Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 3

Read Later
अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 3

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 3

मागील भागात आपण पाहिले की अमेयचे लॉकेट चोरी करायचा प्रयत्न झाला. त्याबरोबर निर्मलाताई त्याला जपत कारण भूतकाळात होते. डॉक्टर बोस यांनी पुस्तकात पाली भाषेत लिहिलेले एक कोडे दिले. आता पाहूया पुढे.


दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजच्या ग्रुपवर इरावती मॅडमचा मॅसेज होता,"आपल्याला एका गावात फिल्ड ट्रीप करिता जायचे आहे. सर्वांनी दोन दिवस राहण्याच्या तयारीने यायचे आहे. खाली दिलेल्या यादीतील मुलांनी यावे."

अमेयने यादी तपासली. त्याचे आणि विनयचे नाव होते. सकाळी दहा वाजता निघायचे होते. एवढ्यात त्याचे लक्ष काल भाषांतर केलेल्या कोड्याकडे गेले. परंतु आता वेळ नसल्याने त्याने पटकन बॅगेत कागद ठेवून दिला.

आता मोठा प्रश्न होता तो आजीला तयार कसे करायचे? शेवटी त्याने सरळ आजीच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली. आईला मात्र गुपचूप सगळी कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी निर्मलाताई फिरायला बाहेर पडताच अमेय घरातून निघाला.


सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की जायचे कुठे आहे?

इरावती मॅडम आल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली,"आपण पुण्यापासून जवळच एका प्राचीन लेण्याचा अभ्यास करायला जातोय. तिथल्या स्थानिक लोकांच्या मते ते वाघोबा देवाचं ठाण आहे. परंतु काही हौशी छायाचित्रकार मित्रांनी पाठवलेले फोटो पाहून मला असे वाटते की तिथे काही वेगळी माहिती मिळू शकेल."

अमेय म्हणाला,"मॅडम,स्केच बुक आणि इन्स्ट्रुमेंट एका ठिकाणी ठेऊ का?"

इरावती मॅडम हसल्या,"अमेय, आपल्याला ह्या वेळी स्केच बुक बरोबर कॅमेरा लागेल."


सगळेजण प्रवासाला निघाले. पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एका खेडेगावात सगळेजण पोहोचले.

संध्याकाळचे पाच वाजले होते.

"ओ आजोबा इथे काही राहायची सोय होईल का?" अमेय मोठ्याने ओरडला.

ते आजोबा जवळ आले,"व्हईल की देवळात. चालल नव्हं?"

इरावती मॅडम खाली आल्या,"आजोबा मुली आहेत आमच्याबरोबर."

आजोबा म्हणाले,"चला माझ्या संग. तुमची समदी सोय जना करल."

मुले सगळे सामान घेऊन आजोबांच्या मागे निघाली. गावाच्या थोडे बाहेर एक घर होते.


"जना,आर ये जना!" आजोबांनी आवाज दिला.

समोरून वीस पंचवीस वर्षांचा काटक जना चालत आला.

मुलाचे चेहरे पाहून हसायला लागला,"तुमासनी वाटलं आसल जना नावाची पोरगी आसल."


त्यासरशी सगळे हसण्यात बुडाले. अमेय मात्र जनाकडे एकटक पहात होता. त्याच्या दंडावर कोरलेले चिन्ह त्याने पाहिले होते.पण नक्की कुठे ते काही केल्या आठवत नव्हते.तेवढ्यात जना म्हणाला,"माज्या म्हातारी बर हित पोरी थांबतील. आपून पोर पडू आंगणात."


विनय ओरडला,"काय? अंगणात? असे उघड्यावर?"

तेव्हा बाकीचे म्हणाले,"विन्या,घाबरतो काय? काही होत नाही उलट मजा येईल."

दुसऱ्या दिवशी सकाळी वाघोबा देवळात जायला निघायचे होते. अमेय मात्र सतत जनाच्या दंडावर असलेल्या खुणेकडे पहात होता.

सकाळी सगळ्यांनी आवराआवर केली आणि लवकर निघाले.

इरावती मॅडम म्हणाल्या,"जना,वाघ देव कसा रे?"

जना हसला,"बाई,ह्या वाघोबा मूळ तिथं चोर चिलट जात नसत्याल."

डोंगर चढून सगळे गुहेपाशी आले.
"सगळ्यांनी काळजी घ्या.टॉर्च असणारे पुढे व्हा." मॅडम सूचना देत होत्या.

आत एक दगड त्यावर शेंदूर होता. आणि पुढे आत गुहा होती.

मॅडम म्हणाल्या,"जना,आम्हाला आत जायचे आहे."

जना दचकला,"आजवर आत जास कुणी गेलं न्हाय."

इरावती मॅडम हसल्या,"चला टॉर्च वाल्यांनी पुढे व्हा."

भिंतीवर विविध चिन्हे कोरलेली होती.

सुपर्णा म्हणाली,"हे कसं शक्य आहे? इजिप्त,मेसापोटेमिया आणि सिंधू संस्कृती अशी वेगवेगळी चिन्हे आहेत भिंतीवर."

मॅडम निरीक्षण करत म्हणाल्या,"स्ट्रेंज,मी आधी असे कधीही पाहिले नाहीय."

अमेय भराभर फोटो घेत होता. अचानक त्याला जनाच्या दंडावर कोरलेले चिन्ह भिंतीवर दिसले आणि ते कुठे पाहिले तेही आठवले.

दिवसभर सगळे व्यवस्थित उतरवून सगळे परत फिरले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे होते.

अमेय मात्र संधी शोधत होता.
रात्री सगळे जेवण करून झोपल्यावर त्याने विनयला उठवले. दोघे हळूच जनाजवळ गेले.

अमेय म्हणाला,"जना,जरा बाजूला येशील?"

जना हळूच उठून आला,"काय झालं? कालपासन तुमी माझ्या गोंदणाकड बगताय."

अमेय हळूच बोलला,"हे. असेच चिन्ह माझ्या आजोबांच्या हातावर आणि त्यांच्या फोटोवर आहे. काय अर्थ आहे याचा?"

जना खुश झाला,"राखणदार. या माज्या मागणं."

जना त्यांना घेऊन एका मोठ्या झाडाखाली गेला. त्याने गुप्त कळ दाबली आणि झाडाच्या खोडातून एक भूर्जपत्रावर लिहिलेले हस्तलिखित काढले.


"हे तुमच्या आजोबांचं हाय. बास एवढंच मला ठाव हाय."

अमेयने हस्तलिखित घेतले. गुपचुप येऊन बॅगेत ठेवले आणि तिघेही झोपी गेले.


तीनही लिपीतील चिन्हे एका ठिकाणी कशी? राखणदार कशाचे? हस्तलिखितामध्ये काय असेल?

वाचत रहा
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//