प्रसन्न?"

सुमेधाने विनीतकडे पाहिले.. 

"हो.. गौराई खूप प्रसन्न झाली आणि तिने हे ही सांगितले कि आता दरवर्षी नाही तर दर महिन्याला इथे येऊन मला नैवेद्य पाहिजे.." असे बोलून सुमेधा गोड हसली.



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई