अंधारातील गोष्ट ( भाग एक )

अंधारात केलेल्या दुष्कर्माची शिक्षा अंधारातच मिळायला हवी.


अंधारातील गोष्ट ( भाग एक )

अंगावरची फाटलेली वस्त्र सावरत ती ओक्साबोक्षी रडत घरी परत आली. तिचे कपडे फाटलेले होते. कितीतरी जखमा झालेल्या होत्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आल्या आल्या तिने स्वतःला पलंगावर लोटून दिलं. सर्वस्व हरपल्या सारखं ती उन्मळून भेसूर आवाजात रडत राहिली.

आपला आधीचा प्रियकर असलेला आणि आता सात जन्म म्हणून सोबत देणारा नवरा असताना आपल्या सोबत अशी गोष्ट घडावी आणि त्याने साधा प्रतीकार देखील करू नये. याचा तिला आधी खूप राग आला. नंतर अक्षरशः किळस आली.

भले  त्याने त्या गुंडांना पळून लावलं नसतं.तो जिंकला नसता तरी चाललं असतं. पण त्याने लढायला हवं होतं. प्रतिकार करायला हवा होता. पण तसं झालं नव्हतं. आपल्या बायकोला कोणी ओढून नेते आहे तरीही काहीही न करता तो नुसताच बुळ्या सारखा , अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर षंढ माणसासारखा गप्प राहिला. अशा माणसासोबत आता आयुष्यभर राहायचे आहे या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला.

तिला त्या अवस्थेत पाहून त्याला काय करावे ते सुचत नव्हते. तो नुसताच बघत राहिला. हळूहळु तिचं रडणं कमी झालं. नुसतीच ती मुसमुसत राहीली.

थोड्यावेळाने उठून ती बाथरूम मध्ये गेली. तोंडावर तिने पाण्याचा शिपकारा मारला. बाथरूम मधल्या आरशात तिला तिचं कुंकू अस्ताव्यस्त झालेलं कपाळ दिसलं. पुन्हा तिला खूप जोरात रडावं असं वाटलं पण तिने आपले ओठ अगदी रक्त येई पर्यंत दातांखाली दाबले. आपला हुंदका दाबून टाकला.

ती बाहेर आली. तो नुसताच बसून होता. दोघंही एकमेकांना टाळत होते.

काही न बोलता तिने कपडे आवरायला आणि बॅग भरायला सुरुवात केली. त्याला काय बोलावे तेच समजत नव्हते.

खरं तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला रात्रीच्या शो ला गेली होती. जातांना त्याने तिच्या केसात गजरा माळला होता.हसत हसत दोघं गेले होते आणि येतांना असा भयानक प्रकार झाला.

खेळ संपल्यावर दोघांनी एक रिक्षा पकडली. रिक्षात बसतांना शक्यतो सहसा कोणी नंबर वगैरे पाहून बसतं नाही. तसचं त्यांनी देखील येईल त्या रिक्षाला हात दिला. जी थांबली त्याला पत्ता सांगून आत बसले.

कॉलेज पासून दोघं एकमेकांवर प्रेम करत होती. दोघांच्या घरचे समजूतदार असल्याने आणि दोघेही एकमेकांना अनुरुप असल्यामुळे तसा त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला कोणी विरोधच केला नाही.

बघता बघता एक वर्ष होवून गेलं होतं. दोघं एकमेकांवर अतोनात प्रेम करत असतं. एकमेकांना जीवापाड जपत असतं. अगदी नजर लागण्या सारखा त्यांचा राजाराणीचा संसार सुरू होता. भरीत भर म्हणून की काय आठ दिवसापूर्वीच तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझीटिव्ह आली होती.

अत्यंत तृप्त मनाने आणि आनंदाने तिने डोळे मिटून त्याच्या खांद्यावर डोके टेकवले होते. तिच्या भुरभुर उडणाऱ्या तो अलगद दूर करत होता. त्यालाही त्याच्या भाग्याचा हेवा वाटत होता.

पण त्या दोघांना पूढे येणाऱ्या संकटाची अजिबात कल्पना नव्हती.

( क्रमशः )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all