अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 1

इतिहासाच्या सफरीवर नेणारा भन्नाट प्रवास



अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 1

कथा संपूर्ण काल्पनिक आहे.

निर्मलाताई पहाटे उठल्या आणि सवयीप्रमाणे हॉलमध्ये आल्या. पाहतात तर लाईट चालू आणि अमेयच्या तोंडावर पुस्तक पडलेले.

त्यांनी हळूच पुस्तक उचलून बाजूला ठेवले. राहुल सांकृत्यान यांचे \"व्होलगा ते गंगा\".

पुस्तक पाहून निर्मलाताई चिडल्या.
"अमेय उठ लवकर." त्यांनी अमेयला झोपेतून जागे केले.

आजीचा चेहरा पाहून अमेयने पटकन पुस्तक लपवले.

निर्मलाताई भडकल्या होत्या,"हजारो वर्षांपूर्वी कोण जगले आणि मेले त्याने काय फरक पडतो काय माहीत?"


अमेय गुपचूप उठून आंघोळीला गेला तेवढ्यात सुलभा बाहेर आली.
"झाला का आजी नाताचा प्रेम संवाद सुरू." तिने हसत विचारले.

"सुलभा,अग एवढा हुशार मुलगा. हे कसले खड्डे खोदण्याचे शिक्षण घेतोय? तू तरी आवर ना त्याला." निर्मलाताई संतापून बोलत होत्या.

" आई,अहो त्याच्या रक्तात आहे हे सगळ. आपण कितीही बांध घातला तरी तो तिकडे वाळणारच." सुलभा सासूला धीर देत समजावत होती.


तेवढ्यात अमेय आवरून बाहेर आला,"आई,आज फिल्ड स्टडी आहे. तर यायला थोडा उशीर होईल."

"आता कोणत्या माळरानावर जाणार आहात माती उकरायला." आजी चिडली होती.

"आजी,आज एका जुन्या पुरातत्व संशोधकांना भेटणार आहोत." अमेय वेगाने निघून गेला.

सुलभा आवरून बँकेत गेली आणि एकट्या निर्मलाताई घरात राहिल्या.


निर्मलाताई सगळे आवरून खोलीत आल्या. सावकाश जयवंतरावांच्या फोटोसमोर उभ्या राहिल्या. रुबाबदार,देखणे आणि मिश्किल जयवंतराव आणि निर्मला एकेकाळी लव्ह बर्डस म्हणायचे सगळे आपल्याला. किती भरभरून जगणे होते.

अशा आठवणीत रमत असताना अचानक निर्मलाताईंचा चेहरा कठोर झाला.

" ज्या मार्गावर मी माझा पती आणि मुलगा गमावला त्याच मार्गावर परत कोणाला चालू देणार नाही." एक कठोर निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


अमेय बाहेर पडला तेवढ्यात त्याला मॅसेज आला,"आज संध्याकाळी सीसीडी मध्ये भेटतोय आपण."

मॅसेज वाचून अमेयला आठवले आज स्नेहा,विनय, धिरज आणि विनोद सगळे भेटणार होते.

त्याने पटकन विनयला फोन लावला,"विन्या,आजची संध्याकाळची ट्रीट कशी मॅनेज करणार आपण."

विनय हसला,"आज आपण माझ्या आजोबांना भेटतोय. त्यांना काहीतरी कारण सांगून लवकर कलटी मारू."

सगळा प्लॅन फिक्स करून दोघांनी कॉलेजला भेटायचे ठरवले. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागात दोघे पदव्यूत्तर शिक्षण घेत होते.


अगदी बरोबर. जनरली इतरांना बोअर वाटणारा इतिहास हा विषय ह्या दोघांचा जीव की प्राण.

दोघांनाही घरून तशी परंपरा होती. दोघाचेही आजोबा प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ होते.



कॉलेजला आल्यावर प्राध्यापक इरावती जोशींनी लगेच सांगितले,"मुलांनो इतिहासाचा प्रवाह अनेकदा लुप्त होतो. तेव्हा त्याच्या बरोबर काही रहस्य लुप्त होऊन जातात.
ती पुन्हा शोधण्यात आणि मानवाच्या घडण्याची ही प्रक्रिया जाणून घेण्यात एक आनंद आहे.
तर मी पुढील आठवड्यात असाच एक आव्हानात्मक प्रकल्प तुम्हाला देणार आहे.
त्या आधी आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ श्री. अच्युत बोस यांना.
नाव बंगाली असले तरी ते पक्के मराठी आहेत. तर तयार रहा एका वेगळ्या अनुभवाला."


विनय हसून म्हणाला,"अमेय,आजोबांचे खूप वय झाले आहे. ते अनेकदा गूढ बोलतात. जास्त मनावर घेऊ नकोस."

दहा पंधरा विद्यार्थी आणि इरावती मॅडम डॉक्टर अच्युत यांच्या घरी पोहोचले.


अतिशय भव्य बंगला होता. सगळीकडे जुन्या ऐतिहासिक वस्तू होत्या. डॉक्टर अच्युत बोस विनयच्या आईचे वडील. इरावती मॅडमचे पी एच डी चे गाईड आणि जीवनातील मार्गदर्शक.

सगळी मुले प्रश्न विचारत होती. मस्त गप्पा झाल्या.

मग इरावती मॅडम म्हणाल्या,"सर,तुमचा संग्रह दाखवा ना मुलांना."

सगळेजण उठले आणि अचानक अमेयचा पाय अडकून तो पडला. बॅग विखुरली. बॅग भरत असताना डॉकटर अच्युत यांनी व्होलगा ते गंगा पुस्तक पाहिले.

त्यांनी ते उचलले आणि अमेयच्या हातात देताना म्हणाले,"तुला खरच वाटतं हे असच घडल असेल?"

तेवढ्यात मुले बोलावत असल्याने ते पुढे निघाले. त्यांच्या संग्रहात सिंधू संस्कृती मधील काही पुतळे होते. त्याखाली काही मजकूर होते.

अमेय काळजीपूर्वक पाहताना म्हणाला,"काय गुपित असेल यात? आता कोणीही उलगडू शकणार नाही काय लिहिले आहे?"

तेवढ्यात त्याच्या खांद्यावर सुरकुतलेला हात ठेवून डॉक्टर अच्युत म्हणाले,"इतिहास कधीच सगळ्या वाटा बंद करत नाही. गरज असते त्या शोधायची."

शेवटी भेट आटोपून सगळे बाहेर पडले.


मित्रांचे फोन चालू झाले होते आणि अमेयच्या मनात एकच वाक्य सतत गुंजत होते,"इतिहास कधीच सगळ्या वाटा बंद करत नाही. गरज असते त्या शोधायची."


डॉक्टर अच्युत काय सांगू इच्छित असतील अमेयला? इरावती मॅडम कोणता प्रकल्प मुलांना देतील? निर्मलाताई इतिहासाचा इतका तिरस्कार का करतात?


उलगडेल पुढील भागात.

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all