Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि लक्ष्मी हसली

Read Later
आणि लक्ष्मी हसली

कथेचे नाव:-आणि लक्ष्मी हसली

विषय - आणि ती हसली 
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

"बाबा बाबा ...प्लिज मारू नका.... आईची काहीच चूक नाही".

सीमा ओरडत राहिली पण संपतरावांनी सीमाकडे अजिबात लक्ष दिले नाही.

सीमाला आज यायला वेळ झाला होता आणि त्याचा राग तिचे वडील तिची आई साधना वरती काढत होते. असेच मारून संपतराव निघून गेले.

साधनाला लग्नावेळीचे दिवस आठविले. १९९५-९६ च्या आसपासचा तो काळ होता, संपतरावांचे स्थळ साधनासाठी सांगुन आले. ते एका चांगल्या धनवान कुटुंबातील होते. स्वतः एक शिक्षक होते, त्यामुळे पटकन हा विवाह जमून आला. लग्न होऊन साधना घरी आली, आणि राजाराणीच्या संसाराला सुरवात झाली. सरकारी नोकरी मुले दोघे गावापासून लांब म्हणजे नोकरीच्या ठिकाणी राहत असत. लग्नानंतर काही दिवसातच साधनाला जाणीव झाली कि आपल्या पदरामध्ये निखारा बांधला आहे. संपतराव हे एक अजब रसायन होते, एकतर शिक्षकी पेशा, त्यात शिस्त, धाक आणि पुरातन विचार त्यामुळे बायको म्हणून प्रेम कमी पण धाकच जास्त वाटत राहिला. साधनाताई स्वभावाने मऊ आणि शांत त्यामुळे त्या शिकल्या सवरल्या असूनही नवऱ्यापुढे कधी गेल्या नाहीत. आणि संपतराव म्हणजे स्त्री म्हणजे पायातील वाहन, तिने जागा ओळखून राहिले पाहिजे अश्या विचाराची व्यक्ती. तरी हा संसार टिकला, म्हणण्यापेक्षा साधनाताईंनी टिकवला, कालांतराने या संसारवेलीवर दोन गोंडस फुले झाली ती म्हणजे मीना आणि सीमा.

सीमाने आईचे डोळे पुसले, तसं साधनाताई भूतकाळातून वर्तमानात आल्या.

"आई मी चुकले. मला माफ कर . मी वेळेत यायला हवं होत, पण उशीर झाला थोडासा.

 आई तुला राग येईल पण तू का या माणसासोबत राहतेस? अशा माणसासोबत राहण्यापेक्षा जीव दिलेला बरा. मीनाताई होती तोपर्यंत हे जरा नीट वागत होते, पण ताई घर सोडून गेल्यापासून यांची मनमानी फारच वाढली आहे."

" अगं बाळा, जीवच द्यायचा असता तर मी आधीच दिला नसता का? तुम्हा दोघींकडे पाहून तर मी इथपर्यंत आले आहे, आणि तूच जर आता असं म्हणालीस तर मी एवढे दिवस जो मानसिक संघर्ष कला त्याचा काय उपयोग? हा विचार डोक्यातून काढून टाक बघू आणि मला सांग तुला ज्या कामासाठी पाठवलं होत ते केलंस का?"

" हो, आई. तू सांगितलंस ते सगळं काम केलं आहे. उद्या आपण दोघी मिळून ताईच्या आवडीचा स्वयंपाक बनवू .इतक्या दिवसांनी ती येणार आहे तर तिला एकदम भारी वाटलं पाहिजे. "

घरची कामं आवरत आणि उद्याची स्वप्न पाहत दोघी झोपून गेल्या.

सकाळी नेहमीप्रमाणे सकाळची सुरवात झाली. संपतराव शाळेला जाण्यासाठी आवरत होते, पण इकडे सीमा आणि साधनाताईंचा चेहरा खुलला होता. काहीतरी गडबड आहे असं संपतरावांच्या लक्षात आलं पण त्यांनी सीमाला घरी राहण्याची ताकीद दिली आणि घराबाहेर पडले.

 

"ए आयडू sss "

अशी गोड हाक मारत मीना घरात आली."

"गुणाची माझी पोर ग ती,कशी आहेस बाळा? तुला आठवण येत नाही का ग आमची?"

" तायडू , तू तर मला विसरून गेलीस बघ. तुझा बाबांवर राग होता ना? मग आम्हाला का शिक्षा?

" तुम्ही दोघी मला श्वास तरी घेऊ देणार आहात का? अजून किती प्रश्नांच्या फ़ैरी झडणार आहेत इथं ?

"तू अपेक्षा केल्या पेक्षा नक्कीच जास्त फ़ैरी झाडल्या जातील इथे " असे कडाडत संपतराव आत आले.

सीमा आणि साधनाताईंची पाचावर धारण बसली.

" काय ग कार्टे ,तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाय टाकायची? आणि तुम्ही दोघीनी हिला घरात कसे घेतले? माझ्या  घराण्याची इज्जत हिने धुळीला मिळवली आणि तुम्ही हिला घरात घेतल ? आता तुम्ही दोघी पण या घरातून चालत्या व्हा. मला हि पोरगी मेलीच होती. आधी तिला घराबाहेर काढतो आणि मग तुमच्या एकेकीला बघतो.

मला जातानाच जाणवलं होत कि काहीतरी गडबड चालू आहे घरात, पण तुमची एवढी हिम्मत होईल आणि या कार्टीला तुम्ही घरात घ्याल असे वाटले न्हवते. "

" बाबा, बास , तुम्ही मला जे बोलायचं ते बोला, तुम्हाला त्यासाठी कोणी अडविणार नाही, पण या दोघीना काही बोलाल तर खबरदार ."

" तू कोण खबरदार म्हणणारी , माझ्यावर आवाज चढवणारी तू कोण? स्वतःला काय समजतेस?, दीडदमडीची लायकी नाही तुझी, एकतर पोराचा हात धरून पळून गेलीस, आमची अब्रू घालवलीस , चल चालती हो माझ्या घरातून."

" जाणारच आहे, इथं काय मुक्कामी राहायला आले नाहीये, माझ्या आईला आणि बहिणीला घेऊन जायला आलेय या नरकामधून, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतेय कि मी कोणाचा हात धरून पळून गेले न्हवते, तुम्ही माझं लग्न एका तुमच्यासारख्या सुखवस्तू घरात करून देत होता, ज्यात भौतिक सुख होत पण आत्मिक समाधान कधीच न्हवत, मला शिकून मोठं व्हायचं होत, आणि आईसारखं कधीच असल्या संसारात स्वतःला गुंतवून घ्यायचं न्हवतं म्हणून मी गेले निघून, मी शिक्षण घेतलं आणि आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. आई तुमच्यावर अवलंबून होती म्हणून तुम्ही तिचा मानसिक छळ केलात, कदाचित ती स्वतःच्या पायावर उभी असती तर तुमची मनमानी कदापि खपवून घेतली नसती. तुमचं हे रूप बघूनच मी स्वतंत्र व्हायचं ठरवलं, पण तुम्हाला सांगून मी जाऊ शकले नसते म्हणून माझं मलाच जावं लागलं. "

" काय म्हणालीस, नरक ? हा नरक आहे? अगं तुझ्या आईने तिच्या उभ्या जन्मात बघितलं नसत एवढं सुखं  मी तिच्या पदरात टाकली आहेत. घरदार, गाडी , शेतीवाडी, दागदागिने काय घेतलं नाही, कोणता सण साजरा केला नाही कि कोणती हौसमौज केली नाही, एकदा तुझ्या आईला विचार कि तिला काही कमी पडलं का?. सांग साधना सांग.

साधनाताई काहीच बोलल्या नाहीत. सीमाने मात्र पुढाकार घेतला

" बाबा, तुम्हाला काय वाटलं याच सगळ्या गोष्टी म्हणजे सुख ? तुम्ही कधी आईला  आदर दिलात,  कधी तिच्या माहेरच्या लोकांचं आणि तीच कौतुक केलंत, कधी तिने बनवलेला पदार्थ मापं न काढता आनंदाने खाल्लात ? कधी तिच्या आवडीने तिला एखादी साडी आणलीत ? कधी तिचं मत विचारात घेतलंत? तुम्ही तिला कधीच सुखी आणि आनंदी ठेवलं नाहीत , आमची तर गोष्टच सोडा,"

"मीनूताई , मी तुझ्यासोबत येणार आणि आईला पण नेऊ आपण, तू गेलीस तेव्हा आईनं सांगितलेलं 'ताई जेव्हा परत येईल तेव्हा ती तुला मदत करेल तुझ्या शिक्षणासाठी आणि इथून बाहेर सुद्धा काढेल तोपर्यंत जरा धीर धर ‘

" काय म्हणालीस तू, म्हणजे तुम्हाला माहित होत हि कोठे आहे आणि काय करतेय ते? इतके दिवस तुम्ही मला फसवलत माझा विश्वासघात केलात? ठीक आहे, जा तुम्ही , मला कोणाची गरज नाही, मी एकटा राहू शकतो, एकटा जगू शकतो, आताच्या आता निघा, तसही एवढा विश्वासघात केल्यावर तुम्हाला घरात ठेवायला मी काय धर्मशाळा नाही उघडलीये.”

तिघी देखील घर सोडून बाहेर पडल्या. आणि मीनाच्या घरी जाऊन राहू लागल्या.

**********************************************************************************

६महिन्यांनी

६ महिने संपतराव एकटे राहत होते, आता त्यांना घर खायला उठले होते, २७-२८ वर्षाचा संसार त्यांना आठवत होता, त्यांनी केलेल्या चुका त्यांना आठवत होत्या. पण आता कोणाला काय बोलणार, त्यांचे मन त्यांना खात होते, दिवसेंदिवस खूप थकल्यासारखे वाटत होते. एक दिवस त्यांना भेटायला त्यांना त्यांचा मित्र दिनकर भेटायला आला.

 

"काय रे संपत , वाहिनी आणि सीमा कोठे दिसत नाहीत, गावी वगैरे गेल्यात कि काय?"

 एकाएकी संपतरावांनी रडायला सुरुवात केली. आणि सर्व घटना दिनकरला सांगितली .

" संपत , तू चुकत होतास , तुला खूप वेळा आम्ही समजवायचा प्रयत्न कला, पण तू ऐकलं नाहीस . आता तरी ऐकशील का माझं?"

" आयुष्यभर मानभावीपणा केला, आता या वयात पण हट्ट झेपणार नाही रे मला, तू सांगशील ते ऐकतो. "

" मग एक काम कर , मला पोरी कुठे राहतात ते माहित आहे, तू जाऊन वहिनींची आणि पोरींची माफी माग, सगळ्याजणी मोठ्या मनाच्या आहेत , तुला नक्की माफ करतील."

दिनकररावांकडून पत्ता घेऊन संपतराव मीनाच्या घरी पोहोचले.

संपतरावांनी बेल वाजविली. सीमाने दरवाजा उघडला.

" तुम्ही ?, आई कोण आलंय बघ"

संपतराव आणि साधनाताईंच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं .

मीनासुद्धा आतल्या खोलीतून बाहेर आली,

" काय आहे, तुम्ही इथे का आलात? तुम्हाला आम्ही इथे आनंदात आहे ते बघवत नाहीये का?"

" पोरी, नको ग असं बोलूस, आता एवढी कटुता नाही सहन होत या म्हाताऱ्या मनाला, तू गेलीस तेव्हा पण मला त्रास झाला, पण एकटा पडलो न्हवतो त्यामुळं किंमत कळाली नाही. त्यात माझा अहंकार मोठा झाला होता. पण सीमा आणि साधनाला घेऊन गेलीस, आणि मी एकटा पडलो, मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत. चुका म्हणण्यापेक्षा गुन्हा म्हणा पाहिजेतर, मी सगळे गुन्हे कबूल करतो, मला हवी ती शिक्षा द्या तुम्ही, मी इथं फक्त तुमची माफी मागायला आलोय. साधना आणि बाळांनो  मला माहित आहेत,कि मी पुरुषी अहंकारापोटी तुम्हाला त्रास दिला आणि आनंदी ठेवलं नाही,त्यामुळं कायम तुमच्या डोळ्यात नेहमी दुःख राहील,तुम्ही मनमोकळे राहिला नाहीत आणि हसलाही नाहीत, त्या सर्वासाठी मी माफी मागतो."

 एवढं बोलून संपतराव जायला निघतात.

साधनाताईंनी त्यांना थांबवलं ,

"अहो थांबा, तुमच्या डोळ्यांत पहिल्यांदा मला ममत्व दिसतंय, इतके दिवस , इतके वर्ष मी याच संपतरावांची वाट बघत होते, आज माझी प्रतीक्षा संपली. माझं तुमच्यावर प्रेम आहे , मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार, चला आपण आपल्या घरी जाऊ."

मुली देखील म्हणाल्या

" आईबाबा , आम्हाला तुमच्या दोघांमध्ये हाच आदरभाव आणि प्रेम पहायचे होते. आज बाबांचं हे वेगळं रूप आम्हाला सुद्धा भावलं. त्यामुळं तुम्ही दोघे इथेच राहा आमच्यासोबत. "

आणि यानंतर ते चौघेही एकत्र आनंदाने राहू लागले.

**********************************************************************************

एका अहंकाराचा नाश होताच तीन स्त्रियांच्या रूपात असणारी लक्ष्मी हसली आणि एक कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी

झाले.

समाप्त 

-©मृणाल मोहिते 

जिल्हा - कोल्हापूर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mrunal Mohite

Lecturer

I am Pursuing my PhD in English. But My First Love Is Reading And Writing

//