अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 5

अच्युत बोस यांच्यावर कोणी हल्ला केला असेल?

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 5

मागील भागात आपण पाहिले की वाघोबा मंदिरात काढलेले फोटो असणारा कॅमेरा चोरीला गेला. अमेय हस्तलिखित घेऊन घरी आला. त्याने आजीची समजूत काढली. अचानक एक बातमी पाहून निर्मलाताई अस्वस्थ झाल्या. आता पाहूया पुढे.


अमेय आणि विनोद कॉलेजला पोहोचले. दोघे चालले असताना अचानक एका मित्राने हाक मारली,"शिंदे सरकार! थांबा जरा."

त्याची हाक ऐकली आणि अचानक अमेयच्या डोक्यात काहीतरी क्लिक झाले. " विनय,लायब्ररीत चल. आता लगेच."

दोघेही वेगाने कॉलेजच्या लायब्ररीच्या दिशेने निघाले. विनय चिडून म्हणाला,"काय हे अमेय? काय झाले तुला अचानक?"

अमेयने पटकन बॅगेतून एक कागद काढला. कागद हातात घेऊन विनय ओरडला,"हे तर आजोबांचे अक्षर आहे. काय लिहिले आहे रे? सोड जाऊ दे."

अमेय त्याला थांबवत म्हणाला,"पहिले वाक्य पेशवेकालीन सरदाराचा एक वंशज."

आता विनय आश्चर्यचकित झाला,"येस,शिंदे. महादजी शिंदे. त्यांचे वंशज म्हणजे तू?"

अमेय हसून म्हणाला,"मी नाही जयवंतराव शिंदे. पुढचे वाक्य बघ समुद्रावरून आलेला त्याचा मित्र."

विनय टाळी देत म्हणाला,"अच्युत बोस. द गाय फ्रॉम बेंगॉल."

अमेय हसून पुढे वाचू लागला,"त्यांना जोडणारी हिरकणी म्हणजे निर्मला पटवर्धन. माझी आजी."

विनय म्हणाला,"पुढे काय लिहिले आहे?" अमेय हळूच त्याच्या जवळ गेला आणि त्याने दोन्ही वाक्य कागदावर लिहिली. विनय म्हणाला,"चल,आता लगेच. आजोबांकडे जाऊ."

दोघेही वेगाने कॉलेजबाहेर पडले.

दोघे बाईक वर बसले. अर्ध्या तासात बंगल्यावर पोहोचले. बंगल्याच्या गेटजवळ कोणीच दिसत नव्हते. विनय गेटजवळ गेला.

" अमेय,लवकर ये. इकडे बघ."

अमेय पळत आला. वॉचमन बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत होता. अमेय आणि विनय सावध होऊन आत शिरले. मुख्य दार उघडे होते. नक्कीच काहीतरी घडले असणार. आतून काहीही आवाज येत नव्हता. सावध पावलांनी दोघे स्टडी रूम जवळ आले.

आजोबांच्या तोंडातून फेस येत होता. अमेय धावत गेला. त्याने नाडी तपासली.
"विनय डॉक्टरांना फोन लाव."
त्याने आजूबाजूला पाहिले कोणतेही सामान हलले नव्हते. दहा मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. कृत्रिम श्वास लावून अच्युत बोस यांना घेऊन डॉक्टर निघाले. तेवढ्यात पोलीस येऊन पोहोचले.

पोलिसांनी अमेय आणि विनय दोघांचे जबाब लिहून घेतले. दोघेही हॉस्पिटल मध्ये जायला निघाले.

"आई,विनयचे आजोबा हॉस्पिटलमध्ये आहेत. मी तिकडे जातोय."

सुलभा बोलायच्या आत अमेयने फोन ठेवून दिला.

सुलभा घरी पोहचली तर घराला कुलूप. दारावर चिठ्ठी,"चावी शेजारी आहे. काळजी करू नकोस."

सुलभा चावी घेऊन आत आली. इकडे हॉस्पिटलमध्ये विनय आणि अमेय दोघे पोहोचले. समोर आजीला बघून अमेय शॉक झाला.

तेवढ्यात निर्मलाताई पुढे आल्या,"विनय,मी तुझ्या आईला कळवले आहे. अच्युत इज अ टफ गाय."

तरीही मनातून त्या घाबरल्या होत्या. अमेय आजीकडे गेला,"आजी तुला कसे समजले."

निर्मलाताई हसल्या,"एस ओ एस मॅसेज वर अच्युतच्या मोबाईलवर माझा नंबर आहे. नेमका मी उशिरा पहिला तो. तेवढ्यात न्यूज चॅनेल वर बातम्या झळकत होत्या. त्या ऐकून थेट इथे आले."

डॉक्टर बाहेर आले,"पेशंटचे नातेवाईक कोण आहेत?"

विनय पुढे झाला,"मी नातू आहे त्यांचा."

डॉक्टर म्हणाले,"विनय,मज्जासंस्था निकामी झाल्याने ते कोमात आहेत. पण सध्या त्यांचे हृदय,मेंदू कार्य करत आहेत."

अमेय म्हणाला,"डॉक्टर अर्धांवायूचा झटका आहे का?"

डॉक्टर थोडे थांबून म्हणाले,"नो यंग मॅन. मी सुद्धा अशी केस पहिल्यांदा पाहतोय."

तोवर विनयची आई येऊन पोहोचली. सगळी व्यवस्था लावून अमेय आणि निर्मलाताई घरी जायला निघाल्या.


इकडे पोलीस हेड ऑफिस मध्ये कमिशनर गुप्ता चिडले होते."मेघाला बोलवा लवकर. अच्युत बोस हल्ला प्रकरणी थेट बंगाल चीफ मिनिस्टर कडून फोन आहे."

पुढच्या मिनिटाला इन्स्पेक्टर मेघा हजर झाली. हाय प्रोफाईल आणि गुंतागुंतीच्या केस म्हणजे मेघाचा हातखंडा. तिने डिटेल्स घेतले.

सत्तर वर्षे वयाच्या एका पुरातत्व शास्त्रज्ञाला कोणी का मारायचा करेल?
मेघाने टीमला उद्या सकाळी बंगल्यावर भेटू असा मॅसेज टाकला आणि गुगलवर नाव टाइप केले अच्युत बोस.


अमेय आणि निर्मलाताई गाडीत शांत बसून होते. निर्मलाताई सगळीकडे सावध नजरेने पहात होत्या. घर जवळ येताच त्या शांत झाल्या. घरात आल्यावर दोघेही गप्प जेवले.

निर्मलाताई म्हणाल्या,"अमेय,आता ती वेळ आलीय. तुला सगळे सांगायची. उद्याचा संपूर्ण दिवस रिकामा ठेव."


कोण असेल ह्या सगळ्या मागे? निर्मलाताई काय सांगतील? इन्स्पेक्टर मेघा शोधू शकेल का अपराधी?

वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all