अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 7

नकाशाचा पहिला तुकडा सापडेल का?



अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 7

अमेय मित्रांच्या मदतीने संदर्भ शोधायला घेतो. इन्स्पेक्टर मेघा पुढील चौकशी सुरू करते. आता पाहूया पुढे.


अमेयने हस्तलिखित उघडले. त्यात अनेक चिन्हे होती.
"थांब मी चिन्हे स्कॅन करते. आपल्याला नेट वरून काही संदर्भ मिळतील." स्नेहाने असे म्हणून चिन्हे स्कॅन केली.

त्यातून काही संदर्भ उलगडू लागले. सरस्वती नदीच्या काठावर गुप्त झालेल्या जागेवर खजिना आहे. खजिन्याचा मार्ग असणारा नकाशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी आहे.

पहिला संदर्भ असा होता. काळा कातळ अखंड त्यात लपले राऊळ. फिरून बघा नीट मार्ग आहे तिथेच जवळ.

विनय म्हणाला,"अरे पण प्राचीन भारतात अशी अनेक दगडात कोरलेली मंदिरे आहेत. त्यातले कोणते मंदिर?"

तेवढ्यात विनोद ओरडला,"इथे बघा. आपल्या सहावीच्या पुस्तकात पशुपतीनाथ असे चित्र होते. तेच चिन्ह ह्या कोड्याच्या खाली दिले आहे."

अमेयने विनोदला मिठीच मारली,"अगदी बरोबर. पशुपतीनाथ म्हणजेच महादेव. स्नेहा गुगल इट."


स्नेहाने की वर्ड्स टाईप केले आणि उत्तर आले कैलास मंदिर वेरूळ.

विनय हसला,"अरे त्या एवढ्या भव्य मंदिरात कुठे असेल संदर्भ? कसा शोधणार?"

स्नेहा म्हणाली,"गाइज्,त्यासाठी तिथे जावे लागेल. कारण काय काढणार?"

सगळेजण गप्प झाले.

पोलिस स्टेशनमध्ये मेघाने डॉक्टर बोस यांच्या केअर टेकरला चौकशीला बोलावले.

"गणेश जाधव,राहणार क्रांतीनगर. घरी एक अपंग भाऊ, छोटी बहिण आणि आई. आता पटापट बोलायचे. डॉक्टरांना औषध खाऊ घालायचे किती पैसे घेतले?" मेघाने त्याला विचारले.

"मॅडम,मी काहीच केले नाही. डॉक्टर बोस माझ्या शिक्षणाचा खर्च करत होते. फक्त त्या दिवशी मी दोन तास उशिरा पोहोचलो. तोपर्यंत हे सगळे घडले."


सनकन एक जोरात कानाखाली बसल्याने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली.

"गुन्हेगारांना मदत म्हणून तू मुद्दाम उशिरा गेलास ना?"

तसे गणेश रडू लागला. "मॅडम,मला फोन आला होता. डॉक्टर बोस एवढंच म्हणाले की तू दोन तास उशिरा ये."

तोपर्यंत सायबर सेलने गणेशचा मोबाईल ट्रेस केला तो खरे बोलत होता.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अमेय सर्व आवरून आईला मदत करू लागला.
"बोला,काय हवे आहे?" सुलभा हसत म्हणाली.
"आई,स्नेहाच्या मामाच्या घरी औरंगाबादला जायचे आहे. सगळे जाणार आहेत. दोनच दिवसांचा प्रश्न आहे. तू समजाव ना आजीला."

सुलभाने त्याला आश्वासन दिले. थोड्या वेळाने निर्मलाताई देवपूजा करून आल्या.

"आई,लवकर या नाष्टा करायला. गरम थालीपीठ लावते. खाऊन घ्या लगेच."

थालीपीठ म्हणताच निर्मलाताई हसल्या. सगळे आवरून त्या नाष्टा करायला बसल्या.

सुलभा लोणी वाढताना पाहून गालात हसत म्हणाल्या,"कुठे जायचं आहे लेकाला?"

सुलभा गप्प झाली. मग अमेयने त्याला औरंगाबादला जायचे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आजीने सरळ होकार दिला. सुलभा जरा आश्चर्यचकित झाली. अमेय लगेच मित्रांना कळवायला पळाला.


इन्स्पेक्टर मेघाने खात्री केली की केअर टेकर खरे बोलतोय. त्याला सोडून दिल्यावर मेघा विचारात पडली. कोणताही ट्रेस लागत नव्हता.

त्यात पुन्हा डॉक्टर बोसना मारायचा प्रयत्न झाला होता. शार्प शूटर सापडू शकतो. हा विचार डोक्यात येताच मेघाच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

तिने सगळी यंत्रणा कामाला लावली. अमेय आणि सुलभा बाहेर पडताच निर्मलाताई घरातून बाहेर आल्या. अतिशय काळजीपूर्वक त्या एका ठिकाणी गेल्या. तिथे त्यांनी आवश्यक सामान खरेदी केले. घरी येताना त्यांच्या मनात निश्चिती होती.

अच्युतला शुद्धीवर आणायचा मार्ग आता सुकर झाला होता. तरीही आपला पाठलाग होत नाही ना याची त्या सतत खात्री करत होत्या.

स्नेहाने तिच्या मामाला दोन दिवसांसाठी फिरायला येतोय असे कळवले. तिकडे स्नेहाच्या मामांची मुलगी भार्गवीला विश्वासात घेऊन तिने सगळा प्लॅन समजावला.

भार्गवी म्हणजे इतिहासातील किडा. तिला याची अतिशय उत्सुकता लागली होती. दुपारपर्यंत चौघे स्नेहाच्या मामाकडे पोहोचले. भार्गवी प्रचंड खुष झाली. तिने सगळ्यांना चहा पाणी दिले आणि मग तिच्या खोलीत हे सगळे शोध कुठून घ्यायचा याचा विचार करू लागले.


"कैलास मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल." भार्गवी म्हणाली.

"आपण दोन टीम करू. एका टीम बरोबर भार्गवी,मी आणि विनोद तर दुसऱ्या टीममध्ये स्नेहा आणि विनय." अमेय म्हणाला.

"स्नेहा चिडली,"विन्या बरोबर मीच का? आम्या तू जा त्याच्या बरोबर."
भार्गवी म्हणाली."दिदी दोन्ही टीममध्ये प्राचीन भाषा वाचणारा एक माणूस पाहिजे."

मग स्नेहा गप्प बसली. तेवढ्यात स्नेहा म्हणाली,"प्रत्येकाने हे घड्याळ घाला. त्यात एक जीपीएस आहे. जर कोणाला काही झाले तर आपल्याला लोकेशन कळेल."

सगळी तयारी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन शोध घ्यायचा होता. मामा आणि मामी खोदून विचारत होते. तरीही कोणीही काहीच सांगितले नाही.


दुसऱ्या दिवशी पाचही जण पूर्ण तयारीने बाहेर पडले. प्रसिद्ध कैलास मंदिर जगप्रसिद्ध असल्याने प्रचंड गर्दीचे ठिकाण.

सगळीकडे अगदी बारकाईने पहात होते. जवळपास तीन तास होत आले. काहीच सापडत नव्हते. इतक्यात अमेय थांबला.

एका ठिकाणी अप्सरा कोरलेल्या होत्या. त्यातील फक्त एका अपसरेची केशरचना वेगळी होती. तिच्या अंबाड्यावर एक बारीक उंचवटा होता.

त्याने भार्गवीला इशारा केला. भार्गवी आणि विनोद कडेने उभे राहिले. अमेयने उंचवटा दाबला. मूर्तीचे पोट उघडले. अमेयने वेगाने आतली गुंडाळी घेतली आणि उंचवटा सोडला.

सगळेजण बाहेर पडले. इतक्यात अमेयला दोन जणांनी पकडले. त्यांनी अमेयची झडती घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात भार्गवीने पर्स मधून स्प्रे काढला आणि दोघांच्या डोळ्यात मारला.

अमेय भार्गवी आणि विनोद धावत बसकडे निघाले. स्नेहा आणि विनोदला फोन लावून वेगळे या असे सांगितले.

पाचही जण घरी पोहोचले. झालेला प्रकार ऐकून विनय म्हणाला,"कोणीतरी आपल्या मागावर आहे."

"याचा अर्थ याबद्दल आणखी कोणाला तरी माहीत आहे." स्नेहाने शंका उपस्थित केली.


अमेय मात्र शांत होता. त्याने गुंडाळी उघडली. त्याच्या खाली महालक्ष्मी देवीचे चित्र कोरलेले होते.

"पुढचा तुकडा कोल्हापुरात आहे." अमेय मोठ्याने म्हणाला.


मेघा घरी आली तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. मेघा झोपायला जाणार एवढ्यात खबऱ्याने मॅसेज केला. शार्प शूटर समजला होता.


दुसरा तुकडा कसा शोधतील अमेय आणि त्याचे मित्र? निर्मलाताई काय करणार आहे? शार्प शूटर काही माहिती देईल का?
वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all