Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि धरणी हसली.....

Read Later
आणि धरणी हसली.....
आणि धरणी हसली......

विषय:- लघुकथा

रमेश त्याची सकाळची न्याहारी आटोपून जरा गडबडीत घराबाहेर पडला. वाटेत त्याला जे जे भेटायचे त्या सगळ्यांना नमस्कार, राम राम करून तो आपल्या वाटेने निघाला.

"काय र गड्या रम्या, कुठं निगालास बीगी बीगी?" रमेशला घाईत जाताना बघून त्याचाच एक गावमित्र नामदेव त्याला बघून विचारू लागला.

"काय नाय रं, जरा शेताकडं जावून येतूया." त्याने सांगितले.

"असं व्हय! जा गड्या जा. आता कवा बी पाऊस पडाया लागंल, मंग शेतीच्या कामास्नी जुंपाया लागंल." नामदेव पण त्याला दुजोरा देत म्हणाला.

तसा तो नामदेवचा निरोप घेऊन पुन्हा त्याच्या शेतीच्या दिशेने निघाला. तो एकेक वाट काढत झपाझप पावले टाकत त्याच्या शेतावर पोहोचला.

रखरखत्या उन्हामुळे काळी आईला सर्वत्र भेगा पडल्या होत्या. त्याने दूरवर नजर टाकली तर उन्हाच्या तडाख्याने ओसाड पडलेली जमीन त्याच्याकडे भकास नजरेने बघत होती. त्याने मग वर आकाशाकडे बघितले. प्रत्येक बळीराजाला ज्या दिवसाची आतुरतेने वाट असते ते क्षण म्हणजेच  पाऊस  कधी पण येणार अशी लक्षणे दिसत होती.

"पाऊस कवा बी येईल असं वाटतूया, कारभारनीस्नी सांगून लौकर कामास्नी जुंपाया लागंल." तो स्वतःशीच पुटपुटला. 

काही क्षण तो तिथेच घालवून घराच्या दिशेने निघाला. तो घरी येताच बाहेर असलेल्या एका छपराच्या आडोशाला बसला. तेवढ्यात त्याची बायको हातात तांब्या धरून आली.

"काय ओ धनी, कुठ  गेलंतसा सकाळच्यानं?" रमेशची बायको पुष्पा त्याच्या हातात तांब्या देत म्हणाली.

"आपल्या शेताकडं गेलो हुतो, आता पाऊस कवा बी येईल बग, आपल्याला घाई कराया लागंल मंग" तो पुन्हा आकाशाकडे बघत पावसाचा अंदाज घेत होता.

"व्हय! तुम्हास्नी कसं ठाव ओ धनी पाऊस पडंल म्हनुन?" रमेश दरवर्षी असाच अंदाज घ्यायचा आणि त्याच्या अंदाजाप्रमाणे खरोखरच पाऊस यायचा त्यामुळे पुष्पाला आश्चर्य वाटायचे आपल्या नवऱ्याच्या या  अंदाजाचे. त्यामुळे तिने कुतूहलाने विचारले.

"सोपं गनित हाय बग! त्या तिकडं त्या झाडावर बग, काय दिसतयं तुला?" त्याने त्यांच्या दारापुढे असलेल्या झाडाकडे निर्देश करून म्हणाला. त्यामुळे त्याने ज्या दिशेने बोट दाखवले त्या दिशेने पुष्पा पण बघू लागली. 

"ते व्हय! ती तर घरटी हायत पक्ष्यांची?" तिने पण आपली हुशारी दाखवली.

"व्हय पण कोणत्या पक्षाची?" त्याने पुन्हा प्रश्न विचारला.

"काल तिकडं कावळा कावळीन दिसाया लागले हुते" तिने आठवूण सांगितले.

"त्याच्यापायीच मला समजतं बग समदं." तो खुश होत म्हणाला.

"म्हंजी?" न समजून तिने विचारले.

"आग माजी राणी." तो लाडिकपणे म्हणाला.

"इश्श! जावा तिकडं."  ती लाजून म्हणाली. तिच्या लाजण्याची त्याला खूप मजा वाटायची त्यामुळे तो अधून मधून तिची अशी खोडी काढायचा.

"बरं ऱ्हाईलं! आता म्या काय सांगतूया ते ध्यानात ठेव. जवा कावळा कावळीन आपली घरटी बनवाया घेतील तवा समजून जावा लौकर पाऊस येनार हाय." त्याने त्याचे गुपित सांगितले.

"असं व्हय! आता आलया माज्या ध्यानात." ती खुश होत म्हणाली. आता तिला चांगल्याने कळलं होतं की तिचा नवरा का ती घरटी बघून नेहमी खुश व्हायचा. 

थोड्यावेळ त्यांच्या गप्पा रंगल्या आणि ते दोघे शेतीची नांगरणी करण्याविषयी बोलत होतेच की पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर पडू लागले. दोघेही ते थेंब बघून आनंदले. हळूहळू पावसाची सर सुरू झाली. पुष्पा तर आनंदाने बाहेर निघून आपले दोन्ही हात पसरवून पहिल्या पावसाचा आनंद घेऊ लागली आणि रमेश तिच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळू लागला. किती दिवसांनी आसुसलेल्या धरणी मातेला पावसाच्या सरीने तिची तहान भागवून तृप्त करू लागली.

पाऊस काही वेळा पुरता येऊन निघून गेला. तरीही सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरले होते कारण आता त्यांना शेतीच्या कामाला लागणे गरजेचे होते. बळीराजा आता शेतातून आपले पीक घ्यायला सज्ज झाला होता. काळी आई पण सुखावली होती.

काही दिवस थोडा पाऊस येऊन गेल्यानंतर पुष्पा आणि रमेश त्यांच्या शेतावर नांगरणी करायला निघून गेले. त्यांनी बैलांना जुंपले आणि नांगरणीला सुरुवात झाली. काळी आई बळीराजाला सुखावण्यासाठी तिच्या छातीवर असंख्य घाव सोसत होती. दोघे एकमेकांच्या जोडीने काम करू लागले.

काम करून थकल्यानंतर पुष्पाने जेवणासाठी आणलेली ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा सोबत एक कांदा घेऊन दोघेही जेवण करू लागले.


"घे खा!" त्याने भाकरीचा एक तुकडा तिच्या तोंडापुढे करत तिला म्हणाला. 

"इश्श!" ती पदराने आपलं तोंड झाकत लाजली.

"अशी लाजतीस कशापायी? आजतोवर कधी घास चारला नाय व्हय तुला?" तो मिश्किलपणे हसत तिला विचारू लागला.

"असं नाय व धनी पर लाज वाटतीया." ती पुन्हा लाजू लागली.

"आता घे की लौकर, मला बी लई भूक लागलीया." त्याने तसं म्हणताच तिने कसंबसं लाजत त्याच्या हातातला तो तुकडा खाल्ला नंतर तिने पण तसंच लाजत त्याला पण भरवलं. भरवताना त्याने मुद्दाम तिच्या बोटाचा चावा घेतला आणि मिश्कीलपणे तिच्याकडे बघून हसू लागला.


जेवण झाल्यावर थोडा आराम करून पुन्हा ते त्यांच्या कामाला लागले.

असेच एक एक दिवस एकेक काम सुरू झाले. बऱ्यापैकी पाऊस येत असल्यामुळे बळीराजा सुखावला होता.  आधी नांगरणी करून त्यात सरी पाडून पेरणी करण्यात आली. 


जेव्हा धरतीचे उदर चिरून पहिलं अंकुर फुटले तेव्हा तर त्यांचे आनंद गगनात मावेनासे झाले. त्यांच्या मेहनतीला यश येण्याकडचे हे पहिले पाऊल होते.


नंतर त्यांना खत देणे, थोडा चांगला पाऊस पडल्यानंतर शेतात चिखल करणे नंतर पेरणी करणे असे अनेक मेहनतीचे काम ते करायचे. 


दिवसभर राब राब राबून संध्याकाळी घरी येऊन जेवण करून थकल्यामुळे लवकर झोपून जायचे आणि पुन्हा भल्या पहाटे उठून शेतीवर निघून जायचे.

आता ही रमेश पुष्पासारखी असंख्य शेतकरी लोकांची दिनचर्या होऊन बसली होती. शेतात काम करणारे लोक गुण्यागोविंदाने काम करायचे. 

दिवसा मागून दिवस जात गेले आणि पीक हळूहळू मोठे होऊ लागले. शेतातली बरीच कामे आटोपल्यामुळे पुष्पा घरी राहायची. रमेश मात्र दिवसभर शेतात राहायचा. कधी कधी रात्र पण सावधानी म्हणून शेतात राहायचा.

"कोन हाय?" पुष्पा घर काम करत असतानाच पाठीमागून येऊन कोणीतरी तिच्या डोळ्यांवर हात ठेवले त्यामुळे ती दचकली आणि तिच्या हातातील वस्तू जमिनीवर पडली.

"आग मी हाय, इतकी दिस झालीत लगीन हुन, माज्या हाताचा परशं वळखता नाय येत व्हय तुला?" तो लटक्या रागात म्हणाला.

पुष्पा आणि रमेशच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती पण अजूनही त्यांना एकही मुलबाळ नव्हते झाले पण रमेशने कधीही यासाठी पुष्पाला ना दोष दिला, ना तिच्यावर कुठली जोर जबरदस्ती केली, ना तिला दूषणे लावली. त्याचे आई-बाबा मात्र पुष्पाला वांजोटी म्हणून आपल्या मोठ्या मुलगा आणि सुनेकडे राहायचे.

ते दोघेही एकमेकांच्या सहाय्याने आनंदाने राहत होते. वर्षातील सहा महिने शेतात राब राब राबायचे आणि बाकीचे सहा महिने शेतामधून आलेल्या उत्पन्नात बाजारात योग्य भावाने विकून ते दोघेही आपल्या संसाराचा गाडा पुढे ढकलत होते.

"आव तसं नाय व धनी, म्या कामात हूते ना म्हनूनशानी समजलं नाय बगा पन आता समजलं बगा, काढू हात?" ती त्याच्या हातावर आपले दोन्ही हात ठेवत म्हणाली. तसं त्याने त्याची पकड आणखी मजबूत केली.

"नग नग, मी जवा काढीन तवा. आता माज्या संग चल." 

"कुठं?" तिने प्रश्न विचारला.

"परस्न ईचारू नगस, म्या चल म्हनतूया तर गप चलायचं." तो म्हणाला.

आता मात्र तिने एकही प्रश्न विचारले नाही. तो तिला घेऊन जाऊ लागला. वाटेत सगळे सुनसान होते कारण सगळे आपापल्या कामात व्यस्त होते त्यामुळे कुणीही त्यांना तसं जाताना बघितलं नव्हतं म्हणून तिला पण अंदाज आला नाही की ते कुठे जात आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्याने तिच्या डोळ्यावरून हात काढून तेच हात तिच्या कमरेत घालून तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून हळूच मान तिरपी करून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखू लागला.

ती अवाक होऊन समोर बघत होती. तिच्या चेहऱ्यावर अत्यानंद झाल्याचे भाव दिसत होते आणि समाधानाचे सुद्धा! कारण पुढे त्यांनी  दिवसाची रात्र करून , घाम गाळून मेहनत केली होती, त्या मेहनतीचे चीज झाले होते कारण पुढे  त्यांची हिरवीगार शेत वाऱ्यावर आनंदाने डोलत होती. जिथे नजर जाईल तिथे सगळीकडे हिरवळ दिसत होती. सगळी धरती हिरवे शालु पांघरूण नटली होती. ते बघून हे दोघे आनंदले आणि काळी माता असंख्य घाव सोसूनही बळीराजाच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधानाने हसली.

✍️ अश्विनी कांबळे
ठाणे विभाग


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//