अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 8

नकाशाचा दुसरा तुकडा कुठे असेल?



अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 8

मागील भागात आपण पाहिले की अमेय आणि त्याच्या मित्रांनी नकाशाचा पहिला तुकडा शोधला. निर्मलाताई अच्युत बोसला शुद्धीत आणायचे प्रयत्न करत आहेत. इन्स्पेक्टर मेघाला डॉक्टर बोस यांच्यावर हल्ला करणारा शूटर समजला. आता पाहूया पुढे.


आता कोल्हापूरला जाणार कसे? भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कारण घरी दोन दिवस सांगून आलेले सगळे.

तेवढ्यात भार्गवी म्हणाली,"मी मदत करेल पण मला बरोबर न्याल तरच. सध्या तसेही सुट्ट्या आहेत मला."

स्नेहा म्हणाली,"बोल लवकर. नेते तुला पुण्याला आमच्यासोबत."

दुसऱ्या दिवशी नाष्टा करताना भार्गवी म्हणाली,"आई, काल ना माझ्या स्वप्नात आजी आली होती."
तशा मामी पटकन म्हणाल्या,"अग बाई हो का? सासूबाईंचा फार जीव होता तुझ्यावर."
भार्गवी हळूच म्हणाली,"आई,आजी म्हणत होती माझ्या लेकीला भेटून ये."

इकडे सगळे गालात हसत होते. शेवटी आत्याकडे जाताना आजीच्या इच्छेनुसार महालक्ष्मी मंदिरातून प्रसाद म्हणून साडी न्यायची आहे अशी कथा रचून भार्गवीने परवानगी मिळवली.

मामा म्हणाले,"आपली गाडी आणि ड्रायव्हर न्या. म्हणजे मग तिथून पुढे पुण्याला लगेच निघता येईल."

सगळेजण गुपचूप नाष्टा करून तयारी करायला गेले.


मेघा आज सिव्हिल ड्रेस वर निघाली होती. एकदम साधा पंजाबी सूट,छान पोनिटेल आणि हातात एक पर्स.

ही पोरगी इन्स्पेक्टर आहे असे कोणीच सांगू शकले नसते. मेघा धनकवडी परिसरात पोहोचली. तिने इअर बड कानात टाकले आणि टीमला सूचना सुरू केल्या.
खबऱ्याने पाठवलेले लोकेशन संपूर्ण अभ्यासून तिने खोलीबाहेर बंदोबस्त लावला. अगरबत्ती पुडे घेऊन मेघाने कडी वाजवली.

" कोण आलंय मारयला." शिवा रागात दार उघडुन बाहेर आला.
समोर एक साधी पोरगी पाहून शिवा गडबडला.
"कोण पायजे? काय काम हाये?" त्याने कसेबसे विचारले.

आत सागर झोपला होता. मेघा हसून म्हणाली,"अगरबत्ती विकायला आले. घ्या ना प्लीज. वाटल्यास एक लाऊन दाखवू का?"

शिवाला बोलायची संधी न देता आत घुसून तिने अगरबत्ती पेटवली. बरोबर विसाव्या सेकंदाला शिवा कोसळला आणि सागर झोपेत बेशुद्ध पडला.

मेघाने बाहेर येऊन रोखलेला श्वास सोडला आणि टीमला बोलावले. दुसऱ्या क्षणी सागरला उचलून मेघा वेगाने बाहेर पडली.


पुण्यात निर्मलाताई गेले दोन दिवस काही गुप्त काम करत होत्या. आज सुलभा बँकेत जाताच त्यांनी दोन दिवस बांधून ठेवलेले मडके सोडले.

त्यातून तीन वनस्पतीचे कोंब बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जुना दगडी खलबत्ता घेतला. वनस्पतींचा अर्क काढला आणि तो व्यवस्थित एका बाटलीत भरला. त्यानंतर निर्मलाताई कॅब करून हॉस्पिटलला पोहोचल्या.

विनयची आई उशाला बसून होती.
निर्मलाताई म्हणाल्या,"जा तू चहा नाष्टा करून ये. तोपर्यंत मी बसते इथे."
विनयची आई बाहेर जाताच निर्मलाताई उठल्या. त्यांनी दार बंद केले. पर्समधून औषधी असलेली बाटली काढली आणि त्यातून हळूच दोन थेंब डॉक्टर अच्युत यांच्या तोंडात सोडले.

प्राचीन धन्वंतरीची ही दिव्य औषधी काम करेल असा विश्वास ठेवून निर्मलाताई बसून राहिल्या. थोड्याच वेळात विनयची आई परत आली. निर्मलाताई मुद्दाम गप्पा मारत बसल्या.

अचानक विनयच्या आईने पाहिले बाबांच्या बोटांची हालचाल होत आहे. त्यांनी डॉक्टरांना आवाज दिला. निर्मलाताई हळूच निघाल्या त्यांचे अर्धे काम झाले होते.


अमेय आणि त्याचे मित्र औरंगाबादवरून कोल्हापूरला जायला निघाले. वाटेत मजा मस्ती चालूच होती.
"कोल्हापूर मंदिरात नक्की कुठे असेल दुसरा तुकडा." स्नेहाने विचारले.
भार्गवी म्हणाली,"हस्तलिखित पुस्तकात काही मिळते का पहा ना?"
विनय हसला,"खूप वेळा पाहिले आहे आम्ही ते पुस्तक."
विनोद म्हणाला,"कोल्हापुरात परत एकदा पाहू . काय हरकत आहे?"
सगळ्यांनी तसे एकमताने ठरवले. जवळपास आठ नऊ तासांचा प्रवास करून कोल्हापुरात पोहोचले. मामांनी तिकडे मुक्कामाची सोय केलेली होतीच. मस्त आंबोळ्या खाऊन आणि चहा पिऊन सगळ्यांनी हॉटेल गाठले.
स्नेहा म्हणाली,"अमेय परत एकदा संपूर्ण हस्तलिखित पाहूया का?"

अमेयने हस्तलिखित आणि नकाशाचा तुकडा समोर ठेवला. सगळे परत एकेक पान पहात होते.

तेवढ्यात भार्गवी म्हणाली,"अमेय हे बघ. इथे दुसऱ्या तुकड्यात देवीच्या पायावर किरण दाखवला आहे."

"बरोबर,काही विशिष्ट दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीपर्यंत जातात." विनोद ओरडला.

अमेय लगेच प्रत्येक पानावर वर असलेली खूण पाहू लागला. "हे बघा इथे प्रत्येक पानावर एक विशिष्ट चिन्ह आणि त्यात किरण आहेत. हा मार्ग आहे सूर्य किरणांचा."

अमेय उत्साहात सांगत असताना भार्गवी ओरडली,"थांब,ह्या पानावर बघ. इथे किरण आहेच आणि त्या बरोबर चांदणी आहे."

सगळ्यांचे चेहरे उजळले. नकाशाचा दुसरा तुकडा समोर प्रांगणात होता. आता तिथून तो काढायचा कसा? विचार करून डोके चालेना तेव्हा सगळे रंकाळा फिरायला निघाले.


इकडे इन्स्पेक्टर मेघा सागर शुद्धीत यायची वाट बघत होती. सागर शुद्धीत येताच आपण तुरुंगात आहोत हे त्याला समजले.

समोर इन्स्पेक्टर मेघा पाहून त्याला समजले की पोलिसांनी आपल्याला कशासाठी आणले आहे.

"सागर,डॉक्टर अच्युत बोस यांना मारायची सुपारी कोणी दिली होती."

सागर कुत्सित हसला." तुला माहित आहे. माझे एन्काऊंटर केलेस तरी उत्तर मिळणार नाही. मग कशाला वेळ घालवते."

मेघा हसली,"तू नाही उत्तर दिलेस तरी माझ्याकडे अनेक मार्ग आहेत."

मेघा तिकडून निघून आली. तिच्या गुप्त कॅमेऱ्याने सागरच्या डोळ्यांचा स्कॅन करून त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल लॉक उघडले होते.


रात्रीचे जेवण करून सगळे मित्र हॉटेलवर आले. तोवर स्नेहाला एक प्लॅन सुचला होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी नकाशाचा तुकडा मिळवायचा सगळ्यांनी ठरवले.

काय असेल स्नेहाचा प्लॅन? मेघा सागरच्या मोबाईलमधून माहिती मिळवू शकेल का? अच्युत बोस पोलिसांना मदत करतील का?

वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा
©®प्रशांत कुंजीर


🎭 Series Post

View all