लघुकथा
विषय :आणि ती हसली
शीर्षक : तिचं मुकं प्रेम
@सौ वृषाली प्रकाश खटे
मालती ही एक अल्पभूधारक शेतकरी महिला .तिच्याकडे थोडी फार जमीन आहे .शेतात राबणारा ती एकटीच आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा धनी साधारण आजाराने मरण पावला होता . गळ्यात एक 5 वर्षाची पोर अदिती व 8 वर्षाचा मुलगा आदित्य आणि दारिद्र्य घेऊन ती दिवस कंठत होती. तसा तिचा स्वभाव देवभोळा होता . गावातील मंडळी तिला बरेचदा मदत करत .शेजारणी तिच्या मुलाकडे लक्ष देत , आजारपण ही पाहत .मालती स्वभावाने खूप मधाळ होती त्यामुळे तिला गावातील स्त्रिया मदत करायच्या .पुरुषापासून ती जरा लांबच राहायची. शक्यतोवर ती पुरुषांची मदत घेणे टाळायची. पुरुषांची जात कधी त्रास देईल सांगता येत नाही .त्यामुळे त्यांच्यापासून दूरच बरे हे तिचे तत्व होते .पण शेतातील कामासाठी पुरुष मंडळीच लागायचे .मग अशावेळी ती सखाआबाला कामाला सांगायची. मुलगा गावातील शाळेत जायचा. मुलगी मात्र तिच्यासोबत राहायची .घरी , दारी , शेतात सगळीकडे सोबत असायची .गावातील बैल भाड्याने सांगून ती शेतातील कामे करून घ्यायची. तालुक्याच्या ठिकाणी जायचे असले की मुलाला सोबत घेऊन सामान वैगरे घेऊन यायची.तशी ती स्वयंसिद्ध होती .तिच्या कडे आणखी एक प्रेमाचं माणूस होत ते म्हणजे तिची मधु नावाची गाय .मधूचा जन्मपण मालतीच्या घरचाच . मधूची आईपण मालती कडेच होती पण धन्याच्या आजारात तिला विकलं आणि दवाखान्यात धन्याला पैसा लावला. तरी काही फायदा झाला नाही .नवरा गेल्याने मालती व आई गेल्याने मधु दोघीही एकट्या पडल्या होत्या .पण या वर्षी मधूने एका वासरिला जन्म दिला होता. तिच्या रंगामुळे मुलांनी तिचे नाव ढवळी ठेवले होते . त्यामुळे दूधदुभत्याची कमी नव्हती. दूध विकून जरा पैसा हाताशी येत होता त्यामुळे मुलाला लागणाऱ्या वह्या पेन किंवा खाऊ विकत घेता येत होता.
सकाळी उठून ढवळी सोबत खेळणे हा मुलांना छंद लागला होता. ढवळीला मधु चाटत असे... तिच्या कडे बारीक लक्ष देत असे. ढवळी च्या मागे मागे मधु सतत राहत असे कदाचित तिचं मातृत्व ती अनुभवत होती. मधु जरी गाय होती तरी मालती तिच्या मनातील सर्व भाव जाणयची . एवढं पक्के नाते त्या दोघींमध्ये होतं. ढवळीला कोवळा पाला आणणे, पाणी पाजणे ही कामे मुले आनंदाने करायची.
रोज शेतात जाताना मधु , ढवळी , मालती व तिची मुलगी अदिती असे चौघी जात असायच्या .या वर्षी शेतातील पेरण्या आटोपल्या होत्या .एखाद्या महिन्यात पीक कापणीला येणार होत. मुलगा आदित्य खूप समजूतदार होता परिस्थितीचं ओझं पेलता पेलता तो प्रौढ झाला होता. कधी कोणता हट्ट नाही की मागणी नाही . मुलगी अदिती मात्र कधी कधी खूप रडायची . तिला समजावने कठीण जायचं . तिचा एकच हट्ट असायचा ....माझा बाबा कुठे गेला.अदिती हट्टाला पेटली की सगळा गाव हळवा होत असे . कुणी तिला चॉकलेट देई ....तर कुणी बाहेर फिरवून आनायचा ... पण ती काही रडणे थांबवायची नाही शेवटी रडून रडून झोपी जात असे .
मालती एक दिवस शेतातून घरी येत होती. मालतीच्या एका हातात आदीतीचा हात व दुसऱ्या हातात कामावर न्यायची थैली होती .तिच्या मागे मधु व ढवळी येत होते. रस्त्याने घरी जाणाऱ्याची वर्दळ होती. कामावरील बाईमाणसे लगबगीने घराकडे निघाले होते. अचानक एक कार जोराने आली आणि ढवळीला धडक देऊन पुढे जाऊन थांबली. मालती व अदिती मागे वळून पाहू लागले तर ढवळी खाली पडलेली होती तिच्या पायाला खूप लागले होते . तिच्या पायातून रक्त निघत होते. ढवळी जोराने हंबरत होती. मधु तिच्या जवळच होती . मालतीपण धावतच ढवळीजवळ गेली तिला पाहू लागली .
तेवढ्यात कार मधून एक तीसेक वर्षाचा माणुस उतरला आणि मालतीकडे येऊ लागला. आजूबाजूला येणाऱ्याजाणाऱ्याची गर्दी जमू लागली . जो तो ढवळीला किती लागले पाहू लागला. अदिती तर ते रक्त पाहून रडायलाच लागली. गाडीमधील माणूस जवळ येताच मालतीवर रागावायला लागला. अद्वतद्व बोलायला लागला..
तो म्हणाला : " ए बाई आपली गुरेढोरे व्यवस्थित सांभाळत जा न .... बघ तुझी वासरी माझ्या गाडीच्या मधात आली आणि त्यामुळे माझ्या गाडीचे किती नुकसान झाले ....मला माझ्या गाडीच्या दुरुस्ती चा खर्च दे "
मालती: "अहो दादा माझी वासरी सरळ रस्त्याने चालली होती ....तुमची गाडी खूप जोरात होती भाऊ .... उलट माझ्या वासरीला किती लागलंय ते पहा तसे पाहता तर तुम्ही मला पैसे द्यायला हवेत ...."
तो म्हणाला : "ए बाई डोकं फिरल का तुझं ....माझी चुक नाही .....तुझी गाय मधात आली ....चूक तुझी आहे."
मालती : "दादा असं म्हणू नका ....माझं रोजच्या जीवनाचा आधार आहेत ह्या दोन गाई .... मला निदान वासरीला उठवण्यासाठी व दवाखान्यात नेण्यासाठी मदत करा."
पण तो उद्धट माणूस पैसे मागून त्रास द्यायला लागला. शेवटी गावातील लोकपण मधात बोलले . पण तो माणूस दारू पिऊन आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले .गावांतील लोकांनी तिला त्या माणसाशी जास्त बोलू दिले नाही. गावातील लोकांची वाढती संख्या पाहता त्याने पळता पाय घेतला. तो निघून गेला. पण ढवळीची तब्येत फार खराब वाटत होती तिला पाय उचलता येत नव्हता . पडलेल्या ठिकानावरून ती हलत नव्हती ....आणि खूप विव्हळत होती ....मधु तिच्या आजूबाजूला अस्वस्थ फिरत होती .कधी तिच्या अंगावरून जीभ फिरवत होती तर कधी तोंडाने तिला हलवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करत होती. ढवळी काही जागची हलेना. शेवटी सखा आबांनी बैलगाडी आणली तिला ढकलून गाडीत चढवले आणि अंगणात उतरविले. या कामी तिला गावातील स्त्रीपुरुष सगळ्यांनी मदत केली .तिला गाडीत टाकले तेव्हापासून तर घर येईपर्यंत मालती सतत रडत होती .....आता काय करावे... तिला कसे बरे करावे याच प्रश्न होता . दवाखान्यात दाखवावे लागणार.... पैसे लागतील... असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात भुंगा घालून राहिले होते .
इकडे आदित्य आईची वाट पाहत होता. आज आईला उशीर का झाला याच विचारात होता .आई ,अदिती रडतांना पाहून जखमी वासरीला पाहून त्याने पण रडणे चालु केले . शेजारीपाजारी आपापल्या घरी गेलेत आता फक्त सखा आबा आणि तिची मुलं होती.सखाआबा यांनी काही औषधी आणून दिलीत. काही उगाळून द्यायची लेप आणलीत .आबांनी तिची जखम धुतली त्याला गावठी औषधे लावलेत. काही झाडांच्या पानांनी जखम बांधून घेतली. मालतीला औषधे सांगितली आणि आबा पण निघाले. मालतीला स्वयंपाक करावंसं वाटत नव्हता पण मुलांसाठी तिने खिचडी टाकली. मुलेही थोडीफार जेवलीत आणि झोपी गेलीत. रात्रभर मालतीच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते. मन पैशाची जुळवाजुळव करत होतं. उद्या डॉक्टरला गाठायचे असे ठरविले आणि ती झोपी गेली.
सकाळी उठल्यावर मालती व तिच्या पाठोपाठ मुले गायीच्या गोठ्यात गेलीत. ढवळी मान खाली टाकून झोपली होती. रक्ताचं तळ खाली साचलं होतं. तिच्या आणि मधूचा डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे हाल पाहून मुलं रडवेला झालीत. मालती मधूच्या जवळ जाऊन धार काढायला लागली. पण मधु दूध देण्याच्या विचारात नव्हती. ती फटाफट पाय मारू लागली.दोर तोडून जाण्यासाठी प्रयत्न करू लागली . मालतीला मधुचे मन कळले आणि तिने दूध न काढण्याचा निर्णय घेतला .ढवळीला लावायला औषधे आणली तिच्या पायला औषध लावले. आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही हलेना. मालतीने गावातील ढोर डॉक्टरचा शोध लावला. त्याच्या घरी गेली आणि त्याला तिच्या घरी येण्याची विनंती केली. त्याने घरी येण्याचे जास्त पैसे मागितले. आणि मालतीने ते देऊ केले. डॉक्टरने औषधी दिली पण पायाचे हाड मोडले असल्याची शक्यता वर्तविली. हाड मोडले म्हटल्यावर मालतीच्या पायाखाली जमीन सरकली.
काय करावे सुचेना . मात्र इकडे मधूने आपला अवतार बदलविला होता. ती कुणालाही शिंगावर घेण्यास धावू लागली .दोर तोडू लागली .ढवळीच्या पायाला लावलेले औषध चाटु लागली. वेड्यासारखा त्रास ती देऊ लागली .ढवळीला उठविण्यासाठी शिंगाचे ठोसे देत असे .ढवळी मात्र जागेवरून सरकत नव्हती .ढवळीला औषधोपचार करावा की मधूला आवरावे असे दुहेरी संकट मालतीवर आले. आदित्य मधूला सांभाळायचा आणि मालती ढवळीला .सखा आबा काही काही औषधे आणून पायाला बांधत होते. मालती झाडाची पाने, हळद उगाळून लावत होती. तरी दोन दिवसात काहीही आराम नव्हता ढवळीने जागा सोडली नाही . जखमही जास्त भरली नाही .आता मालतीच्या भिस्त देवावर लागली. ढवळीला असं पाहून मधूपण दूध देईना. हातचा पैसा औषधमध्ये गेला मधु व ढवळीसाठी घरी राहावे लागे.त्यामुळे शेताकडे दुर्लक्ष झालं . दोन चार करता करता आठ दिवस झालेत. ढवळी काही पाय उचले ना शेवटी मालतीने शेतात जाण्याचे ठरविले .मधूला शेतात दोर बांधून घेऊन निघाली. मालतीला वाटले की मधु आता रस्त्याने खूप त्रास देणार. तिने जाड दोर तिच्या गळ्यात टाकला व मधूला घेऊन निघाली .पण रस्त्याने मधूने अजिबात त्रास दिला नाही. सरळ शेतात आली. शेतात आल्यावर मान पोटावर ठेऊन डोळे बंद करून झाडाखाली बसली. जणू ती पण ढवळी च्या आजाराला थकली होती. तिच्या मनाने मान्य केले की आता ढवळी पुन्हा चालणे नाही .शेतात तिने फार कमी चारा खाल्ला संध्याकाळी सरळ घरी वापस आली. तिचा हा शांतपणा मालतीच्या मनाला घर करून गेला. मालती मनालाच समजावत होती की ढवळी आज नाही तर उद्या उठेल काही तरी करून तिला मी उठवणारच .
रोज सकाळी संध्याकाळी जाड मिठाच्या खड्यानी ढवळीचा पाय शेकणे चालू ठेवले. पंधरा दिवसात मधु पार ढासळली. तिच्या हातापायात जोर राहिला नाही. दुध देणे तर बंद केले होते. निस्तेजपणे शेतात जाणे आणि येणे एवढेच मालती व मधु करत होत्या..
एक दिवस सकाळी मालती गोठा साफ करण्यासाठी आली मधूच्या आजूबाजूला साफ केलं. मधु ढवलीला चाटत होती. पायांना जिभेची गरम ऊब देत होती. मालती सफाई करत होती आईला शोधत अदिती गोठ्या आली.अदिती मधु आणि ढवळीच्या अंगावर हात फिरवीत होती . .. खेळत होती. खेळता खेळता आदीतीचा पाय शेणावर पडला. तिचा पाय घसरला , तशी ती जोरदारपणे ढवलीच्या पोटावर पडली. आणि तिचा हात ढवळीच्या पायावर पडला. तिचा तो आघात ढवळी सहन करू शकली नाही म्हणून ती जोरात उठून उभी राहिली. ढवळीला उभी पाहून अदिती लागलेलं असतानाही जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली .आणि "आई ढवळी उठली ढवळी उठली " अशी ओरडायला लागली मधूपण काळजीपूर्वक ढवलीला चाटु लागली तो क्षण पाहून ती (मधु) हसली तिला पाहून ती (मालती )पण हसली आणि त्यांना पाहून ती (ढवळी )पण हसली .
सौ वृषाली प्रकाश खटे
9404375920
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा