अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 11

खजिन्याचा शोध आता सुरू होणार आहे.

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 11
मागील भागात आपण पाहिले की नकाशाचा तिसरा तुकडा कुठे आहे ते समजले होते. निर्मलाताई आणि सुलभा दोघींनी अमेयला वाचवायला निघाल्या. इकडे स्नेहाने इन्स्पेक्टर मेघाची. मदत घेतली. आता पाहूया पुढे.


अमेय आणि विनय खजुराहो पहायला निघाले.

"विनय,आपल्याला खूप सावध राहावे लागेल. कारण प्रत्येकवेळी आपल्यावर हल्ला झाला आहे." अमेय सावधगिरी बाळगून बोलत होता.

सगळेजण मंदिर पहायला गेले. आता एवढ्या मोठ्या परिसरातून नकाशा शोधायचा कसा?

तेवढ्यात अमेयला आठवले,"पुरुष आणि प्रकृती म्हणजे महादेव आणि पार्वती."

दोघांनी सगळा परिसर पालथा घातला. शेवटी एकदाचे महादेवाचे मंदिर सापडले. त्यावर कोरलेली शिल्पे अतिशय बारकाईने पहात असताना अचानक विनयची नजर नंदीच्या शिल्पावर पडली. इथे नंदीचे डोळे वरच्या दिशेने होते. दोघे गुपचूप जाऊन नंदीजवळ बसले.

बरोबर वर पाहिले आणि दोघे हसले. अमेयने नंदीचे दर्शन घ्यायचा बहाणा करून त्याच्या कपाळावर असणारी कळ दाबली आणि पुढच्या क्षणी वर असलेल्या मूर्तीच्या हातातील दगड हलला. विनय हळूच तिकडे सरकला आणि त्याने गुंडाळी झेलली.

अमेय उठला तेवढ्यात त्याच्या पाठीला काहीतरी टोचले."गुपचूप आमच्या बरोबर चालायचं नाहीतर तुझा मित्र मेला म्हणून समज."

विनयच्या कानात एकजण बोलला. दोघेही पुढे चालू लागले. अचानक पुढून काही साधू येताना दिसले. अमेयने सूचक हसून इशारा केला आणि बम बम भोले करत दोघे साधूच्या पायावर वाकले.

तेवढ्यात अमेयने साधूच्या खांद्यावर असणारी भस्म भरलेली पिशवी वर उधळली आणि दोघेही पळत सुटले.

थोड्या वेळात एका ठिकाणी थांबून अमेयने स्नेहाला फोन लावला,"तुला एक इमेज सेंड करतो. तीनही तुकडे जोडून मला पाठव."

अमेय आणि विनय परत आले. तेवढ्यात इरावती मॅडमनी घोषणा केली,"आपल्याला उद्याच राजस्थानातील एका ठिकाणी जायला निघायचे आहे."

अमेय आणि विनय दमून बसले असताना अचानक विनय म्हणाला,"अमेय,आपण कुठे जाणार हे हल्ला करणाऱ्या लोकांना कसे समजत असेल? शिवाय आपल्याला जिथे जायचे तिकडे जाण्याचा योग बरोबर जुळून कसा येतोय?"

तेवढ्यात स्नेहाने इमेज सेंड केली आणि एक मॅसेज केला,"तुम्हाला ट्रॅक केले जात आहे असं मला वाटतंय."

तेवढ्यात निघायची तयारी सुरू झाली. इरावती मॅडमनी सगळ्यांना एकत्र केले,"मुलांनो,सरस्वती नदी लुप्त होताना एक संपूर्ण संस्कृती लयाला गेली. त्यातील अनेक अमूल्य रहस्य आपल्याला शोधायला मिळणार आहेत. आज रात्री आपण निघतोय."


अमेय आणि विनय रूमवर आले. तेवढ्यात शेजारून शुक शुक असा आवाज आला. अमेयने समोर पाहिले आणि तो ओरडणार एवढ्यात विनयने त्याच्या तोंडावर हात ठेवला.


"तुमचे मोबाईल,शूज,अंगावर असलेले सगळे दागिने काढून ठेवा आणि इकडे या." निर्मलाताई सांगत होत्या.

दोघांनी सगळे रूमवर काढले आणि ते आजीकडे धावले."आजी हे सगळे काय आहे? तू आणि आई इथे काय करताय?"


आजीने बॅग उघडली आणि त्यातून अच्युत बोस यांनी दिलेली डायरी बाहेर काढली.

"विनय,गेले आठ ते दहा वर्ष अच्युत अल्झायमरने आजारी आहे. पण ह्या डायरीत सगळे सूत्रबद्ध लिहिले आहे. फक्त त्याची शेवटची दोन पाने लिहायच्या आधी अच्युतवर हल्ला झाला. अच्युतला सूत्रधार माहीत होता. पण त्याला सांगता आला नाही."


विनय म्हणाला,"पण ते लिहू शकत होते ना?"

"त्याच्यावर नजर ठेवली जात होती." निर्मलाताई म्हणाल्या.

"आजी,हे नकाशाचे तीनही तुकडे जोडले तरी आम्हाला काही उलगडत नाहीय."
"इकडे आण.हे बघ." असे म्हणून आजीने नकाशा उलटा फिरवला आणि क्षणात नदी साकार झाली.

"पण आजी,आता नदी नाहीय."
"त्यावर उत्तर आहे आकाश." आजीने ठिकाण दाखवले.

तेवढ्यात आजीच्या डोक्याला पिस्तूल लावून इरावती मॅडम उभ्या होत्या. " अमेय, जर तुझे मित्र आणि आई जिवंत हवी असेल तर तू आणि तुझी आजी मला खजिन्यापर्यंत घेऊन चला."

अमेयला धक्का बसला. तेवढ्यात इरावतीच्या माणसांनी सुलभा आणि विनयला कैद केले.


मेघा मध्यप्रदेशात पोहोचली तोवर इरावतीने राजस्थान गाठले होते. राजस्थानात एका तांड्यावर तिने सर्वांना उतरवले. विनयने तिसऱ्या तुकड्याचा फोटो स्नेहाला पाठवला. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला.

"मेघा मॅडम हा फोटो आलाय. पण त्याचा अर्थ लावणार कसा?"

मेघाने तो फोटो स्वतः च्या मोबाईलवर घेतला आणि कुठेतरी पाठवला. थोड्या वेळात मॅसेज आला. मेघाच्या टीमने पुणे स्टेशनवर अमेयची हस्तलिखिते पळवणाऱ्या माणसाकडून पुढील सगळा प्लॅन जाणून घेतला होता.

आता फक्त त्याप्रमाणे गुन्हेगाराचा पाठलाग करायचा होता. तांड्यावर इरावती येताच एक हेलिकॉप्टर उतरले.

"वेलकम माया. गेले वीस वर्ष आपण घेत असलेला शोध आज पूर्ण होणार आहे."

इरावती हसली,"कम ऑन माया. गेली पाच वर्ष इरावती म्हणून जगत आहे. आता संपवा लवकर हे."

माया हसली,"बॉस येतील. चला यांना घेऊन खजिन्याकडे."


इरावतीचे काय रहस्य असेल? खजिना मिळेल का? अमेय सगळ्यांना वाचवू शकेल का? सूत्रधार बॉस कोण आहे?

वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all