अंधारलेल्या प्रकाशवाटा अंतिम भाग.
मागील भागात आपण पाहिले की इरावतीने तिच्या गायब होण्याची गोष्ट मेघाला सांगितली. इकडे खजिन्यापर्यंत पोहोचायला सात योग्य चिन्हे निवडायची होती. आता पाहूया पुढे.
दोन्ही बॉडीगार्ड खाली कोसळले. त्याच क्षणी अवधुतने त्यांना गोळ्या घातल्या.
माया म्हणाली,"बॉस असे आपल्याच माणसांना का मारायचे?"
"माया,कमजोर माणसे बरोबर नेली तर काय होते बघायचे आहे? मग आजूबाजूला बघ. हे सगळे सापळे अशाच अपयशी लोकांचे आहेत. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर असे लोक अडसर आहेत." माया गप्प राहिली.
अमेय विचार करत होता त्याने सगळीकडे पाहिले. सात तारे,सप्तर्षी,सात पर्वत,सात खंड सगळे दिसत होते फक्त सप्तसिंधू दिसत नव्हत्या. हा विचार मनात येताच अमेयचे डोळे चमकले.
खाली असलेल्या चिन्हातील सात नद्यांची नावे असलेली चिन्हे निवडायची होती.
"कम ऑन यंग मॅन. बी क्विक." अवधूत ओरडला.
अमेय हसून म्हणाला,"आपल्याला सात जिवंत माणसे लागतील सात चिन्हावर उभे राहायला. आपण फक्त सहा आहोत."
तेवढ्यात इरावती ओरडली,"अवधूत अजूनही थांब. आजवर इथून कोणीच काहीही घेऊन जाऊ शकले नाही."
अवधूत जोरात हसला,"एकावर चार माणसे फ्री."
तेवढ्यात मेघा म्हणाली,"अवधूत,माझ्या गन पॉइंटवर आहेस तू."
"हे लेडी सिंघम. दमाने घे. नाहीतर अमेयचे डोके उडेल."
विनय पुढे आला,"डॅड का केलेस हे सगळे? काय हवेय तुला?"
अवधूत हसला,"मी तुझा बाप कधीच नव्हतो. मी फक्त त्या खजिन्यासाठी म्हाताऱ्याच्या विधवा पोरिशी प्रेमाचे नाटक केले. तुझ्या खऱ्या बापाला संपवून मग मी माझा डाव टाकला."
विनय चिडला,"तुला सोडणार नाही. इथून बाहेर गेल्यावर."
"इथून बाहेर फक्त आम्ही जाणार. तुम्ही सगळे इथेच मरणार." अवधूत क्रूर हसला.
माया चिडली,"अवधूत आता हा डेली सोप नंतर करू. चल अमेय पटकन चिन्हे निवड."
इरावती म्हणाली,"अमेय मी एकेक चिन्ह सांगते. त्याप्रमाणे आपण एकेकजण पुढे जाऊ."
इरावती एकेक चिन्ह सांगत होती त्यानुसार एकेकजण चिन्हावर थांबत होता. शेवटी अमेय तिथे पोहोचला. त्याने पाहिले तर तिथे फक्त एक चौकोन होता आणि त्यात काही अक्षरे होती.
अमेय जोरात ओरडला,"इरावती मॅडम इथे चिन्हे नाहीत. अक्षरे आहेत."
निर्मलाताई म्हणाल्या,"अवधूत मला जाऊ दे. मीच जगातील जवळजवळ सर्व प्राचीन लिपी वाचू शकते."
अवधुतने त्यांना पुढे जाऊ दिले. निर्मलाताई अक्षरे वाचू लागल्या. परंतु अर्धा भाग वाचल्यावर त्या थांबल्या.
"घाई कर,लवकर वाच. नाहीतर ह्या सगळ्यांना गोळ्या घालेल."
निर्मलाताई म्हणाल्या,"पुढील अर्धा भाग वेगळ्या लिपीत आहे. तो मी वाचू शकत नाही."
तेवढ्यात विनय म्हणाला,"आजी,त्याचे उत्तर ह्या डायरीत आहे. माझे आजोबा आणि विनयचे आजोबा दोघांनी त्या काळातील काही स्थानिक लिपी शोधून काढल्या. पण तू नंतर इतिहास ह्या विषयातून अंगच काढून घेतले. आजोबांनी ते जाण्यापूर्वी मला ही डायरी दिली."
अवधूत चिडून म्हणाला,"म्हातारा मला ओळखू नये म्हणून त्याला विस्मरण व्हायची औषधे देत होतो. तरीही त्याने शेवटी मला चकमा दिलाच."
विनयने पुढे येऊन उरलेला अर्धा भाग वाचला. त्याबरोबर दरवाजा उघडला आणि समोर होता तो अनमोल खजिना. सोने, नाणी अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि गुप्त विद्यांचे रहस्य.
माया पटकन एका सोन्याच्या सिंहाच्या मूर्तीसमोर उभी राहिली आणि तिने मूर्तीला हात लावताच मूर्तीचे तोंड उघडले. माया पटकन खाली वाकली आणि मागे असलेला बॉडीगार्ड मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडलेल्या रहस्यमय वायूने मृत्यू पावला.
अवधूत प्रचंड खुश झाला. "गेले वीस वर्षे केलेले प्रयत्न सफल झाले. आता मी सर्व शक्तिमान होणार."
तेवढ्यात मायाने त्याच्यावर बंदूक रोखली."अवधूत माझे सगळे आयुष्य पणाला लावले आहे मी. खजिना माझाच होणार."असे म्हणून मायाने त्याच्या पायावर गोळी घातली.
त्याचक्षणी एका राहिलेल्या बॉडीगार्डने मायाच्या कपाळात गोळी मारली. तोवर मेघाने त्या बॉडीगार्डला शूट केले.
"पाहिलेस अवधूत. हे कारण आहे इथून कोणीच परत न जाण्याचे. लालच आणि ईर्ष्या. जर हे ज्ञान खुले झाले तर त्याचा प्रचंड दुरुपयोग होईल. त्यामुळे हे राखणदार सदैव ह्या खजिन्याची रक्षा करत असतात." इरावती म्हणाली.
तेवढ्यात अवधूत एक ग्रंथ घ्यायला उठला आणि त्याचक्षणी विनयने त्याला गोळी घातली.
निर्मलाताई म्हणाल्या,"इथले ग्रंथ इथेच राहू द्या. फक्त काही कलाकृती घ्या. म्हणजे ह्या खजिन्याचा शोध थांबेल आणि तुम्ही असाल ह्या सगळ्या खजिन्याचे नवे राखणदार."
असे म्हणून निर्मलाताईंनी तिथून एक ग्रंथ उचलून इरावतीच्या हाती दिला. त्यात इतर अनेक अमूल्य खजिन्याची माहिती होती.
काही मौल्यवान मूर्ती आणि रत्ने घेऊन सगळे बाहेर आले. प्राध्यापक इरावती म्हणाल्या,"इतिहास कधीच सगळ्या वाटा बंद करत नाही. फक्त त्याचा शोध घ्यावा लागतो."
इतिहासावर आधारित ही रहस्य कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा