अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 9

तिसरा तुकडा कोठे असेल?

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 9

मागील भागात आपण पाहिले नकाशाचा दुसरा तुकडा कुठे आहे ते मुलांनी शोधून काढले. अच्युत बोस यांना निर्मलाताईंनी शुद्धीवर आणले. मेघाने सागरचा मोबाईल आणि लॅपटॉप अनलॉक केला. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी स्नेहाने साडी घातली. गळ्यात खोटे मंगळसूत्र आणि सगळे दागिने घातले. बरोबर अमेय तिचा नवरा बनून जाणार होता.
स्नेहा नाटकी हसत म्हणाली,"अहो,ऐकलत का?"
अमेय चिडला,"स्नेहा, एकतर तू जगातली एकमेव मुलगी उरली तरी हे होत नसते."
स्नेहा म्हणाली,"असला आकडू नवरा मी कशाला करेल. छप्पन मिळतील असे."
भार्गवी समजावत म्हणाली,"हे बघा,आपल्याला सावध राहून काम करावे लागेल. तुम्ही भांडणे थांबवा आधी."

पाचही जण मंदिरात पोहोचले. मंदिरात गर्दी होती. स्नेहा पुजाऱ्याकडे गेली. गाभाऱ्यात जाणे शक्य नसल्याने बाहेरून पूजा करू द्यायची विनंती तिने केली. पाचही जण पूजेला थांबले. स्नेहा आणि अमेय बरोबर त्या जागेवर थांबले. तिथे अमेयच्या लॉकेटची डिझाईन कोरलेली होती.
स्नेहाने पटकन साडीचा पदर त्यावर टाकला. पुजारी पूजा करत असताना भार्गवीने लॉकेट अमेयकडून घेतले आणि त्या नक्षीवर ठेवले. दगड सरकल्याचा करकर आवाज झाला तेवढ्यात विनयने हातातील ग्लास खाली पाडला.
भार्गवी सावध होतीच. तिने पटकन हात घालून तिथली थैली घेतली आणि लॉकेट उचलले.


पूजा आटोपली आणि पुजारी म्हणाले,"प्रसादासाठी चला. इथे जवळच माझे घर आहे. महाप्रसाद घ्या आणि मग जा."

सगळेजण निघाले. एका बोळातील इमारतीत आल्यावर वरच्या मजल्यावर जेवायची सोय केलेली होती.

"मी आलोच जेवण सांगून."

तो बाहेर जाताच विनोद म्हणाला,"मला गडबड वाटते. इथून बाहेर पडा."

तेवढ्यात तो पुजारी परत आला."आम्हाला थांबायला वेळ नाही. आम्ही लगेच निघतो." अमेय गडबड करत होता.

" खबरदार,मंदिरात मिळालेली पिशवी द्या. नाहीतर गोळी घालेन."

आता सगळे घाबरले. त्याच्या हातात पिस्तूल होते. तेवढ्यात स्नेहाने चपळाई करुन हातातला तांब्या त्याच्या हातावर मारला आणि पिस्तूल खाली पडले. अमेयने पिस्तूल उचलले.

" स्नेहा ओढणी दे. विनोद आणि विनय त्याला बांधा."

सगळेजण वेगाने बाहेर पडले. ड्रायव्हरला हॉटेलवर तयार राहायला सांगून पळतच हॉटेल गाठले.

अमेय म्हणाला,"ह्या गाडीचा पाठलाग होणार. भार्गवी ड्रायव्हरला परत जायला सांग."

स्नेहा म्हणाली,"चला मी इंटर सिटी कॅब बुक केली आहे. दोन मिनिटात पोहोचेल."

दोन्ही गाड्या दोन दिशेला निघाल्या आणि मुलांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


मेघाने सायबर सेल गाठले. सागरला वारंवार फोन येणारे काही नंबर ट्रेस झाले होते. सागर अतिशय हाय प्रोफाईल किलर होता. सुपारी बिटकॉइन मध्ये स्वीकारली गेली होती. मेघाच्या डोक्यात कल्पना चमकली.

"मॅडम,ह्या ब्लॉक चेन वरून आम्ही पेमेंट पाठवणारा शोधला आहे."

मेघा ओरडली," नाव काय आहे?"

समोरून उत्तर आले,"मिसेस माया सबरवाल."

"काय? माया सबरवाल? द लेडी बिझनेस टायकुन." मेघा बाहेर आली.


माया सबरवाल खूप मोठे नाव होते. आणखी भक्कम पुरावा लागणार होता. पण आता तपासाला निश्चित दिशा मिळाल्याने मेघाने पुढील प्लॅन आखला.


तेवढ्यात मेघाला फोन आला,"काय? आर यू शुअर?"

मेघा हताश झाली. माया साबरवाल गायब होती. गेले चार दिवस ती गायब आहे. आज मिडियात बातमी फुटली होती.

मेघा आता अलर्ट झाली. तिने टीमला सूचना देऊन माया केव्हा? कशी आणि कुठे गायब झाली ते शोधायला सांगितले.


इकडे मुले पहाटे पुण्यात पोहोचली. स्नेहा म्हणाली,"अमेय,आपण पोलिसांची मदत घ्यायची का?"

"पोलिसांना आपण सगळे सांगितले तरी ते विश्वास ठेवतील का?" विनयने शंका उपस्थित केली.

सगळेजण आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरवून. अमेय घरी आला.
आजी एकदम शांत होती."विनयचे आजोबा शुद्धीत आले. त्यांना आज घरी सोडणार आहेत. आपण त्यांना भेटायला जाऊ. उद्या दुपारी तयार रहा."


सुलभाने अमेयला हाक मारली,"अमेय,पटकन फ्रेश होऊन ये. खायला देते."

अमेय आवरून आला,"आई,आजी एवढी शांत का झाली?"

सुलभा म्हणाली,"तू गेला तेव्हा दोन दिवस खोलीतून बाहेरच आल्या नाहीत. काल विनयच्या आजोबांना भेटून आल्या."

अमेय दिवसभर झोपून होता. उद्या डॉक्टर अच्युत यांना भेटायचे आहे. त्याने पटकन मित्रांना मॅसेज केला,"प्लॅन चेंज आजच संध्याकाळी भेटू."


तेवढ्यात कॉलेजच्या ग्रुपवर इरावती मॅडमची व्हाइस नोट दिसली. त्यांनी केंद्र सरकारला सादर केलेला प्रकल्प मंजूर झाला होता. त्यामुळे लवकरच मध्यप्रदेश आणि राजस्थान दोन्हीकडे उत्खनन करायची परवानगी मिळाली होती.


संध्याकाळी सगळे जमले. अमेयने नकाशा काढला त्यात खाली एक उघडा शंकू उलटा आणि त्यात एक त्रिकोण होता.

हे चिन्ह हस्तलिखित ग्रंथात कुठेही नव्हते. आता काय करायचे?

तेवढ्यात विनय म्हणाला,"ह्याबाबत उत्तरे देणारी मोजकी माणसे जगात आहेत. त्यातील एक नाव म्हणजे निर्मला पटवर्धन."

अमेय हसला,"विनय,तिथून काहीही उत्तर मिळणार नाही. बर आम्ही दोघे पुढचे पाच दिवस मध्यप्रदेशात जातोय. तिथून आल्यावर ह्या सगळ्यांवर विचार करू."

स्नेहा म्हणाली,"अमेय,हे सगळे स्कॅन करून ठेवते मी."


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विनय आणि अमेय निघणार असल्याने आता त्यानंतर भेटायचे सगळ्यांनी ठरवले.

अच्युत बोस घरी आल्यावर त्यांनी आधी विनयला बोलावले,"विनय,उद्या माझे काहीही बरे वाईट झाले तर तुला काही गोष्टी माहीत असाव्यात. त्या सगळ्या ह्या डायरीत आहेत."

डायरी ठेवलेली जागा त्यांनी विनयला दाखवली. त्या रात्री त्यांनी खूप गप्पा मारल्या.

सकाळी अमेय आजीला म्हणाला,"आजी,मला नाही जमणार यायला. संध्याकाळची तयारी करायची आहे."

आता आजी चिडेल असे त्याला वाटले. पण निर्मलाताई शांतपणे हो म्हणून निघून गेल्या.


माया सबरवाल आणि खजिन्याचा काय संबंध असेल? तिसरा तुकडा कुठे असेल? मुलांवर हल्ले कोण करत असेल?

वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all