Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 10

Read Later
अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 10अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 10

मागील भागात आपण पाहिले मेघाने सागरला सुपारी देणारी व्यक्ती शोधली. परंतु ती गायब झाली. इकडे तिसऱ्या तुकड्याचे रहस्य काही सापडत नव्हते. आता पाहूया पुढे.


मेघाने चौकशी सुरु केली. मागच्या आठवड्यात एका पार्टीला गेल्यानंतर माया गायब झाली होती. तिने ताबडतोब पार्टीचे फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवून घेतले.

माया रात्री अकरा वाजेपर्यंत पार्टीत होती. त्यानंतर ती बाहेर पडताना दिसत होती. त्यानंतर माया गाडीत बसली आणि निघून गेली. यात काहीही वावगे दिसत नव्हते. मेघाने व्हिडिओ परत लावला.

ड्रायव्हरला पाहून माया फक्त दहा सेकंद थांबली होती.

"साळुंके माया सबरवालच्या ड्रायव्हरला लगेच बोलावून घ्या."

तोवर डॉक्टर अच्युत बोस यांच्याकडे चौकशी करण्यासाठी मेघाने बुलेटला किक मारली.


इरावती मॅडमनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सगळे विद्यार्थी पुणे स्टेशनवर पोहोचले. अजून अर्ध्या तासाने ट्रेन होती. सगळेजण गप्पा मारत असताना अचानक एक म्हातारे आजोबा त्यांचे सामान घेऊन अमेयच्या अंगावर आदळले. दोघेही खाली पडले.

"आजोबा उठा. कुठे लागले नाही ना तुम्हाला?" अमेयने आजोबांना आधार दिला.

आजोबांचे सामान नीट दिले आणि मग तो परत विनय बरोबर बोलू लागला.


सगळे ट्रेनमध्ये बसले. रात्रीचा प्रवास असल्याने सगळेजण घरून आणलेले डबे खाऊन झोपून गेले. तेवढ्यात अमेयला हस्तलिखित परत एकदा पहावे असे वाटू लागले. त्याने बॅगेत हात घातला आणि अमेयचा घसा कोरडा पडला. नकाशाचे तुकडे आणि हस्तलिखित गायब झाले होते.

"विनय उठ,लवकर उठ." अमेय कुजबुजला.

"काय यार? झोप ना निवांत." विनय चिडला.

"नकाशा आणि हस्तलिखित गायब आहे." अमेय परत हळू आवाजात म्हणाला.

त्याबरोबर विनय खाडकन जागा झाला."वेट,रेल्वे स्टेशनवरील म्हातारा. बट काळजी करू नकोस स्नेहाने सगळे स्कॅन केलेले आहे."

एवढे बोलून विनयने स्नेहाला फोन लावला.

"विनय यार झोपा ना गुपचूप."पलीकडून स्नेहा ओरडली.

"ऐक,तुला रेल्वे स्टेशन वरील फुटेज मिळवायचे आहे." विनय म्हणाला.

"काय? डोक्यावर पडलास का तू?" स्नेहा चिडली होती.

" तुला सगळे मॅसेज करून सांगतो." विनयने फोन ठेवून दिला.

निर्मलाताई एकट्याच डॉक्टर अच्युत बोस यांना भेटायला गेल्या. दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलले. जाताना डॉक्टर अच्युत यांनी आपल्याकडील एक नवीकोरी डायरी त्यांना भेट दिली.

निर्मलाताई फक्त म्हणाल्या,"काळजी करू नका. आपण सगळे नीट करू."

इन्स्पेक्टर मेघाने मायाच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले.
"त्या दिवशी तू पार्टीला का गेला नव्हतास? जर तू नव्हतास तर गाडी कोण चालवत होते? मायाच्या घरच्यांना हे कसे माहीत नाही?"
सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मग मात्र मेघा संतापली.
तिने थर्ड डिग्री वापरताच तो बोलायला लागला,"मला त्या रात्री माझ्या बदल्यात दुसरा माणूस द्यायचे पैसे मिळाले. त्यानंतर मी गाडीच्या डिकीत लपलो."

मेघा चिडली,"माया कुठेय? बोल लवकर?"

ड्रायव्हर घाबरून म्हणाला,"त्यांनी माया मॅडमना कुठे ठेवले आहे मला माहित आहे."

मेघाने पत्ता घेतला. सपोर्ट टीम घेऊन मेघा दिलेल्या पत्त्यावर निघाली. शहराबाहेर एका निर्जन बंगल्याजवळ आल्यावर ड्रायव्हर थांबला. बंगला संपूर्ण रिकामा होता. गुन्हेगार परत निसटले होते.

तेवढ्यात मेघाला गणेशचा फोन आला,"मॅडम लवकर या. अच्युत सर..."पोलीस व्हॅन वेगाने धावू लागली.


इकडे निर्मलाताई घरी आल्या. त्यांना अच्युतने दिलेल्या डायरी बद्दल काहीतरी खटकत होते. त्यांनी डायरी उघडली. संपूर्ण कोरी डायरी. पाने उलटताना त्यांच्या हाताला एक पावडर लागली. क्षणात त्याचे डोळे चमकले.

अच्युतने दिलेली माहिती वाचून त्यांनी सुलभाला फोन केला.
"लगेच घरी निघून ये. अमेयचा जीव धोक्यात आहे."


मध्यप्रदेशात उत्खनन सुरू करून दोन दिवस झाले होते. तिथे काही स्थानिक लोक मदत करत होते. काम करत असताना अचानक अमेयला शंकू आणि त्रिकोणाचे चिन्ह एका माणसाच्या हातावर दिसले.

"इस का क्या मतलब है|" त्याने विचारले.

" ये चिन्ह पुरुष और प्रकृती याने स्त्री मिलाप का प्रतीक है|" त्या माणसाने उत्तर दिले.

विनय चित्कारला,"अमेय,मैथुन चिन्ह आहे हे."

दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ओरडले,"खजुराहो!"


सुलभा धावत घरी आली. पाहते तर निर्मलाताई ट्रेकिंग कपडे आणि हत्यारे घेऊन तयार होत्या.
"काहीही विचारू नकोस. गाडी बोलावली आहे.आपल्याला अमेय पर्यंत पोहोचायचे आहे."


इकडे अमेय आणि विनय इरावती मॅडमची परवानगी घेऊन खजुराहो पहायला निघाले.


स्नेहाने पुणे रेल्वे स्टेशन वरील फुटेज चोरले. त्यातून तो म्हातारा शोधला आणि तिच्या लक्षात आले की अमेय आणि विनयचा जीव धोक्यात आहे.

तिने ताबडतोब विनोदला बोलावून घेतले,"विनोद,आता आपल्याला इन्स्पेक्टर मेघाला सांगावेच लागेल."

विनोद म्हणाला,"अगदी बरोबर. आपण लगेच जाऊया चल."


मेघा हॉस्पिलजवळ पोहोचली."साळुंके,डॉक्टर बोस कसे आहेत?"
"मॅडम,बोस आता ह्या जगात नाहीत." मेघा हताश होऊन खाली बसली.

शेवटचा दुवा निखळला होता. उदास मनाने मेघा परत पोलीस स्टेशनवर आली.

"गायकवाड,कडक कॉफी सांगा एक." मेघा शांत बसली.

"प्लीज आम्हाला आत जाऊ द्या. एकदा मॅडमना भेटू द्या." बाहेर आरडाओरड ऐकून मेघा बाहेर आली.

विनोद आणि स्नेहाला तिने आत बोलावले."बोला,काय काम आहे? छोटी मोठी चोरी असेल तर हवालदार गायकवाड करतील तपास."

स्नेहाने फोन उघडला आणि तिच्या समोर फुटेज ठेवले. "मेघा मॅडम आमच्या मित्रांना वाचवा."

मेघा प्रचंड आनंदी झाली. तिने स्नेहाला सांगितले,"सगळी माहिती मला द्या आणि घरी जा."

विनोद म्हणाला,"नाही,आम्हाला बरोबर न्याल तर आणि तरच माहिती देऊ. नाहीतर आमचे आम्ही जातो."

मेघा विचार करून म्हणाली,"ठीक आहे. पण तुम्हाला माझ्या बरोबर राहावे लागेल. आपण लगेच निघतोय. घरी फक्त सांगू नका. कारण मिडियात बातमी फुटली तर मिशन धोक्यात येईल."


तिसरा तुकडा सापडेल का? सगळ्यांचा सूत्रधार कोण असेल? निर्मलाताई आणि मेघा वेळेवर पोहोचतील का? खजिना नेमका कुठे असेल?

वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//