अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 4

अमेयला सापडलेल्या हस्तलिखित ग्रंथात काय असेल?



अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 4

मागील भागात आपण पाहिले की कॉलेज फिल्ड ट्रिपवर अमेय गुपचूप निघून गेला. तिथे काही वेगळे निष्कर्ष सापडले. त्याबरोबर एका चिन्हाचा अर्थही समजला. जनाने दिलेले हस्तलिखित अमेयने बॅगेत ठेवले. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आवराआवर करून सगळे निघाले. तेवढ्यात जना अमेयजवळ आला,"जपून रहा. काळजी घेवा."

अमेयने त्याच्या हातावर थोपटले. सगळे गाडीत बसल्यावर विनय म्हणाला,"जना काय बोलला रे?"

अमेय हसला,"काही नाही. काळजी घे म्हणाला."

त्यानंतर प्रवास चालू झाला. सगळे मस्त गप्पा मारत चालले होते. दुपार झाली सगळ्यांना भूक लागल्याने एका ठिकाणी सगळेजण उतरले. तेव्हा अचानक अमेयला असे वाटले की कोणीतरी पाहते आहे.

त्याने बॅग बरोबर घेतली. सगळेजण गप्पा मारत मस्त जेवण करत होते.

तेवढ्यात एक मुलगा म्हणाला,"मी गाडीतून लोणचे घेऊन येतो."

तो गाडीजवळ गेला तेवढ्यात गाडीतून एक जण गडबडीत उतरला आणि पळू लागला. त्या मुलाने चोर चोर असा आवाज दिला. तेवढ्यात चपळाईने तो चोर त्याच्या साथीदाराच्या मोटासायकलवर बसून वेगाने निघून गेला. काही समजायच्या आत सगळे घडले.

जेवण टाकून सगळे परत आले. सगळ्यांच्या बॅगा,पैसे जिथल्या तिथे होते. फक्त इरावती मॅडमचा कॅमेरा गेला होता.


अमेय जरा घाबरला. जनाचे शब्द आठवू लागले,"काळजी घ्या."

तेवढ्यात मॅडम म्हणाल्या,"अरे भुरटा चोर असेल. हा लोणचे न्यायला आल्याने फक्त कॅमेरा घेऊन पळून गेला. चला जेऊन घ्या."


सगळेजण जेवायला बसले पण आता सगळे गप्प जेवत होते. प्रवास संपवून अमेय घरी जायला निघाला. आता घरी काय होईल याची त्याला काळजी लागली होती. तरीही तो धाडस करून घरी आला.

आजीने दार उघडले पण त्याच्याशी एकही शब्द न बोलता आत निघून गेली. अमेय दमला असल्याने गुपचूप खोलीत जाऊन बसला. इकडे निर्मलाताई अस्वस्थ होत्या पण रागावल्या असल्याने त्या काही बोलत नव्हत्या.

संध्याकाळी सुलभा घरी आल्यावर तिने अमेयला सांगितले,"आजी दुखावली गेली आहे. तू जाऊन माफी माग."

अमेय हळूच आजीच्या खोलीत गेला. तेव्हा निर्मलाताई आजोबांच्या फोटोसमोर उभ्या होत्या.

अमेय हळूच जाऊन उभा राहिला,"आजोबा,तुमच्या बायकोला समजवा. इतिहास रक्तात आहे आपल्या."

निर्मलाताई चिडल्या,"सांगा तुमच्या नाताला इतिहास रक्तात आहे हे कोणाला सांगतोस? मला ह्या निर्मला पटवर्धनला."

इतके बोलून आजी गप्प झाली. अमेय आजीला स्वतः कडे वळवत म्हणाला,"काय म्हणालीस? निर्मला पटवर्धन? जगभरातील प्राचीन लिपीवर लिहिणारी प्रसिद्ध लेखिका?"
आजी तू आहेस द निर्मला पटवर्धन?"

अमेय एकामागोमाग एक प्रश्न विचारत होता. निर्मलाताई शांत झाल्या,"अमेय,तुला सगळे सांगेल पण आता नाही. योग्य वेळ आल्यावर. मला कोणताही संदर्भ किंवा इतिहासातील काहीही विचारायचे नाही. ते सगळे खूप मागे पडले आहे."

अमेय हसला,"तुला वाटेल तेव्हा सांग. पण राग सोड ना आजी." दोघे आजी आणि नातू हसताना पाहून सुलभा आनंदी झाली.


अमेय त्या रात्री दमला असल्याने लगेच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्याने बॅगेतून जनाने दिलेले हस्तलिखित काढले. त्यात प्रत्येक पानावर वेगवेगळी चिन्हे होती. त्यातील काही तर अमेयला ओळखू येत होती. परंतु काही त्याला समजत नव्हती. त्याने हस्तलिखित नीट पाहिले असता ते अर्धेच असल्याचे लक्षात आले.


आता ह्याबाबत विनयची मदत घेण्यासाठी त्याने विनयला फोन करून बोलावले. विनयने नीट पाहिले तर यातही वेगवेगळ्या काळातील आणि संस्कृती मधील चिन्हे होती. विनयने काही चिन्हांचे अर्थ लावले."अमूल्य,ज्ञान,अज्ञात,देवता आणि मंदिर असे काही शब्द निघत आहेत यात."

विनयने सांगितले. कॉलेजची वेळ झाल्याने दोघेही हस्तलिखित कपाटात ठेवून निघून गेले. इकडे निर्मलाताई सकाळची कामे आटोपून बातम्या पहात होत्या.

" पुण्यापासून जवळ एका दुर्गम गावात युवकाचा विचित्र पद्धतीने मृत्यू." बातमी ऐकताच निर्मलाताई थबकल्या.

त्यांनी संपूर्ण बातमी ऐकली. एका विशिष्ट अज्ञात विषाने युवकाचा मृत्यू झाला. हे ऐकून त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. त्यांनी मनाशी काहीतरी निर्धार केला.


हस्तलिखिताचा अर्धा भाग कुठे असेल? बातमी ऐकून निर्मलाताईंनी काय निर्धार केला असेल?

वाचत रहा
अंधारलेल्या प्रकाशवाटा.

©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all