अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 6

अमेयला खजिन्याचे रहस्य समजल्यावर तो काय करेल?



अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 6
मागील भागात आपण पाहिले की अच्युत बोस यांच्यावर हल्ला झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. इन्स्पेक्टर मेघा त्याबाबत तपास करत आहेत. तर निर्मलाताई अमेयला सगळे सांगायचे ठरवतात. आता पाहूया पुढे.


आजी काय सांगणार ह्या विचारांनी अमेयला झोप येत नव्हती. इकडे निर्मलाताई अस्वस्थ होत्या. जुन्या जखमा पुन्हा ताज्या होणार.

दुसऱ्या दिवशी सुलभा ऑफिसला निघून गेली आणि निर्मलाताईंनी अमेयला आवाज दिला. अमेय बाहेर आला.
निर्मलाताई म्हणाल्या,"तो समोरचा फोटो घेऊन ये."
अमेय फोटो घेऊन आला. त्यांनी अमेयला शेजारी बसवले.

" अमेय,ह्या फोटोवरील चिन्ह पाहून तू विचारायचा ही डिझाईन कसली. तर ही डिझाईन नाही. प्राचीन हडप्पा लिपीतील हे एक चिन्ह आहे. त्याचा अर्थ आहे राखणदार." असे म्हणून निर्मलाताईंनी त्यांच्या मानेवर कोरलेले चिन्ह दाखवले.

"आजी,हे असेच चिन्ह आम्ही ट्रीपला गेलो तिथे पाहिले आहे. कसले आणि कशाचे राखणदार?"

"अच्युत तुझ्याशी काही बोलला होता का?"
"हो, व्होलगा ते गंगा पुस्तक पाहून."
"काय म्हणाला सांगतोस?"
"ते म्हणाले,असेच घडले असे तुला वाटते का? आणि हडप्पा लिपीबाबत सुद्धा."
"अमेय,ह्या प्राचीन लिपी वाचू शकणारा एक गुप्त समुदाय आहे. मी,अच्युत,तुझे आजोबा त्याचे सभासद आहोत."
"पण मग तुम्ही सगळ्यांना हे का नाही सांगत. त्यामुळे इतिहास उलगडला जाईल."

"काही रहस्य काळाच्या उदरात गडप झालेली असतात. जातक कथा ऐकले आहेस ना? तर जातक हा प्राचीन भारतीय समुदायाचा प्रमुख होता. त्याने त्या काळी आलेल्या रोग आणि पुरांच्या संकटातून ज्ञान वाचावे म्हणून एक गुप्त समुदाय स्थापन केला. त्यांनी प्रचंड प्रमाणात हे सगळे सरस्वती नदीच्या किनारी लपवले. पुढे नदी लुप्त झाली. त्या मार्गाच्या खाणाखुणा इतिहासात लुप्त झाल्या."

"आजी,हे सगळे भन्नाट आहे. तुम्ही शोधायचा प्रयत्न नाही केला?"
निर्मलाताई हसल्या आणि त्यांनी फोटो उलटा केला त्या मागून एक हस्तलिखित काढले,"तुझ्या आजोबांचा जीव गमावून हे अर्धवट हस्तलिखित मिळाले आहे. त्यानंतर मी कधीच काही शोधायचा प्रयत्न केला नाही. परंतु एका आदिवासी राखणदाराचा मृत्यू आणि अच्युतवर हल्ला झाला. याचा अर्थ तो येतोय."
"कोण तो?"

"ते नाही सांगता येणार."

अमेय हसला,"आजी अग मग गुन्हेगार सापडणार कसा?"

"अमेय,फक्त एक वचन दे. तू या खजिन्यामागे जाणार नाहीस.गुन्हेगार पोलीस शोधतील"

अमेय फक्त हसला.

निर्मलाताई म्हणाल्या,"चल, अच्युतला भेटून येऊ."

दोघेही घराबाहेर पडले. तेवढ्यात स्नेहाने आम्हीही येत आहोत असे कळवले.


इकडे इन्स्पेक्टर मेघा फॉरेन्सिक डॉक्टर,फोटोग्राफर आणि सगळ्या टीमला घेऊन अच्युत बोसच्या बंगल्यावर पोहोचली. तिथला केअर टेकर आज हजर होता.

"साळुंखे,याला ताब्यात घ्या. सिक्युरिटी एजन्सीला फोन करून फुटेज मागवा."

मेघा भराभर सूचना देत परिसर पहात होती. झटापट झाल्याचे कोणतेही निशाण नव्हते. काहीही चोरी झाले नव्हते. मग एका वृध्द शास्त्रज्ञावर हल्ला कशासाठी झाला असेल?

तेवढ्यात फॉरेन्सिक डॉक्टरने सांगितले,"मेघा, यू हॅव अ बिग चॅलेंज,नो फूट प्रिंट्स ऑर फिंगर प्रिंट्स."


फोटोग्राफर सगळ्या अँगलने फोटो काढत होते. मेघा सगळा संग्रह पहात होती. प्राचीन भाषेतील अनेक ग्रंथ होते. पुस्तके पाहताना अचानक मेघा थांबली. एका शेल्फ मधील रचना थोडीशी हलली होती.

"डॉक्टर,चेक हियर."

तिथे तपासल्यावर एक वेगळ्या प्रकारची पावडर दिसली आणि डॉक्टरचे डोळे चमकले.

"लूक मेघा,ही पावडर कार्बन डेटिंग साठी वापरतात. कदाचित विशिष्ट कालावधी मधील गोष्टी शोधायचा प्रयत्न झालेला असेल."

तेवढयात फोनची रिंग वाजली. मेघा टीमला सूचना देऊन वेगाने हॉस्पिटलकडे निघाली.


निर्मलाताई आणि अमेय हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टर बोस अजूनही कोमात होते. विनयची आई प्रचंड घाबरली होती. डॉक्टर काहीही सांगायला तयार नव्हते.

इन्स्पेक्टर मेघा पोहोचताच डॉक्टर आले.

"इन्स्पेक्टर,त्यांच्या पोटात एक अतिशय दुर्मिळ वेगळा घटक मिळाला आहे. त्याचमुळे ते कोमात आहेत. वैद्यकीय इतिहासात असा द्रव पाहण्यात नाही. नक्कीच खाण्यातून दिले गेले आहे."

मेघाने रिपोर्ट ताब्यात घेतले आणि ती निघणार एवढ्यात तिने निर्मलाताईंच्या अंगावर झेप घेतली. दोघी जमिनीवर कोसळल्या आणि स्नीपर रायफलने झाडली गेलेली गोळी दरवाजात घुसली.

समोरच्या बिल्डिंग वरून हल्ला झाला होता. बंदोबस्त कडक करायच्या सूचना देऊन मेघा पोलीस स्टेशनवर पोहोचली.

"त्या डॉक्टर बोस यांच्या केअर टेकरला रिमांडमध्ये घ्या." आत शिरताना तिने ऑर्डर दिली.


इकडे अमेय आजीला घेऊन घरी आला. आजीला त्याने शांत झोपायला सांगितले.

आजी झोपलेली पाहून त्याने आजीचे अर्धे हस्तलिखित घेतले आणि दुसरे अर्धे हस्तलिखित घेऊन त्यातून संदर्भ शोधायला सुरुवात केली. त्याचवेळी त्याने स्नेहा,विनोद आणि विनयला बोलावून घेतले.


हस्तलिखित वाचून अमेयला संदर्भ सापडतील का? इन्स्पेक्टर गुन्हेगाराला पकडू शकेल का? अमेयचा जीव धोक्यात असेल का? इतिहासातील कोणता मार्ग सापडेल?

वाचत रहा
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all