-- आणि तिला कृष्ण भेटला

About Lord Shrikrishna


कथेचे नाव -- - आणि तिला कृष्ण भेटला
कथेचा विषय -- - आणि कृष्ण भेटला
कॅटेगरी -- गोष्ट छोटी डोंगराएवढी

"वा ! माझी राधा किती गोड दिसते आहे ."
माधवी आपल्या मुलीचे अदितीचे कौतुक करत होती.
सोसायटीत गोकूळाष्टमीनिमित्त कार्यक्रम होता.त्यासाठी माधवीने अदितीला राधा बनवले होते.

कार्यक्रमात जेव्हा अदितीने कृष्णाला पाहिले,तेव्हा तिला खूपचं आनंद झाला.
अदितीने आपल्या आजीकडून कृष्णाच्या कथा ऐकल्या होत्या. आजीने वर्णन केलेला, मूर्तीत आणि फोटोत पाहिलेला कृष्ण आपण प्रत्यक्षात पाहत आहोत , असेच तिला वाटत होते.
पूर्ण वेळ ती कृष्णासोबतच होती. त्याला सोडतचं नव्हती.
कार्यक्रम झाल्यानंतरही ती कृष्णाला आपल्या घरी आणण्यासाठी आईकडे हट्ट करत होती,रडत होती.

खरचं,

बालपण किती निरागस असतं
खरं-खोटं काही माहित नसतं
छोट्या छोट्या गोष्टीतही समाधानी असतं
निःस्वार्थ आणि निष्पाप मन असतं


नंतर आईला व आजीला तिची समजूत काढण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली.


अदितीचे घरातील वातावरण धार्मिक होते. सर्व सण-समारंभ छान साजरे होत. मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या जायच्या.आजी कृष्णभक्त होती त्यामुळे आजीच्या कथांमध्ये कृष्ण नेहमी असायचा. आणि अदितीलाही आजीच्या कथा आवडायच्या.अदितीला कृष्ण आवडायला लागला आणि
तिच्या दृष्टीने कृष्ण म्हणजे तिचा हिरोच!

आजीने तिला तिच्या वाढदिवशी कृष्णाची मूर्ती भेट म्हणून दिली होती. त्या मूर्तीसोबत ती गप्पा मारायची. बोलताना असे बोलायची की, जसे की- कृष्ण तिचे सर्व ऐकतो आहे.

लहानशी अदिती मोठी होत होती. शाळा,कॉलेज,
मित्रमैत्रिणी या सर्व गोष्टींचा आनंद घेत होती. पण कृष्णावरची भक्ती, प्रेम कमी झाले नव्हते.कृष्णावर नितांत प्रेम करणारी राधा,कृष्णभक्तित तल्लीन राहणारी मीरा समजून घेत होती.

लहानपणी मित्रांसोबत खेळ खेळणारा खेळकर कृष्ण,गोपिकांच्या खोड्या काढणारा खोडकर कृष्ण, दही,दूध,लोणी चोरणारा यशोदेचा नटखट कृष्ण.कृष्णाचे हे सर्व रूप तिला आवडत होते.

ती कृष्णाबद्दल बोलताना म्हणायची,

\"कृष्णाचे रूप पाहण्यासाठी डोळे
व ऐकण्यासाठी कान हवे
आणि कृष्णाला समजून घेण्यासाठी
खरी भक्ती व ह्रदयात प्रेम हवे.\"

तिचे वागणे,बोलणे पाहून घरातल्यांनी आणि
मित्रमैत्रीणींनी तिला \"कृष्णवेडी\" नाव ठेवले होते. आणि तिला ते आवडायचेही.

अदितीला कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजून पुढचे शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. पण आजीची ढासळत जाणारी तब्येत आणि अदितीचे लग्न पाहण्याची आजीची इच्छा यामुळे आईवडिलांनी अदितीचे लग्न करायचे ठरविले.


उच्चशिक्षित,दिसायला राजबिंडा, रूबाबदार व्यक्तिमत्त्व असणारा तेजस अदितीचा लाईफ पार्टनर झाला.

लग्नानंतर अदिती आपल्या संसारात सुखी होती. संसार करता करता तिची कृष्णभक्ती सुरूच होती.

अदितीचा पायगुण की काय, लग्नानंतर तेजसला एका मोठ्या कंपनीत वरची पोस्ट मिळाली. पण या नोकरीसाठी त्याला दुसऱ्या शहरात जावे लागले.
नवे शहर,नवी नोकरी , दुसऱ्या नव्या घरात तेजस-अदितीचा पुन्हा नव्याने संसार सुरू झाला.

सुरूवातीचे एकदोन महिने सर्व सुरळीत सुरू होते. अदितीही आनंदी होती.
पण पुढे आयुष्यात काय लिहून ठेवलेले असते हे कोणालाच माहित नसते.
तसेच अदितीच्या बाबतीत झाले.

तेजस रात्री-अपरात्री उशिरा घरी येऊ लागला. पार्टीला जाणे, दारू पिऊन येणे. हे नित्याचेच झाले.
सरळमार्गी ,साध्या अदितीला त्याचे वागणे आवडत नव्हते. तिने प्रेमाने,लाडाने त्याला समजावून सांगितले. पण तेजसने तिचे बोलणे मनावर घेतले नाही. उलट तोच तिला म्हणायचा ,
" मी जे करतो, वागतो त्याला \"स्टॅंडर्ड ऑफ लिविंग\" म्हणतात. \"श्रीमंतीचा स्टेटस\" म्हणतात.
अदितीला त्याचे वागणे,बोलणे काहीही मान्य नव्हते. तिने सासरी- माहेरी सांगितले. सर्वांनी त्याला समजावून सांगितले. पण परिणाम शून्यच!

अशातच अदितीला मातृत्वाची चाहूल लागली. खर तर हा आनंदाचा क्षण ! पण येणाऱ्या बाळाचे भविष्य कसे असेल ? तेजसचे वागणे असेच चालू राहिले तर ... अशा अनेक विचारांनी ती दुःखी व्हायची आणि आपले दुःख, विचार कृष्णासमोर व्यक्त करायची.

तेजसमध्ये काही सुधारणा तर होत नव्हती उलट त्याचे व्यसन वाढतच होते.

अदितीला प्रेग्नन्सी मुळे मळमळ,वोमीटिंग चा त्रास होत होता.

असेच एके दिवशी, सकाळपासून तिला वोमीटिंग चा त्रास होत होता.काही पचतही नव्हते. अशक्तपणा आलेला होता.
\"संध्याकाळी तेजसला बरोबर घेऊन डॉक्टरांकडे जाऊ . \" असे तिने ठरविले होते.

त्यादिवशी तेजस उशिरा आला;आणि सोबत एका तरुण मुलीला घेऊन आला. त्या मुलीला पाहून अदितीला शॉकच बसला आणि तिला काय समजायचे ते ती समजली.

अदितीने आजपर्यंत जेवढी शांतता ठेवली होती ती सर्व शब्दांतून व्यक्त करत होती. तेजसला कठोर शब्दांत सर्व गोष्टींचा जाब विचारत होती.
तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा , येणाऱ्या बाळाच्या भविष्याचा ..
नशेत असणाऱ्या तेजसला अदितीच्या बोलण्याचा राग आला , तिच्यावर हात उगारला आणि तिला घराबाहेर काढले. घराचा दरवाजा लावून घेतला.

अदितीलाही हे सर्व असह्य झाले होते. मनात अनेक चांगले वाईट विचार सुरू होते. आता जायचे तरी कुठे ? या विचारात असताना रस्त्यावर तिला एक रिक्षा दिसली.
रिक्षावाल्याला आपल्या मावशीच्या घराचा पत्ता सांगितला व रिक्षात बसली. रिक्षाभाडे मावशीकडून घेऊन देवू. असे ठरविले. तिच्याजवळ पैसेही नव्हते ,मोबाईलही नव्हता. देवावर ,आपल्या कृष्णावर विश्वास ठेवून ती रिक्षात बसली होती.


\"मुखावर अलौकिक तेज,डोक्यावर सुंदर मुकुट, मुकुटावर छानसे मोरपीस, हातात सुदर्शन चक्र असा पितांबरधारी साक्षात श्रीकृष्ण माझ्या शी बोलतो आहे,मला उठवित आहे आणि कुठेतरी घेऊन जात आहे. त्याचे हे दिव्यरूप पाहत असताना,त्याचे मधुर बोल माझ्या कानावर पडत आहे. माझ्या मनातला श्रीकृष्ण मी प्रत्यक्ष पाहत आहे....


अरे ..हे काय झाले ? ... आता तर कृष्णा माझ्या समोर होता. कुठे गेला ? माझा कृष्णा कुठे गेला ?
कृष्णा...कृष्णा..\"

अदितीच्या तोंडातून कृष्णा शब्द ऐकताच केशव तिच्याजवळ आला व तिला जागे केले.
अदितीने डोळे उघडताच ,समोर पाहिले तर... समोर रिक्षावाला उभा होता आणि ती हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली होती.
रिक्षात बसल्यानंतरचे तिला काहीच आठवत नव्हते. तिने काय झाले ? विचारल्यावर केशवने तिला सांगितले ,
" ताई, तुम्ही रिक्षात बसल्या आणि थोड्या वेळाने लगेच बेशुद्ध झाल्या. मी तुम्हांला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. डॉक्टरांनी तपासले आणि इंजेक्शन दिले.
तुम्हांला टेंशन आणि अशक्तपणा असल्याने हा त्रास झाला. आता काही घाबरण्याचे कारण नाही. पण यापुढे काळजी घेण्याचे सांगितले नाही तर बाळाला त्रास होऊ शकतो. असे सांगितले.
मला विचारले ,"तुमच्या या कोण?"
"ही माझी बहिण आहे." असे मी सांगितले.

तेवढ्यात डॉक्टर तिथे आले आणि केशवला विचारतात,
"मि. केशव,तुमची बहिण कशी आहे आता ? "

"हे काय ,आताच शुद्धीवर आली ." केशव ने सांगितले.

डॉक्टरांनी अदितीला चेक केले आणि तब्येत व्यवस्थित असल्याने घरी जाण्यास सांगितले.

काही औषधे लिहून दिली आणि सूचनाही दिल्या.

सर्व पैसे केशवने भरले आणि अदितीला तिच्या मावशीच्या घरी सुखरूप सोडले.

मावशीकडे आल्यानंतर अदितीने मावशीला सर्व सांगितले . केशवचे अदितीने व मावशीने खूप खूप आभार मानले. तो नाही म्हणत असतानाही त्याचे रिक्षाभाडे आणि त्याने केलेला खर्च दिला.

\"आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर होतो आहे.\" असे सांगून तो जाण्यास निघाला.

अदिती कितीतरी वेळ विचार करत होती,\" आपण कृष्णाला स्वप्नात पाहिले की सत्यात...
आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेणारा,मावशीकडे सुखरुप सोडणारा रिक्षावाला केशव म्हणजेच माझा सखा कृष्णच होता.माझा भाऊ झाला ,माझा सारथी सुद्धा झाला.
कृष्णभेटीच्या विचारात ती तिचा सर्व त्रास विसरून गेली. तिचे मन तृप्त झाले.
आणि तिच्या तोंडून शब्द येतात,

\"कृष्णा,अरे माझ्या कृष्णा
तूच आहे माझा खरा सखा
आज संकटातूनी वाचवून
बनला तू माझा पाठीराखा\"


अदिती मावशीकडेच राहत होती.

बाहेरचे खाणेपिणे,दारू,पार्ट्या यामुळे तेजस आजारी पडला. त्याला अदितीची उणीव भासू लागली. तिची आठवण येऊ लागली. तिचे महत्त्व कळू लागले.
संसार आणि नातं तुटण्याअगोदर ते सावरायला हवं. असे वाटून तो अदितीकडे गेला.

त्यादिवसाच्या प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशी मावशीने तेजसला फोन करून खडसावले होते.अदिती मावशीकडे हे तेजसला कळाले होते.
म्हणून तो अदितीला भेटण्यासाठी मावशीच्या घरी जातो.

अदितीची मनापासून माफी मागतो. \"पुन्हा असे करणार नाही.\" असे वचन देतो.
तेजसला झालेला खरा पश्चाताप अदितीला जाणवत होता आणि एक संधी म्हणून ती त्याच्या बरोबर आपल्या घरी जाण्यास निघाली.
मनातून तिला वाटत होते,\"ही पण माझ्या कृष्णाचीच लीला !\"